नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी आत्महत्या आणि आम्ही शहरवासी
दि. १९ मार्च १९८६ साली पहिली शेतकरी आत्महत्या झाली. वर्धा - चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली. यावर्षी या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली. ३१ वर्ष...आणि या ३१ वर्षात काय काय घडले? अनेक सरकारे आली / गेली, अनेक नवीन प्रकल्प सुरु झाले, तंत्रज्ञान प्रगत झाले, पण शेतकरी कुठे पोहोचला? आज शेतकरी आत्महत्येचा आकडा हजारोंच्या घरात पोहोचला आहे.
पहिल्या शेतकरी आत्महत्येने पूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. मी तेव्हा शाळेत होते. बातमी वाचली पण त्याचे गांभीर्य तेव्हा कळले नाही. एक शेतकरी पूर्ण परिवारासकट आत्महत्या का करतो? हे समजायचे ते वय नव्हते. विदर्भापासून खूप दूर नासिकला मी रहात होते. आजोळ सांगली, तिथला शेतकरी सधन, पाण्याखालचे वावर असलेला. दर सुट्टीला सांगलीला जायचे तेव्हा शेतकर्याच्या घरात धान्यांच्या पोत्यांच्या थप्पी लागलेल्याच पाहील्या. शेतकर्याचे दारीद्र्य मला अजिबात माहीत नव्हते असे नाही. वेळेला शेतकर्यांना उधारउसनवारी करतांना पण पहात होते. सुगी झाली की परताव्याची बोली पण ऐकत होते. पण शहरातून सुट्टीला गेलेली मी रोजचे ताजे धारोष्ण दूध पित होते. शेतातली माळवं, काकड्या, शेंदाड खात होते. मक्याची कणसं, चिकू, चिंचा, सिताफळ यांची रेलचेल होती. यापलीकडे शेती मला माहित नव्हती.
हळूहळू शेतकरी आत्महत्या करत असल्याचं सारखंच कानावर येवू लागलं. हे आत्महत्या का करत आहेत? हे मी वाचायचे, समजून घ्यायचा प्रयत्न करायचे. परिस्थिती लक्षात येवू लागली. भाजी घेतांना सुरुवातीला मला हा भ्रम होता की विकणारे सर्व शेतकरीच असतात. कारण गावाकडे माझी मावशी, तिच्या जावा याच माळवं, कडधान्या विकायला जायच्या. कनवटीला लावलेले पैसे घरातल्या तिखटासोबत मीठाची भूमिका बजावायच्या. भाजी घेतांना त्या शेतकरणीला आधार व्हावा म्हणून मी पाव किलो ऐवजी अर्धा किलो घ्यायचे. पण नंतर त्यांच्याशी संवाद साधतांना लक्षात आले की त्या शेतकरी नाहीत. त्यांनी ती भाजी आडत्याकडून विकत घेतली आहे. मग विचार सुरु झाला की शेतकरी स्वतः भाजी, धान्य का विकत नाहीत? कारणे शोधता हजार मिळाली. शेतकरी रोज भाजी विकायला बाजारात गेला, तर शेतात मशागत कोण करणार? वेळेवर पाणी देणे, खत घालणे, भांगलणी, तोडणी यासाठी मोलाने माणसे परडवत नाहीत. आणि पिकवलेले धान्य, भाजी एकदम एवढी कोण घेणार? नाही विकले गेले तर धान्य घरात ठेवता येईल, पण भाजी कशी टिकवणार?
एका वर्षी आजोळी गेले असता, शेतात शाळू तयार झाला होता. मावशी, मामा त्याच्या कापणीची तजवीज करतच होते की अचानक बेमौसमी पाऊस कोसळला. सगळीकडे चिखल झाल्याने दोन दिवसांनी आम्हांला शेतात जाता आले. शाळू पूर्ण आडवा झाला होता. जमिनीला टेकलेली कणसे, त्यात पूर्ण भरलेला मोत्यासारखा दाणा, आणि त्यातून बाहेर डोकावणारा पिवळसर अंकूर! शेतात राबराबलेली मावशी एक एक कणीस उचलून हळहळू लागलेली! पोटच्या पोरासारखे जोपासलेले पिक जेव्हा डोळ्यासमोर असे हातातून जाते तेव्हाचा आकांत ना तोंडातून बाहेर येत, ना डोळ्यातून! मी फक्त साक्षीदार बनू शकले. तिला समजावण्याची ताकद माझ्यात नव्हती. असेच अनेक प्रश्न आत्महत्या करणार्या शेतकर्यासमोर होते. काही ठिकाणी ओला दुष्काळ, तर विदर्भात वर्षानुवर्षे कोरडा दुष्काळ! आभाळाकडे लावलेली नजर विझुन गेली तरी त्या वरुणराजाला दया येत नाही. जमिन सिंचनाखाली आणण्यासाठी काय करायला हवे? हे तज्ञांना माहीत आहे. पण ते अमलात आणणार कोण?
प्रश्न अनेक होते, आणि उत्तर माझ्याकडे नव्हते. सुरुवातीला शेतकरी आत्महत्या झाली की वातावरण ढवळून निघायचे. सगळे तोच विषय बोलतांना आढळायचे. आम्ही शहरवासी तावातावाने या विषयावर चर्चा करायचो. शेतकर्याने काय करावे, काय करु नये याविषयी आमच्याकडे भरपूर सल्ले होते. पण कसे करावे, त्यातल्या खाचाखोचा याची आम्हांला जाणीवच नव्हती. मुटे सरांशी मायबोलीवर ओळख झाली. शेतकरी चळवळ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय! मी त्यांचा, शेतकरी चळवळीचे प्रणेते आ. शरद जोशी यांचा दृष्टीकोन समजून घेवू लागले. पण तरीही अजून फारसे काही लक्षात आलेले नाहीये. कारण त्या परिस्थितीशी आम्ही संलग्न नाही.
शेतकरी आत्महत्या रोजचीच बाब होवू लागली तसे बाकीच्यांच्या भावना बोथट होवू लागल्या. 'रोजचे मढे त्याला कोण रडे' ही म्हण शब्दशः खरी होऊ लागली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरुन ह्या बातम्या दुसर्या, मग तिसर्या पानावर गेल्या. आता तर वर्तमानपत्राच्या कुठल्याश्या कोपर्यात छापल्या जातात, कोण वाचते की नाही काय माहित!
शहरवासीयांना या शेतकर्यांच्या व्यथा समजाव्यात, परिस्थिती नक्की काय आहे ते लक्षात यावे म्हणून सिनेमा निघाले. एक सिनेमा म्हणून मी पण ते पाहिले. 'गोष्ट छोटी...डोंगराएवढी' बघतांना अक्षरशः ढसढसून रडले. हाल हाल म्हणतात ते काय असते! शासनाने कोंडी केलेली, बीबियाणे विकत घ्यायला पैसा नाही, उधार मागावा तर आजूबाजूचे सर्व त्याच परिस्थितीत! कोण कोणाला मदत करणार? किती काळ करणार? शेताला पाण्यासाठी पावसावर अवलंबून रहावे लागते. उमद्या मनाचा शेतकरी मोडून न पडला तर नवल! यांव करावे त्याव करावे...सांगणे खूप सोपे आहे. जो त्या परिस्थितीत असतो ना, त्यालाच त्याचे दु:ख ठाऊक! उपदेश करणारे कधी ह्या परिस्थितीतल्या शेतकर्यासाठी काही करतात का? नाही. ते फक्त उपदेश करतात. अहो ते ह्या शेतकर्यांचा विचार करतात हेच खूप नाही का? सरकारी मदत आधी मिळाली तर काही जीव वाचतील तरी! पण ती येते शेतकरी सरणावर चढल्यावर, आणि ती पण पुर्ण येते का? जे पोळले गेलेत त्यांनाच माहीत! आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्याच्या मुलीच्या लग्नाचा खर्च कोणी उचलत नव्हते. आणि मागे राहिलेल्या त्या माऊलीचे दु:ख तर काय वर्णावे? धनी गेलेला, मागे उरलेल्या कच्च्याबच्च्यांची जवाबदारी तिच्यावरच असते. मुलांसाठी तिला जगावेच लागते, लढावेच लागते. मग त्या गेलेल्या घरच्या कर्त्याला तिच्यासोबत ही लढाई लढायला काय झाले होते? त्यांना कोणाच्या आधारावर सोडून तो निघून जातो? जे काही कर्ज असते त्याची झळ घरातल्यांना बसत नव्हती का?
पोटाला चिमटा घेवून गरीब शेतकरी आपल्या लेकरांना शिकवतोय. त्यांनी कुठेतरी नोकरी करुन घराला सावरावे, शेतीला काही मदत करावी याची वाट पहात आहेत. पण या आरक्षणाच्या विळख्यात अडकलेली सिस्टीम त्या मुलांना नोकरी द्यायला असमर्थ आहे. त्यांनी आपले शिक्षण कसे पूर्ण केलेय याच्याशी कोणालाच काहीही घेणे देणे नाही. जिथे सरकारी नोकरीसाठी पेट्या द्याव्या लागतात, त्या गरीब शेतकर्याच्या मुलांनी, ज्यांना खायला अन्न नाही त्यांनी कुठून आणायच्या पेट्या? शेतकर्यांची काही मुले जी शिकून शहरात आली, इथे त्यांनी बस्तान बसवले, त्यांनी आपल्या गावाशी नाळ तोडली. गावाकडचा अडाणी बाप, माय, धाकटी भावंडे त्यांना आपल्या शहरी रहाणीमानावरचा डाग वाटू लागली. त्यांना मदत तर दूर, त्यांना आपले समजायची पण त्यांची तयारी नाही. आपल्या नशीबाला दोष देण्याशिवाय तो शेतकरी बाप काही करु शकत नाहीये.
बापाला त्रास होऊ नये म्हणून काही उपवर मुली, शिकून पण नोकरी न मिळालेली मुले बापाच्याच मार्गावर निघून जात आहेत. का? त्यांना मार्गदर्शन करणारा त्याच मार्गावर चालतो आहे. त्या निरागस, भांबावलेल्या मुलांना वाट कोण दाखवणार! आत्महत्या हा मार्ग नाही माझ्या शेतकरी भावांनो, आपल्या कोवळ्या मुलांकडे पहा, आपल्या कारभारनीकडे पहा, तुमच्या नंतर त्यांना या जालीम जगात काय काय भोगावे लागेल याचा तरी विचार करा.
काही सामाजिक संस्था शेतकर्यांच्या कुटुंबियांना उभे करायचा प्रयत्न करत आहेत. पण शेतकर्याने मजबूत व्हावे म्हणून कोण काय करतय का? आत्महत्येचे हे लोण वाढतच चालले आहे. जगाच्या पोशिंद्याला इतक्या हीनदीन अवस्थेत पोहोचवायला काय कारणीभूत झाले?
हे आहेत हे माझे फक्त विचार आहेत. खरे तर बरेच काही करावेसे वाटतेय. उत्तरे शोधते आहे. थोडा वेळ लागेल पण मार्ग मिळेल हा विश्वास आहे.
- विनिता माने - पिसाळ
पुणे
प्रतिक्रिया
अप्रतीम, मार्ग मिळणारच
अप्रतीम,
मार्ग मिळणारच
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
या लेखात शेतक-यांच्या
या लेखात शेतक-यांच्या कुटुंबाची वाताहात थांबावण्यासाठी व 'शेतकरी आत्महत्या हा पर्याय नाही' हा चांगला संदेश शेतकरीदादा व शेतमजूर यांच्यापर्यत नक्कीच पोहचेल.
धन्यवाद सुमन
धन्यवाद सुमन
या लेखात शेतक-यांच्या
या लेखात शेतक-यांच्या कुटुंबाची वाताहात थांबावण्यासाठी व 'शेतकरी आत्महत्या हा पर्याय नाही' हा चांगला संदेश शेतकरीदादा व शेतमजूर यांच्यापर्यत नक्कीच पोहचेल.
शेतकरी आत्महत्या आणि आम्ही शहरवासी
विनीताजी खूप छान लेख आहे । मार्मिकतेने मांडणी केली आहे ।
आभिनंदन ।
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
धन्यवाद सर __/\__
धन्यवाद सर __/\__
छोटासा प्रयत्न केला आहे.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर
धन्यवाद सर
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण