नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
“सोसायटीचं कर्ज अन् बाप”
अर्थात
“कर्जाच्या विळख्यात शेती”
“कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या”
“सावकाराच्या तगाद्यामुळे शेतकर्याने जीवन संपवले”
“सात बारा कोरा करण्याचे शासनाचे आश्वासन”
“बैलाचा कासरा बनला शेतकऱ्याच्या गळ्याचा फास”
“पिकांवर फवारलं जाणारं औषध शेतकऱ्याने केलं प्राशान”
या बातम्या वर्तमानपत्रासांठी आणि टी. व्ही. माध्यमांसाठी आता नवीन राहिल्या नव्हत्या. मुळात टेलीविजन च्यानलचा टीआरपी, अन् वर्तमानपत्राची हेडलाईन शेतकरी आत्महत्तेशिवाय सुरुच होत नव्हती. मग कर्ज घेऊन शेती करणे पाप की काय असा प्रश्न आम्हा तरुण पिढीला पडू लागला..?
कर्जाविषयी एक प्रकारची धास्ती आमच्या मनात बसली होती.
कर्ज काढून शेती करायची की नाही? हा प्रश्न दूरच पण मुळात शेतीच करायची कि नाही हाच नवा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला होता.
काही वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.......!
तेव्हाही बापच शेती बघायचा,
हो शेती......!
कायम तोट्यात असणारी शेती........!
ती तोट्यात कश्यामुळे होती याचं उत्तर अजूनही बाप ठामपणे नाही देऊ शकला. मुळात शेतमालाला भाव नव्हता की शेती पिकत नव्हती हे प्रश्न प्रश्नार्थक होते...? आणि आजही आहे. शेतीवर कायम असणारं सोसायटीचं कर्ज बापाची रात्रीची झोप उडवायचं, म्हणून तो अवसानात कर्ज घ्यायचा, मुळात कर्जच अवसानात मिळायचं, त्यातही कापले जाणारे शेअर, वेगवेगळ्या फंडाच्या नावाखाली कपात केले जाणारे पैसे, आणि यातच सोसायटीच्या अध्यक्षाकडं लावावा लागणारा वशीला, अन् कर्ज पास व्हावं म्हणून सेक्रेटरीला द्यावी लागणारी चिरी-मिरी. याच सोबत कर्जाच्या फायलीवर-फायली, फाईलीवर-फाईली, यातच आपली फाईल धूळ खात पडू नये म्हणून कधी टेबला वरून तर कधी टेबला खालून द्यावी लागणारी लाच.
कर्ज मिळवणं जेवढ अवघड होतं त्याहूनही अवघड होत ते फेडणं.....!
त्या वेळी होणारी सोसायटीची सक्तीची वसुली आणि कर्ज फेडलं नाही तर होणारा जमिनीचा, घरा-दाराचा लिलाव यामुळे बापासगट सगळेच शेतकरी हवालदिल झाले होते. सोसायटीचे कर्जाचे हप्ते थकले होते, एक तर जमीन लिलावात जाणार होती किंवा सोसायटी भरायला विकावी तरी लागणार होती.
अवेळी पडणारा पाऊस, दुष्काळ, गारपीठ या नैसर्गिक संकटाना शेतकरी बाप वैतागला होता, पण वैतागून करणार काय......? करण्यासारखं त्याच्याकड दुसर काहीच नव्हत.
शेतीचा वाढणारा उत्पादन खर्च आणि आणि शेतीच्या मालाला मिळणारा कवडीमोल भाव. या साऱ्यामध्ये त्याला आपल्या प्रपंचाचा गाडा चालवणे कठीण बनत चालले होते, हाताला नोकरी नाही, कामधंदा नाही म्हणून गरज नसताना त्याच शेतीत कुटुंबातील गरजेपेक्षा जास्त लोक राबू लागले, यामुळे कुटुंबाचा व्याप, खर्च वाढत होता उत्पन्न मात्र तेवढेच होते. शेतीचा उत्पादन खर्च, बी-बियाण्याचा खर्च, रासायनिक खते, मजुरी, याचा खर्च वर्षानुवर्षे दिडीने वाढत चालला होता. आणि मालाला मिळणारा भाव वर्षानुवर्षे कमी होत होता. यामुळे सोसायटी, थकली होती. मग बापापुढे एकच मार्ग दिसू लागला. तो सावकारी कर्जाचा......! बाप सावकाराची उंबरठे झीझवू लागला, सावकारी कर्ज आणि त्याचे सावकारी व्याज याने बापाच्या गळ्याचा गळफास आणखी आवळल्या जाऊ लागला.
