नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*वांग्यातलं घोडं*
हरियाणातील फतेहबाद जिल्ह्यातील एका शेतकर्याने अर्ध्या ऐकरात बिटी वांग्याची लागवड केली होती. एका पर्यावरणवाद्याने त्या शेतातील वांगे तोडुन तपासणीसाठी दिली इथेच वांग्यात घोडे गेले. ती वांगी बिटी बियाण्यापासुन तयार झाली असल्याची अढळुन आल्याचे प्राथमिक अहवालात सांगण्यात आले. त्या आधाराने फतेहबाद जिल्ह्यातील उप जिल्हाधिकारी व जिल्हा फलोत्पादन अधिकारी यांनी, रतिया तालुक्यातील नथवान गावातील इश्वर सैनी व त्यांचा मुलगा जिवन सैनी यांना, पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत पीक नष्ट न करण्याची नोटीस दिली. काही दिवसा नंतर कृषि विभागाच्या अधिकार्यांनी सैनी यांच्या शेतातील पीक उपटुन १० -१२ फुट खोल खड्यात गाडुन नष्ट केले.
या घटनेची इंग्रजी वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेली बातमी श्री. अजित नरदे यांच्या वाचण्यात आल्या नंतर त्यांनी मला पाठवली. आम्ही हरियाणातील भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुणिप्रकाश यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या प्रकाराची बिलकुल माहिती नव्हती. त्यांना त्या शेतकर्याचा शोध घेण्यास सांगोतले व आम्ही येणार असल्याची कल्पना दिली.
दि. १९.५.१९ रोजी मी, अजीत नरदे, ललीत बहाळे व सीमाताई नरोडे दिल्लीला पोहोचलो व २० तारखेला दिल्लीतुन बरुन मित्रांना घेऊन नथवान येथे जिवन सैनीच्या शेतावर दाखल झालो.
महाराष्ट्रात या विषय वर मोठ्या प्रमणात चर्चा सुरु झाली होती पण हरियाणात कोणाला या विषया बद्दल काहीच माहिती नव्हती. स्थानिक वर्तमानपत्रात फार काही छापुन आले नव्हते. गुणिप्रकाशजींचा एक कार्यकर्ता जिवन सैनीचा शोध घेत गेला पण त्याच्या कुटुंबातील लोक काहीच माहिती देण्यास तयार होइनात. त्या कार्यकर्त्यांने त्यांना पटवुन दिले की आम्ही पण शेतकरी आहोत व तुमच्या मदतीसाठी आलोत तेव्हा कुठे शेत दाखवले.
शेतात सैनी पितापुत्रांनी आम्हा सुटाबुटातील सर्वांना पाहुन आता काय नविन बालंट आले आहे असा विचार करत काही स्पष्ट सांगण्यास टाळा टाऴ केली पण शेवटी त्यांना विश्वासात घेउन बोलते करण्यास यशस्वी झालो.
इश्वर व सैनी पिता पुत्र यांनी ही जमीन खंडाने वहिती करण्यास घेतली होती. दरसाल एकरी ६० हजार रुपये खंड. अर्ध्या एकरात त्याने या वांग्याची लागवड केली होती. आपल्याकडे हंगामात जसे बाजारात लोक रस्त्याच्या कडेला रोपे विकण्यास बसतात तसे एका शेजारच्या गावातुन रस्त्यावर रोपे विकणार्या कडुन त्यांनी रोपे विकत घेतली होती. साधे रोप दीड रुपयाला व किड न लागणारे रोप सात रुपयाला असा दर होता. ही रोपे लावल्यास फवारणीचा खर्च खूप कमी होतो इतकेच त्याला सांगण्यात आले.
वांग्यचे पिक चांगले आले, फवारण्याही खुप कमी लागल्या वांग्याला चांगला भाव मिळत गेला पण हे बिटी वांगे आहे यांची त्याला माहिती नव्हती. कृषि खात्याने कारवाई केल्या नंतर त्याला माहिती झाली.
कारवाई करताना त्याला कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही. पुर्वी दिलेली नोटीस सुद्धा परत घेउन गेले. वांगे बिटीचे असल्याचा रिपोर्ट त्याला दाखवला नाही किंवा दिला नाही. कसलाही पंचनामा न करता कारवाई पुर्ण करण्यात आली.
आम्ही दिल्लीत पोहोचलो तेव्ह वर्तमान पत्रात बातमी झळकली होती की सैनी यांच्या शेतात पिकवलेली वांगी बिटीचे नाहीत पण जिएमचे आहेत. मग खात्री नसताना या शेतकर्याचे पीक उध्वस्त करण्याचा कृषि खात्याचा अधिकार काय? शेतकर्याला आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करण्याचा अधिकार कृषि खात्याला आहे का? शेतकर्याच्या झालेल्या आर्थिक नुकसानिची भरपाई कोण देणार? शेतकर्यावर बेकायदेशीरपणे कारवाई करणार्या अधिकार्यांवर कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गुणिप्रकाशजी यांच्या बरोबर त्यांचे सहकारी होतेच पण समाजवादी विचाराच्या इतर शेतकरी संघटनांचे नेते पण आमच्या सोबत होते. सैनी यांच्या शेतावर दोन अडीच तास व नंतर एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणासाठी गेलो असताना ४ तास या समाजवादी नेत्यांचे आम्ही बर्या पैकी प्रशिक्षण केले. ललित बहाळेंनी त्यांना स्वमिनाथन आयोग समजावुन सांगितला. दोन अडिच तास गाडीतील प्रवासात मी त्यांच्या बाकी शंकांचे निरसन केले.
या सर्व प्रकारा नंतर गुणिप्रकाश व त्यांच्या सहकार्यांची हिंमत वाढली व नेमका अन्याय कसा झाला व तंत्रज्ञान बंदी कशी आहे हे त्यांच्या लक्षात आले. शुकर्वार दि. २४ मे रोजी भारतीय किसान युनियन, या शेतकर्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेउन जाणार आहेत व "या पुढे आम्ही उघड बिटी वांग्याची लागवड करणार आहोत, हिम्मत असेल तर पीक उपटुन दाखवा " असे शासनाला अव्हाण करणार आहेत. हा भाग कापुस उत्पादक पट्टा पण आहे. यांना आर. आर. बिटी/ एचटी बिटी कापसा बद्दल काहीच माहिती नाही. आम्ही त्यांना ही माहिती दिल्या नंतर या कापसाची पण जाहीर लागवड करण्याचा निर्णय केला आहे.
दुसर्या दिवशी अजित नरदे, ललीत व बरुण मित्रा यांनी जिल्हाधिकार्यांना भेटुन सैनी यांच्या वरील कारवाईची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण जिल्हाधिकार्यांनी सरळ बगला वर केल्या व या सर्व माहिती व कागदपत्र जिल्हा कृषि आधिकार्यांकडेच आहे असे सांगितले. जिल्हा कृषि अधिकारी दोन दिवस रजेवर असल्यामुळे पुढील तपास थांबला.
सैनीने ज्या गावातुन रोपे घेतली होती तेथे आसपास बर्याच शेतकर्यांनी ही रोपे लावली असणार व त्याची रोप वाटिका पण असणार त्याचा शोध या चमुने घेण्याचा प्रयत्न केला व पुढे गुणीप्रकाश व्यपक शोध घेऊन त्या सर्वांना आंदोलनात उतरवणार आहेत.
एकुनच आमचा हा हरियाणा दौरा बर्यापेकी यशस्वी झाला. हरियाणात तंत्रज्ञान स्वातंत्र्याची बिजे रोवली गेली व एक आंदोलन उभे राहिले आहे. १० जुन ला महाराष्ट्रात सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हरियाणातुन काही सहकारी तर येणार आहेतच पण सोबत अन्याग्रसत शेतकरी इश्वर सैनी सुद्धा येणार आहेत.
लवकरच दिल्लीला एखादा कार्यक्रम घेऊन हा विषय येऊ घातलेल्या नवीन सरकारच्या दरबारात मांडयचा आहे. अकोल्यात या कार्यक्रमाची आखणी व घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रा प्रमाणेच हरियाणात सुद्धा चार महिऩ्या नंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. दोन्ही सरकारांना वाकवण्याची योग्य वेळ व संधी आहे. केंद्रातील सरकार कमजोर असणार आहे, खंदकात बसण्चे दिवस संपलेत आता शेतकर्यानी आक्रमण करण्याची वेळ आली आहे.
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.