नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अ. भा. शे. सा. निबंध स्पर्धेसाठी निबंध
विषय - शेतकऱ्यांचा राजा :बळीराजा
शीर्षक - बळीराजा सुखी भव
गुणगुणायचो बालपणी
निसर्गातली हरित गाणी
पाखरांच्या चोचींमधूनी
ऐकायचो वृक्षांची वाणी
बालपणापासून निसर्ग आणि ऋतूंचे चक्र आपण पहात, अभ्यासत आलो आहोत. हल्ली वृक्षांची बेसूमार कत्तल आणि ग्लोबल वॉर्मिंग या कारणामुळे निसर्गचक्रात परिवर्तन झाले आहे. 'नेमेचि येतो मग पावसाळा' म्हणत सात जूनला आपण पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत असतो. परंतु तो आता जून अखेरीस येऊ लागला आहे. बर्यापैकी बरसल्यावर वरूण थोडी सुट्टी घेतो आणि बळीराजा आपल्या कामात शिवारात गढून जातो."यंदाचा मोसम बरा हाय, मालाला दर मिळंल औंदा" अशा चर्चेतून बळीराजाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. श्रावणात 'सरसर शिरवे अन् उन्हाचा खेळ' अशा वातावरणात पिकांना हरितमय करून जातो. आता बघता बघता पिकांची काढणी जवळ येते आणि या पावसाला ताळतंत्रच उरत नाही. वीजांचा कडकडाट नि ढगांचा गडगडाट अशा ढोल नगाऱ्यांच्या गर्जनेत तो रोजच बरसायला लागतो.
नको तडतड विद्युल्लतेची
व्यथित होतोय बळीराजा
मेघांच्या गडगडाटातूनी
येतोय ऐकाया बॅंडबाजा
बळीराजाच्या अशा सुखी सरळ जीवनात संकटाची चाहूल नसावी.
निसर्ग भासतो गावचा
किती सुंदर नि मोकळा
वाटतेच जावे गावाला
पिकवावा फुलवावा मळा
खरेच! गावाला राहणारा आणि मळ्यात आपले आयुष्य काढणारा बळीराजा खूपच भाग्यवान रोज प्रात:काळी उठून कांदा,ठेचा,भाकरी चटणीची न्याहारी करून नांगर खांद्यावर घ्यायचा. हाताला ढवळ्या पवळ्याची जोडी अन् शेतात काम करायचे,.सुखाचे जीवन!आपल्या मनाला वाटेल तितके खपावे, दुपारी जेवण करून झाडाच्या शांत थंडगार सावलीत बुंध्याची उशी करून लवंडावे नि आराम करून पुन्हा कामाला उभारीने सुरुवात करावी. शहरातल्यासारखे धकाधकीचे जीवन नाही. रोज लोकल आणि ऑफिसचे मस्टर गाठण्यासाठी पळापळ नाही. लोकलमध्ये हात लटकून तासन् तास प्रवास करून शरीर आणि मन दोन्ही थकून जाते. पुन्हा काम करण्यासाठी ऊर्जा वाचत नाही. दमट वातावरणात आणि घाम गळेपर्यंत पळाल्याने मनाला शांती नाही. सकाळी आणलेला चपाती भाजीचा थंडगार डबा खायला लागतो.
बळीराजाची घरधनीण घरातली कामे उरकून गरम गरम भाकरी, बेसन, दही आणि ठेचा डोईवरच्या टोपलीत ठेवून धन्यासाठी दुपारचे जेवण
घेऊन मळ्यात येते अन् दोघेही आंब्याच्या झाडाखाली गार सावलीत संगतीनं चार घास जास्तच जेवतात. विहिरीतला थंड पाणी पिऊन आपली तृष्णा भागवतात. पाच मिनिटात वचवच खाऊन पुन्हा कामाशी गाठ घालण्याचा प्रश्नच नाही. गावचे रानवारे मस्त शीतल हवा देते. त्यात डूलकी न लागेल तरच नवल! शिवाय शारीरिक कष्ट केल्याने भूक आणि झोपही चांगली लागते. कामाचा तणाव नाही. उगाच चिंता, काळजी नाही. शेतात कष्ट करावे, संध्याकाळी घरी येऊन चहापान करून जरा मंदिरात देवदर्शन करून यावे. काही भक्तगण भजन-कीर्तनातही रमतात. घरी येऊन चविष्ट जेवण खावे अन उद्याची स्वप्ने पहात स्वस्थ झोपून जावे. सुखाचे अन् निष्काळजी जीवन जगल्याने रोग, विकार नि आजार शरीराला शिवतच नाही. शारीरिक कष्ट केल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही. निरोगी शरीर असल्यावर जीवनात आणखी काय हवे! रासायनिक खते, केमिकल्स घातलेले आणि औषधाची फवारणी केलेले अन्नधान्य खाऊन शहरात आजारांना सामोरे जावे लागते.
निरनिराळ्या व्याधी मरेपर्यंत शरीराला चिकटतात. त्यामुळे अनेक औषधे आणि पथ्यपाणी करण्यातच आयुष्य संपून जाते. अशावेळी जीवनाचा आनंद तरी कसा आणि किती लुटणार! ऊर फाटेस्तोवर कष्ट केल्यानंतर मिळणारा तुटपुंजा पगार घराचे भाडे आणि लाईट बिल, किराणामाल भरण्यातच संपून जातो. महागाईने सर्व वस्तूंमध्ये बेसुमार वाढ झाल्यामुळे हातातोंडाची गाठ घालणं अवघड होऊन बसतं. बळीराजाचे तसे नाही. आपल्या शेतात पिकलेला भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य मुबलक असल्यामुळे कष्ट करावे आणि चांगले चुंगले खावे. घरातच असणारा खिल्लारांचा बारदाना दूध, दही, लोणी,तूप यांची मुबलकता आणि औषध खानपानामुळे निरोगी आयुष्य! सुख सुख म्हणतात ते याहून काय निराळं असणार! कोणाची गुलामगिरी नको, दंडेलशाही नको! आपल्या शेतात जायचे आणि हवे तेवढे कष्ट करायचे! त्यामुळे शरीरही धष्टपुष्ट होते. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारी नदी, ओढे आणि पाखरांचा किलबिलाट अशा निसर्गात जीवन म्हणजे सुखनैव होय. नको वाहनांची वर्दळ, प्रदूषण! नाही जलप्रदूषण किंवा रासायनिक कारखान्यातून टाकणाऱ्या मळीचे प्रदूषण! कोंबड्याच्या आरवण्याने आणि पाखरांच्या गोड किलबिलाटाने सकाळी त्याची झोप मोडते. मंदिरातल्या भूपाळी चा मंजुळ निनाद कानावर येत असता तो शेतात जाण्याची तयारी करतो.
कर्णकर्कश्श आवाजाच्या गाड्यांचे हॉर्नस्, भोंगे नसल्यामुळे त्याच्या शरीरावर, मनावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. निसर्गाची अवकृपा झाल्यावर बळीराजाला नुकसान झेलावे लागते. परंतु निसर्गापुढे कोणाचे काय चालणार!
नकोच बँकेत लाखोंचा बॅलन्स
असायला पैशाची खुळखुळ
जगतो आनंदाचे जिणे आम्हीं
जसा काही झराच झुळझुळ
पन्नास शंभर साड्या, कपडे, दहावीस चपलांचे जोड, घरासाठी काढलेले लाखोंचे कर्ज, बँकेच्या लॉकर मधील शंभर तोळे कधीच सुखाची झोप घेवू देणार नाहीत. परंतु अंग झाकण्यापुरते वस्त्र आणि कामापुरता पैसा असेल तर ती व्यक्ती शांत निद्राधीन होते. कोणा चोराचिलटाचे भय नाही अन भरमसाठ कमवलेला पैसा कुठे गुंतवायचा त्याची पर्वा नाही. येईल तो दिवस आपला समजून निवांत खाऊनपिऊन सुखी राहणे हेच बळीराजाच्या जीवनाचे ध्येय असते.
नको फुकाचा पैसाअडका
प्यारी मजला ही चंद्रमौळी
सोने चांदीही वर्ज्य असता
खावी सुखाची भाजीपोळी
अशा जीवन तत्वांनी आपले जीवन सुखात जगणारा आणि आपल्या शेतात दिनरात घाम गाळून सोने पिकवणारा जगाचा हा पोशिंदा आपल्या पोटाची सुव्यवस्था राखतो आणि आपल्या दोन वेळच्या पोटाची सोय करतो. म्हणूनच आपण सुखाची पोळी खाऊ शकतो. त्याच्या कष्टाची किंमत व्हावी, त्याला, त्याच्या संसाराला सुखाने राहता यावे अशी आपणही व्यवस्था करावी एवढीच माफक अपेक्षा त्याला असते. त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा असे त्याला वाटणे साहजिकच आहे.लाखों करोडोंची मालमत्ता त्याला कधीच नको असते. हवा असतो देशवासियांचा खंबीर हात आणि निसर्गाची अनुकूल साथ! निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकल्यानंतर मदतीसाठी त्याने दिलेली साद आपल्या कानी पडावी अन् संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला मदत करावी. स्वच्छंदी जीवनाला नको लाखोंचा पैसा, पोटापुरता हवा पैसा.
बळीसारखे आयुष्य जगणे म्हणजे खरे तर सुखाचेच. नको रोज पिझ्झा-बर्गर, हवी त्याला ठेचा भाकरी जी त्याला निरोगी बनवते.नकोच बिसलरीचे बाटलीबंद पाणी, शिवारालगत वाहणारा स्फटिकसारखे मधूर जल पुरविणारा झुळझुळ झरा त्याची तहान भागवतो. त्यातूनच सर्व प्रकारची खनिजे आणि विटामिन्स मिळतात.सण सोहळ्याला मात्र बळीराजाही आपल्या सहकारी मित्रांसोबत एकत्र येतो. सर्व मिळून सणांचा आनंद लुटतात. तसेच गावात देव धर्माच्या कार्याला बळी सर्वतोपरी सहाय्य करतो. गावी वर्षातून एकदा भरणारी यात्रा त्याला अपरिमित आनंद देते. त्यात मिळणाऱ्या आनंदाचे संचित त्याला वर्षभर पुरते. आपल्या ढवळ्यापवळ्याला सजवून तो शर्यती खेळतो. त्यांचा सन्मान करतो.बैलजोडीच्या मेहनतीची जाण ठेऊन वर्षातला एकदाच येणारा बैलपोळा सण जल्लोषात साजरा करतो. बळीराजाची सेवा करणारी त्याची बैलजोडी त्याला आपल्या जवळची वाटते. अशा या इमानी सेवकांना तो पोळ्या दिवशी विशेष जपतो. सकाळीच उठून नदीवरून त्यांना अंघोळ घालून आणतो. त्यांच्या सर्वांगावर गेरूने,रंगाने ठिपके द्यायचे,त्यांच्या शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग,गळ्यात कवड्यांच्या माळा घालायच्या,पायात चांदीचे तोडे घालतात. त्यांची यथासांग पुजा होते. सुवासिनी त्यांना पंचारतीने ओवाळतात. गोड-धोड पुरणपोळीचा घास खाऊ घालतात. त्यांच्या पाठीवर झूल टाकून गावातून मिरवणूक काढतात. त्याचा खराखुरा सखा त्याचा बैल असतो. त्याचे ऋण फेडण्यासाठी पोळ्या दिवशी तो नांगराला जुंपत नाही. वर्षातून एक दिवस त्याला आराम देतो.
बळीला आपला गावच स्वर्गासमान असतो. त्याला गावच्या मातीची ओढ असते. काळ्याआईची सेवा करण्यातच तो धन्यता मानतो. पण त्याला जगवणाऱ्या काळ्या आईला तो खूप मानतो. म्हणूनच शेती कसणे त्याचे परम कर्तव्य असते. त्याचे कुटुंब याच काळ्या आईच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळे तिचेही ऋण तो मानत असतो.बळी शहरात कधीच रमु शकत नाही. शहराचे धकाधकीचे आयुष्य त्याच्या अंगवळणी पडू शकत नाहीत. या मातीतील अन्न खाऊन आपली जोपासना झाली, तिच्यात हाडाची काडे केली. शेवटी मेल्यानंतरही या काळ्या मातीतच आपल्या देहाची माती व्हावी अशी त्याची इच्छा असते.शहरात असणारे चंगळवादी जीवन त्याला आकर्षित करत नाही. गावात स्वच्छ, प्रदूषणविरहीत जीवन जगताना त्याला आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. वडिलोपार्जित वाड्यात त्याचा रहिवास म्हणजे स्वर्गच. मळ्यात पिकलेला भाजीपाला त्याला इंद्राच्या नंदनवनाहूनी मौल्यवान वाटतो. कारण त्यात त्याचा घाम गाळलेला असतो. आपल्या कष्टाचे चीज करून देणारी ही काळी आईच असते.ती त्याला प्राणाहूनही प्रिय असते.
नको शहराचा रहिवास
हवा मजला माझा गाव
मस्तमौला जीवन माझे
बळीराजा हे माझे नाव
गावाकडचे सण सोहळे, बैलांच्या शर्यती, जत्रा यात्रा आणि देवादिकांची क्रियाकर्म साजरी करत असताना त्याचा दिवस कुठे संपून जातो आणि जीवन सुखमय बनून जाते हेही कळत नाही.
हल्ली मात्र ये लहरी निसर्गचक्रामुळे बळीराजाला अवकाळी, दुष्काळ, महापूर अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. वृक्षतोड झाल्यामुळे पर्जन्याचे प्रमाण नियमित असे राहिले नाही. त्याचे कष्ट मातीमोल होते. उभं पीक आडवे व्हायची लक्षणे दिसू लागतात.बळीराजा चिंतातुर होतो
कधी हा वरूण उघडीपच देत नसल्याने सारे शिवार जलमय होऊन जातं. काय करावं!याच्या काळजीतच असलेला बळी पाऊस थांबण्याची वाट पाहू लागतो. परंतु वरूणराजा काही आपली पाठ सोडत नाही.छत्र्या मिटवून जागच्याजागी ठेवून द्याव्यात तर दिवसभर उन्हाची काहिली करणारा सूर्य दुपारनंतर ढगाआड लपतो अन् सायंकाळी आकाशात विजांचा तांडव सुरू होतो. "भीक नको पण कुत्रं आवर" असे म्हणायची वेळ बळी आणि तमाम जनतेवर येते. छत्री न घेता बाहेर पडलेल्या व्यक्ती पावसाच्या शिडकाव्यात अडकून जातात. चिंब भिजून घरी परतत चाकरमानी तरी बॅग आणि कपडे सांभाळत ओलेत्याने घर गाठतो.
किती खट्याळ तू वरूणा
खेळतोस असे अघोरी खेळ
भिजवून टाकतो चाकरमानी
कसा घालावा कामाचा मेळ
"काय म्हणावे या पावसाला! कर आता तोंड काळे" अशा उद्गारांनी त्याची हेटाळणी होते. तरीही तो आपला हट्ट काही सोडत नाही. "आलोच आहे तर तुमची पुरती जिरवूनच जातो" असे ठरविल्याप्रमाणे तो रोज मुसळधार वर्षावात भिजवून टाकतो. गणपती गेले, नवरात्री तरी कोरड्या मिळतील. पण त्याही भिजल्या वस्त्रांनी परतल्या. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी बरसलेल्या वरुण राजाने तळी, नद्या, ओढे, नाले भरून घरातही प्रवेश केला. आणि घरातील सर्व काही धुवून नेले. "हाय,हाय!"करत मानव मेटाकुटीला आला. शेतात, घरात पाण्याची तळी भरून राहिली. शेतातलं सर्व धान्य मातीत मिसळते. तसेच घरातील वस्तू, कपडे, किडूक-मिडूक सारं काही वाहून गेलं. आधीच कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. त्यातच अवकाळी पावसाने इंगा दाखवायला सुरुवात केली आहे. अस्मानी आणि महामारीच्या संकटाने त्रस्त झालेल्या बिचार्या मानवाने दाद तरी कुणाकडे मागायची? कधी अवकाळी तर कधी हाय हाय करायला लावणारा दुष्काळ! मनुष्याची ही दयनीय अवस्था पाहून गणपती, दुर्गामाता स्वगृही रवाना झाले. त्यांनीही वरूण राजापुढे आपले हात टेकले. तरीही वरूण राजा जिद्द सोडायला तयार नाही. त्याला मानवाच्या परिस्थितीची जराही कीव येत नाही. दिवसभर उन्हाची काहिली अन् संध्याकाळी पावसाची रिपरिप करत मुसळधार झोडपणे !काय करावे! सहा महिने दिवसरात्र कष्ट करून उगवलेले पीक डोळ्यांसमोर पायदळी तुडवले जाताना बळीराजाच्या मनाला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी! डोईवरचे सावकारी ऋण कसे फेडायचे! अशा काळजीत बळीराजा रोज गळफास लावून घेत आहे.तरी कोणालाच त्याची दया येत नाही.
नको पाहू परीक्षा बळीची
दुर्दैवाची आहे त्याची कथा
ऐकावी समाज बांधवांनी
जगाच्या पोशिंद्याची व्यथा
हे चक्र असेच चालू राहिले तर बळीच्या कष्टाचे काय मोल राहणार? त्याच्या डोईचे ऋण कसे कमी होणार? पाऊस आणि गारपिटीने फळबागांचेही नुकसान झाले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच कोरोनामुळे धंदा व्यवसायालाही मंदी आली आहे. कंपन्या, कारखाने तीन चार महिने बंदच असल्याने नोकरदारांचे पगार पाणीही मिळाले नाही. जगायचे कसे? हा यक्षप्रश्न मानवापुढे आ ऽ वासून उभा आहे. हा वरूणराजा मानवापुढे काळ बनून उभा आहे. दिवसभर उन्हं आणि रात्री पाऊस यांचा परिणाम मानवाच्या तब्येतीवरही होत आहे. यामुळे कित्येक शेतकरी आत्महत्या करतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. त्याला दोन वेळेच्या पोटाची भ्रांत निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला होता. तर यंदा पर्जन्याचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे दुष्काळ म्हणून शासनाने जाहीर करावे अशी मागणी वाढताना दिसत आहे. परंतु सरकारी तिजोरीत खडखडाट असताना फाटलेली ही झोळी किती जणांना पुरेल हाही एक प्रश्नच आहे. सरकारने त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आमिषाचे गाजर जरी दाखवले असले तरी ती मदत किती आणि कुठंपर्यंत पोहोचेल देवच जाणे! आधीच नेते, पुढारी आपल्यातच राजकारण खेळताना दिसत आहेत . त्यामुळे मधल्या लांडग्यांच्या हातातून प्रत्यक्ष किती रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडेल याची आणि गळती किती प्रमाणावर आहे हे प्रत्यक्ष देवही सांगू शकणार नाही, तिथे सामान्य माणसांची काय कथा! रोज वृत्तपत्रांमधील मथळे बळीराजाच्या आत्महत्येची बातमी पुरवून लिहिणार आणि सामान्यजन ती बातमी रोज चहासंगे चघळणार! बळीराजाची परिस्थिती रसातळाला पोहोचणार. जगाचा पोशिंदा न्याय मागायला थेट स्वर्गाचे दार ठोठावणार. याला धरबंधच राहणार नाही ही काळया दगडावरची रेघ!
दाखवूया दया जीवांवर
सर्वांना हक्क जिण्याचा
कितीही झाले नुकसान
पोशिंदा ताठ कण्याचा
अस्मानी संकटांना तोंड देत जगाचा पोशिंदा काबाडकष्ट करण्याचे सोडत नाही. तो हासत सगळी संकटे पाठीवर टाकतो.
नको अवकाळीचा त्रास
दुष्काळाची नसावी धग
पाणी आवश्यक जीवा
वाचवू त्यास लगोलग
सूर्याच्या उष्णतेने तळी, नद्या, कालवे आटून जाणार,जलसाठे कोरडे पडणार. पशुपक्षी पाण्याविना तडफडत राहणार. झाडे,वेली, वृक्ष सुकून जाणार. माणूस देखील पाण्याविना हैराण होणार.तहान कशी भागणार?भूक कशी मिटणार? सर्व सजीवसृष्टी तहानेने व्याकुळ होऊन जाईल. पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण होईल. जमिनी, बागा, जंगले उजाड होऊन जातील.झाडावर पक्ष्यांची चिवचिव, कुहूकुहू ऐकू येणार नाही. हरणे,पाडसे अरण्यात बागडणार नाहीत.धरती हरितवसना दिसण्याऐवजी वाळवंटी दिसेल.जिकडे पहावे तिकडे रूक्ष वाळवंट. पाण्यावर चालणारं जहाज, नावा बंद पडणार, विद्युतनिर्मिती न झाल्याने कारखाने, उद्योगधंदे बंद पडणार, सुर्यास्तानंतर काळोखाचे साम्राज्य पसरेल.
वाचवूया पाण्याचा थेंब
करूनी नेटके संवर्धन
चराचराची तहान भागते
अनमोल असे हे जीवन
मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सोयी कशा पुरवल्या जाणार? जीवनाचे हे चक्र थांबून जाईल. पृथ्वीवरील सचेतन विश्व अचेतन होऊन जाईल.देवाला साकडे घातले जाईल.पाण्यात ठेवले जाईल. पाऊस नसेल तर जीवनाचे रहाटगाडे कसे चालणार? विकासाच्या वाटा खुंटतील. शास्त्रज्ञांना पाण्याविना चालणारी यंत्रणा बनवावी लागेल. पाण्याला पर्याय शोधावा लागेल. परंतु पाण्याशिवाय दुसरे काय पिणार हाच प्रश्न उभा राहिल.
म्हणून देवाला मनोमन प्रार्थना ही की,मानवाला संजीवनी देणारा हा पाऊस पडायलाच हवा व चराचर सृष्टी हरितवसनाने नटलेल्या नववधूप्रमाणे दिसायला हवी. मानवानेदेखील जंगलतोड न करता दिवसाला एक तरी वृक्ष लावून संगोपन करण्याचे व्रत स्वीकारायला हवे. तेव्हा हा निसर्गरुपी परमेश्वर आपल्याला भरभरून पाणी देईल.
स्वच्छ खळाळत्या धारा
फुलवितो मयूर पिसारा
थाट अवनीचा पाहण्या
उधाणला अल्लड वारा
सौ. भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई
9653445835
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने