नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आले तव चरणा
कीटक नाशक पिऊन आले
कुणी घेउनी फाशी
भूलोकीचे प्रभू शेतकरी
आले तव चरणाशी
बळीराजाचा बळी जातसे
राज्यातुन सा-या
तरीही चुकल्या कधीच नाही
दोन तुझ्या वा-या
वक्रदृष्टी आम्हावर, कोठे
नजर तुझी खाशी ?
भूलोकीचे प्रभू शेतकरी
आले तव चरणाशी
घाम गाळुनी ओली करतो
मायभूमीची माती
उत्पन्नाचे मोल अपूरे
शुन्य उरे हाती
कर्जाचे घेउनिया ओझे
जुडतो सरणाशी
भूलोकीचे प्रभू शेतकरी
आले तव चरणाशी
शेतकी प्रधान देश आमुचा
कसा करू विश्वास ?
घरघर लागुन शेती घेते
शेवटचा निश्वास
एकच उरला मार्ग जोडणे
नाते मरणाशी
भूलोकीचे प्रभू शेतकरी
आले तव चरणाशी
खूप ऐकल्या, तुझ्याही नको
मदतीच्या घोषणा
मख्ख उभा तू विटेवर सदा
दूषण तव भूषणा
काय दिले फळ पाहुन आमच्या
पुण्याच्या राशी ?
भूलोकीचे प्रभू शेतकरी
आले तव चरणाशी
मुले होउनी मोठे घेतील
एक दिवस फाशी
अशीच स्वप्ने उरात कुठली
उत्तर दक्षिण काशी
स्वप्ना मागे पळता पळता
चढाओढ हरणाशी
भूलोकीचे प्रभू शेतकरी
आले तव चरणाशी
जन्म जरी हा वाया गेला
एक विनंती खाशी
पुनर्जन्म जरी देणे असले
देई भारत देशी
कसून राबून उम्मेदीने
भाग्य आणू उदयाशी
भूलोकीचे प्रभू शेतकरी
आले तव चरणाशी
निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिक्रिया
काका
खूपच सुंदर!!
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!