नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
साखरबिटकी- पुस्तक समीक्षण !!
लेखक श्री श्रीनिवास चितळे यांचे अतिशय सुंदर पुस्तक साखरबिटकी हातात पडले अन एका बैठकीत त्याचे वाचन केले. वाचकांनी तन्मय होऊन जाणे ही तर त्यांच्या लेखणाची किमया! सहवासात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वभावाचे चित्रण त्यानी इतक्या सहजतेने केले आहे की जणू ती व्यक्ती आता आपल्या सानिध्यात भासावी. ओम गोविंदाय नमः मधील बन्याबापुचे वर्णन तीस इंच निधडी छाती, आयुष्यभर अनेक घरगुती सामाजिक ओझी वाहाणाऱ्या देहाने चाळीस किलो वजनाचा काटा ओलांडला नाही. रंग बुक्का उधलल्यावर असतो तसा देशस्थी वर्ण पण मेंदू मात्र कोकणस्थी, धारदार शस्त्र म्हणजे जीभ ..दशग्रंथी ब्राह्मणाचे हे सुंदर वर्णन म्हणजे चितळे काकांच्या ओघवत्या भाषाशैलीचा नमुना ! ऋषीतुल्य अंतुकाकांच्या आठवणी, सोनचाफ्यासारख्या सुगंधित फूलासारखा त्यांचा हात सदैव त्यांच्यावर आहे याचप्रमाणे अनुपमा, माधवकाका, शामा, सत्तूकाका अनेक व्यक्ती त्यांची व्यक्तीचित्रे सुंदर शैलीत रंगवली आहेत.
पन्नास वर्षापूर्वीचा काळ, त्यावेळेची एकत्रित कुटुंबपद्धती, त्यावेळच्या चालीरिती याचे वर्णन वाचल्यानंतर त्या वातावरणाशी आपलीही जवळीक होते. आमचे ही असेच एकत्रित कुटुंब, वडिलांसह एकूण चार चुलते, त्यांची मुले सर्वजण एकत्र अर्थात आता सर्वजण नोकरीच्या निम्मित्ताने बाहेर परंतु आई आणी माझे वडील यांच्याकडून यैकलेल्या एकत्र कुटुंबपद्धतीच्या गमती मी पुन्हा साखरबिटकी तुन वाचून त्यातच रमून गेलो. घरात सगळेजण एक दिलाने वागत. जेवणासाठी टेबल खुर्च्या नाहीत. जेवणाच्या पंगती प्रथम पुरुष नंतर स्त्रिया, पुरुषांच्या पंगतिला स्त्रियानी उभा राहून वाढणे. कोणाच्या ताटातले संपले का ते पाहुन वाढणे, सर्व भांडी पुढ्यात घेऊन गप्पा मारत स्त्रियांचे जेवणे सर्व दृष्ये अशीच नेत्रचक्षुःसमोर उभा राहिली. पन्नास वर्षापूर्वीच्या काळाचे हे त्यांच्या घरातील वर्णन मला स्वताला रिलेट करून गेले. आजी सुद्धा आजोबा असताना ओट्यावर यायची नाही. त्याकाळी सोपा पडवी अंगण यात स्त्रिया दिसतच नसत त्या असायच्या स्वयंपाकघर किंवा माजघरात ! हे वर्णन आम्ही ऐकले होते त्याची सत्यता साखरबिटकी वाचून पटली.
साखरबिटकी पुस्तकात चितळे काकांनी केलेले एक वर्णन मला सूखावून गेलं ते म्हणजे पास झाल्यावर, 85 टक्के मार्क्स मिळवून मॅट्रिक झाल्यावर प्रत्येकाचे त्याविषयी बोलणे. त्याकाळी कौतुक प्रत्येकाला नव्हतं असं नाही. पण कौतुक करण्याची भाषा वेगळी. सध्यासारखी तोंडभरून स्तुती केली जायची नाही. काका म्हणाले 85टक्केच मिळाले शंकरशेठ स्कॉलरशिप नाही मिळाली. वडिलांना मात्र देवाला नमस्कार करून ये म्हणताना डोळ्यात पाणी आलं. प्रेम आणी कौतुक दाखवण्याची वेगळी रीत खूप छान रिलेट करून जाते.
पूर्वी कौतुक देखील माफक असायचे. हल्लीच्या मुलांचा खरोखर हेवा वाटतो. आषाढातील पावसासारखे मार्क्स कोसळतात. आणी त्याचे कौतुक करायला किती जण ? आई बाबा आजी मावश्या मामा मामी आत्या काही विचारुच नका. पण आमच कौतुक म्हणजे काय ? एकजण म्हणायचा न्हालं का गंगेत घोडं ? जा देवासमोर साखर ठेवा. आत्या मामा म्हणायचे मार्क्स चांगले पडलेत नाहीतर शेतावर धाडले असत काका म्हणायचे मार्क चांगले आहेत पण बोर्डात येणे जमले नाही का ? एकूण काय तर कौतुक जाहीरपणे केले जायचे नाही. खूप स्पर्शुन गेलं हे. मानसं वाचायची ,निररखायची अन हुबेहुब लेखणी द्वारे कागदावर ऊतरावयाची हे कसब ही शैली साखरबिटकी वाचताना प्रकर्षाने जाणवते.
