नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दि. २९/१२/२०२१
८ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
नमस्कार मंडळी,
८ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची उद्घोषणा करायला यावर्षी बऱ्यापैकी उशीर होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी संमेलन रद्द करावे लागते होते. तीच पुनरावृत्ती यंदा होणार नाही याची दक्षता घेत घेत पावले टाकावी लागली आहेत. नोव्हेंबरात जन्म, डिसेंबरात बारसे, जानेवारीत रांगणे, फेब्रुवारीत चालणे, मार्चमध्ये धावणे, मे मध्ये उड्या मारणे आणि जून मध्ये कुंभकर्णी झोप घेण्यासाठी कोमात जाणे..... या तऱ्हेचे कोरोनाचे जीवनचक्र असल्याचे मागील दोन वर्षात दिसून आले आहे. यावर्षी तर कोरोनाच्या साथीला ओ माय क्रॉन आल्याने जनतेवर ओ माय गॉड म्हणायची पाळी आली आहे. ८ व्या संमेलनाचा रस्ता खडतर आहे पण संभाव्य अरिष्टाशी कधी हातमिळवणी करत, कधी मैत्री करत तर कधी कधी त्याच्यावरच मात करत आपल्याला आपले मार्गक्रमण करत, अत्यंत काळजीपूर्वक एक एक पाऊल पुढे टाकत वाटचाल करणे, हा आपला नाईलाज आहे आणि हाच आपल्यासमोरचा एकमेव पर्यायही आहे. संभाव्य परीस्थिती कशीही असो, प्रसंग कसाही येवो यावर्षी संमेलन रद्द करण्याची वेळ येणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेत, त्यासोबतच संभाव्य कोरोना स्थितीत शासन व प्रशासनाला १०० टक्के सहकार्य करत, प्रतिनिधींच्या आरोग्याची पूर्ण काळजीही घेता येईल अशा पद्ध्तीने आपण ८ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे नियोजन केलेले आहे.
मावळत्या वर्षाला निरोप देत ३१ डिसेंबरला आपण ८ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची घोषणा करणार आहोत. आपल्याकडे आता वेळ कमी आहे आणि कामे भरपूर. मी तयार आहे. आपण तयार आहात ना?
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
* * * *
~~~~~~~~
दि. १७/१२/२०२१
गेली २ वर्ष आपण कोरोनाच्या सावटाखाली वावरतो आहे. कोरोना अरिष्टाचा शेतकरी संमेलनावर प्रचंड प्रभाव पडून वाटा अवरुद्ध झाल्यात. त्यात २ कारणे प्रामुख्याने महत्वाची ठरत आहेत.
१) कोरोनामुळे निधीसंकलनावर खूपच जास्त प्रमाणावर मर्यादा आल्यात. मोघमपणे आपले बजेट साधारणपणे ७ लक्ष रु.चे आसपास असते पण आजच्या स्थितीत २ लक्ष रु.जमवणे देखील अवघड झाले.
२) ऐनवेळी नियोजित संमेलन पुढे ढकलावे लागले तर जवळजवळ ७० टक्के खर्च व्यर्थ जातो.
पण तरीही अशाही बिकट स्थितीत संमेलनात खंड पडू देणे योग्य ठरणार नाही. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. त्या अनुषंगाने काही काटकसरीचे मार्ग विचाराधीन आहेत.
१) आजवरची भव्यदिव्य परंपरा आखडती घेऊन अगदी साध्या पद्धतीने संमेलन व्हावे.
२) यंदा फक्त १ दिवसाचे संमेलन असावे.
३) कमी उपस्थितीत नीटनेटका कार्यक्रम उरकावा.
संभाव्य स्थळ : रावेरी
संभाव्य तिथी : रविवार, २७ फेब्रुवारी २०२२
वेळ कमी असल्याने २० डिसेंबर २०२१ रोजी आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे.
आपल्या सूचना आमंत्रित आहेत.