नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुष्काळाची दाहकता
डॉ.आदिनाथ ताकटे, (मो. 9404032389)
मृद पदार्थविज्ञानवेत्ता
विभागीय कृषि संशोधन केंद्र,सोलापूर
दुष्काळ...,दुष्काळ...,अन दुष्काळ...! सध्या राज्यात दुष्काळाचीच चर्चा आहे.पाण्यासाठी वणवण आणि टँकरवर पाणी भरण्यासाठी गर्दी, हे दृश्य सर्वत्रच पाहायला मिळतेय.पाण्यासाठी केवळ माणसांचीच वणवण होत आहे असे नाही, तर मुकी जनावरे,पशुपक्षीही यातून सुटले नाहीत.जमिनीतील सगळा उपसा संपला, निराधार आकाशातून पडणारा पाऊस हाच आता जगाचा आधार आहे, निदान या महाराष्ट्राचा तरी. तो पडला नाही तर पाण्याअभावी माणसे तरफडून मरतील.एक्सप्रेसखाली जो कुणी येतो तो चिरडून मरतो.इथे पाण्यावाचून लोक मरतील आणि म्हणून आता कायम स्वरूपी तोडगा काढल्याशिवाय महाराष्ट्राची तहान भागणार नाही.मुळात दुष्काळ हि आपत्तीच एक दिवसात किवा एका वर्षात उद्भवणारी नसते,हि हळूहळू पसरू लागते.गेली तीन वर्ष राज्यातला शेतकरी,मजूर यात पुरता भरडला गेलाय,बायकांची तर पाणी वाहून चिपाड झालीत.या भयाण परिस्थितीचा घेतलेला वेध.
थेंबभर पाण्याच्या शोधात गावे झाली ओस
महाराष्ट्रातील बहुतांश गावात दुष्काळामुळे स्थिती विदारक झाली असून, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. बहुतांश जोडप्यांनी रोजगाराच्या शोधात पुणे, औरंगाबाद, नाशिकची वाट धरली आहे.गावात शेतकरी मुले अन म्हातारी-कोतारी माणसाच थांबली आहेत.सकाळी दहा-अकरा वाजताही गावात सामसूम जाणवते.पाण्याची स्थिती बिकट झाल्यामुळे मुलांच्या परीक्षा आटोपताच स्थलांतर सुरु झाले.येणाऱ्या पाहुण्यांना घोटभर पाणी देण्याचा पाहुणचार म्हणजे चैन वाटावी अशी मराठवाड्यात बहुतांश गावातील परिस्थिती आहे.
यंदा पिण्याच्या पाण्याचे संकट गहिरे बनत चालले आहे.देशातील १२ राज्ये थेंब-थेंब पाण्यासाठी तरसत आहे. देशातील एक चतुर्थाश म्हणजे ३३ कोटी लोकसंख्येला दुष्काळाने कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत.या राज्यात सिंचन प्रकल्पांची संख्या ३७१२ इतकी आहे राज्यातील नऊ जिल्ह्यात संपूर्ण दुष्काळ आहे.लातुरात रेल्वेने पाणी पुरवावे लागले.महाराष्ट्रात असे पहिल्यांदाच घडले.राज्यातील धरणात फक्त १९ टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठलाय.मराठवाड्यातील धरणात ३ टक्के साठ शिल्लक आहे.तेथे पंपाने पाणी उपसण्याची वेळ आली आहे.अशा प्रकारची वेळ भविष्यात येऊ नये यासाठी ठोस नियोजनाची आवश्यकता आहे.
व्होल्व्ह्च्या गळतीवर भागते गावाची तहान
बहुतांश विहिरी कोरड्या ठाक पडल्याने औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिनींच्या व्होल्व्ह्च्या गळतीतून मिळणाऱ्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ राज्यातील अनेक गावावांवर आली आहे.राज्यातील दुष्काळी भागात फिरल्यानंतर या परिस्थितीची जाणीव तीव्रतेणे होते.गेल्या तीन वर्षाच्या दुष्कालाने गावातील विहिरी आटल्याने संपूर्ण गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
बारमाही टँकर चे पाणी पिणारे गाव
२५ विहिरी, १८ हातपंप असूनही गेल्या १० वर्षापासून देउळघाट ग्रामस्थाना पिण्यासाठी नव्हे तर इतर वापरासाठी देखील विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.गावातील सगळ्यात मोठ्या विहिरीचे गोडेपाणी खारट झाले आहे.गावातील सार्वजिक विहिरी, हातपंप या केवळ दिखाव्यापुरत्या उरल्या आहेत.महाराष्ट्रातील दुष्काळी भागात जवळपास सर्वत्र असे चित्र पहावयास मिळते.
चार तासात उरकतायेत विवाह
भीषण दुष्काळात समाजजीवन किती झटकन बदलू शकते याचे चित्र मराठवाड्यात पावलोपावली दिसत आहे.बव्हंशी शेतकरी आपल्या मुला-मुलींचे विवाह एकतर स्थगित किंवा मानपान टाळून साखरपुडयातच करीत आहे.काही ठिकाणी तर चार तासातच हे विवाह उरकले जात आहेत.अनिष्ट प्रथाविरुद्ध समाजसुधारकांनी आपले आयुष्य वेचुनही शक्य झाले नाही,ते दुष्काळ करून दाखवीत आहे.दुष्काळाने समाजजीवन पूर्ण बदलले आहे.
दुष्काळाने आटला गाईचा पान्हा
केवळ वासराच्या हंबरन्यामुळे पान्हा फोडणाऱ्या गाईला आता या दुष्काळात वासराने ढुसन्या देऊनही पान्हा फुटेनासा झाला आहे.आपल्या वासरासाठी गाईचा जीव तीळ तीळ तुटतोय.कुपोषित वासरांना विकतचे दुध पाजण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यामुळे या दुष्काळाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हेच लक्षात येते.उसाच्या पंढरपूर तालुक्यात हि परिस्थिती आहे तर इतर कायम दुष्काळी तालुक्यात काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी.पाणी व चारा टंचाईमुळे जनावरांचे प्रचंड मोठे हाल होत आहेत. मेंधापूर भागात चार टंचाईमुळे दुधाळ जनावरांनी आपला पान्हाच आटवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.पिण्याच्या पाण्याची भ्रांत असलेल्या या भागात शेती पाण्यावाचून पडीक पडली आहे.अशा परिस्थितीत जनावरांना हिरवा चारा दूरच,परंतु सुका चाराही दुरापास्त झाला आहे.ओला चारा काही केल्या मिळतच नसल्यामुळे दुधाळ जनावरांनी आपला पान्हा आटवला आहे.त्यामुळे तान्ह्या वासरांना जगवण शेतकऱ्यांनाच अवघड बनले आहे.
जनावर पेलवेना अन् गिराहीक मिळेना
बैलांना दिवसाला तीन वेळा पाणी लागत.दोन बैलांना सहा बादल्या पाणी लागत.`घरात माणसांना प्यायला पाणी मिळेना.कुठून आणायचं जनावरांना पाणी? आपल्या नजरेसमोर त्यांचे हाल होतांना बघवत नाहीत म्हणून जनावरांना बाजाराचा रस्ता नाईलाजास्तव दाखवावा लागत आहे. राज्यभर दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे.अशा परिस्थितीत ग्रामीण भागात भरणाऱ्या बाजारात जनावरांच्या किमती ढासळल्या आहेत.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची खरेदी विक्री अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.अनेक शेतकऱ्यांना जनावरे विक्री न करताच परत घरात आणावी लागत आहे. तर बाजारात ७० हजाराची बैलजोडी ४० हजारात विकून गावाकडे हताश मनाने परतत आहेत.जनावरे खरेदीदारांची संख्या अत्यंत कमी झाल्याने किमतीवर देखील परिणाम झाला आहे.
दुष्काळाने गावही केले मोताद
पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश साखर कारखान्याकरिता उसतोडणीसाठी मराठवाड्यातील उसतोडणी कामगारयेतात.मराठवाड्यांतील पाणीटंचाईच्या बातम्या ऐकूनच गळीत हंगाम संपला, तरी उसतोडीसाठी आलेले मजूर गावाकडे परतायला तयार नाहीत. गावाकडे जायच्या नुसत्या कल्पनेनेही काही कुटुंब शहारून गेली होती.मिळेल ते काम करू पण एवढा उन्हाळा येथे काढू असे एकमेकांना सांगत मजुरांची जोडपी आपल्या गुराढोरांना घेऊन येथेच थांबली आहेत.पाऊस पडला तरच तिकड जाऊ, नाहीतर इकडच कुठ्बी काम मिळेल तिकड, मिळेल त्या मजुरीत काम करू असे मजुरांशी चर्चा करतांना सांगितलं.माणसांपेक्षाही आपल्या जनावरांवर प्रेम करणाऱ्याच्या उसतोड मजुरांना यंदाच्या दुष्काळाने गावही मोताद करून टाकले आहे.
येणारा दोन महिन्याच्या काळ फार विदारक राहणार आहे, पाणी कोठून आणावे हा फार मोठा प्रश्न आहे, या प्रश्नाचे उत्तर लोकांकडेही नाही आणि प्रशासानाकडेही नाही. केवळ आलेला दिवस पुढे ढकलत जाणे हाच भाग उरलेला आहे. काळच त्या प्रश्नाचे उत्तर देईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्वांचा परिपाक म्हणजे अतिशय विदारक घटना या परिसरात घडत आहे.त्यापैकी एक म्हणजे उबग आल्यामुळे, परिस्थितीपुढे हतबल झाल्यामुळे लोक आत्महत्येकडे वळत आहे.
अण्णांच्या राळेगणसिद्धीलाही दुष्काळाच्या झळा
गेल्या तीन वर्षाच्या सततच्या दुष्काळाने अण्णा हजारेंच्या राळेगणसिध्दीत ३० वर्षात प्रथमच यंदाच्या वर्षी पाण्याचा टँकर सुरु झाला.यावरून दुष्काळाची दाहकता लक्षात येते.राळेगण सारख्या गावांनी डोंगरावरून य्रेणार पाणी माथा ते पायथा मोहीम राबवून यशस्वीरित्या अडवलंय,माती अडवा-पाणी जिरवा धोरण यशस्वी करून दाखवलय.एखाद –दुसऱ्या पावसाने राळेगणसिद्धीचे बंधारे भरतात. गावाला आणि गावाच्या शेतीला पुरेल इतक पाणी स्वतः गावाचं कमावतो.परंतु गेल्या तीन वर्षापासून पावसान दगा दिल्यान अण्णांच्या गावालाही टँकर सुरु झाले.
मराठवाड्यात दिवसाला तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
सलग तीन वर्षापासुनची नापीकी, त्यातून वाढलेल्या कर्जाचा बोजा,त्यात सावकाराचा तगादा आणि यातून आलेल्या नैराश्यातून शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे भीषण चित्र मराठवाड्यात आहे.२०१५ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यात मराठवाड्यात १,१०९ शेतकरी आत्महत्या झाल्या.दिवसाला तीन शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याची गंभीर स्थिती आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ९७ टक्के कुटुंबाकडे शेतीशिवाय उत्पन्नाच दुसरे कुठलेही साधन आढळले नाही.आत्महत्या करणारयामध्ये तरुण, महिला शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.सर्वाधिक शेतकरी अत्यल्प व अल्पभूधारक असल्याचे आढळून आले. नापिकी, कर्जाचा बोजा सावकाराचा तगादा यातून नैराश्य आल्याचे आत्महत्येचे प्रमाण ४९ टक्के आहे.२०१२ पूर्वी या घटना तितक्या प्रकर्षाने पुढे आल्या नव्हत्या,पण गेल्या एक दोन वर्षांत हि परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (संदर्भ:सकाळ माध्यम समूह )
या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी मुलभूत विचार करण्याची गरज आहे. निसर्ग बदलू शकत नाही पण निसर्गाकरिता आपण काय बदल केले पाहिजेत याचा विचार करून निश्चयाने पुढची दिशा ठरवली पाहिजे. तसे बळ या शासनाला आणि प्रशासनच देणे गरजेचे आहे. शासन आणि प्रशासनाकडे असे बळ निर्माण होत नसेल तर या लोकशाहीत लोकांनी पुढे आले पाहिजे आणि आवश्यक ते बदल घडवून आणले पाहिजेत.या भागात कमी पाणी लागणारे उद्योगधंदे आणले आणि त्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला तर शेती उजाड झाल्यानंतरहि कुटुंबातील एका व्यक्तींच्या आधारे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो.
दुष्काळामुळे ग्राहकच फिरकत नाहीत
दुष्काळामुळे गिर्हाइक नसल्याने मराठवाड्यातील प्रत्येक गावातील नव्वद टक्के दुकाने बंद असल्याचे चित्र समोर आले आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी तीव्र दुष्काळामुळे हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे,त्यामुले पुढचे दोन महिने कसे जाणार या विचाराने ग्रामीण भागातील नागरिक चिंतीत आहे.त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची देखील खरेदी न करता त्या सोयरया-धायरया कडूनउसनवारीवर आणण्यावर भर दिला जात आहे.त्यामुळे गीराहीकानाभावी दुकाने बंद झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामधील चार हजाराहून अधिक दुकानदारांसाठी धंदा नसल्यामुळे स्वतःच दुकानांना टाले लावले आहे.चौफुला,मुख्य रस्त्यावरील हॉटेल्स बंद असल्याची चित्र सर्वत्र पहावयास मिळते.
पाण्यासाठी जमिनीची चाळण
उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रुईभर तलावाच्या कुशीतच रुईभर आणि त्यालाच खेटून अनसुर्ड्डा ही दोन गावे. तलावाच्या पाण्याचे सुख लाभलेली, पण गेल्या चार वर्षात पावसाचे प्रमाण कमी होत गेले आणि या गावांची रया गेली.उसशेतीवर गब्बर झालेल्या या गावांनी मग धरतीमातेची कुस उकरायला सुरवात केली.अनसुर्ड्डा गावाची लोकसंख्या आहे १६०० तर बोअरवेल ८०० पेक्षा जास्त आणि रुईभर गावांची लोकसंख्या आहे ४००० तर बोअरवेल आहेत १५०० पेक्षा अधिक.जवळपास दोन ते तीन माणसांमागे एक बोअरवेल. हे क्रोर्य इथेच थांबत नाही. या दोन्ही गावात मिळून हजार फुट बोअरवेलचे प्रमाण आहे ५० पेक्षा अधिक. या दोन्ही गावांनी गेल्या २५ वर्षात टँकर पहिला नव्हता. त्यांना आता टँकरची वाट पहावी लागतेय. एप्रिल – मे महिना या गावासाठी कठीण जाणार आहे.रुईभर तलावाच्या पाण्यावर पोसलेल्या या गावांसाठी पाण्याची टंचाई हि केवळ दोन-तीन वर्षातालीच. बोअरवेल्स शेतीच्या पाण्याची भूक भागवत होत्या. पण आता त्याहूनही फक्त दगडाच्या भुकटीचा पांढरा धूर बाहेर येऊ लागल्याय.पण तरीही गावकऱ्यांचा विश्वास दृढ आहे. पाण्याच्या मृगजळाच्या शोधात हजार फुटांच्या खालीही जाऊन शोध घेण्याची तयारी या गावामध्येच सुरूच आहे.
पाणी आयपीएलच, उसाच आणि रेल्वेच
मराठवाड्यातील लातूर शहारला तशी पाणी टंचाई नवी नाही,अगदी चांगल्या पावसाच्या वर्षातही लातूरसह राज्यातल्या बऱ्याच भागात उन्हाळा जिकरीचा असतो. सलग तीन वर्षाच्या दुष्काळाने यंदा तो असह्य बनवला यात शंका नाही. लातूरच्या दुष्काळाने आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलविले गेले.यंदा लातूरची टंचाई राष्ट्रीय मुद्दा होऊन गेली,याच श्रेय द्यायचाच तर, ज्या कोणी तिथे जमावबंदी केली त्याला द्यायाला हव.त्या एका बातमीन लातूर देशाच्या चिंतेचा विषय बनला.आयपीएलच पाणी आणि पाण्याची गाडी असले विषय राष्ट्रीय
चर्चेचे बनविले गेले आणि राज्यातून आयपीएल एकदाच गेल आणि बहुचर्चित पाण्याची गाडी एकदाची लातूरला धडकली. या वर्षाच्या पाणी प्रश्नान लातूरला मोठाच धक्का दिला. मिरजेतून पाण्याची रेल्वे लातूरला न्यावी लागली आणि निम्माअधिक भारतात भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या तीव्रतेला लातूरच नाव मिळाल.एक उपाय म्हणून रेल्वेन पाणी देन ठीक,पण त्यान प्रश्न नाही,संपलेला नाही.याच भान निसछित ठेवावं लागणार आहे.
महाराष्ट्रात पाण्याच संकट येणार हे मागच्या ऑगस्ट-सेप्टेम्बर मधेच स्पष्ट झाल होत,त्याच वेळी पाण्याच नियोजन करणआवशक होत.टंचाई टोकाला गेल्यानंतर जमावबंदी लावायची वेळ येऊन आणि कधी नव्हे तो लातूरची टंचाई सोशल मेडीयाचा ट्रेंड बने पर्यंत वाट पाहयच कारण नव्हत. आयपीएलचे सामने बाहेर गेल्याने वाचणार पाणी आणि मराठवाड्याचा दुष्काळ याच संबंध लावण मूर्खपणाचे ठरेल. स्टेडीयमवर वाचलेले पाणी लातुरात कसे पोहचणार असा व्यवहार्य मुद्दा कोणी लक्षात घेत नाही. पाणी खेळासाठी कि माणसासाठी हा प्रश्नच गैरलागू आहे,दिशाभूल करणाराही आहे.यातून खेळाला पाणी नाही दिल तर ते दुष्काळ ग्रस्ताना मिळेल असा आशावाद दाखवण तकलादू आहे.मुळातच सगळ्या आयपीएलला लागणार पाणी आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांना हव तेवढ पाणी याचा काहीच ताळमेळ बसणार नाही. परंतु आयपीएल विरुद्ध दुष्काळग्रस्तयावर एडियेट बॉक्सवर चर्चेचे गुरहाल चालतंय, याने सामान्य माणूस हवादिल होतोय. राज्यात अजून उसाला लागण्याऱ्या पाण्याची चर्चा विविध माध्यमातून जोर धरती आहे, उस अधिक पाणी खाणार पिक आहे यात नाव काहीच नाही.उस शेती करणारा शेतकरी सरयानी पाणी पाजतो हेही मान्य,तसे केल्याने अनेक भागात जमिनी खराब झाल्याचे शेतकारीही मान्य करतात.मात्र पाणी टंचाईच्या निमित्ताने शेतकरयावर आणि साखर कारखानदारीवर वाभाडे काढण्याचे काहीच कारण नाही. ज्या ज्या भागात पाण्याची उपलब्धताआहे त्या त्या भागात उसशेती वाढली आहे.त्याच कारण या पिकत चार पैसे मिळण्याची खात्री आहे.त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झालेली आहे.ज्या भागात पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी पाण्याचा अधिक वापर होण्यासाठी पिकांना ठिबक सिंचनाखाली आणणे क्रमप्राप्त आहे, मात्र पाणी संकटाच्या निमित्ताने सरसकट उसशेतीला आणि उस कारखानदारीचा विषय चघळत बसणे अनाकलनीय वाटते. कारण राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती या पिकाभोवती फिरते आहे.
