Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



तुलना दोन शरदांची

योद्धा शेतकरी

तुलना  दोन  शरदांची

- अनंत देशपांडे

            भारतासारख्या खंडप्राय देशात, देशपातळीवरील   मान्यताप्राप्त  नेतृत्व ,अथवा  विचारवंत  म्हणून  मान्यता  मिळवणे  फार   कठीण  काम आहे.  देशाच्या  विविध  भागातील  नेते  आणि    विचारवंत   तसे  प्रयत्न  करताना आपण  पाहतं  असतो  त्यातील   काही  जणांनाच  ते भाग्य  लाभते.  असे    भाग्य   महाराष्ट्रातील     दोन  लोकांना  लाभले   एवढेच  नाही   त्यांनी    दिल्लीतील  सत्ताधाऱ्यांवर   वचक  आणि  धाक  ठेवला.  त्या   दोन  व्यक्तिमत्त्वाच्या     कारकीर्दीचा    वेध  घेण्याचा  आणि  त्यांची  तुलना  करण्याचा  मोह  अनेकांना होत  असतो . खरंच  हे दोघे  का     एकत्र आले नसावेत असाही   प्रश्न  अनेकांना  पडत असतो.  खरंच  ते दोघे  एकत्र  आले असते  तर  नक्कीच  काही  सकारात्मक  बदल  झाले  असते  असेही  अनेकांना  वाटत  असते.  त्यातल्या  त्यात  शेतकरी  हा  दोघांच्या  कारकीर्दीचा   समान  बिंदू  आणि  महाराष्ट्र   राज्य  हे  कार्यक्षेत्र,  तरीही  तसं   घडलं  नाही  हेही खरं. या  दोघांची   कारकीर्द  समान  कालखंडात  राहिलेली     असूनसुद्धा  महाराष्ट्राला   या   दोघामध्ये    आपसात  विचाराच्या  पातळीवरचा    सुसंवाद  कधीही     दिसून  आला   नाही.  वरवर   पाहता   दोघेही  शेतकऱ्यांसाठी   काम   करणारे  नेते   वाटत  असले   आणि अनेकांना या  दोन दिग्गजांनी  एकत्र  येऊन इतिहास घडवावा  असे  अनेकांना  मनोमन वाटत होते  तरीही,  दोघांची  वाटचाल  पूर्णपणे परस्परांच्या   विरुद्ध  दिशेने  झालेली  दिसते,  बारकाईने  पहिले तर    या  दोघांमध्ये   नामसाधर्म्या   व्यतिरिक्त  कोणतेही  साम्य  दिसत  नाही .   शरद जोशी   आज  हयात नाहीत,  शरद जोशी  हयात असताना  त्यांच्या  अनेक  आंदोलनात्मक  भूमिकेला  कडाडून  विरोध  करणारे   शरद पवार, आता  अलीकडील  काळात  शरद जोशी यांनी पंचेवीस तीस   वर्षापूर्वी  आंदोलनात  वापरलेली  भाषा  बोलताना दिसत  आहेत. सत्ता  मिळवणे  आणि टिकवणे  हेच  अंतिम  उद्दिष्ट  असलेले  शरद पवार, आणि  स्वातंत्र्याचा  शोधार्थी  शरद  जोशी  या दोन नेत्यामधील   माणूस,  राजकारणी   आणि  विचारवंत  म्हणून  जडणघडण  कोणत्या पार्श्वभूमीवर  झाली  इथपासून  धांडोळा  घेतल्याशिवाय  वरील  प्रश्नांचे  योग्य  उत्तर  मिळणार  नाही.
            शरद  पवार   यांनी   राजकारणाची  सुरुवात   महाविद्यालयीन    जीवनापासूनच     केलेली  असल्यामुळे    राजकारणाचे  बाळकडू  अंगात  खोलवर  भिनलेले,   राजकारणाचे  सगळे    डावपेच  बेमालूमपणे  वापरण्याचे  कसब  त्यांनी  अवगत  केले . माणसे  जोडावीत    कशी    ते  शिकावे  शरद पवारांकडून.  साम  ,दम, दंड, भेद हे   सगळे  उपाय,  कधी आणि  कसे  वापरावे याचा  वस्तुपाठ  त्यांनी घालून  दिला.  विद्वानांना,साहित्यिकांना, विविध  क्षेत्रातील नामवंत   दिग्गजांना,  जीवाभावाचे   मित्र  केले,  एवढेच  नव्हे  तर ते    कधीही  आपल्या   कामाला  पडावेत   इतक्या  प्रेमाने  त्यांना  आपलेसे केले .  आपल्या   कामाला  येणाऱ्या   कार्यकर्त्यांना  आणि  साथीदारांना   लागेल ती रसद पुरवून   अनेक  बाबतीत  सक्षम केले,   अनेक  वैयक्तिक   मित्र  जोडले, मित्र  होत नसतील   तर  किमान  ते   आपले    शत्रू  होऊ   नयेत    याची   खबरदारीही  त्यांनी  आयुष्यभर  घेतली. एवढे सारे  करूनही    शत्रू  तयार  झालाच   तर  त्याला   बेमुर्वतपणे, राजकारणाबाहेरचा  रस्ता  दाखवावा हेही  तत्त्व  त्यांनी  पाळले.   महाराष्ट्राची  खडानखडा  माहिती  तोंडपाठ ठेवणारा आणि    तालुक्या  तालुक्यात  असणाऱ्या  कार्यकर्त्याची  कुंडली  जवळ  बाळगणारा,  प्रसंगी   आपल्याच  पक्षातील  दोन  कार्यकर्त्यांना   एकमेकाविरोधात   निवडणुकीला  उभे करून  सोयीच्या  कार्यकर्त्याला   रसद  पुरवून   दोनीही   कार्यकर्त्यांना   सांभाळणारा,  गावापासून  ते   दिल्लीपर्यंत  सतत   राजकीय अवधान  ठेवणारा  राजकारणी  अशी त्यांची प्रतिमा.   दिल्लीत  सरकार  कोणत्याही   पक्षाचे  असो, पंतप्रधान  कोणीही   होवो,   शरद  पवार  यांनी  त्यांचे    संबंध  सलोख्याचेच  असतील  याची  काळजी  घेतली.  सोनिया गांधी, मनमोहन  सिंग असोत  की  अटलजी, अडवाणी  असोत,   किंवा  डावे    पक्ष,   साऱ्या  पक्षाच्या    नेत्यात     त्यांचा  सदैव  संचार, वेगवेगळ्या   राज्याचे   मुख्यमंत्री, राज्यपाल,ते  थेट  आताचे  पंतप्रधान  नरेंद्र   मोदी    यांच्या  पर्यंत,  सगळ्यांबरोबर  सरळ  सलोख्याचे   संबंध,  यांच्या पैकी  कोणालाही    भेटण्यासाठी   त्यांना   मध्यस्थाची  गरज  लागू नये.  काँग्रेस मध्ये होते त्यावेळी असो  किंवा    काँग्रेस  मधून  बाहेर   पडून  स्वतःचा     पक्ष   स्थापन    करून  केंद्रात  काँग्रेस बरोबर  युती  करून  सत्तेत  भागीदार   असोत,   दिल्लीच्या   काँग्रेस  नेतृत्वावर    कायम  धाक   म्हणा  किंवा  आपलेपणा म्हणा ठेवण्यात  ते यशस्वी  राहत आले आहेत.  राजकीय  अनुभव आणि  प्रशासनिक   चातुर्य   अशा   अगणित  क्षमता  या    शरद  पवार    यांच्या  ताकदीच्या  बाजू .
            त्यांच्या   नेमकी  विपरीत  पार्श्वभूमी   शरद  जोशी  यांची.   महाराष्ट्रात   शेतकरी  समाजाचा    राग  असणाऱ्या    ब्राम्हण   जातीतला   जन्म.   शेती, शेतकरी  या  समाजघटकाचा संपर्क  आला  तो  वयाच्या  पन्नाशीत .  नोकरानाम्या   वडिलांसोबत   बदली  होईल  तिथे  शिक्षण,  शिक्षण  संपल्यावर  काही  काळ  भारतात  नोकरी  करून थेट   युनायटेड  नेशन्स  मध्ये  स्वित्झर्लंड  सारख्या  देशात  आरामाची  नोकरी,  वयाच्या  पंचेचाळीस   वर्षापर्यंत    आरामदायी   आयुष्य   घालवणारा  हा अवलिया  अस्वस्थ  झाला  आणि   कोण्या  अज्ञात  प्रश्नाच्या   शोधात  नोकरी   सोडून  भारतात  परत  आला.    पुण्यापासून  पस्तीस  कि.मी.अंतरावर चाकण  जवळ  आंबेठाण  या  गावात   कोरडवाहू  शेती  केली    आणि  शेतीचा  प्रश्न  समजून  घेतला. नुसतं  समजून घेतला  एवढंच  नाही  तर  पिढ्यानपिढ्या  शेतीत  खपणाऱ्या  शेतकऱ्यांना   त्याच्या  गुलामीचं  न  सुटलेलं  कोडं  त्याने  चारपाच  वर्ष  शेती करून  तेवढ्याच  अनुभवावर  सोडून  दाखवलं.   माणसं   जोडण्याऐवजी  तोडण्यासाठी  जे  जे  गुण  असावे  लागतात  ते ते सगळे  अंगात स्वभावतःच, समोर कोणीही   असो  भीडमुर्वत  न  ठेवता,   कोणी   दुखावेल  याची  चिंता  न   करता समोरासमोर  ठणकावणारा  सडेतोडपणा,   राजकारणाचा  कधी काळी  मतदान  केले  असेल  तेवढाच  संबंध  आलेला  त्यामुळे   गावपातळीवर  काम  करणारा  कार्यकर्ता  सुद्धा  सहज  फसवेल  इतका    राजकीय भाबडेपणा.   राजकारणासाठी  लागणारी  लबाडी  त्यांना कधीच   जमली नाही.  त्यांच्या  दृष्टीने  शेतीमालाचा  भाव  मिळवण्यासाठी  वापरण्याचे  राजकारण हे  आंदोलनाचे  तंत्र  आहे एवढाच राजकारणाचा  अर्थ.  नोकरी  सोडताना  आलेला   पैसा  शेतीच्या  प्रयोगात  खर्ची  पडल्यामुळे  आणि  कुटुंबाचा  आर्थिक  भार   शेतीतल्या  उत्पन्नावरच  पडल्यामुळे  खिसा  कायम  रिकामा,  त्यामुळे    कार्यकर्त्यांना   सक्षम  करण्याचा  प्रश्नच  नव्हता.  कोणी  कार्यकर्ता  शेतकरी संघटनेत  आला  काय  किंवा  बाहेर   गेला काय  त्यांनी त्याची   चिंता  कधीही  केली नाही.  व्यक्ती  स्वातंत्र्याचा   कडवा    समर्थक  असल्यामुळे   विचारधारेच्या  बाबतीत   दुसऱ्या  कोणाची  भूमिका समजून घेण्याची  किंवा   तडजोड  करण्याची  गरज त्यांना  कधीही  वाटली   नाही.   अभ्यासाचा   दांडगा  व्यासंग  त्यामुळे   तयार  झालेला  अहंमन्य  स्वभाव.  आयुष्यभर  सतत  प्रयोगशीलता, विचार  करण्याचा  आणि  निर्णय घेण्याचा  झपाटा    इतका अचाट कि सोबत  काम  करणाऱ्या  कार्यकर्त्यांची   दमछाक  व्हावी.   शरद  जोशी  यांची  साधारण  अशी   पार्श्वभूमी.
            परस्पर विरोधी  पार्श्वभूमी  एवढाच  या  दोघातील  फरक  नव्हता  तर  त्यांच्या  मूलभूत  भूमिकेतील  विचारधारेचा फरक  होता  तो समजून घेतल्याशिवाय  या दोन  नेत्यामधील  द्वैत  समजून  घेणे  कठीण  आहे.
            शरद जोशी  स्वातंत्र्याचे   कडवे  समर्थक, शेतकऱ्यांना बाजारपेठेचे, तंत्रज्ञानाचे, शेतीव्यवसायाचे  संपूर्ण  स्वातंत्र्य असावे या विचारधारेचे. सरकारचा   व्यापारातील   हस्तक्षेप,   बाजारपेठ  बाधित  करतो, सरकारी  धोरणामुळे       शेतमालाला  भाव  मिळत नाहीत  हे  त्यांनी   सरकारी  अहवालातील  पुरावे  समोर ठेवून    सिद्ध  केले.  देशातील  सरकारे  मग ते कोणत्याही  राजकीय  पक्षाचे  असोत,सातत्याने  शेतकऱ्यांच्या  विरोधात   धोरणे  राबवतात,  शेतकरी  हा गुणाकार करणारा  उद्योजक  आहे,  त्याला   स्वातंत्र्य  मिळाले पाहिजे  याशिवाय  काहीही  नको.  शेती  धारण  करण्यापासून  ते शेती  सोडण्यापर्यंत, शेतीमध्ये  काय पिकवावे इथं पासून कुठे, कसे, केव्हा ,विकावे इथपर्यंत,  शेतीमध्ये  कोणते  तंत्रज्ञान  केव्हा,  आणि  कसे  वापरावे याचे स्वातंत्र्य  असावे  यासाठी  आग्रही  असणारे  अर्थकारणी,  कृतिशील   विचारवंत.  सरकारने  बाजारपेठेत   अजिबात  हस्तक्षेप  करू नये,  तशा   परिस्थितीत  मागणी आणि पुरवठा  या  नैसर्गिक  न्यायाने  बाजारपेठत   असणारे   भाव  हे  शेतकऱ्यांसाठी   न्याय्य  असतील  आणि  मान्यही असतील. बाजारात  किमती  पडल्या    तर  फायदा  ग्राहकाचा  होईल  आणि  भाव  वाढले  तर  फायदा  शेतकऱ्यांचा  होईल,  एवढेच  नाही तर  भारत सरकारने,   भारतातील  शेतकऱ्यांना  जगभरातील  शेतकऱ्यांशी  स्पर्धा  करता  यावी  यासाठी     जागतिक  व्यापार  संघटनेच्या  व्यासपीठावरसुद्धा,    मागणी  आणि  पुरवठा  या  नैसर्गिक  तत्त्वाप्रमाणे  जगभरातील  शेतकऱ्यांना  परस्पर  व्यापार  करता  यावा  यासाठी   प्रयत्न  करायला   पाहिजे  तशी   ठाम  भूमिका  घेतली पाहिजे हा त्यांचा आग्रह.  सरकारने  कायदा  आणि  सुव्यवस्था   सक्षमपणे  राबवावी,    याशिवाय  संरचनात्मक   उभारणी  करावी,  विजेची,  पाण्याची  रस्त्यांची,  उपलब्धता  वाढवावी  यासाठी  भांडवली  गुंतवणूक  वाढवावी, म्हणजे  शेतकऱ्यांना  बाजारपेठेचा  अभ्यास  करून  उत्पादनाचे, साठवणुकीचे, प्रक्रियेचे   निर्णय     करता  येतील   यातूनच  रोजगार  निर्माण होतील आणि  मोठी ग्राहक शक्ती  बाजारपेठेत  उतरून देवाणघेवाण  होईल  आणि  गरिबी  हटेल,  देशाचा   विकास  साध्य होईल. विकास करण्यासाठी  यापेक्षा  वेगळे  प्रयत्न  करण्याची  गरज नाही.  सरकार  कमीत कमी  असावे,  ते  कार्यक्षमपणे   काम  करणारे  असावे.    थोडक्यात      संपूर्णपणे    खुल्या  व्यवस्थेची   शरद  जोशी   यांची मांडणी  आणि विचारधारा.
            शरद   पवार  यांची  विचारधारा  नेमकी   शरद  जोशी  यांच्या  उलट  दिशेची, जवाहरलाल  नेहरू  यांचे  ते  वैचारिक   वारसदार,  समाजवादी  धोरणावर   त्यांचा   विश्वास.  सगळे  आर्थिक  नियोजन  सरकारनेच  करावे या विचारधारेचे,  शेतकऱ्याने  जमीन  किती  धारण  करावी, किती  विकावी, कुणाला विकावी, कोण  विकत  घ्यावी,कोण  विकत  घेऊ  नये, कोणते  पीक घ्यावे,  पीक किती घ्यावे,,कसे विकावे,  कुठे  विकावे, प्रक्रिया  कशी करावी, कोणी   करावी, शेतमालाची  साठवणूक  किती करावी, निर्यात  करावी  किंवा  करू नये, याशिवाय    तालुका  बंदी,जिल्हा  बंदी,  राज्य  बंदी, कधी   चढ्या  भावाने  शेतमालाची  आयात   करून  शेतमालाचे  भाव पडावे,अशा  एक  ना  अनेक   शेतकरी  विरोधी  धोरणाचे  शरद पवार  प्रतिनिधित्व  करतात.   सगळ्या समाजवादी, कल्याणकारी  धोरणाचा   पाया  हा लायसन,परमिट,कोटा,राज  हे  धोरण   राहिलेले  आहे. या व्यवस्थेत   विकास  हा  सत्तेभोवती    वावर  असणाऱ्याचाच  होतो  हे  सगळ्या  राजकारण्यांना, अर्थशास्त्र्यांना पक्के  माहीत  असते  त्यामुळे,   सरकारी  हस्तक्षेपाचा   बाजारपेठेतील    फास  जास्तीत  जास्त  आवळावा  याकडेच  सगळ्यांचा  कल  असतो . त्यामुळे   सगळ्या   समाजवादी   व्यवस्थेत  शेतकऱ्याचा   धान्य  उत्पादन करण्यासाठी      गुलाम म्हणून वापर  केला ,  सगळ्या  राजकारण्यांनी  शेतमाल  तयार करणे आणि  मते गोळा करणे  यासाठीच  शेतकऱ्याला   वापरले .   त्याला  शेतकऱ्याचा  राजा  म्हणवून  घेणारे  शरद  पवार हेही  अपवाद  नाहीत. आपल्या  राजकीय  कारकीर्दीत  शरद  पवार  यांनी  शेतकऱ्याला  त्याच्या    गुलामगिरीतून  बाहेर  काढण्यासाठी  काही प्रयत्न  केल्याचे  कधीही  दिसले  नाही. उलट  समाजवादी  व्यवस्थेला  पोषक  वातावरण  तयार करण्यासाठीच  त्यांनी   सारी  हयात  घालवली. शेतकऱ्यांच्या  गरिबीचा  आणि  अडाणीपणाचा  फायदा  घेऊन,त्यांच्यात    जातीय   विद्वेष  पसरवून,    शेतकऱ्यांच्याच    काही  पोरांना  हाताशी   धरून  त्यांना  रसद   पुरवून   राजकारण  करण्याचा  मधला   मार्गच   स्वीकारला.
            शरद जोशी  यांच्या  शेवटच्या  काळात  यशवंतराव  चव्हाण  यांच्या  नावाने  दिला जाणारा  पुरस्कार प्रदान  कार्यक्रमात  बोलताना  शरद पवार  यांनी  शरद  जोशी  यांचा   शेतकऱ्यांच्या  प्रश्नाच्या  अभ्यासावरील त्यांच्या  स्वातंत्र्याच्या भूमिकेचा   आणि देशातील  विविध  भागातील  असलेला  प्रभाव  सर्वासमक्ष  मान्य केला. त्यापुढे  जाऊन  सरकारी  तिजोरीतील   शेतकऱ्यांचा  वाटा  त्यांना  मिळाला  पाहिजे  असा  माझा  प्रयत्न  आहे  हेही  सांगितले. खरी  गोम  त्या वाटा  मिळवण्यातच आहे.  या वाटा  मिळवण्यात  शेतकरी  सोडून   सगळेच  यथाशक्ती  यशस्वी  होतात,  शेतकरी  मात्र   तिजोरीतल्या  न  मिळणाऱ्या  वाट्यासाठी  पिढ्यांमागून  पिढ्या  धावत  शरद पवारासारखे  नेते  मोठे करीत राहिलं.
            स्वातंत्र्यातच    शेतकऱ्यांना  विकासाच्या  अनंत  संधी  संभवतात  असे  मानणारे  शरद जोशी आणि  हातपायात  दंडबेड्या  ठोकून  सरकारंच  सगळा विकास  करेल  असं  मानणारे  शरद  पवार  यांची  तुलना कशी  होऊ शकते?   या दोघातील  फरक   फक्त  वेगवेगळ्या  पार्श्वभूमीचा  नाही तर  परस्पर विरोधी  आर्थिक  विचारधारेचा  आहे.
 
- अनंत देशपांडे
Mob no : ९४०३५४१८४१
Email : anant.deshpande2155@gmail.com

Share