नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जमीन नांगरली, वखरली अन माती अशी भुसभुशीत की हवेलाही मोह होऊन हवा त्या मातीला तिच्या सोबत दूरवर घेऊन जात मुक्त उधळण करावी. पहिला पाऊस पडल्यावर त्याच मातीने अत्तराची ख्याती सांगावी इतपत सुखावणारी माती अन त्या मातीला आपली माय मानणारा माणूस म्हणजे बळीराजा नावाचा एक अनोखा प्राणी. दरवर्षी भरभरून देणारी माय-माती कधीतरी हिरावून घेईल का? असे अनेकानेक प्रश्न सतत पाठलाग करतच असतात. म्हणतात की जेवढं जास्त सुख वेचल तेवढ्याच पटीच दुःख माग घेत येत असते; पण ज्याने सुखच वेचल नसेल त्याच काय? हाही कळीचा प्रश्न कायम सतावत असतो.
गालावरच्या अन ओठावरच्या लालीला कधी न भाळणारा मोहन मात्र लाल कांद्यावर वर्ष-दोन वर्षे झालेत आकंठ गुंतून गेलेला; कारणही तसंच की, कांद्याच्या लालीने कधी धोका दिला नाही. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फार काळ टिकत नाही. एकदा आलेला हंगाम जाणारच असतो मायर जाताना तो काय घेऊन जातो आणि काय पदरात देऊन जातो हे मात्र सांगता यायचं नाही. कितीही पक्के नियोजन केले तरी बुडणाऱ्याला कैकवेळा काडीही गवसत नाही.
मागच्या दोन वर्षांचं नियोजन यावर्षी फसले. ज्या पाण्यानं जीवदान द्यावं तेच पावसाचं पाणी लहान रोप नेस्तनाबूत करायला धजावल. हा दोष कुणाचा निसर्गाचा की मोहनचा हा निरुत्तरीतच प्रश्न मग यासाठी मायबाप म्हणून कोण पाठीशी उभं राहिल ; मायबाप सरकार? गोष्ट इथेच सरली मोहन पुढं निघाला. रोप विकत घेतले आणि नव्याने लागवड केली. ज्याने काळी माती टिळा म्हणून माथ्याला लावली अन भरलेल्या खळ्याला पंढरी मानले तो एक एक पाऊल आशेने चालतच राहतो. मोहनने पुन्हा जोमाने चांगलं नियोजन करत रक्ताचा रंग कांद्यात पाहत कामाला लागला. कांद्याचे पीक शिवारभर डोलताना पाहून लहान लेकरसारखं त्या कांद्याला जवळ घेत न्याहाळू लागला. पीक काढणीला आल्याने उत्साह पार शिगेला गेलेला. मातीचे उपकार मानत सगळे कांदे काढतो.
बाजाराचा दिवस पाहून मालाला बाजार दाखवत कळत की भाव चांगल्या प्रतीच्या मालाला आहे त्यामुळे आणखी सुखावतो मात्र हा आनंद ओहोटीला जायला फार काळ लागत नाही. जेव्हा दलाल/व्यापारी कांदा ओला आहे म्हणून भाव पाडून मागतात. मग मात्र काही दिवस कांद्याला ऊन दाखवून परत यायचा विचार करून माघारी यावं लागत. काही दिवसांत कांदा परत घेऊन गेल्यावर मात्र चांगला कांदाही खराब कांद्याच्या बरोबरीने विकला जातोय हे पाहून मात्र तो चक्रावून जातो. अशा काळात हमालही परवडायचा नाही अशी गत झालेली. एवढं सगळं एवढ्या कमी काळात घडताना पाहून अक्षरशः डोकं सुन्न होत मात्र पर्याय गवसत नाही कारण मायबाप सरकार मध्यमवर्गीयांच्या डोळ्यातील आसवांच्या धारा पाहून कांदा आयात करून घेते अन आधाराचा खांदा बनून काम करते. मोहन मात्र डबडबलेले डोळे आकाशाकडे करत स्तब्ध होतो. एकाच हंगामात दोनदा झालेलं नुकसान डोळे कांद्यासारखे लाल करत. मात्र पर्याय नसताना घरी सडवण्यात काय अर्थये म्हणून ज्या भावाने रोप आणलेत त्याच्या अर्ध्या भावात सगळा कांदा खुलेआम नामुष्कीने ओढवलेल्या तहात व्यापाऱ्याला द्यावा लागतो.
पराकोटीचा आशावादी माणूसही अशावेळी कोसळेल मात्र ज्याला जगण्याशी दोन हात करण्याची सवय झालीये त्याला माघार घेता यायची नाही. मोहन सगळा राग सावरत संध्याकाळच्या प्रहराला उधारीने भरलेल्या किराण्याच्या थैलीला घट्ट पकडून माघारी फिरतो. दोन पावलं मागे आलेल्या माणसाने दोन पावलं पुढे जाऊन कुणाच्या नरड्यावर ठेवले तर? असंख्य असे प्रश्न अवलंबलायला कधी जमेल माहीत नाही; मात्र स्वतःला मायबाप म्हणवणारे एकाच वेळी दोन लेकरं रडत असताना एकाला सावत्र अन एकाला लाडका अशी वागणूक का देतात? हे मायबाप म्हणवतील? जगण्या-मरण्याचे प्रश्न कळीचा मुद्दा बनून पुढे आले असताना संतुलन साधण्याचे कौशल्य हे आशावाद जपून ठेवते; जेव्हा हा आशावाद मावळला तेव्हा अस्तच..!
- कृष्णा जावळे (बुलडाणा)
मो. 7028563001
प्रतिक्रिया
अतिथी सदस्य या आय डी ने
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पाने