नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतमालाचे भाव एक स्वप्न ?
गाय वासरू गेले पंजा ही गेला
नाही मिळाला शेतमालाला योग्य भाव l
धनुष्य ताणले , कमळ ही फुलले , घड्याळ टिक टिक करत हाय
आमचा शेतकरी मात्र हाय तिथच हाय ll 1ll
पूर्वी गावरान होत, कमी उत्पन्न होत
म्हणून शेतकरी अर्धपोटी होता l
आता हायब्रीड आल, बक्खळ धान्य झाल
आडत्याच्या मनभावाने हाती धुपाटन आल ll 2ll
आता कीटकनाशक, रासायनिक खते,
बी बियाणांचे भाव ही गगनाला भिडले l
किती ही उत्पन्न झाले झाले तरी
शेतकरी मुद्दलातच राहिले ll 3ll
रासायनिक खतांच्या अतीवापराने
धरणीमाय निझूर झाली
कास्तकऱ्यांनी कितीही ओतल तरी .....
शेणखतांच्या खुराकासाठी ती आतुर झाली ll 4ll
संकटाची मालिका शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली
कधी सुलतानी संकट, कधी अस्मानी संकट l
यातून वाचलाच तर इमानदारीने सर्वांची उधारी चुकवतो
डूबला तर कधी कुटुंबाचा विचार न करता गळफास घेतो ll 5ll
एखाद्या शेतकऱ्याच्या कोथंबिरीचा लाखोंचा डंका वाजतो
सगळा मीडिया त्याला उचलून धरतो l
कोट्यावधीचा कांदा काही हजारोंनी विकतो
तेंव्हा गावोंच्या गावातील शेतकरी हमसून रडतो ll 6ll
आज नोकरशाहींचे पगार लाखोंनी झाले
दोनशेचे धान्य अन पन्नासचा कांदा त्यांच्या डोळ्यात पाणी आणू राहिले l
पूर्वी त्यांचा महिना एक पोत्याचा पगार होता आता तीस पोत्यांचा झाला
आमचा गरीब शेतकरी मात्र आहे तिथेच राहिला ll7ll
नकोत आम्हाला मोफत, लाडक्या अन् सबसिडीचे गाजर
हवे आम्हाला आमच्या घामाचे दाम l
मायबाप हो खरच असेल जर कळवळा तर
देता का आमच्या मालाला योग्य भाव ll8ll
शेतकरी आता शिक्षित झालाय ,
शरद जोशींचे आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरा l
सामुहिक फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या बनवा,
आपल्या शेतमालाचे भाव आपणच ठरवा ll9ll
राजा आता नकोत यांच्या कुबड्या चतुरंग शेती करू
आपल्या पिकवलेल्या मालाचे आपणच उपपदार्थ बनवू l
आपली बाजारपेठ आपण उभी करू
आपल्या शेतमालाचे भाव आपणच ठरवू ll10ll
कवी. राजेंद्र फंड, राहाता.(शिर्डी)
मो. 9881085671.