नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शनिवार २२ जुलै २०१७ दुपारची वेळ होती. कामानिमित्त वाघोलीला गेलो होतो. अचानक धुवांधार पाऊस सुरू झाला म्हणून आडोसा घ्यायला दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून एक छोट्या हॉटेलात थांबलो. पाऊस लवकर उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती म्हणून तिथेच एक चहा घ्यायचं ठरवलं. बाजूला आचारी गरम गरम कांदाभजी तळत होता. छान वातावरण तयार झालं होतं.
माज्याच बाजूला एक मजुराचं कुटुंब आडोशाला आलं, आई वडील व त्यांच्यासोबत अनुक्रमे अंदाजे ८ आणि ५ वर्षांचा मुलगा. आई वडील कसल्या तरी चिंतेत चर्चा करण्यात मग्न होते. दोन्ही मुले बराचवेळ खूप कुतूहलाने कांदाभजी कशी तयार केली जात आहे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. माझा लहान भाचा जसा अशा गोष्टी आवडीने मागवून खातो अगदी तसंच काहीतरी मला त्यांच्या विषयी वाटलं. म्हणून ना राहवून मी त्यांना विचारलं की बाळा कांदाभजी खाणार का? मी देतो पैसे हॉटेलवाल्याला. पहिल्याच प्रश्नात ज्येष्ठ मुलगा नाही म्हणला.
मग मी विषयांतर करत मोठ्या मुलाला कुठून आला काय करतोस विचारलं. तेव्हा तो बोलू लागला की मी अकोल्याचा आहे आणि शाळेत तिसरीला जातो. त्याच्या सोबत बोलताना जाणवलं की ते कुटुंब अकोल्याहून सततच्या दुष्काळ आणि नापिकीमुळे गाव सोडून वाघोली येथे मजुरी करत आहे. मग मी परत एकदा त्याला सांगितलं की तू मागशील ते देणार मी खाण्यासाठी. तू सांग काय हवंय या हॉटेल मधून? त्याने परत उत्तर दिलं की नकोय मला काही आणि छोट्या भावाकडे बोट दाखवत म्हणला की याला विचारा काय पाहिजे. मी लहान भावाकडे पाहिलं तर तो आईला जाऊन बिलगला. मी परत विचारलं की अरे सांगा पटकन तुम्ही काय खाणार? तुम्ही मागाल ते देणार आज मी तुम्हाला!
मोठ्या मुलाने परत नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला की आम्ही आत्ताच घरून पोटभर जेवण करून निघालोय. त्यांचं उत्तर ऐकून खरंच मी भारावून गेलो आणि ठरवलं की नको आता यांचा स्वाभिमान दुखवायला. ८ वर्षे वय असलेला मुलगा किती समंजस आणि स्वाभिमानी आहे. किती विलक्षण गोष्ट आहे की त्याला त्याच्या परिस्थितीची याच वयात जाणीव आहे. काही झालं तरी कोणापुढे झुकायच नाही हात पसरायचे नाही हा गुण जणू काही त्याच्या रक्तातच आहे असं जाणवलं.
आपला देश हा भारत आणि इंडिया या दोन विचारसरणीमध्ये विभागला गेलाय. इंडिया मधील उद्योगधार्जिन सरकार आणि बेशिस्त प्रशासन विविध फसव्या योजनांच्या नावे शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान करून त्यांना दुय्यम वागणूक देत असताना, ही अशी गुणवान मुले भविष्यात भारताचं नेतृत्व नक्कीच करतील. भारताचं भवितव्य उज्वल असल्याचं समाधान मला सुद्धा वाटलं.
जसा पाऊस बंद झाला तसा मी पटकन जायला निघालो आणि दुचाकीवर बसताना दोघांचा निरोप घेताना त्यांना स्मितहास्य केलं. माज्याकडे पाहून गोड हसत त्या दोघांनीही चटकन हात उंचावून मला निरोप दिला. त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते तेचं खरं समाधान होतं.
https://pankajsgaikwad.blogspot.in/2017/07/blog-post_26.html
#पंकज_गायकवाड
#माझी_लेखणी
#शेतकरी_पुत्रांचा_स्वाभिमान