नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ऋतुचक्रांचा खेळ हा सदोदित चालूच असतो. मागेपुढे काहीवेळा लपंडावही त्याचा चालूच असतो. सुख-दुःखाची विण विणतच राहतो. जमिनीच्या सदऱ्याला नाना रंग भरण्याचे काम त्याच्या येण्या जाण्याने नकळत भरले जातात. ग्रीष्म सरायला सुरुवात झाली की, चाहूल लागते पुढच्या ऋतूची. सगळी जमीन रुक्ष झालेली त्यात जमिनीला पडलेले तडे पार काळीज पिळवटून टाकतात. कित्येक झाडंही नवसंजीवणीच्या प्रतीक्षेत आभाळाकडे टक्क डोळे लावून बसलेले असतात. बळीराजा अंगात त्राण आणून जमिनीच्या मशागतीस जुंपलेला पाहायला मिळतो. बळीराजा समवेत सर्वच चातकासारखी आभाळाकडे नजर रोखून वावरत असतात. उजाड रानात गुर-ढोर घेऊन पाण्यावर जायला सुद्धा फिरकावसं वाटत नाही. अशा या वातावरणात जीव यायला उजडाव लागतं वर्षा ऋतूला. तो येतो तर चैतन्य नांदते. पहिल्या पावसाच्या सरींच्या वर्षावात जमीन ओलिचिंब होते. तप्त अशी माती जमिनीवर पावसाशी एकरूप होताना दिसते आणि पूर्ण वातावरण सुवासाने गँधून टाकते.
"नेमेची येतो मग पावसाळा । हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! " या उक्ती कुठेतरी वाचलेल्या आणि त्याच खरेपणही तेवढंच सत्य. पाऊस हा नेहमीच नाही पडत त्यालाही ठराविक वातावरणाचा आधार हवाच असतो. रानात पडणारा पाऊस डोळ्यासमोर उभा ठाकला की, डोक्यावर घोंगड करून चालणारे गुराखी, शेतात राबणारा कष्टकरी-शेतकरी, आया-बाया आणि पावसात भिजणारी पोरं आणि एका लयीत चालणारे गुरेढोरं मनावर आजही गारुड घालतात. यातली परिस्थिती काहीशी बदलती आहे पण माती आणि पाऊस यांचं रिवाज आहे तोच. रानात चार-पाच जोरदार पाऊस झाले की, पेरणीची लगबग सुरू होते. पडीक जमीन शहारून येते अंगी हिरवा रंग ल्याते; जणू हिरवा शालूच नेसते. त्या तुलनेत इतरत्र काळी जमीन तोवर रुक्ष, उजाड जमिनीचे रूप वाटते. दरसाली रानात कोसळणारा पाऊस आबादनी साठीचा असेल हे अनिश्चितंच. एका साली वातावरण सारं आल्हाददायक आणि सकारात्मकतेनं भरलेलं. पेरणी पार पडून पिकं तरारून मातीच्या गर्भाशयातून बाहेर आलेली. हळूहळू कामाजोगा पाऊस चालूच असायचा; त्यांमुळे पिकं जोमात वाढू लागली. ते सारं जणू ना. धो. महानोर म्हणतात तसं " या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतूनी चैतन्य गावे.." या ओळीच इथे समर्पक बसेल अशीच सारी स्थिती.
पिक चांगलं आले. यंदाचं आबादानीच ठरणार अशीच एकूण सारी गावातली आणि आजूबाजूच्या परीसरातल्या शेतकऱ्यांत सकारात्मक वातावरण. काही शेतकऱ्यांनी पिकाची कापणी( सोंगणी ) करून चांगल्या प्रकारे सुड्या घातल्या तर काही मजुराअभावी शक्य होईल तशाप्रकारे सोंगणी आटोपून घेण्याच्या तयारीत. आभाळाचं वातावरण तसं काहीसं नेहमीसारखच असायचं. याच लगबगीच्या दरम्यान एके दिवशी रात्री पावसानें हाहाकार करीत पार हाता-तोंडाशी आलेला घास कैक शेतकऱ्यांच्या पदरातून हिसकावून नेला. गावातला शेतकरी मनोहर रावांच्या शेतातील पीक जमिनीवर कापणी करून पडलेले होते. पाऊस सलग तीन - चार दिवस संततधार बरसतच होता. पीक सार मातीमोल झालं; जमा करायला जेवढं मजूर लागेल तेवढ्या खर्चही त्यातून निघणार नाही अशी एकूण दुर्दशा झालेंली. त्यांचा पोरगा माझा मित्रच. त्याचे वडील डोळ्यांतील आसवांना बाहेर येऊ देत नव्हते मात्र मला कळून चुकलं होतं; आतून खूप पिळवटून निघाले असणार हा माणूस. सगळी मेहनत एका पावसात मातीमोल झाली. पण डोक्यावरच्या कर्जावर असं कुठलं सुलतानी संकट नाही येणार. जसा जसा पाऊस बरसत होता तसं तसे त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाण्यात विरघळत होते. त्यांना धीर द्यायला सारा गाव होता कारण बऱ्याच जणांचं नुकसान तसंच काहीसं कमी प्रमाणात झालंच होत. हार मानायची नाही हे वाक्य भिंतींवर, पुस्तकांमध्ये फार छान वाटते पण वेळेवर पचवायला हलाहला'सारखं असते. पाऊस रोमँटिक असतो हे वाक्य माझ्या जीवनात तेव्हापासून आजतागायत मला कधी जवळचं वाटलं नाही ते यामुळेच. ज्याच्यावर दुःखाच आभाळच कोसळलंय त्यास कुठला आधार द्यावा कळत नाही. तो पाऊस आजही गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींना स्मरणात आहे. पावसाने नुकसान होते हे माहीत होते पण एवढं भलंमोठं संकट हे पहिल्यांदा गावावर आणि आजूबाजूच्या परिसरात गडद पसरलं होतं. पाऊस जसा आधार देतो तसाच कैकदा आधार काढूनही घेतो. असा हा अश्रूंचा पाऊस आजही आठवला की, डोळे भरून येतात, मन गहिवरून येतं. भूतकाळात डोकावताना असा पाऊस पुन्हा कुणाच्या वाट्याला येऊ नये असंच सदोदित वाटते.
- कृष्णा जावळे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने