दरम्यानचे काळात प्रसिद्ध माजीक्रिकेटपटू विनोद कांबळी स्टुडियोत पोचले. त्यांचेशी प्रत्यक्ष भेट होणे याचा आनंद काही वेगळाच होता. विनोद कांबळी म्हणजे माझा सर्वाधिक आवडता खेळाडू. अगदी सचीन तेंडूलकर पेक्षाही माझा जीव कांबळीमध्येच जास्त गुंतायचा. सचीनची महानता मला निर्विवाद मान्य असूनही मी कांबळीवरच जास्त प्रेम का केले, याचे उत्तर मला तेव्हाही माहीत नव्हते आणि आजही मला बिनतोड स्पष्टीकरण देता येत नाही. मात्र एकेकाळी कांबळी माझा "जीव की प्राण" होता, हे नाकारण्यातही अर्थ नाही. त्याला टीममधून वगळल्यावर मला किती वेदना व्हायच्या, हे शब्दात सांगणे कठीण आहे. सचीन नावाच्या विक्रमांच्या बादशाहने एक-एक शिखर पादाक्रांत करत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वप्नवत दोनशे धावांचा पल्ला गाठला तेव्हा सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत हे तुंबडीगीत मी उत्स्फ़ूर्तपणे लिहिले; तसे एखादे गीत कांबळीवर अजूनपर्यंत तरी माझ्या हातून लिहिले गेले नाही. मात्र यानिमित्ताने कांबळीसोबत जवळून भेटण्याचा जो योग आला तो क्षण माझ्या कायमच स्मरणात राहील.
कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात "पंचावन्नपक्वानाचा" यथेच्छ समाचार घेता आला.
योगायोग बघा, १४ जानेवारी २०१३ला मी "शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)" ही हजल लिहिली त्यातील एक शेर असा आहे.
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
आणि ................ १३ दिवसातच आयुष्यात पहिल्यांदाच अगदी तशीच वेळ माझ्यावर आली. 
 |
प्रसन्न जोशी सोबत लेखक |
मुंबईपासून माझ्या गावाचे अंतर जवळपास ८०० किलोमीटर. एवढे अंतर चालून कार्यक्रमाला जायचे किंवा नाही असा प्रश्न माझ्यासमोर उद्भवलाच नाही. कार्यक्रमाला जायचेच हा विचार आधीच पक्का झाला होता. त्यामुळे प्रसन्न जोशींची १२ जानेवारी २०१३ रोजी मेल येताच आणि प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रम १० फेब्रुवारी २०१३, रविवारला आयोजित केला आहे हे कळताच रेल्वे आरक्षण वगैरे उरकून घेतले. पण एक घोळ झाला. पुन्हा प्रसन्न जोशींची मेल आली आणि कार्यक्रमाच्या तारखेत बदल होऊन १० फेब्रुवारी २०१३ ऐवजी २७ जानेवारी २०१३ ला होणार असल्याचे कळल्याने थोडी तारांबळ उडाली. आता ऐनवेळेवर रेल्वे आरक्षण मिळेल काय, वेटींग मिळाले तर कन्फ़र्म होईल काय, सारे प्रश्नच प्रश्न. शेवटी निर्णय झाला की थेट चारचाकी वाहनानेच जायचे. भटकंती करत जायचे. कोकणात खूप खोलवर घुसायचे, तेथील जीवनशैली न्याहाळत गोवा-रत्नागिरी मार्गे मुंबईला पोचायचे. पण पुरेसा वेळ नसल्याने इष्टमित्र-मंडळींशी आणि आंतरजालीय मित्रांशी फ़ारसा संपर्कच करता आला नाही. त्यामुळे भटकंतीचा उद्देश फ़सला नसला तरी फ़ारसा सफ़लही झाला नाही.