नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
१]गद्यलेखनस्पर्धा.२०१८
विभाग;
अ)ललितलेख
""""""""""""""""""""""""""""""""""""
!! चिमण्या
परत आल्या ;
.अन् गेल्याही !!
मोबाईल टावर गावापर्यत पोहोचले आणि गावचिमण्यांवर संकट आले,सुरुवातीच्या काळात त्यांनी गाव सोडले,टावरचा परिसर सोडला..... गावचिमण्या गेल्या कुठे? प्रश्न पडला.कविंना चिमण्यांनी गाव सोडने आवडले नाही,,,.,आणि मग कविंनी "चिमण्यावरच्या कविता" लिहायल्या घेतल्या.एकट्या लातूरात दहाबारा कविंनी दणादणा चिमण्यावर कविता लिहिल्या,,,,परवा माझ्या गावाकडे गेलो होतो,खळे चालू होते .तेव्हा गावचिमण्या घोळक्याने येत,दाणे टिपत.भूर्र उडून जात,शेतातली चक्कर झाली अन् गावाकडे गेलो. बीड जिल्ह्यातील लोणी माझं गाव,शिरुर तालुक्यातील.शिरुर नावाची गावं,तालुके महाराष्ट्रात खूपच आहेत.ते लक्षात यावे म्हणून "शिरुर -कासार "असे नाव सरकार दरबारी लागले.शिरुर गावात पूर्वी कासार समाज अधिक संख्येने असायचा,यांचा प्रमुख व्यावसाय बांगड्या भरणे;बांगड्यांची दुकानं आणि भांड्या बासणाची दुकानं .आता मारवाडी,मुस्लिम ,मराठा.वंजारी. राजस्थानी असे विविध जाती धर्माचे लोक शिरुरमधे आले आणि ईतर व्यावसायात मग्न झाले.शिरुरचा चेहरा बदलला आहे.माझं गाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. माझ्या बालपणी सर्व नद्यांना बारमाही पाणी असायचे,पिण्याचे पाणी तेवढे शेंदून आणावा लागायचे. विहीर,आड,बारवा,बुडखीतून महिला पाणी शेंदून आणत.गावाभोवती नद्या.पावसाळ्यात नद्यांना पूर आला की रानातली माणसं-जनावरं रानातच अडकून पडायची ,तर गावातली गावातच. महारढवाच्या आमच्या शेताजवळ शंकरबुवाची भलीदांडगी चिंच होती.तिच्यावर खोडाला चढता येत नसायचे.ईतके दांडगे खोड होते.त्या खोडाचा परिघ कासराही कमी पडेल एवढा मोठा होता.तिच्या फांदीला धरुन तिच्यावर चढावा लागायचे ,मोठे खोड.मोठ्या फांद्या
हातात मावत नसत.म्हणून नंतरतर या चिंचेला कोणी झोडतही नसायचे. सकाळी शेळ्या सुटल्या तर दोन तासभर रस्ता ओलांडता येत नसे.संध्याकाळीसुध्दा असेच होई,चरुन गावात शेळ्यांची खांड आली की रस्ते भरुन वाहत.गावाच्यामधे शाळेजवळ भलामोठा वड होता.ऊन्हाळ्यात माणसं या झाडाखाली विसावा घ्यायची,सावली द्यायचे काम या वडाने आम्ही मोठे होऊसतोवर केले.सायंकाळी या वडावर कितीतरी कावळे.बगळे बसायचे आणि मुक्काम करत.असाच ऐक वड सईदबाँच्या देवळाजवळ होता.मोठ्या वडाचा बारका भाऊच म्हणा की,त्याच्यावर पोपटांची संख्या खूप असायची.त्याच्या मोठाल्या फांदीला भोकं असायची,त्यात पोपटं अंडी देत,पिल्लांना जन्म देत.या झाडाखाली क्वचितच माणसं बसायची.शाळा सुटली की काही धाडसी पोरं या वडावर चढून पोपटाची पील्लं पकडत.
असे ते दिवस होते.
आता गावात खूप बदल झाला.पहिल्यासारख गाव राहिले नाही,आता रस्ते मोकळे झाले.पूर्वी दारादारात कोंबड्या .करडं,शेळ्या दिसायच्या, त्यातून घर चालवायला पैसा यायचा.विहिर मोटेचे पाणी शेतीला पुरायच.घरागणीस शेळ्या असायच्या.बाजारला शेळ्या.बोकडं.पाठी विकायला मिळत.भाजीपाला असायचा.गावाभोवती खताचे उकांडे असत.त्या उकांड्यावर रोज सकाळी शेर्डूके.पोरं पोरी शेण नेवून टाकायची. हे शेण किंवा वाडगं झाडून लेंड्याचं खत सकाळी उकांड्यावर टाकायचे काम केलेय.हे खत शेतीच्या उपयोगी पडायचे,शेतागणीस सुड्या असत.बुचाडं असायची,शेती उत्तम पीकायची,घरातल्या कणगी भरल्या जायच्या ढालजात भरलेल्या पोत्यांची थप्पी असायची .....आता हे दिसत नाही.शेतीतून येणारा पैसा बंद झाला.हातात मोबाईल आले.गावात चहाची हाँटेलं वाढली.चहापाणी खर्च वाढला."वाळूत मुतलं फेस ना पाणी"यासारखं राजकीय गप्पा वाढल्या.ग्रामपंचायतच्या निवडणूकीचे खर्च वाढले.त्यामुळे निवडून आले की पैसा खायचा,नसता मतदान देताना पैसा मागायचा.किंवा राजकारणाच्या नादापायी चांगली माणसं लबाडीपणा करुन उजळ माथ्याने गावभर हिंडतात .हे सर्रास सुरु झाले.खर्च वाढला.त्यामानाने उत्पन्न कमी होत गेले,तर काही टगे सरकारची स्कीम आणून देण्याच्या मोबदल्यात लाभार्थ्याकडून मेहनताना म्हणून पैसे उचलतात.गावागावात विविध प्रकारचे टगे तयार झालेत.एक खरं ,गिवाचा रंग बेरंग झालाय.
आमचे सर्जेरावतात्या दारात खूर्चीत बसलेले.दुपारची वेळ होती.त्यांच्या भोवती हजारावर चिमण्या दाणे टिपताना दिसल्या.
मला पाहून चिमण्या बिथरल्या.
त्यांनी माझ्या हातात बाजरीचे दाणे दिले.
"सर सावकाश शिपडा" अन् काय जादू, उडालेल्या चिमण्या पुन्हा दाणे टिपण्यात मग्न झाल्या.
सर्जेरावतात्यांचे चिमण्यासोबतचे जगणे छान चाललेय,तात्यांच्या अंगाखांद्यावर चिमण्या बसतात,तात्या त्यांना दुपारी पोटभर दाणे टाकतात.तात्या म्हणतात," मला आनंद मिळतो"
.चिमण्यांनी मोबाईल टावरवर मात केली...
अन् सर्जेतात्या गेले......
खूप दिवसानंतर गावी गेलो होतो,तात्या गेत्यानंतर त्यांच्या पोरांनी चिमण्यांना काही दिवस तांदूळ.बाजरी टाकले,...पण चिमण्यांनाही तात्या जाणे पचले नाही,तात्यानंतर चिमण्या यायच्या घायटा घालायच्या,चिव,.. चिव,.. चिव,...करत निघून जात.आतातर त्या आमच्या गल्लीत दिसेनाशा झाल्या.मलाही प्रश्न पडला कुठे गेल्या असतील.
सर्जीतात्या गेले अन् चिमण्याही गेल्या.
एक सत्य आहे,सर्जीतात्या परत येणार नाहीत.अन् चिमण्याही परत येणार नाहीत.
चिमण्यांनो परत या,
सर्जीतात्याची गल्ली वाट बघतेय.
बरं का चिमण्यांनो.
या.
(लोणी दि.८/९/१८)
००
डाँ,भास्कर बडे
.मुपो.लोणी ता.शिरुरकासार जि.बीड
ध्वनी ;९४२२५५२२७९
************************
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने