नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नाकतोंडात नळ्या घुसल्यावर
ती कासावीस झाली
रसायनाचा मार, हवेचा दाब
श्वास गुदमरला.....
प्राण निघायला लागला...
प्राण डोळ्यापर्यंत पोचताच
तिने पापण्या घट्ट मिटल्या
प्राण अडवला, मुठी आवळल्या
तोच तोंडातून शब्द फुटलेत
देवा! ..... वाचव रे देवा!!
दुसर्याच क्षणी संचारली तिच्यात
आदी-माया-शक्ती
गर्भाबाहेर आली.... आणि
कडाडली... वीज होऊन....!
"बाबा! का संपवलंत तुम्ही मला
जमिनीवर पाय देण्यापूर्वीच?"
"विवश होतो गं पोरी मी,
मुलगा हवा होताय गं मला..."
"अन् आई तू?
तू तर जगाची जननी आहेस ना?
का घोटलास गं माझा जीव"
" काय सांगू पोरी? अगं माझ्या मताला
इथे विचारतोच कोण?
त्यांनी निर्णय घ्यायचे अन् मी
केवळ निमूटपणे राबवायचेत
याचेच तर नाव समाज आहे गं पोरी...!!"
"समाज! समाज!! समाज!!!
जन्म घेण्यापूर्वीच माझी विल्हेवाट
लावणारा समाज.....
त्या तुमच्या समाजाला आज मी
शाप देतेय....
एक वेळ अशी येईल की
पुरुष स्त्रीसुखाला पारखा होईल
लग्नाला मिळणार नाहीत मुली
बालवधूची प्रथा सुरू होईल
लग्न होऊनही बालवधू
वयात येईपर्यंत
’इंतजार’ करावा लागेल
पुरुषांना....!
गर्भात मुलगी आहे हे कळल्यावर
मागणी नोंदविण्यासाठी कुंकू घेऊन
रांगा लावून बसावे लागेल गर्भासमोर
आणि तरीही.....
प्रश्न सुटणार नाही
पांचाली संस्कृतीचा उदय होईल
मात्र तरीही काही पुरुष जीवांना
जगावे लागेल लग्नाशिवाय
स्त्रीसुखाच्या कमतरतेने ते
अर्धवेडे होतील
त्यांचे जगणे दुष्कर आणि
मरणे मुष्किल होईल
तेव्हा आई
व्याकुळ होईल तुझा हा समाज
एकेका स्त्रीजीवाच्या जन्माची
प्रतीक्षा करत......!!!"
- गंगाधर मुटे
----------------------------------
प्रतिक्रिया
शाप
खूप छान सर . अगणित कळ्यांना उमलण्यापूर्वीच तोडून टाकणारायाना दिलेला शाप .........कित्येक मातांच्या आणि सुंदर जग पाहण्यासाठी आसुस्लेल्या त्यांच्या लेकींच्या व्यथाच तुम्ही मांडल्यात ,खरच सर खूपच हृदयस्पर्शी आहे.
पाने