कण्हेरीवाडीत वॅाटर एटीम कार्ड
उस्मानाबाद जिल्ह्यातील कण्हेरीवाडीत ग्रामस्थांनी लोकसहभागातून एक बोअर घेतला,त्याला फिल्टर व कुलिंग युनिट बसविले आणि अॅटोमॅटिक मशीनद्वारे स्वच्छ व थंडगार पाणी देण्याची सोय केली. संपूर्ण गावाला वॅाटर एटीम कार्ड द्वारे ३० पैसे लिटरने पाणी पुरवून एक आदर्श घालून दिला,तेही कुठल्याही सरकारी मदतीशिवाय.
ठोस नियोजनाची आवश्यकता
देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत.या राज्यात सिंचन प्रकल्पांची संख्या ३७१२ इतकी आहे.या साऱ्या प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा झाला तर पाणी टंचाईचा प्रश्नच निर्माण होणार नाही.परंतु तो निर्माण होतो याचा अर्थ पाण्याचे योग्य नियोजन होत नाही, असमान पाणीवाटपामुळे समस्या निर्माण होत आहेत.वरचेवर कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण आणि दुसरीकडे पाण्याचा काटेकोर आणि काळजीपूर्वक वापर करावा लागणार आहे. त्या दृष्टीने वाँटर बँक तयार करण्यावर भर दिला जायला हवा. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, शिरपूर होऊ शकत. त्यासाठी तरी “तू भी अन्ना,मै भी अन्ना;अब तो सारा देश है अन्ना ” हि लोकपाल आंदोलनातील लोकप्रिय घोषणा प्रत्यक्षात यायला हवी. भगीरथा पासून झालेला हा प्रवास अण्णा, राजेन्द्रसिह्जी यांच्या पर्यंत थांबयला नकोत.प्रत्येक गावात भगीरथ उभे राहिले पाहिजेत.आपण सारेच भगीरथ झालो तर दुष्काळ कधी येणार नाही.
दरवर्षी पाऊस पडतो.फक्त तो आपल्याला हवा तितका आणि हवा तितका आणि हवा तेवढाच पडतो असे घडत नाही, त्यामुळे पडलेले पावसाचे पाणी अडविले नाही तर ते वाहून जाते आणि उरते ती फक्त पाणी टंचाई. हि टंचाई संपविणे आणि दुष्काळी स्थितीवर निदान काही अंशी तरी मात करणे शक्य आहे.त्यासाठी जनजागृती आणि जलजागृती आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायती प्रमाणे पाणी पंचायत हवी त्याद्वारे आपण क्रूरपणे वाया घालविलेल्या पाण्याचा तसेच वाचविलेल्या पाण्याचा हिशोब ठेवला पाहिजे.थोडक्यात जेव्हाअधिक पाऊस पडतो तेव्हा तो साठविणे आणि ते पाणी पैशांसारखे वापरणे,हाच मार्ग समोर येतो.प्रार्थना करूयात कि या वर्षी राज्यासह देशावर वरुणराजा प्रसन्न होईल आणि राज्यातीला जलयुक्त शिवार अभियान देशभर नावजला जाईल आणि आपले गाव,शहराचे पाणी आपणच जिरवले पाहिजे याची एक लाट देशात निर्माण होईल!
-------------------------------------------------------------------------
कार्यालीन पत्ता:
डॉ.आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ,
विभागीय कृषि संशोधन केंद्र,सोलापूर ४१३००२.
मो.९४०४०३२३८९
email: aditakate@gmail.com
घरचा पत्ता/पत्रव्यवहारासाठीचा पत्ता:
डॉ.आदिनाथ ताकटे,
२,अक्षत अपार्टमेंट,गरुड बंगल्यामागे,
रंगभवन-सातरस्ता मार्ग,
सोलापूर -४१३००३
मो.९४०४०३२३८९
email: aditakate@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने