नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
‘बळीराजा’
बळीराजा धनिक आज जरी, भूतकाळात मी कर्जबाजारी
चुकविले देणे सर्वांचे तरी, काहूरणे सोडेना मम अंतरी
सवय नापिकीचीच जडलेली, रोमरोमात अशी भिनलेली
पाहिले बहरलेले शेत कितीही, नजर कायम धास्तावलेली
गतकाळीची आठवती यातना, दुष्काळी मरणप्राय वेदना
हुलकावणीत जगलेले क्षण ते, सौख्यातही विसरणे होईना
डोळ्यात नाचे ती भयाण वेळ, राबलो होतो वेळ अवेळ
नित्य पारी चुकवूनी मेघाने, केला होता माझाच खेळ
आणले मग बळ कुठूनसे, जमविले बियाणे कसेबसे
वादळाचा तडाखा एक, उन्मळून पडले कोंब नाजुकसे
जमुनी आले होते तेव्हा, पुन्हा उमेदीने पिकविले जेव्हा
भाव धान्याचे पडले असे, उठले जीवन कळले न केव्हा
राबलो पुन्हा नव्या जोमात, घरदार जरी बुडले कर्जात
पेरुनी बीजे गर्भात धरेच्या, टकटकी लावली वर नभात
मेघांनी दिली साथ अपेक्षित, चुंबिले धरेस भेगाभेगात
अंकुरले हिरवे कोंब शेतात, फुटले चैतन्याचे डोंब मनात
फुलली पिके डोलली ऐटीत, बोलली एक नवी उमेदीत
काळ्या आईने दिले भरभरून, सुखेही आली हात जोडीत
सार्थकी लागले कष्ट सोसले जे, तयापुढे भासतसे अंबरही खुजे
दडलीय भीती इतुकी अजूनही, स्वीकारण्या सत्य मन न धजे!
आसावरी इंगळे
asawari.in@gmail.com