नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सोशल मीडियावर आपण नेहमी उपासमारी, कुपोषण, गरिबी, दारिद्र्याची छायाचित्रे पाहून हळहळ व्यक्त करतो. हळहळ व्यक्त करणाऱ्यांकडे तसही दुसरा काही उपाय सुद्धा नसतोच त्यामुळे फक्त हळहळ व्यक्त करतात. परंतु या विषयाच्या खोलात जाऊन कारणे आणि उपाय शोधण्याची मानसिकता बहुतेक वेळा कोणाचीच नसते. मुंबई पुणे सारख्या महानगरातील झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या ही मूळची दुष्काळग्रस्त भागातील आहे. त्यांच्यासोबत संवाद साधला तर आढळून आले की त्यांचे पूर्वज अल्पभूधारक किंवा जिरायती जमिनीचे शेतकरी होते. रोज सकाळी शहरात मजूर अड्ड्यावर दिसणारे लोक हे सुद्धा मूळचे व्यवसायाने शेतकरीच. सततचा दुष्काळ आणि हमीभावाची नसलेली शाश्वती व त्यामुळे डोक्यावर साचलेला कधी न संपणारा कर्जाचा डोंगर शेवटी त्या शेतकऱ्याला भूमिहीन बनवून महानगरात झोपड्यात राहून मजदूर बनायला प्रवृत्त करतो. तर कित्येक शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात.
मी लहानपणापासून एक वाक्य ऐकायचो की,'काशीस जावे, नित्य वदावे'. अस म्हणायचे की मुलं नातवंड संसारात रमली की वयोवृद्ध जोडपं आपला कार्यभार मुलांच्या हाती सोपवून काशीला तीर्थाटनासाठी जातात. पण सध्या घडत असलेल्या घटना जाणून घेत असताना या मागील भीषण सत्य उजेडात आलं. अनेकदा कुटुंबातील पीक कर्जाचा बोजा, सहकारी बँकांकडून कर्ज वसुलीच्या नावे गावात केली जाणारी मानहानी, दुष्काळ मुळे होत असलेली नापिकी आणि शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव तसेच अनेक घटकांना त्रासून नातवंड आणि मुलांच्या भवितव्यासाठी घरातील वयोवृद्ध आई वडील तीर्थाटनच्या निमित्ताने आळंदी, पंढरपूर किंवा काशी येथे भिक्षा मागून जीवन जगत आहेत. बहुतेक शेतकरी काशीला प्राधान्य देतात कारण तेथे अंत्यसंस्काराचा सुद्धा खर्च नसतो आणि देवाच्या दारात मरण आलं तर पुण्य लाभेल अशी त्यांनी स्वतःच्या मनासोबत अटकळ बांधलेली असते.
मानसशास्त्रीय अभ्यास अस सांगतो की जर एखाद्या गावात एका व्यक्तीने आत्महत्या केली तर इतर त्रस्त शेतकरी सुद्धा तोच मार्ग अंतिम उपाय समजून आपले जीवन संपविण्याचा मार्ग निवडतात. परंतु या आत्महत्या काय फक्त एका गावात तालुक्यात जिल्ह्यात आहेत का? तर नाही! एकाचवेळी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश येथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग या आत्महत्यांच नेमकं कारण मानसशास्त्र ऐवजी सरकार ने अवलंबलेली शेतकरी विरोधी धोरणे आहे. उद्योगधंदे आणि बडे व्यापारी यांनी जागतिक खुल्या बाजारातील भावापेक्षा २०० ते ३०० टक्के इतका कमी भाव देऊन शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दरीत ढकलून दिलं हेही तितकं कटू सत्य आहे. अनेक वैचारिकतेने मागास असलेले विचारवंत सांगतात की आधुनिक पद्धतीने शेतीवर खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी आत्महत्या कमी करतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना भेसळयुक्त कीटकनाशके, खते, बियाणे पुरविल्याने त्यांचे कष्ट मातीमोल झाले, हा शोध मागास लोक कधी घेतील देव जाणो. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याच प्रमुख कारण आहे शेतमालाला नसेलला हमीभाव आणि त्याच वेळी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचं थोडं वेगळं कारण आहे ते म्हणजे कीटकनाशके, खते, बियाणे यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ. त्याचा परिणाम असा की औषधांचा वापर करून उत्पादन खर्च वाढला आणि शेतकरी फक्त कर्जबाजारी बनत राहिला. एकदा एक असाच तमिळनाडूचा शेतकरी शरद जोशी यांना भेटला होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु त्याने जे कीटकनाशक पिले त्यातसुद्धा भेसळ असल्या कारणांमुळे तो जिवंत राहिला.
शेतकरी आत्महत्याचं वास्तव फार भीषण आहे. देशभरातील सर्वात जास्त आत्महत्या या कापूस उत्पादक प्रदेशात झाल्या आहेत आणि आत्महत्या करणारा शेतकरी हा बहुतेक वेळा भूमिहीन नसून जमीनमालक शेतकरी आहे. खाजगी सावकारी आणि व्यापारी बँका यांच्यापेक्षा शेतकरी सहकारी बँकांच्या कर्जवसुलीने जास्त त्रस्त आहे. सहकारी बँकेचे अधिकारी वसुलीदारम्यान शेतकऱ्याची गावात दवंडी पिटवून अप्रतिष्ठा कशी होईल यावर भर देत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 'कापूस एकाधिकार खरेदी योजना' मुळासकट उखडून फेकण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक शेतकरी म्हणून आपणाला सुद्धा काही उपाययोजना करणे गरजेचं आहे. प्रथम आपणाला शेतकरी समाज संघटित करून त्यांना मानसिकरित्या खंबीर बनविले तर ते एक महत्वाचे पाऊल ठरेल आणि क्षणिक दुर्बलते मुळे शेतकरी पत्कारात असलेला आत्महत्येचा मार्ग आपण रोखू शकतो. प्रत्येक धर्मात रोज सायंकाळी देवासमोर प्रार्थना केली जाते अगदी त्याचप्रमाणे शरद जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी मिळून जर अशी प्रतिज्ञा केली की, "आम्ही बुडालो ते आमच्या चुकीमुळे नव्हे आणि या आक्रमणाला आम्ही सर्व मिळून एकत्र तोंड देऊ, खचून जाणार नाही" तर शेतकर्यांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य मिळू शकते.
हिंसा किंवा अहिंसा म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि त्याचा शेतकरी आत्महत्येबाबत कसा आपण अर्थ लावणार तर महात्मा गांधीजी यांनी म्हणले आहे की,"अहिंसा म्हणजे भिरुता नाही. भीतीपोटी शरण जाण्यापेक्षा हिंसाचार केलेला अधिक भला". या वाक्यातून महात्मा गांधी शेतकऱ्यांना नक्कीच काहीतरी संदेश देऊ इच्छित आहेत. शरद जोशी यांनी सांगितलं होतं की आजच्या काळात जर महात्मा गांधीजी असते तर त्यांनी शेतकऱ्यांना एकच सल्ला दिला असता,"शेतकऱ्यांनो, मारा, मरू नका!"
#शेतकरी_आत्महत्या_आणि_वास्तव
#माझी_लेखणी
#पंकज_गायकवाड
https:\\www.PankajSGaikwad.blogspot.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे
पाने