नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
१. भांडण
ऐकून झाले खूप काही
बोलता काही आले नाही
पेरता पेरता पांभरीच्या
नळ्यात अडले दाने काही ....
किती तासं पेरून झाली
कुठे नाही पडला दाना
उगवणाऱ्या कोंबाकोंबात
खाटी सल जुनी वेदना .....
पोटी मुळे जपता जपता
ओली माया सुटत गेली
डोळा पाऊस सावरताना
हिरवी साडी फाटत गेली .....
उंबऱ्याच्या काळीजकळा
रित्या उखळी घरात कांडण
उरल्या सुरल्या जाणिवांचे
भांड्याभांड्यात पेटते भांडण ....
*********************************
2.खचू नको माझ्या बापा.........
झाला अवकाळी तरी
खचू नको माझ्या बापा
बघ बांधते पाखरू
पुन्हा नव्याने हा खोपा ...
आभाळात काळा ढग
त्याच्या उरात जहर
पापी माणूस त्याच्याच
माथी फोडतो खापर ...
पापणीत दाटलेले
आसू गोठले रे त्याचे
गारा दगड फेकीत
वेडा भुईवर नाचे ...
भुई सावरेल ओटी
जरी झाला गर्भपात
रागावल्या आभाळाचा
पुन्हा धरेल ती हात ...
आले अंधारून तरी
बाप शाकारतो छत
जिचा मागावा आसरा
तीच भेगाळली भीत ...
उभा फाटतोया ढग
पुन्हा भीती पावसाची
उरी बापाच्या धसका
तरी आस जगण्याची ...
*************************************************
३..धसलं कापड .......
जाळण्या जळण
आणायला मोळी
मेराला कुपाटी
एकटीच गेली ...
तोडून लाकडं
घामाघूम झाली
सरत्या सांजेची
ओसरली लाली ....
झाडाची भीतीने
पानगळ झाली
बाहेर बांधाच्या
सरकली मुळी....
जागत्या काट्यांची
उमगता बोली
धसलं कापड
निरोपाच्या वेळी ....
*********************************************
४..खाज...
दिवसभराचे सोसत चटके
अंगावरती आसूड फटके
ढेकूळ ढेकूळ उकलताना
दबल्या दान्यात हासू लटके....
आभाळ झुलवी झुला कोरडा
आषाढ घाली पेरणीस मोढा
उंडरणा-या वासरांच्याही
शेपटींचा मग पडतो गोंडा....
झुलता श्रावण सोडतो लाज
बैलपोळ्याचा उतरता साज
जगण्यासाठी उधारी सारी
मरण मांडते वाढीव व्याज....
सोसण्यालाही चढवी साज
पेलते माती कोणते राज?
सरत्या सांजेच्या तळहातावर
उगत्या सूर्याची सुटते खाज....
रावसाहेब जाधव (rkjadhav96@gmail.com)
७०, महालक्ष्मी नगर,
एस.टी.स्टँड मागे. चांदवड
जि.नाशिक (९४२२३२१५९६)
प्रतिक्रिया
सर्व वाचकान्ना धन्यवाद!
रावसाहेब जाधव (चांदवड)
वाचकांनी प्रतिसाद नोंदवल्यास मार्गदर्शन मिळेल
वाचकांनी प्रतिसाद नोंदवल्यास मार्गदर्शन मिळेल
तरी मार्गदर्शनपर प्रतिसादाची अपेक्षा
रावसाहेब जाधव (चांदवड)
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)
पाने