सध्या गाजत असलेल्या दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने श्री राकेश टिकैत यांचे नाव चर्चेत आले आहे. भारतीय किसान युनियनचे ते राष्ट्रीय प्रवक्ता आहेत आणि त्यांचेच थोरले बंधू नरेश टिकैत हे भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राकेश आणि नरेश ही दिवंगत महेंद्रसिंग टिकैत यांची मुले आहेत. महेंद्रसिंग यांच्या निधनानंतर डोक्याला पगडी बांधून नरेश टिकैत यांना राष्ट्रीय किसान युनियनचे अध्यक्ष घोषित करण्यात आले. हा केवळ वारसाहक्क होता, त्यात लोकशाही वगैरेचा कुठेच सुतराम संबंध नव्हता. राजकीय वारसा मिळून जसे राजकीय नेते होता येते तसेच वडिलोपार्जित हक्काने शेतकऱ्यांचा नेता देखील होता येते, याचे ठसठशीत उदाहरण म्हणून या उदाहरणाकडे बघायला हरकत नाही.
१९९० च्या दशकात उत्तरप्रदेशात शेतकरी नेते म्हणून महेंद्रसिंग टिकैत यांनी दबदबा कायम केलाच होता. शेतकरी नेते म्हणून टिकैतांना नावलौकिक प्राप्त झाला असला तरी ते मूलतः शेतकरी नेते नव्हतेच. लाखो जातबंधू सामील असलेल्या त्यांच्या जात पंचायतीचे ते मुखिया होते. जात पंचायत इतकी मजबूत कि कोणत्याही कारणासाठी मुखियाने आवाज दिला तर तर ५ तासांच्या आत २-३ लक्ष जातभाई पंचायतीत एकत्र येण्याची त्यांची परंपंरा. त्या जातपंचातीचा उपयोग करून महेंद्रसिंग टिकैतांनी किसान युनियनला आकार दिला आणि शेतकरी नेते झाले. त्या जातपंचायतीमधील सर्वांचा व्यवसाय शेती असल्याने व ते आपल्या व्यवसायाच्या भल्यासाठी एकत्र आल्याने त्या पंचायतीचा नेता असलेले टिकैत आपोआपच शेतकरी नेते झाले.
शेतीविषय हाताळायला शेतीचे अर्थशास्त्र व शेतीच्या समस्या शास्त्रीय दृष्ट्या समजून घ्यायची टिकैतांना कधी गरजच भासली नाही किंवा असेही म्हणता येईल की शेतकरी नेता होण्यासाठी जो अभ्यास लागतो, अभ्यास करण्यासाठी गुणवत्ता लागते ती टिकैतांकडे कधीच नव्हतीच. मनाला येईल तशा उटपटांग मागण्या घेऊन आंदोलन रेटने यापलीकडे टिकैतांना दुसरे काही जमलेच नाही. त्यांचा स्वभाव आणि वृत्ती हुकूमशहाची म्हणण्याऐवजी एखाद्या गल्लीबोळातल्या मवाली गावगुंडांसारखी होती. काहीही कारण नसताना बोलताबोलता निष्कारण युगात्मा शरद जोशी आणि शेतकरी संघटनेतील तत्कालीन नेते विजय जावंधिया यांच्यावर बुक्की उगारताना टिकैतांना मी माझ्या नजरेने पाहिले आहे. गावातल्या काही बायका लहान मुलावर रागीष्ट नजरेने बघून जशा दातओठ खातात, त्या क्रोधी मुद्रेत कार्यकर्त्यांकडे बघून दातओठ खाताना टिकैतांना मी अनेकदा पाहिले आहे.
टिकैत बापलेकांच्या अपरिपक्व व निर्बुद्ध नेतृत्वाच्या नमुन्याचे दोन उदाहरणे सादर करतो.
१९८९-९० मध्ये शेतकरी नेते युगात्मा शरद जोशी यांच्या शेतावरील राहते घरी महेंद्रसिंग टिकैत आले होते (चित्र क्र. १). तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बोलताना अचानक एक आगळीवेगळी मागणी केली होती. ते म्हणाले होते कि "रेल्वेतील तिकिटांचे अग्रीम आरक्षण व डब्यांचे आरक्षण पूर्णपणे बंद झाले पाहिजे. तिकिटे फक्त वेळेवरच मिळाली पाहिजे आणि सर्व डब्बे अनारक्षित असले पाहिजे." पत्रकार गेल्यानंतर या आगळ्यावेगळ्या मागणी बद्दल मी टिकैतांची भूमिका विचारली असता ते म्हणाले की, येताना आम्हाला रेल्वेची तिकिटे न मिळाल्याने आम्हाला फुकट प्रवास करावा लागला म्हणून रेल्वेतील तिकिटांचे अग्रीम आरक्षण बंद झाले पाहिजे जेणेकरून सर्वांना वेळेवर तिकिटे मिळू शकतील. रेल्वेच्या आरक्षित डब्यात आम्हाला चढू न दिल्याने आम्हाला जनरल डब्यात चढून उभ्याने प्रवास करावा लागला.... ये किसानोंका अपमान है. आमचा किसान आरक्षण-बिरक्षण नाही करू शकत त्यामुळे सर्व डबे सर्वांसाठीच खुले असले पाहिजे. यासाठी मी आंदोलन करणार आहे. (पुढे त्यांनी तसे आंदोलन केले नाही हा भाग वेगळा.)
जून २०२० मध्ये राकेश टिकैत यांनी नवीन विधेयकाचे जोरदार समर्थन करून या कायद्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील मध्यस्थ संपून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे म्हटले होते, इतकेच ही आमची "बरसोपुरानी" मागणी आहे, असेही म्हटले होते. (चित्र क्रं. २). मग चारच महिन्यात राकेश टिकैतांना असा कोणता साक्षात्कार झाला की हाच कायदा रद्द करण्यासाठी त्यांना अटीतटीचे आंदोलन करावे लागत आहे? आमच्या बोलीभाषेत अशा व्यक्तिमत्वाला "बिनबुडाचे गाडगे" असे म्हणतात. या तिन्ही विधेयकाचा MSP शी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. एमएसपीच्या आत शेतमाल खरेदी करण्यास मनाई असावी किंवा एमएसपीच्या आत शेतमाल खरेदी केल्यास गुन्हा ठरावा, इतकेच टिकैतांचे म्हणणे असते तर त्याच मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले असते. तीन कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही असे म्हणण्याऐवजी एमएसपीच्या आत खरेदी करण्यास मनाई करणारा कायदा केल्याशिवाय आंदोलन संपणार नाही असे म्हटले असते. जेव्हा जसे मनात येईल तसे बोलणे, यापलीकडे राकेश टिकैत यांचे व्यक्तिमत्व नाही.
शेतमालाच्या भावाचा प्रश्न किमान आधारभूत किंमतीशी (msp) नव्हे तर उत्पादन खर्च भरून निघतील इतके किमान भाव मिळण्याशी संबंधित आहेत इतकेही ज्याला कळत नाही त्याला शेतीविषयाचे अजिबात ज्ञान नसणारा नेता असेच म्हणावे लागेल. असे म्हणणे नाईलाज आहे कारण अशा निर्बुद्ध नेत्यांमुळे शेतीचे काही भले होण्याऐवजी शेतीचे आणखी नुकसानच होण्याची पुरेपूर शक्यता आहे.