हि अवस्था माझ्या एकट्याच्या बापाची झाली नव्हती तर शेतीत राबणाऱ्या साऱ्या महाराष्टाची झाली होती. कास्तकार अडचणीत सापडला होता. आणि यातूनच मग शासनाच्या विरोधात आवाज उठवायला सुरवात झाली. कर्ज वसुली विरोधात शेतकरी संघटनेन यासाठी आंदोलन केली. धुऱ्याच्या बांधावरून सोसायटीचं वसुली पथक परत पाठवलं, शेतकऱ्याच्या रुमण्याच्या धाकानं सक्तीची वसुली थांबली, शेतकरी आपल्या घामाचा हिशोब शासनाला माघू लागला, जिल्हा बँकेनं, सोसायटीनं कापलेल्या शेअरचा हिशोब कास्तकार माघू लागले.
यातच जिल्हा बँकेचे घोटाळे समोर येऊ लागले. शेतकऱ्याचा पैसा तत्कालीन नेत्यांनी पूर्णपणे लुटला होता. याच काळात जिल्हा बँक डबगाईस आली होती, बड्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा पैसा आपल्या घश्यात घालायला सुरवात केली. सुरवात कसली...? घातलाच होता........!
आता आपले काही खरे नाही याचा अंदाज ज्यांनी या बँकेवर दरोडा टाकला होता त्यांना आलाच होता, हे प्रकरण इथेच मिठवणे गरजेचे होते. हाताबाहेर चाललेली परिस्थिती पाहून तत्कालीन शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आणि बापाच्या गळ्याच्या गळफास तेवढ्यासाठी सैल झाला.
शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला...!
पण कोरा राहील तो शेतकऱ्याचा सातबारा कसला......?
सोसायटीन पुन्हा कर्ज द्यायला सुरवात केली. नवीन सातबारा, नवीन आठ-अ, पुन्हा हैसियत दाखला, शंबरचे दोन कोरे स्टँम्प, अन् वेगवेगळ्या बँकांचे नो ड्युज........?
पुन्हा हातातली काम सोडून बापाच्या सोसायटीत चकरा सुरु झाल्या.......!
पुन्हा तीच शेअर कपात, तीच चिरी मिरी. अन् तीच लाच.......!
आणि महिना पंधरा दिवसात बापाच्या खात्यात पिक कर्जाचे पैसे जमा झाले.
तलाठ्याकडून पुन्हा सातबाऱ्यावर बोजा चढला.....!.
अन् शेती पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडली......!
पुन्हा तोच दुष्काळ, तीच गारपीट, तीच शासनाची शेतीची धोरणे, तोच शेतीचा कवडीमोल भाव, अन् तीच बेरोजगारी........!
पुन्हा वर्षा-दोन वर्षात परिस्थिती “जैसी थी वैसी” झाली.
सोसायटीच कर्ज थकलं....!
ही परिस्थिती अख्या महाराष्टाची झाली होती. शेतकरी आत्महत्त्या वाढत चालल्या होत्या. त्यामुळे वसुलीची सक्ती नव्हती.
शासनाच्या मेहरबानीने आता सोसायटीचा फारसा तगादा नव्हता. पण थकलेल्या कर्जामुळे सोसायटीची दरवाजे बंद झाले होते.
मग तेच खातं नवं जुनं करायचं, पुन्हा कर्ज खाली वर करायचं, कर्जाच पुनर्गटन करायचं..... यात कर्जाची रक्कम नकळत वाढतच चालली होती. पिकणारा माल आणि मिळणारा बाजारभाव पाहता हे कर्ज आता फेडण्याच्या अवसाना पलीकडे गेल होतं.......!
बापान ठरवलं ना या कर्जाकडं बघायचं न त्याच्या व्याजाकडे.....
यात तीन वर्ष गेली
या काळात पुन्हा बापाला शेतीसाठी सावकाराचं दार ठोठवावं लागलं......
बापाच्या गळ्याचा फास पुन्हा आवळल्या गेला. सावकारी कर्ज म्हणजे बापाच्या गळ्याचा आवळत चाललेला फास.....! सावकारी कर्ज काढून शेती करून बाप स्वतः च्या हाताने स्वतःच्या मरणाचं सरण रचत होता. सहज आणि सोप्या पद्धतीने सावकारी कर्ज उपलब्ध होत असल्या कारणाने बाप या कर्जाचा बळी ठरत होता. सरासरी महिन्याला पाच टक्के म्हणजेच वर्षाला साठ टक्के व्याज भरणे उत्पनाच्या हिशोबाने बापाला कोणत्याच बाजूने परवडण्या सारखे नव्हते.
सावकारी कर्जाचं व्याज भरण्यासाठी बापाला खुट्यावरची जनावरं विकावी लागली.
ज्या हातानं गुरा-ढोरांच शेण-पाणी करायचं, ज्या खुट्यावर जनावरांना लहानाचं मोठ करायचं, लाडानं वाढवायचं, मायेन चोपकारायचं, पोळ्याला सजवायचं, गाईच बाळंतपण करायचं त्याच हातांन खुट्याचा कासरा सोडून हि मुकी जणावरं बेफाऱ्याच्या हातात द्यायची हे दुखः किती अवघड असत हे माझ्या पेक्षा बापच सांगू शकेल.....!
कोणत्याच सावकाराचे अनैतिक कर्ज कोणत्याच शेतकऱ्याने भरायचे नाही हे शासनाने वर्तमानपत्रातून, टीव्ही माध्यमातून, प्रत्यक्ष अप्रतक्षरित्या सांगितले. कोणताच सावकार दारावर येणार नाही, आणि कोणी पैश्यासाठी तगादा लावणार नाही हे निश्चित होतं. पण बेमानी कुणब्याच्या रक्तात नाही. आपण कुण्या सावकाराकडून कर्ज घेतलं ती आपली नड होती म्हणून आपली गरज होती म्हणून. त्याचे पैसे देनं हे आपल कर्तव्य आहे म्हणून कोण्याच शेतकऱ्यानं पैसे बुडवले नाही. आणि हि सावकार म्हणजे काही वेगळी जात नव्हती. आपलेच, आपल्याच गावातले, शेजारचे-पाजारचे ते तेव्हड्यापुरते श्रीमंत लोक होते.
तशीही सावकाराची जागा आता गावातील देव-देवळे, मंदिरे घेऊ पाहत होती. वर्षाला दिडीने कर्ज देणारी ही मंदिरे गावो-गावी सर्हास राजरोसपणे मंदिराच्या पारावर व्यवहार करत होती. या देवळातल्या सावकारांवर कोणत्या नियमाअंतर्गत, आणि कोणता गुंन्हा नोंदवायचा हा प्रश्न अजूनही माझ्या सारख्या तरुणांना अनुत्तरीतच होता.
शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस सरकारी दप्तरात वाढत चालला होता.
बाप या अत्महत्तेचा बळी ठरू नये एवढंच मनोमनी वाटायचं, वावरातून यायला बापाला थोडा जरी उशीर झाला तरी जीव लागत नव्हता. चिखलवाटेच्या वावराकडे डोळे लागून असायचे. बाप घरी असला की बरं वाटायचं. झोपेतून जाग आली अन शेजारी अंथरूनावर जर बाप दिसला नाही तर मन कावरं-बावरं व्हायचं. गावात जाळणारं प्रेतही आता पहावल्या जात नव्हतं.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्तेचा वाढत चाललेला आकडा अन पुढे येऊन ठाकलेल्या निवडणुका यामुळे शासनाला काही दिवसातचकाही निकष लाऊन तत्काळ कर्ज माफीचा निर्णय घ्यावा लागला.
त्यासाठी आँनलाईन अर्ज माघवण्यात आले, आँनलाईन अर्ज भरण्या इतपत बाप अजून साक्षर झाला नव्हता....!
पण कर्जाच्या विळख्यातून बाहेर यायचं तर अर्ज तर भरावाच लागणार.
अर्ज भरण्यासाठी बाप रोज शहरात चकरा मारीत होता. पण हाताला पडलेल्या गट्ट्यामुळे बापाच्या हाताचे ठसे काही केल्या आधाराला लिंक होत नव्हते. फार्म भरण्याची तारीख जवळ-जवळ येत होती, पण रोज लायनीत लागणारा बाप संध्याकाळी तसाच घरी परतायचा, दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उम्मिदिनं शहरात येऊन लायनीत लागायचा पण काही केल्या ठसे आधाराला लिंक होत नव्हते.
आता मुळात या साऱ्यांमध्ये बापाचा काय दोष....?
हाताला पडलेले गट्टे......? की लिंक न होणार आधार.....?
कधी नव्हे तो एक दिवस बापाच्या हाताचे ठसे आधाराला लिंक झाले अन कर्ज माफीचा अर्ज भरल्या गेला. बापाला बर वाटलं. वावराचा कोरा सातबारा त्याला नजरेसमोर दिसू लागला.
दिवसामाघून दिवस गेले.
अर्ज भरल्या गेले.
कर्ज माफीच्या याद्या येऊ लागल्या. बाप रोज सोसायटीत येऊन कर्जमाफीत आपलं नाव आलं की नाही ते बघू लागला.
पण अजून काही बापाचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलं नव्ह्त..........!
मग बापाला कळालं की ते येणार बी नाय म्हणून.....!
का.......?
का तर........?
मुळात बापाचं कर्ज थकीत नव्हतंच मुळी.......!
हे तर शासनाच्या नजरेत चालू खातं होतं......!
पण अस्स कसं काय......? तीन वर्ष झाले बापानं त खातं नवं जुनं बी केलं नव्हतं....! न कोणतं कर्ज भरलं होत....!
पण मग बापान केलं नाही म्हणजे होणारच नाही असं थोडीच काही........!
हा पराक्रम केला होता सोसायटीच्या चेअरमननं सेक्रेटरीनं, शिपायानं राहेल-सुहेल साऱ्या कार्मचारी यांनी......!
आता तुम्ही म्हणाल.......!
का...? अन् कश्यासाठी....?
तर फक्त त्यायच्या पगाराची सोय म्हणून..........!
खातं नवं-जुनं करायचं.......!
कर्जाची रक्कम खाली वर करायची.....!.
वसुली शंबर टक्के दाखवायची......!
आपला पगार काढून घ्यायचा.........!.
असं सगळं काही सुरळीत चालू आहे असं दाखवायचं.......!. पण या प्रक्रियेत बापाचं कर्ज शासनाच्या नजरेत थकीत नव्ह्तं. म्हणून ते माफीस पात्र ठरल नाही.....!
पण मग हे सारं बापाच्या सही शिवाय आणि बापाला माहिती नसल्या शिवाय कसं शक्य झालं....?
तर यात बापाच्या सहीचा प्रश्न कुठे आलाच नाही....! मुळात बापाच्या सहीचे नमुने त्यांच्याकंड तसेही होतेच. आणि कोऱ्या स्टँम्पवर सह्या करून देणारा बाप..... मँट्रीक शिकलेल्या बापाची सही अवघड असून-असून किती अवघड असणारं आहे....?
बापाची खोटी सही म्हणजे सोसायटीच्या शिपायाच्या डाव्या हाताचा खेळ आहे....!
अन् सही खरी कि खोटी हे पडताळून पाहणार कोण....? आणि सिद्ध करायचं कसं.....?
शेवटी त्या सोसायटीच्या पगारापाई बापाचं कर्ज माफ झालच नाही........!
अन् बापाची शेती तशीच राहिली......!
सोसायटीच्या कर्जाच्या विळख्यात.........!
कर्जाच्या विळख्यात.........!
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
सोसायटीचंं कर्ज अन् बाप"
निलेश देशमुख सर
व्यवस्थेच्या दांभिकतेचा खरा चेहरा आपण लेखातून उजागर केला
खूप खूप शुभेच्च्छा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!