त्यांनीच सांगितलेले त्यांचे आदर्श आणी त्यांची ऐकलेली व्याख्याने, एस एम जोशी , यशवंतराव , शिवाजीराव भोसले, बाळासाहेब ठाकरे ,प्रमोद महाजन, मधु लिमये. दंडवते,चंद्रशेखर, अटलबिहारी, जॉर्ज फर्नांडिस येक ना अनेक. अश्या अनेकांच्या भाषणातून मला वाटते चितळे काकांची शैली तशीच ठसकेबाज आणी ओघवती झाली आहे.
फ्लॅट आणी वाडा संस्कृती यांचे त्यानी केलेले वर्णन खूपच सुंदर आहे. वाडासंस्कृती लोप पावून दहा बाय दहा च्या खोल्या असलेल्या वन रूम किचन हॉल मध्ये शहरात लोक राहू लागल्यामुळे जुन्या आठवणींचा विसर पडला आहे.
कोकणातील रस्त्यांचे वर्णन ही खूप सुरेख !त्याचप्रमाणे तेथील प्रत्येक रुपाचे गणपती, शिमगा आणी प्रत्येक देवांचे जन्मोत्सव हे वर्णन वाचून आपण स्वतः त्यात सहभागी व्हावे असे वाटते. कोकणातील निसर्ग वर्णन सागराचे वर्णन परशुरामभूमि तील समग्र कोकणवासीयान्चे वर्णन खूप भावले. कोकणी माणूस कष्टातुन उभा राहिला आहे. तो कष्ट करून त्रास घेऊन जगेल पण आत्महत्या करणार नाही. कोकणात नाही जमले तर मुंबईला जाऊन कष्ट करील पण कोणा पुढेही हात पसरणाऱ् नाही. साखरबिटकी या कोकणपुत्रांचे निरीक्षणात्मक अवलोकन करण्यात प्रचंड यशस्वी ठरली आहे.
कोकणाचा एक अविभाज्य भाग म्हणजे हापूस आंबा .. साखरबिटकी पुस्तकात या आंब्याचे खूप सुरेख वर्णन केलेले आहे. देवाघरचे लेणे, राजस राजकुमार मदनाचा पुतळा या भाषेत त्या राजाचे कौतुक ! मोहोर आल्यापासून आंबा दिसेपर्यंतचे कौतुकवर्णन फारच सुंदर ! आंबा कसा खावा याचे चितळे काकांनी केलेले वर्णन म्हणजे एक उत्तम प्रशिक्षण ठरावे. सुरीने काप करून आंबे खाणाऱ्या शहरी लोकांपेक्षा कोकणी लोकांचे आंबे खाण्याचे वर्णन अप्रतिम चितारले आहे.
कोकणातील पाऊस, सृष्टीवर्णन, कोकणातील रस्ते ,घरे , सण ,समुद्र ,माणसे सर्वांचे वर्णन इतके हुबेहुब केले आहे की जणू कोकणातच आपण जन्माला यायला पाहिजे होते असे वाटावं. रस्ते बसस्थानक माणसांचे स्वभाव यांचे चितळे काकांनी केलेल्या वर्णनात गुंतून रहायला होतं. 120 फूट 90 फूट असलेले रस्ते म्हणजे स्वतःचे अस्तित्व नसलेले कारण या रस्त्यावर चालताना स्पीड सरकार ठरवते. हे रस्ते म्हणजे ऑफीस मध्ये वाघ आणी घरी बायकोसमोर शेळी झालेले, गळ्यात टाय बांधून कागदी वाघ झालेले ते नुसतेच गूळगूळीत ..रस्त्यांची खरी मजा चौकात जेथे चारीकडून फाटे फुटतात. रस्तावर्णन करण्याचे चितळे काकांचे कसब खरोखर सुंदर !त्यात एस टी ड्राइवर, कंडक्टर आणी भेटलेले प्रवासी यामध्ये विशेष लक्षात राहिलेले वृद्ध आजोबा आजी आणी त्याना जागा देणारी बारा तेरा वर्षाची चुनचुनीत मुलगी. चितळे काका वर्णन करताना वास्तव समोर असल्याचा भास होतो. त्या आजोबांनी पाचशे रुपयांच्या दोन नोटा त्या मुलीच्या आईच्या हातात कोंबल्या हे देवकण .कोकणी माणसाच्या स्वभावाचे पैलू फारच सुंदर रेखाटलेले आहेत.
इतके करूनही चितळे काका थांबत नाहीत तर रामतीर्थाविषयी सुद्धा पूर्वीचे रामतीर्थ आणी सध्याचे रामतीर्थ याचे सुंदर तुलनात्मक वर्णन ही ते करतात. वाचायला खूप छान वाटते. ज्या स्मशानभूमीत जायला भीती वाटे तेथे आता स्विमिंग पुल बागबगीचा झालेला आहे. इतरांप्रमाणे कोकणही झपाट्याने बदलत चालले असले तरी कोकणी लोकांचे स्वभाव, कष्ट करण्याची वृत्ती मात्र तशीच आहे कोकणाचे असे सर्व पैलू चितळे काकांनी साखरबिटकी या पुस्तकांतून अधोरेखित केले आहेत.
साखरबिटकी असे समर्पक नाव त्यानी या पुस्तकाला दिले आहे. आम्ही घाटावर या साखरबिटकी ला 'साखरगोटी आंबा ' म्हणतो. साखरेची गोडी यात असते तद्वतच श्रीनिवास चितळे काका यांचे हे साखरबिटकी पुस्तक फारच गोड आहे. कोकणाचे सारे वर्णन ह्रुदयाला स्पर्शुन जाते, कोकणी माणसाचा अभिमान वाटतो आणी कोकणदर्शनाची उर्मी अन्तर्यामी दाटून येते.
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने