Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कथेचे शीर्षक - नकतीर

लेखनविभाग: 
कथा

विश्वस्तरीय लेखण स्पर्धा २०२३ 
वांङ्मय प्रकार - कथा
कथेचे शीर्षक - नकतीर 

नकतीर

सारं रान पिवळं धम्मक पडून पराटीचे पानं तिच्या पायाशी व्यथा गळावी तसे ठिबकत होते. मायच्या पायाशी लेकरायनं गहिवरून तुटून पडावे तसा पाचोळा भोवताली. वघळाच्या खालच्या डून्गीत अन्ना जुनेर पंत्याची प्यांटपायल्या वर खोसून बाभूळ रंगाचे पाय अभय होवून पुढे फेकत होता. त्याच्या पाठीवर पिवळ्या रंगाचा दमन नाव लिवलेला पंप चिकटून होता. तनावर एक एक लाथ ठेवून त्यांचे नाक त्वेषाने घासून त्यावर उजव्या हातातल्या नळीने ग्ल्याफोसेट ऊन होवून फवारात होता. कापसाची वेचनी जेमतेम सुरू झालेली. आताच पराटीची बंदी रया गेली. अजून वेचे बाकी हाये. किती मोठा गड अजून आपल्याले जिंकायचा हाये. पण त्यासाठी आपल्या जीवात जीव असणे महत्वाचे हाये. मांगलदिसा, असरका नकतीर पुरं कोड्ड गेलं. त्यात अधिक मासाची समाप्ती झाली. ते बरं झालं का आपून पिकाचे निन्दन, डवरण, फवारणी उरकून टाकली. नाई त सारं आपल्या बोकांडी बसलं असतं. शेवटी सरावन हिरवा पदर डोक्यावर घेवून सोनग्याड्यासारखा नाचत-मिरवत आला. त्यात नागपंचमी लाडू करंज्यात आनं सतूच्या पिठासंग बाऱ्या म्हणत नागव्दारात, पचमढीत गाणे गात आनंदात गेली. घरावर तिरंगे झेंडे फडकून स्वातंत्र दिन चिरायू होवो ! असं आपून म्हणत गेलो.
पण पावसाचा काही कुठंच पत्ता नाई. कुठ दडी मारून बसला कोणाले ठाव ? ह्या बाबाने एवढाही आपला अंत पाहू नये. ह्याच्यापाई दरसाली आपल्या कारजाले घोर लागतो. नुसता घोर की महाघोर ? तरी ह्यो बाबा आपल्या मनासारखा सांडत नाई. कोणत्याबी साली पाहा. आपून करतो आपल्या मनानं आन ह्यो करतो त्याच्या मनानं. चित्ल्या मनाची गोष्ट कवाच पूरी हा होवू देत नाई. कुठ ह्याची तक्रार पण आपून करू शकत नाई. का कोण्या सरकारी विभागाला सुद्धा ह्याच्यासाठी विनंती करू शकत नाई. त्यामुळे कितीबी पैसेवाला आणि सिरीमंत असला त्याची बी तीच अवस्था. जी आपली आज हाये. बरं ह्याच्या शिवाय शेवटी शेती नाई. कास्तकारायची मातीच हाये.
ह्या बाबाच्या दिरंगाईमुळे पराटीवर आधी काळा मावा मोठ्या प्रमाणावर आला. आणि मंग चिकट्याने आक्रमक होवून गर्भार कपाशीले कटरीजून सोडल्याशिवाय सुस्कारा टाकला नाई. ओलतीवाल्यायनी इरीचे काळे पाणी स्पिंकरणे सोडले. पण आपून कोरडवाहू कास्तकाराने कुठून  पाणी सोडायचे. नेहमी साला हाच घन्ट्याघोर. अण्णाजी रिकामं डपकं भरायला ड्रामाजवळ आला.
....आभाळात एकाद-दुसरा ढग यायचा आणि वाकुल्या दाखवत हिंगणघाटात जावून सांडायचा. ह्या तालुक्याच्या ठिकाणी पडणे काई गरजेचे नाई. पण ह्यो बाबा अईन बाजाराच्या दिसी कास्तकार भाजीपाला घेवून इकायला बसला का तिथे बरसतो. करतो त्याच्या रोजीरोटीचं पाणी. अनं हलवून टाकतो लककण काळीज. मंग काळजाच्या होते दोन खापा. एका जखमी खापेवर भावभाजी करुन गिऱ्हाईक मीठ चोळते. आणि दुसरीवर परस्थितीचे पालुपद लोळते.
मागे तेवडा चिकटा आला तरी आपून फवारणी केली. महागड्या अवषधी फवारल्या. किटकनाशके फवारली. काय केरं आपल्या हाती आलं. एका दणक्या पावसाचे फक्त काम होते. तो तेव्हा आला असता त मावा, चिकटा असाच जमिनधोस्त झाला असता. आता पराट्यांची अवस्था असी झाली नसती... अन्ना जरी तणनाशक फवारण्यात गुंग होते. तरी त्यांची घारीगत तीक्ष्ण दृष्टी कपाशीचे स्वास्थ निरखीत होती. त्यांना कपाशीच्या पानावर दही शिंपडल्यासारखे पांढरे ठिपके दिसून येत होते. पानाच्या खालच्या बाजूला भुरकट पांढरे चट्टे तर वरील भागात तांबडे पट्टे दिसून येत होते. काही काही आवडात तर याचे प्रमाण वाढल्यासारखे दिसून येत होते. तिथे वेगळीच कपाशीची स्थिती पाहायला मिळत होती. पूर्ण पान खालून वरुन भुरकट पांढरे दिसत होते. कुठे पाने सुकून गळलेले. तर कुठे पानाच्या कडा आतील बाजूने वळलेल्या किवा कोकडे होत असल्यामुळे त्याचा परिणाम खोडावर होवून मालधारणा कमी दिसत होती. तर काही काही ठिगळं जास्त प्रादुर्भाव असल्यावानी पाने, पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे गळलेले दिसत होते. याचा परिणाम उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून कृषीविभागातल्या काही अधिकाऱ्यांनी आमच्या शिवारात जागरूक राहून पिकाचे निरीक्षण करुन ह्या दहिया रोगाचे व्यवस्थापन करायला सांगितले होते. अन्ना आज खालून तणनाशक फवारून उद्या वरचा दहियासाठी फवारा मारणार होते. पंरतू कास्तकार जिणे पिकात अधिक इचार करत जगते. तेवाच त्याच्या आधाराने तगून त्याच्याच बाजूने उभे राहते. कारण आमच्या पिढीदर पिढीत पिकांचे, दुष्काळाचे आम्ही अथांग आघात पचवलेले आहे. म्हणून तर आमचे कुणबीपन परिपक्व बनले आहे.
दिवसाने आपली मान हळूहळू झोपेची डुलकी मारावी तशी खाली टाकणे चालू केली होती. तसेतसे कापसाचे गाठोडे तानकाट्याने अलगद खाली येत होते. कापसाचे वजन काटा अधोरेखित करत होता. तशा सूर्याच्या लालतांबड्या गोळ्याला पाठमोऱ्या होवून बाया वजन पाहत होत्या. मग अन्नाजी काट्याचे गाटोडे काढून आपल्या लोखंडी यांगलच्या दोपखी बंडीत टाकत होता. एका वहीच्या कागदावर तारीखेखाली मजुराच्या नावापुढे तीन रुपयाच्या पेनने कुसुम कापूस मांडून ठेवत होती.
“आवं, मी काय मनते ?” कुसुम आंगणातल्या चुलीत फुंकणीने प्राण फुंकत म्हणाली. तसा अन्ना शेवटचे गाठोडे कापसाच्या गंजीवर टाकत डाव्या शर्टाच्या बाहीने घाम पुसत म्हणाला, “का मनते...सांग..सटकन.”
“कुण्या, काल दिवाईच्या सुट्या लागल्या म्हणून आला. त तो मनत होता का मले वापस जायच्या आधी पैसे पायजे मनून...”
अन्ना रेटून कापूस खुमसावत होता. कुसुमचे असे आईकून आता त्याच्या कदमतालाची गती मंदावली होती. तो निमूटपणे कापूस तुडवत होता. काहीच वाच्या त्याला फुटली नव्हती. त्याने फक्त एक दृष्टी तिच्या पोळ्या टाकण्यावर केली होती. तेव्हा कुसुमने पुन्हा अन्नाला विचारणा केली, “काय झालं...मी काय मनून रायली...आनं तुमी कोणत्या ईच्यारात गुडूप हाये.”
अन्नादा आताही बोलाला नव्हता. तोंड सिवल्यागत तसाच खाली मान टाकून कापूस रेटण्यात मग्न होता. मागीलदिसा वेळेवर पाऊस आला असता. त एक फवारा वाचत होता. तेच पैसे आता कापूस तोडायले फुल नाई फुलाची पाकळी अरजली असती. फवारा मारला तवा कुठं पराटी हरखून गेली होती. तंदुरस्त दिसत होती. आपून मात्र तेवढ्यात उनाने लाहाकून गेलो होतो. लहाक उमळली म्हणून मेडीकल मधल्याच गोल्या आणून खाल्ल्या होत्या. म्हतारे मात्र पंचांग पाहून पोत्यावर बसून बोटं मोजत होती. असरक्याले म्हशीचं वाहन असून असरक्यात जोराचा पाऊस येईन. हे नकतीर कोड्ड बिलकूल जाणार नाई. असा त्यायचा पक्का अंदाज होता.
“आवं, म्या काय इचारले ? काई सांगाण का नाई ? काईचा इचार करता तुमी...थे तरी सांगा ?” अन्नादा विचाराच्या डोहातून खडबडून जागा होत क्रोधाने म्हणाला, “कायले भोकाले बोमलतेवं ?” गव्याळ्याने फना फुगवावा तशी कुसुम नाकपुड्या फुगवून चुनाला फोडणी देवू लागली. अन्नादा कापूसवाल्या बायायच्या पालवाचे गाठोडे बांधून कापसावर पिवळी ताडपत्री झाकत होता. येवढ्यात कुनाल तालुक्यावरून आपल्या पल्सरने आंगणात प्रवेशला. त्याने दिवाळीच्या बजाराचा वायरथयला मायच्या पुढ्यात ठेवला. आनं धावपळत संडासात गेला. तेवढ्या मानात अन्नादाने आपले दिवसभराचे हातपाय हांड्यातल्या कोमट पाण्याने धुवून काढले.
“आई, म्या पाह्य का आणलं...खायले ?” आपल्या मायनं तोंड भरून आपले कवतुक करावं किवा आपून त्यायची किती काळजी करतो याचे त्यांना अप्रूप वाटावे या अर्थाने कुणाल म्हणाला. तशी त्याच्या हातचे ते लाल न्युडल्स पाहून ती इट आल्यागत म्हणाली, “आरे बापू, हे कायले गेंड्र आणले. हे धड पचत नाई न काई नाई. थोडा इचार करुन खर्च करत जा. पयलेच साल असं अवसानघातकी पल्ल.” कुणाल मायचे शब्द आईकून शांत बसन असं अन्नादाले वाटलं. पण थे पोट्ट काई च्यूप बसलं नाई. “तुले काय अक्कल हायेवं...ह्या चायनीज मधली...बापाच्या राजात पायले होते कधी..” तशी अन्नादाच्या मस्तकावरची नस फुगली. आणि मनात तिने तिडीक उठवली. पोटात अपेन्डीक्सच्या गोळ्याची कळ उठावी तशी. “आबे, लेका काय बोलून रायला...याचे काई भान हाये का नाई...साल्या माय होये तुयी....जीनं तुया अक्लेले जल्म देला थे तुयी माय होये...तिचीच तू अक्कल काढते...आनं तिचाच बाप काढते...मायनं तुले लाडानं डोक्श्यावर बसवून ठेवलं...म्या नाई...तीन पैशाच्या गेंड्रायसाठी तुयी त जबान आमचे संस्कारच इसरून गेली.”
“घ्यानं...का झालं त्यानं तसं मनलं त ? मज्याकीनं मनलं असण त्यानं ? अधून मधून थो मले असाच मन्तो” पदराच्या ढालीखाली घेत कुसुमबाई म्हणाली. तसे मूठभर मास कुण्याला चढले. अन्नादाचा मात्र आता पचका झालेला होता. त्याला तिच्या सहानुभूतीचे क्षण अश्या शब्दात पाहायला मिळेल याची त्याने कल्पनाही केलेली नव्हती. मग तो माय लेकाच्या आपून आता कधीच फंदात पडायचे नाई. असे ठरवून गावात फिरायला निघाला. तेव्हा त्याच घटकाला गावातली लायीन बसलेली. तरी अन्नादाने पाऊल मागे वळवले नाई. ते पुढल्या अंधारात बुडत बुडत चालत गेले.
यंदा सोयाबीनवर गेल्या दोन तीन वर्षाधी सारखा येलोमोझ्याक डोळ्यात माती झोकून शत्रूच्या पावलाने आला होता. आमच्याच गावात नाही तर पंचक्रोशीसंगे दूर दूर मुलखात हीच बिमारी सोयाबीनवर येवून पडलेली होती. लकव्याने मानवी शरीराच्या अर्धांगाला वाळवी लागावी तशी सोयाबीनच्या हिर्व्याकंचं धना गेलेल्या, कुठे गर्भार उमेदीतल्या पिकाला लागली होती. कोलता पडावा तसे सोयाबीन आपसूक उभ्या उभ्याच वाळत चाललेले होते. एकाद्या बिमारीच्या घोराने माणूस कातडीतून सुकत जावा तसे. नुसते हाड्हाड् पिकांचे दिसत होते. कुठे काहीच तकाकी उरलेली नव्हती. तरतरी आभाळाखाली हरवलेली होती. त्राण मुळीच नव्हता. सोयाबीनला पाहून साऱ्यांचे डोये पिचपिचे होत होते. त्याला आतून भडभडून येत होतं. ह्या वावरापाई आपण सालं काई पुडं जावून नाई राह्यलो. दरसाली काई ना काई कटकट वळवळून येतच राह्यते. एकही साल म्हन्ता येत नाई का, खांडूक नसण झालं. दरसाली वावरात काई ना काई घडतच अस्ते. पाठी पोटाच्या पोक्त पोकळीत हुबक भरवनारं.
तीन चार सालाआधी हाच येलो मोझ्याक सोयाबीनवर येवून पेरलेल्या आवडात खळ्याखळ्यानं पसरला होता. ढुंगणावर फाटलेल्या पॅन्टला ठिगळं जोडून भोकं बुजवावं तसे ठिगळं येलोमोझ्याकचे पेरल्या सोयाबीनमधी पडले होते. त्यामुळे काळजात भोकं भोकं. त्याचे सुळे काळजात अजून अंगार करत होते. डोये गहिवरून वाहत होते.
गुदस्ताही काही डेंगधतुरा हाती भेटला नाई. काही पदरातलं अवजलं नाई. आणि कोणी आक्रोश मोर्चा देखिल काढला नाई. पिक विमाही भरला नाई. पेरणी-डोबणीचा खर्च, मशागतीचा खर्च, निंदनाचा खर्च, फवारणीचा खर्च आणि कोणाच्या ड्रिंचींगचाही खर्च खिशात पडला नव्हता. साऱ्यांचे त्या वर्षी खिशे फाटून काळीज गदगदून हबचक झाले होते. आपली व्यथा मांडावी कुठं ? आपला माथा फोडावा कुठं ? नांगरल्या वावरात पडावं कुठं ? असल्या दिवसात जावं कुठं ? ह्याच सवालाचा घोर ज्याच्या त्याच्या जूबानी रुतून बसलेला होता. सारेच जण आपली व्यथा परस्परांना सांगत होते. एकमेकांना धीर देत होते. त्यामुळे जरासी उभारी संचारत होती. अन्नाजी जेवण करुन ताटावरुन उठले. आणि खर्रा चघळत मागे हात करुन घरापुढच्या सिमेंट रोडवरती येरझाऱ्या मारू लागले. तसे विचार मनात येवू लागले. यंदाही मात्र हातात आलेला तोंडचा घास हिसकावून घेतला गेलेला. पोटातली भूक तशीच कासावीस होवून डोयात दाटत होती. होय तसच झालं होतं. सोयाबीन चलपाच्या अवस्थेत होतं. तेव्हा काही शिवारात चक्रभुंग्याची साथ गोसायीच्या रूपाने यावी आनं भुलवून भलतीकडे न्यावी तशी साथ आलेली होती. त्यांनी सोयाबीनच्या खोडात आपलं हुमणीच्या सुप्त माध्यमातून चक्र चालवून त्याच्या जिंदगानीला भुंगारून सोडलं होतं. त्यामुळे काही वावरात सोयाबीनने श्वास सोडले होते. कुठे कोण्या शिवारात सोयाबीन फुलोऱ्यात असतांना हुमणीच्या प्रादुर्भावाने खोडात काळी चिंगी हुमणी पाहायला मिळत होती. त्यामुळे ती रक्त शोषून घेत होती. आणि रसशोषलेल्या झाडाची अवस्था अस्वस्थ तकाकीरहीत होवून आपल्या आजाराला कंठाळून सोया स्वत:चा गळा दाबून गुदमरून स्वर्गवाशी होत होता. 
काही तणकावश्या शिवारात सोयाबीनच्या शेंगा अपरीपक्व असतानी पिवळे पिवळे ठिगळ पडून सोयाबीन हाडकुळे होवून वाळत होते. वारले जात होते. दिवस भरल्यावर वाळावे तसे. झुरणी पडून केविलवाने. हा नियतीचा खेळ सारा दोघांचाही होता. पिकांचा आणि कास्तकारांचा. यंदा फुले संगम सोयाबीनची सगळीकडे हीच बोंब उठली होती. जिकडे जिकडे हे सोयाबीन कास्तकारांनी पेरले होते. जीकडे तिकडे “आमचे सोयाबीन गेले.” असाच व्याकुळ आवाज हादरून टाकणारा आयकायला येत होता. आधीच हे सोयाबीन लेट होतं. त्यात त्याला गर्भार अवस्थेत उभार पोटावर लाथ हानून वायरसने यम सदनास धाडावे असे वाटत होते.
पण तिकडे झाडीपट्यात हे सोयाबीन पेरलं नसतानाही अशीच अफवा नातेवाईकांकडून येत होती. “आमचे सोयाबीनचे प्लॉटच्या प्लॉट गेले. वीस पंचीस एकराचे. दा बारा एकराचे. तुमच्याकडे त लय उशीराने आला हा. तुमचा कमीतकमी खर्च तरी निंगण...आमचा त थोई निंगत नाई.” असे आपले मामा फोनवर हालचालीत पिकपाणी विचारतांना सांगत होते. “पुढं निवडणूक हाये. आता तेल वाडत नाई. वाडलं त लोकं मोर्चे काडन. त्यायले पुन्ना निवडून यायचे हाये का नाई. मून तेल वाढन नाई.” मंग ज्याचं अर्ली सोयाबीन होतं. त्याले का भाव देईन. का भाव यंदा राईन. अशी चर्चा नेहमी गावात. दारात. घरात. अन् नाकपुढ्यात होत होती. सरकार कोन्तई असू द्या. गांड आपलीच मारते. आपूनच निवडून देतो. आन् आपली दमछाक हे सालं सरकार करते. अन्नादा जेव्हा अंथरूनावर पडले. तेव्हा त्यांच्या घशाला कोरड पडली होती. ते पुन्हा उठून खाटेखालच्या गडव्यातले पाणी प्यायले. कुणालकडे त्यांचे लक्ष गेले तेव्हा तो हेडफोन घालून मोबाईल छातीवर ठेवून क्रिकेट पाहत होता. ते पुन्हा सात्रीवर आडवे झाले. तसे पुन्हा विचार मनातून उभे राहिले.     
आपून फक्त नावाने जगाचा पोशिंदा. आपल्या घरात आपून फाटलेला कशिदा. आपल्या पूर्वी किती तरी सालाधी म्हणे आपला बळीराजा होवून गेला. तो खरंच प्रजेचा कैवारी होता. असा आपला बाप त्याच्या पुराणातल्या दंथ कथा सांगायचा. माय काही तरी वेगळीच सांगायची. तिने त्या बळीराज्याच्या मौखिक कथा तिच्या आई-वडीलांकडून आईकल्या होत्या. ते ती सांगायची. आपले आनाजी आपल्या आज्या पंज्या कडून वाहत आलेल्या सांगायच्या. आपापल्यापरी. आपल्या कानाले चवभारी. गावातले जुने खोडं त काई भलतच सांगायचे. पण आपल्या गावातल्या बोधपुऱ्यातला हाडके गुरजी मात्र ज्योतिबा फुल्यांच्या पुस्तकाचा संदर्भ देवून सांगायचा. हे मात्र त्या बेघरावरच्या वामणाले कवाच पटलं नाई. तो मात्र चिंचेखालच्या बामनाचेच आईकायचा.
आपून एक दिवस गावतल्या जिल्हा परिषदेच्या वावरे मुख्यधापकांना विचारलं. तेव्हा ते ज्योतीबांचेच सांगायचा. आणि दुसरा शेतकरी राजा- छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सांगायचा. बळीराज्याचा इतिहासात मतभेद जागोजागी दिसून येतात. पण कुळवाडी भूषण असलेल्या शिव छत्रपती राजांचा इतिहास अलीकडच्या काळातला आहे. तो रयतेचा जाणता राजा होता. बहुजन कल्याणकारी हितचिंतक होता. रयतेला पोटाशी लावणे. हे ब्रीद त्यांनी आजन्म उराशी बाळगून स्वराज्य स्थापन केले.
आज मात्र आपल्या वास्तवात अठरापगड जातीचे पुढारी नेते पाहायला मिळते. पण आजही शेतकरी नेता एक अपवाद वगळता. कुठे पाहायला मिळत नाई. त्याच्या भरोशावर खावून खावू त्याच्या बापाचे काय देवू. हीच वृत्ती सगळीकडे फोफावलेली दिसते.
शेतकऱ्याचे दुसरे नाव बळीराजा आहे. ते फक्त वर्तमानाले नाकीनव येवून त्याने बळी जावे. एवढेच ! कारण, यंदा आपली अर्ली वेरायटी असून आपल्याले अर्ध्याअर्धीही उत्पन झालं नाई. सालाच्या मानाने किमान खर्चही निगाला नाई. तीन चार पोते हे काई उतारी होये का ? कोणाची चांगली काईची जमीन हाये. त्यायलेच एकांद्याले पाचचा यावरेज भेटला. बाकी लेट वेरायटीवाले त उभ्या उभ्याच मेले. आता पिक विम्याचे पैसे सरकार कोणा कोणाले देईन. घरामागच्या थ्या वातूबुवाले त पोरंच नाई. भाऊ बंदही नाई. दोघेच बुढा बुढी राहते. त्यायची कुस त कवा उजवलीच नाई. आपल्यालेच थे पिकपेरा भरायची अॅप्स पह्यले समजली नाई. किती तरी दा आपून हैराण झालो. हबचक झालो. निऱ्हा दिमाख खाल्ला सालीनं. आपल्या सारख्या पोक्त दिमाखवाल्यायचे तोंड फेसाटून गेले. पिकपेरा अॅप्स मधून भरता भरता. त थ्या म्हाताऱ्या बुड्याने कसा कोठून भरला असन. पिकपेरा.
सरकारनं सारं डिजीटल केलं. हे चांगलं केलं. घरूनच सारी काई माहीती पुरवाची सोय करून सारे कामं हलके केले. परंतु अशा म्हताऱ्या मानसायसाठी जूनीच आफलाईन पध्दत ठेवा लागत होती. तसं जाहीर करावं लागत होतं. का म्हाताऱ्यांसाठी पटवारीकडे भरण्याची सोय केली म्हणून. आता थो वातूबुढा गेलाच होता ना शेवटी. पटवाऱ्याकडे. लय लय थ्या आबाजीनं त्याले मिनत्या केल्या. हात जोडले. पाय धरले. शेवटी थो जातीवर येवून त्यांने विकलीच स्वत:ची लाज. जनाचीही नाई ठेवली. न् मनाची विकून घेतली बुढ्याकून लाच. लावलं हजार पंधराश्याले चंदन. आता केवढ्याची पडली गंमत. सालं सरकार सामान्याची दरवेळा गमंतच पाह्यते. सामान्य माणूस करू शकत नाई म्हणते का तर. कॉलेजच्या पोट्यानं स्कॉरलशिपचा फॉर्म समजून भरला नाई त त्याले कॉलेज फी पूरी भरा लागते. तसी गत सरकार दरवेळी आपल्यावर आणते. आता काहींचे सोयाबीन बंदेच गेले. काही तीन भाग गेले. काहींचे अर्धे गेले. काहींचे एकट दुकट फनताडे वाळून पाव भाग गेले. आता यायनं हेडंबे वालायले पंधराशे रुपये सोयाबीन काढायला द्याचेय. यंदा त ट्रयाकटर वाल्यानेही एकरी सोयाबीन असन त पंधराशे लावले. मंग पोतंभर कावून होत नाही सोयांबीन. त्याचं त्याले का करायचे आहे. आणि सोंगाचे जमा कराचे साडेतीन हजार. म्हणजे गेलं पाच हजाराच्या घरात. सोयाबीनले भाव किती ? तीन-साडे तीन. मंग का धतुऱ्या अवजन हाती. एक दीड पोतं याच्यातच गेलं. मंग उरलंच किती ? ह्या पिकाच्या भावापाई आपून मेटाकुटीले येवून गेलो. दीड वाजला तरी अन्नादाचा डोळा लागला नव्हता. सारखा विचाराच्या घोरात उशाशी घोर घेवून पडला होता. शेवटी कसा बसा इकडून तिकडून कूस बदलवत त्याचा डोळा लागलेला.
 
दिवसाचा कोबंडा आरवला तशी कुसूमताई रोजच्या कामात गुंतून गेलेली. भांड्यांचा नाद, सृष्टीची किलकिल त्याच्या कानी जात होती. अन्नादा मात्र उशीरा डोळा लागला म्हणून तो साखरझोपेत गाढ बुडून गेलेला. आज कसे काय अजून हे उठले नाई. दिवस वर वर मान करत हाये आन् हे झोपूनचं हाये ? "आवं कुण्याचे बाबा, उठा न...दिवस निंगला ?" आपल्या दंडाले मगापासून कोणी तरी गदागदा हलवून रायलं. म्हणून त्याने किलकिल्या नजरेनं नाकाच्या रेषेत पाहीलं. तर विसकटलेल्या केसांची बुकरीली कुसूम त्याला दातावर बोट ठेवून दिसली. तेवढं तिच्या भरलेल्या काळ्या तोंडाकडे पाहून त्याने पुन्हा किलकिलले डोळे चिकटवले. त्याचं असं आळशी होणं हे तिच्या सवयीचं होतं. मग तिने त्याला काकड आरतीची आठोन करून दिली. तसा तो खाडकन आळस झडकारत उठला. आन् रोजची विधी करायला विधीच्या मार्गी लागला. कुसूमने अदरक, गुळाच्या चहाचे आंधन एचपी गॅसवर ठेवले होते. एवढ्या मानात अन्नादा आंघोळ करून काकड्यात जायला तयार होवून आलेला. तिने त्याला चहा देवून रात्रीची आठोन व्हावी म्हणून होठांनी कालची चाळवाचाळव केली. तसा तो त्यावर काहीच बोलला नाही. तोंडाले कुलूप लावून विठ्ठल रक्मिनी देवस्थानाकडे चालता झाला. डोक्यावर आभाळ जरासं फिक्कट लाल-सोनेरी आणि करडं होतं. त्याला पंखावर घेवून पाखरे वारीत निघालेले दिसत होते.

जय जय राम कृष्ण हरी.....चा जयघोष होवून रूप पाहता लोचनी...सुख जाहले वो साजणी... म्हणत अन्नादाने काकड्याला सुरवात केलेली होती. मनपाखरू सारखं त्या चाळवाचाळवीच्या दाण्यावर  भिरभिरत होतं. त्यांची अभंग म्हणायची पाळी आली तरी तो त्याच कालच्या मागणीत रूतून गेलेला होता. हे सारं मनात सुरू होतं. पण अन्नादाच्या हातकानाला टाळ मृदुंगाची सवय झालेली होती. म्हणून तर तो शरीरानं काकड्यात होता. पण विचारानं बायकोच्या पोरासाठीच्या मागणीत रूतलेला. चिखलात फसावे तसा. दिवाई तोंडावर आली. किराना-खरेदी बाकी हाये. अजून बीजंले पोरी आन् बयनी येईन. तवाचा त्यांच्या कपड्यालत्याचा खर्च बाकीच रायला. आता आपून पोराच्या ट्रेनिंगसाठी विस हजार त्याला देले नाई त त्याचे बी. टेक. अॅग्री कोण्याकामाचे. अन्ना विचार करत कोरस देत होता. मगा ह्या अशाच घोरानं त्याने बाजूच्याला अभंग म्हणालायला लावला होता. त्याचे ते संपून आता अन्नादाला एक रचना सादर करावयाची होती. त्याच्या ओठी आज शब्द गोठून गेलेले होते. तरी पण त्यांनी मनाचा मोठेपणा करुन गायला सुरवात केलेली होती.
अन्नादा रमेश लाडेच्या दारी त्याच्या सोबत आला; तेव्हा सकाळचे सात वाजून पाच मिनटे झाले होते. असे रमेशभाऊच्या दारातून समोरच्या विट भिंतीवर टांगलेल्या अजंता घड्याळीत दिसत होते. तेव्हा त्याला वाटलं, आपून रमेशभाऊच्या घरी चहा पित बसलो त कापसाचे मजूर कापूस येचाले चालले जाईन. आन् आपल्याले पुन्ना नासुकल्या कापसाचे फडके घेवून पेट्रोल जारत वावरात जा लागन. त्या पक्शा चहाच्या भानगडीत पडण्यात आपलं भलं नाई. इथुन असच निगून गेलेलं बरं ! तसा तो बसल्या दिवानवरून उठत रमेशभाऊले घाईगडबडीत असल्यावानी म्हणाला, "रमेश, चालतो मी...मले कापसाचे पालवं बायायले द्याचे हाये." आत किचनच्या दिशेनं हलका वरडत, "वयनी च्या नोका मांडू....माह्या पुरता." म्हणत निघायचा तसा रमेशभाऊने त्याचे मनगट धरले आणि स्वत:कडे वढत,  "एक महत्वाची गोष्ट तुले सांगाची हाये ?” असा म्हणाला. तरी अन्नादा बिलकुल थांबला नाही. पुढे चालत मागे वळून म्हणत होता, "संध्याकाई सांगजो...मंग कालच्यावानी बसू." तसा रमेशभाऊ त्याच्या घाईने जाणाऱ्या आकृतीकडे पाहत बसलेला.
 
"पप्पा, मले ट्रेनिंगसाठी वीस हजार रूपये पाह्यजे..आईनं सांगतलं तुमाले. पण तुमी काई हो नाई तिले सांगितलं नाई." कुणाल B4U Music चॅनेलवर गाणे पाहात एक एक घास टिव्हीत डोळे घालून घशात ढकलत होता. मागे त्याने नागपुरवरून येसरचे लॅपटॉप तीस हजार रूपयाचे आणि डीजे सारखे गाणे वाजवायला सात हजाराचे बेस्टॉन कंपनीचे टॉवर होम ठेटर आणले होते. तेही आता दनदन वाजत होते. अन्नादाच्या पायाखालची जमिन हादरत होती. त्याला ती सरकल्यावानी वाटत होती. त्याचप्रमाणे, आपल्या कारजात ह्या होमटेटरच्या रीदमने कळेचा गोळा उठत हाये का काय ? असंही त्यांना वाटत होतं. करंजीचे पानं सोसाट्याच्या वाऱ्याने हलावी तसी त्यांच्या हृदयाची गती वाढत असल्याची जाणीव त्यांना होत होती. आपल्याले अटॅक त नाई येईन ? या भितीने त्यांनी ते टेटर होमटेटरची बटन बंद केली. तसा कुण्या वरणभातभाजी कालवत चिरकत वसकावून म्हणाला, "रावू द्यानं...कायले बंदं केलं...कानाचे पडदे फाटून रायले का ?" मगा पोराने आपल्याला पैशाची मागणी घातली. तेव्हा तो नरमाईनं बोलला. आता त्याचे मन ज्यात गुतून हाये. ते आपून बंद केलं. त तो बोकारून बोलला. काय मनावं या वृत्ती प्रवृत्तीले ? मगा रमेश फोन करून आपल्याले खरच म्हणत होता, "तुया, कुण्या आधी सारखा रायला नाई."
काल कुणालला रमेशभाऊने गावाच्या शेल्याले असलेल्या जि.प. शाळेत फोनवर बोलतांना पाहीले होते. पलीकडून त्यांना कोण बोलत आहे. हे त्यांच्या आधी ध्यानात आलं नाही. परंतु अलीकडून कुणाल बोलत होता, "आपून दोन दिसा आधी वर्धेला न जाता नागपूरले जावू...त्या गुलाबी यरियात जावून एकदा गंगा-जमुना पाहून घेवू....म्या माह्या मायले सांगलं का मले वीस हजाराची गरज हाये...हरीयानाले ट्रेनिंगले जायचं हाये म्हनलं..नाई बे...माही माय माह्या फेव्हरची हाये...म्या हट्ट केला का थे कसी बी करून पुरी करते माई इच्छा ! आबे, हो हो ! जमलं त मी पुन्हा दोन चार हजार वडाचे प्रयत्न करतो...माहा बुडा जरासा कडक हायेनं म्हणून...चाल ठीक हाय मंग...ठेवतो." हे सारं कुणालचं संभाषन ऐकून त्यांना कुणाल नेमका कुठं चालला. याचा संदर्भ लागत नव्हता. त्यासाठी आज अन्नादा सायंकाळी भेटला म्हणजे हा संदर्भ स्पष्ट होणार होता.
...अन्नादा विचारात हरवून दवाखान्याची तयारी घाई घाई करत होता.

दरम्यान कुण्याने बंद केलेलं होमटेटर चालू करून पूर्वी पेक्षा आवाज केलेला. त्यामुळे आता कानपटं बसवण्याऱ्या दनदन अगाजाने अन्नादाच्या इचार प्रक्रियेत मीठ सांडून त्यांना ते खारडखारड केलं होतं. त्यांना नकोसं वाटत होतं. यावेळेस मात्र त्यांनी ठंडं राहून होत आलेली तयारी वाटेला लावली होती. ते डिसकव्हर घेवून दवाखान्यात निघाले होते. बऱ्याच वर्षापासून त्यांना चुंबळीची मुळव्याध उठता बसता हैराण करत होती. आतून बुडाले छळत होती. झाडपत्ती, अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी  घेवून सारं काही खावून उघड्यावंर पडलं होतं. तरीही त्यांना तीळमात्र आराम नव्हता. कुणी तरी दोन महीन्याधी त्यांना बंगाली डॉक्टर एकमेव शंभर टक्के आराम पडणारे अवषीद देते म्हणून कळवलं होतं. तेव्हा पासून अन्नाजी दर महीन्याच्या तीन तारखेला दवाखाण्यात जात असे. आजही ते वर्धेच्या दिशेने रवाना झाले होते.
शेतात कापूस येचायला बाहेर गावचे मजूर असल्याने अन्नादाच्या माघारी कुसूमताई वावराकडे निघाली होती.
आई वडीलांच्या माघारी कुणाल एकटाच घरी. त्याने घराचे दार लावून घेतले. लॅपटॉपवर सिनेमा लावून आपल्या कॉलेज बॅगमधून सिगरेट होठात धरली. लायटरने शिलगावली. दमा दमानं तो धुळाचे झुरके टिनाकडं सोडू लागला. मग त्याने एक कॉल केला. विवो वाय सेवन काळा मोबाईल कानाले लावून भिंतीच्या कानी आयकू जाणार नाही अशा आवाजात तो बोलू लागला, "आबे अव्या, भेटले का घरून पैसे...साल्या माह्यासाठी दोन चार हजार अगावू घेजो...नाई बे लवड्या...माह्या बाप मोठा कंजूस भोकाचा हाये...हो हो...मंग तुये देतो...भाऊबिजेच्या पाडवाच निंघू आपण...हो हो..तिथून दोन दिसानं आपल्याले अकोल्यावरून इसारले पोहचाचे हाये...म्हणून म्हणलं पैसे अगावू घेजो...मैयना काडाचा हाये...चाल मंग ठेवतो...रश्मीचा फोन येवून रायला." म्हणत त्याने फोन कट केला.
कुणाल रोडे बारावीत ७५ टक्के घेवून पास झाला होता. तेव्हा तो सेंटरला द्वितीय आणि गावातून प्रथम आला होता. अन्नाजी आणि कुसुमताईच्या आनंदाला थांग उरला नव्हता. येवढा गगनात मावेनासा आनंद त्यांना झाला होता. आपून जे आयुष्यात शिकू शकलो नाई. ते आपून पोराले शिकवू. रोडे घऱ्यान्याचे नाव या वेलाने आसमंतात नेवू. असे ते घरी दोघे आपापसात म्हणायचे. त्यांनी मग एकदा पोरापुढे दोन शिक्षणाचे पर्याय ठेवले. त्यात एक B.sc.agri आणि दुसरा B.tech.agri. त्याला त्याच्या सरांकडून दोन्ही क्षेत्रातले भवितव्य आणि संध्या कळाल्या. तेव्हा त्याने B.tech. agri. करायचे ठरवले. त्यासाठी त्याला सीईटीच्या परीक्षेत ९० टक्केच्या वर गुण मिळवायचे होते. अन्नादाची भूक आणि झोप मात्र नाहीशी झाली होती. त्यांनी आडाचे देड करुन त्याला त्याचे कोचींग क्लास वर्धेला काटकर सर जवळ लावून दिले होते. तेव्हा कुण्यानेही वडिल्याच्या घामाच्या दामाची चीज करुन ८८ टक्के मिळवलेले होते.
जेव्हा तो डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात प्रवेश घेवून अन्नादाच्या स्वप्नाच्या पहिल्या पायरीवर उभा होता. तेव्हा अन्नादाच्या डोयात आनंदाश्रू उभे होते.
यंदा कुणाल चौथ्या सेमिस्टरला होता. आता त्याला नॉर्थन रिजन फार्म मशनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टीट्यूड, इसार ; हरियाणा. येथे ट्रॅक्टरच्या ट्रेनिंगला आणि त्याच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अभ्यासाला जायचे होते. त्यासाठी त्याला मेस, ट्रेनिंग, रेल्वे तिकीट आणि दर विकला विशिष्ट ठिकाणी प्रवास करायला वीस हजाराची रक्कम पाहीजे होती.
त्यात त्याचे घर शेतीवर अवलंबून. खरीपातील सोयाबीनने हातात येवून हातावर तुरी ठेवल्या होत्या. त्याच विवंचनेत अन्नादा रात्रनदिस घोराने व्यथित होवून चीमलेल्या तोंडाने राहत होता.

रात्रीची वेळ. अन्नादा जेवायला बसला. तेव्हा कुणालने पुन्हा पैशाची गोष्ट काढली. त्यावर अन्नादा काहीच बोलाला नव्हता. निमूटपणे एका खाण्यावर असलेला दा अध्याशासारखा भकाभका ताटावर तुटून गास गिळत होता. रमेशभौच्या घरची मिटिंग अटेंड करुन तो आलेला होता. रमेशभौने त्याला कुणालची हिस्ट्री वर्तवली होती.
मागे पोळ्याच्या वेळेस तो जेव्हा गावाला आला होता. तेव्हा तो तान्हा पोळा पाहायला रेल्वे सिंदीला गेला होता. मात्र परत येताना जामच्या अशोका हॉटेलमधी मटन वैगरे त्याने खाल्ले होते. येवढेच नाई तर त्या सिंदीत त्याला कुठून मोहाची मिळाली. तिनेही सोबत्यायसंग त्याने आंघोळ केली होती. आणि मग तिथल्या प्रत्येक नंद्यायपुढे त्याची ग्यांग बेदम थिरकली होती. त्यात त्याने कुण्यातरी एका मुलीच्या नित्म्बाला थाप मारलेली. त्या वेळेस तिथे बरच काही घडायच्या आधी गर्दीची वाट धरून निस्तारलं गेलं. सारं प्रकरण थुंकून इथेच त्याची चव बेचव करायची. असं त्याने ठरवून गावात आपली बोंब होवू नये. म्हणून सर्वांना पुन्हा दारू आणि मटन खावून पिवून दबेल केलेलं होतं. हे सार आज अन्नादाच्या कानी रमेशभाऊने टाकलं होतं. म्हणून ते फक्त आता जेवायच्या नादात होते. लेकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन. कारण त्यांना त्याचा भयानक राग आलेला होता.
वडीलाचे अबोलणे त्याला शेवटी अनावर झाले. तेव्हा दात रगडून अन्नाजीला म्हणाला, “मी काय मनून रायलो. काई लक्ष नाई का..माया बोलण्याकडे ?” तसे पुन्हा अण्णाजी गपगार. मग तोच पुन्हा अजून जोरात ज्वालेसारखा भडकत म्हणाला, “बयरे हाये का जी तुमी...मी मन्गानपासून का मनत हाये...काई हो नाई त सांगा.” तशीच कुसुमताई भांडे गोळा करत नवऱ्याला म्हणाली, “आवं, डोक्स जाग्यावर हाये का नाई...थे पोर्ग जेवाले बसलं तई पासून तुमाले काई तरी मनत हाये. काई तरी बोला ?” तसा अन्नादा खऱ्याची पन्नी प्यान्टच्या खिशात टाकत बावरून म्हणाला, “का होयेवं तुयं...लागते पैशे त जाणं म्हणा कामाले...लोकायच्या पोरायवानी. मंग करत जाय म्हना शौकं. माय बापाच्या माथ्यावर शान कोणीई मारते.” कुणालच्या चेहऱ्यावर बापाचे असे तिरकस बोलणे आईकून तरारून घाम फुटला होता. यायले कोणी आपले शौक सांगितले. आज आपून सिगरेट त पेतानी नाई दिसलो. का यायले मान्ग्चे पोऱ्याचे समजले. त्याच्या हातापायांना कंप सुटला. थरथरीने त्याला वेढून टाकले होते. तरी त्याला वाटले, हे बाबांनी अंजदाजे फेकलेले फासे असेल. मग तो बळ गोळा करत प्रश्नार्थक म्हणाला, “कायचे म्या शोक केले ? कोनं तुमचे कान भरले ? आता माही ट्रेनिंग पाहून कोण्या लवड्याने घरात आग लावून.” लेकाचे असे अपशब्दात बोलणे आईकून भांडे विसळत कुसुम बाहेरून म्हणाली, “काय दारू पेवून आले कावं...आपल्या कुण्याले तुमी का बाकीच्या लंडूऱ्यायवाणी समजून रायले का..काय ?”
अन्नादा कधी बी लेकाले झ्यापाला लागला की कुसुमताई मधात चम्मच फिरवायला यायची. आताही ती येवून तिने चम्मच फिरवला होता. मायच्या लाडापाई आपला लेक वाम मार्गाने गेला असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांनीच शहाणापणाने आपली बाजू मागे घेत कुण्याला दोन शब्द सांगितले, “अरे, येवढे तुले आमी पैशे लावून देवून रायलो आनं तू असा उडवू रायला. मायच्या परकाराच्या पाह्य चिंध्या किती झाल्या..” त्याने दोऱ्याण्यावर असलेल्या रंगहीन जुन्या साध्या परकरकडे बोट दावत त्याला खुणावलं. तिथे बापाच्याही DMR च्या अंडरवियर भोकं पडलेल्या दिसल्या. त्याने ते लक्तरलेले गुप्तबारीक कपडे पाहून चेहरा पाडला. पुढे त्याने स्वतःचाच मनसूबा मोडून लेकाच्या खांदयावर हात टाकत त्याला हळूच म्हणाला, “माह्या मूळव्याधीचा काई इचार कर. आता मले डाक्टरनं आपरेशन सांगितलं. साल आधीच असं पडलं. तुले नेट किती रूपे लागते थे सांग...मी उद्या हे दीड पोतं सोयाबीन मार्केटात नेवून टाकतो...आणि दलालापासून अजून अंगावर पैसे आणतो....पण तू दिलेल्या पैशाचा उदो उदो करू नोको..” आता कुणालही बापाचा खांदयावर हात पाहून वलादांड झाला होता. विहिरीतून गहिवरून आला होता. दांडत पाण्याने ढेकूळ इघळावे तसा तो मूऊसूत झाला होता.
“आईची शप्पत घेवून मी यापुढे असे काईच करणार नाई..!” तो गळ्याला चिमटीत धरून नकारात्मक मान हलवीत बापाला प्रोमिस करत म्हणाला. तसा अन्नाजी उंचबळून आला. पुन्हा त्याने लेकाला घरादाराच्या गोष्टी सांगून वर्तमानाचे भान करुन दिले. तसा कुनालही सारं काही निगूतीनं ग्रहण करू लागला.
अन्नादा लेकाला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगून सातरीवर पडला तेव्हा त्यांचे डोळे टीनाच्या पत्र्याकडे पाहू लागले. तर त्या टिनांना धुपटाच्या इसव्याने डांबर थोपल्यावानी माकून दिसले. अमोशाच्या रातीसारखे. मनात पुन्हा विचारांचे काहूर उठले...कवा आपल्याच्यानं हे बुद्दू उकलून सलाप पाडनं होईन. सालोसाल असे कोड्डे फटांग साल पडतात. काई धतुऱ्या शेतीतून शिल्लक पडत नाई. मांगचे दोन तीन नकतीर कोड्डे गेले नस्ते त सारं मनासारखं शिजलं अस्त. हिरवंगार झालं अस्त. पण ह्या नकतीरायनं गांड वासून दिली आन् आपल्याले तोंड बुचक्या पाल्ल. याच्यातच बुरशीनं समाधी सोडून कोड्ड्या नकतीरायचा फायदा उचलून सोयाबीनच्या देहात मुळातून शिरली आन् खोडात हुमनीले जंदवून आपल्या सप्नाचे दिवाळे काढले. साले चार पाच साल होवून रायले. दिवाई दसरा आपला आंगावर उचल उचलूनच जाते. आंगावर बोकांडी होवून बसते.
आनाजीच्या काळी बरं होतं. दिवाई दसऱ्यापर्यंत आपलं कृषी केंद्र, किराणा दुकान आणि कापड दुकान पैसे देवून अर्धे अर्धे का होईना पण निल व्हायचे. व्याज आंगावर बसायचे नाई. बापाच्या काळाचा विचार मनात आनून तो जरासा हरखला. चेहरा फुलून उजळला. पण पुन्हा नाकापुढच्या वास्तवाचा विचार करून जसाच्या तसा लिलीच्या फुलावानी मावळून गेला. अगतिक तोंडाने चिमून गेला....आता पोरानं मायची शप्पत घेतली जरूर; पण त्यानं आता परिस्थितीचे भान राखून ह्या गांडमाऱ्या शौकातून मुक्त व्हायला पायजे. नाई त मंग सारा सत्यानास झाल्यावर कोण्या कामाचे सुधरून.
....आपल्या बापाच्या काळी याच्या पेक्षाही आपली परिस्थिती कुडाले भोकं पडलेली होती.  तरी आनाजीनं चार पोरी उजवून आपल्याले कामापुरतं शिकवलं. लोकायच्या इरी, बांध्या खांदून, त्यांच्या रानातले झाडं तोडताड करून त्यांचे वावरं वाह्यतीत आणून देले. लेकरायच्या आनंदात सोताचा आनंद मानून आपल्या इच्छा वेशिले टांगल्या. आपले भोकं कसेबसे बुजवले. तवा कुठं आपल्याले असे सुखाचे दिवस पाहाले भेटले.
आनाजीनं आपल्यासाठी मरायच्या आगूदरचं पोऱ्यायकून वदवून घेतलं. “मी मेल्यावर तुमी माह्या अन्नाच्या वावरावर हक्क गाजवू नोका.” म्हणून त्यायनं तवाच आपल्या नावी खालची डूंगी आन् वरचा माथा नावी करून देला. बाकी अर्ध वावर नाताच्या नावी करून देलं. पुन्हा जुनेर आठवून त्याच्या काळजात गलगल झालं. त्याने ओलावलेल्या पापण्या उशाकडं ठेवलेल्या मुंडाशाने कोरडे केले. बाजूच्या दिवानवर कुण्या त्याच्याकडे पाठमोरा होवून एका कुशीवर ब्लॅंकेटात पपजी खेळत होता. त्याने लेकाला पाहून त्याच्या उलट दिशेने कड फेरला. डोळे कसाबसा लावून पाहू लागला. तर डोये काही केल्या लागेना. आपून सोयाबीनचे भाव वाढन म्हणून सोयाबीन ठेवलं होतं. पण आता आपल्याले सालोसाल तेच भाव असलेल्या भावात इका लागन. एक सवा क्विंटल भरण त्याचे येईनच कितीक ? पुन्ना आपल्याले थ्या हटवार दलाले अजून तिसेक हजार आंगावर मांगा लागन. तवा कुठं आपली दिवाई साजरी होईन. पर पावण्यायचे कपडेलत्ते घेणं होईन. मनातल्या मनात अन्नाजीच्या पापण्या जडावू लागल्या. सुस्तावू लागल्या आणि तो लहानपणी नानीच्या कुशीत बळीराजाच्या गोष्टी आईकत झोपी जायचा तसा आता निद्रेच्या स्वाधीन हळूहळू जावू लागला.
कुंभकर्णाच्या नात्यातल्या माणसावाणी तो झोपून होता. ढणढणती दुपार त्याला दिसत होती. त्या दुपारीच कुनाल बी. टेक. अॅग्रीची डिग्री कंप्लेट करून गावी आलेला. दरम्यान त्याने ट्रॅक्टर शोरूमचा परवाना काढलेला. त्याची ती धावपळ जीवाच्या ओढीनं चालू असलेली. गुडी पाडव्याच्या दिवशी मायला म्हणाला, "आई, ह्या वावराफावरात काई दम नाई...एवढे दिवस झाले तरी तुमचे हाल जून्यासारखेच..."
"हो रे बाबू...तुय बरोबर हाये...पण तुया बापाचा घास धकत नाई न वावरात गेल्याशिवा."
"म्हणून  म्या ठरवलं का..आता हे वावर इकून हिंगणघाटले ट्रॅक्टरचे शोरूम टाकायचे.."
"टाक मा....तुया शिक्शनाची चिज कर. नाई त आयुष्यभर झीज होईन..तुया बापाचं काई एक आईकू नोको.."
"आवं पण बाबा गेले कोठं ?" त्याने जोरात विचारले. त्याच्या विरण्याच्या पाठोपाठ अन्नादा वावरातून खुटल्याचे खासर घेवून आलेला. इंधनावर टाकायला त्याने खुटल्या आणलेल्या. खासरातील खुटल्या काढायला वडिलाला त्याने हातभार लावायला पाहीजे होता. पण त्याने तो हातभार न लावता लगोलग बापाला बदाबदा पाणी पित असतांना त्याच्या पुढे वावर विकण्याचा विषय काढला. तेव्हा अन्नादा कपातला दोन घुट चहा फेकत पोराला आरबळून म्हणाला, "आबे, डोस्कं ठिकानावर हाये का नाई...ज्या जमिनीच्या भरसुद्यावर तुले शिकवलं तिले विकाले चालला का ? लहानपना पासून तुये सर्व हट्ट पुरे केले म्हणून ह्यो हट्ट तू मांडला का ?"
दरम्यान, शेजारीपाजारी त्यांच्या भोवती कान टवकारून जमलेले. बापाचे असे आबे काबेचे बोलणे आयकुन कुण्याही हमरीतुमरीवर येत म्हणाला, "कोण मले अडवते, त मी बी पाह्यतो. माह्या वाटनीचे मी तीन एकर इकून माही इच्छा मी पुर्ण करतो.." तसा अन्नादा क्षणभरासाठी हतबल होवून डोळे मिटून क्रोधाची अग्नी निवू लागलेला. तेवढ्यात कुणाल कपाटातून वावराच्या कागदपत्राची फाईल घेत बाहेर घेवून आलेला. तेव्हा अन्नादा बेभान होवून त्याच्या हाताच्या फाईलला झोबंला. कुण्या स्वत:कडे फाईल ओढू लागला. पण त्याला बापाच्या पकडीची जाणीव नव्हती. आज पावतरचे उन्हाळे पावसाळे अन्नादाने पचवून निसर्गापुढे नमते कवाच घेतले नव्हते. त्याला जाणीव होती एका वचनाची. कर्म करते रहो. फल की चिंता मत करो. कुण्याला शेवटी वाघाच्या जबड्यात आपली फाईल फसली आहे असं वाटलं. तेव्हा त्याला अतिशय राग अनावर झाला. त्यामुळे त्याचा विवेक हरवून गेला. आणि जे घडायला नव्हतं पाहीजे. ते त्याच्या हातून क्षणात घडलं. बापाच्या हातून फाईल जेव्हा सुटेनाशी झाली. तेव्हा त्याने जल्म देणाऱ्या त्या कनवाळू फाटक्या बापाला धाड दिशी उजव्या लाथेचा पुरा अंगानिशी पौच्या पोटावर मारला. तसा अंगातलं अवसान गळून त्या लाथेच्या माराने पोटात कळेची भोवळ दाटली. आन् तसा अन्नादा धपककन खाली कोसळला. पोटावर हात ठेवून व्याकुळपणे इवळू लागला...
तसी अन्नादाला थोबाडीत मारल्यावानी खाडकन जाग आली. काय आपून आज असं वाईट सप्न पाह्यलं. पुढच्या घड्याळीत त्यानं पाहीलं. तेव्हा पहाटेचे चार वाजलेले होते. पाह्यटंचे सप्न जूनी लोकं खरे होते म्हणायचे. खरच हे खरं होईन का ? मनात शंकेली इजगूर फडफडली. तशी त्याने एक नजर कुणालकडे वळवली. तर तो त्याच्या अंथरूनावर नव्हता. नुस्त रिकामं अंथरूण होतं. आपलं पोरगं कागदपत्राची फाईल तर नाई शोधत. तो त्याला पाहायला दुसऱ्या खोलीत आला. तिथेही कुणाल त्यांच्या दृष्टीस पडला नाही. तेव्हा ते बाहेरच्या दारात आले. तर कुणाल ब्लुटोथ कानात घालून कुणासंग तरी बोलत त्यांना व्यस्त दिसला. अन्नादा त्याला दिसनार नाही. अशा बेताने डोकावून लपून ऐकत बसला. कुणाल कासराभर दारापासून दूर जात होता. आणि पुन्हा तिकडून दारात येत होता. अशा चकरा मारतांनी तो बोलत होता, "अगं, विश्वास ठेव...मी हायेनं....तुला धक्का लागू देणार नाई...तुले वावरात पण जाचं काम नाई. माह्या मताने सारं काई माह्या घरी होते. आणि म्या पैशाची सेटिंग लावली.." ऐवढं आईकून अन्नादाने शितावरून भाताचा अंदाज घेतला होता. त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलल्या होत्या. तोंड धूवूनही त्या काळवंडलेल्या दिसत होत्या. त्यांनी बाहेरचा लाईट लावला. अंधारात उजेड पेरून हांड्याखाली विस्तू करायला कडाकडा तुराट्या मोडून ढणढणवात्या चूल पेटवली. तरी त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा उजळल्या नव्हत्या. अजून गडद होत चालल्या होत्या.  
बाहेरच्या लाईटाचा उगामा पाहून कुणालला घर जागी झाल्याची जाणीव झाली होती. अन्नादा धुमसत्या हांड्याखाली कडूनिंबाच्या काडीने दात पाजवत पचापचा लेकाकडे पाहून थुंकत होता. कुणाल खाली मान घालून जपऱ्या परडासारखा कुडाशी दडी मारून शिरावा तसा तो आपल्या अंथरूनात शिरला होता. लेकाले काय बोलावं ? आता रामपाह्यऱ्यात. काई कळत नाई. तेव्हा अन्नादा चुलीतल्या भगव्या अग्नीकडे पाहून पुटपुटत होता,
“परमेश्वरा, आता माहंच रगत उरलं होतं, त्याच्या वृत्ती उगवायला. कवापासून आमच्या माय-बयनी म्हणून रायल्या-
इडा पिडा टळो
बळीचं राज्य येवो !”.
( समाप्त. )
 

  • आशिष आत्माराम वरघणे

रा. सिरूड पो. वेळा. ता. हिंगणघाट जि. वर्धा.
मो. ९३५९६७९०९३
                             
 
              
            
 

Share

प्रतिक्रिया