![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
१२ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या उपस्थितीत हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
शेतीमातीशी नाळ जपणारे अनेक शेतकरी बांधव आणि साहित्यिक मंडळी या ठिकाणी शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञाना विषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी मराठी साहित्य सारस्वतांची कृषी उद्योग जगता सोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा संपवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याकरिता शक्तिशाली विचार शक्तीयुक्त साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न म्हणून अशा संमेलनाचे आयोजन नक्कीच उपयुक्त आहे.
जयसिंगपूर येथे संपन्न झालेल्या १२ व्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचा प्रारंभ मराठी गौरव गीतापासून ते शेतकरी नमनगीता पर्यंत वेगळा आदर्श निर्माण करून कार्यक्रम उंचीपर्यंत नेला.
अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आदरणीय गंगाधरजी मुटे सरांनी अहोरात्र कष्ट करून हा कार्यक्रम यशस्वितेकडे कसा जाईल याकडे अधिक लक्ष दिले. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी मा. आमदार श्री राजेंद्रजी पाटील यड्रावकर, संमेलनाध्यक्ष मा. सरोजताई काशीकर, शेतकरी नेत्या तथा लेखिका, संयोजक श्री अँड. सतीश बोरूळकर, उद्घाटक, मा.. अँड. वामनराव चटप, आमदार, संसदपटू तथा शेतकरी नेते, यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ मनीषा रिठे यानी केले.
२ दिवस चालणाऱ्या या शेतकरी संमेलनामध्ये प्रारंभापासून दिवसाच्या शेवटपर्यंत आपण अनेक मान्यवरांचे विचार ऐकले. त्याचबरोबर सायंकाळी शेतकरी कवी संमेलन अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाले. वेगवेगळ्या रचनांचा आस्वाद या ठिकाणी घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या संदर्भात होणारे अन्याय, जाचक कायदे आणि होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवींनी या ठिकाणी रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि शेतकरी काव्याची उपयोगिता विशद केली. ,
सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे गझल मुशायरा. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात विशेष दिव्यांग मुलांकडून गाण्याची मैफिल संपल्यानंतर लगेचच गझल मुशायऱ्याला या ठिकाणी सुरुवात झाली आणि तो आनंदच वेगळा आठवणीत राहील असाच गझल मुशायरा पार पडला. मागील काही शेतकरी संमेलनातील आयोजित गझल मुशायऱ्याची आवड आणि साहित्यिक, रसिकांची पसंती सोबत होतीच आणि तोच भक्कम विश्वास घेऊन मराठवाड्यातील परळीचे सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित गझल मुशायरा. सूत्रसंचालक, नाशिक येथील गझलकार बाळासाहेब गिरी यांचे अगदी नीटनेटकं सूत्रसंचालन.
गझल मुशायर्यात गझलकार सुनील बावणे, गझलकार नंदकिशोर ठोंबरे, गझलकार आत्माराम जाधव, गझलकार यशवंत मस्के, गझलकार अविनाश कासांडे, गझलकार अजित सपकाळ तसेच मा. गंगाधरजी मुटे सरांनी पण मुशायर्यात सहभागी होऊन मैफिलीत रंजकता आणली.
मुशायरा उत्तरोत्तर रंगत गेला. गझल मुशायऱ्यात माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीला आणि इतर गझलकारांना समावेश करून घेतल्याबद्दल अखिल भारतीय मराठी शेतकरी संमेलनाचे कार्याध्यक्ष आदरणीय गंगाधरजी मुटे सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. शेतकरी गझल मुशायऱ्यात एकापेक्षा एक सरस गझल रचना सादर करून शेतीमातीच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित ज्वलंत प्रश्न उभे करून आशय संपन्न गझला सादर करून शेतकरी प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. अनेक गझलकारांच्या सादरीकरणातून शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाची, दुर्दशेची व्यथा मांडणाऱ्या अनेक रचना सादर करण्यात आल्या.
तो कोणाच्या सोबत राहत नाही
त्याला कोणी कोणी लागत नाही
मिटून डोळे स्वप्न पाहतो आहे
उघड्या डोळ्यांनी जे साधत नाही...
अजित सपकाळ यानी संगती व सोबती संर्दभात मांडणी करुन स्वप्न साधण्याची किमया साकार करुन मुशायऱ्याची सुरुवात केली..अविनाश कासांडे सरांनी आपली वेदना मांडत असताना वेदनेलाच यार केले..
काळजावर कैकदा हे वार केले
शेवटी मी वेदनांना यार केले
बंद दारे उघडली जेव्हा मनाची
भावनांनी सारखे यल्गार केले..
गझलकार नंदकिशोर ठोंबरे सरांनी मनातली व्यथेची भावना संघर्षमय शब्दात भांडून मांडली आहे..
हे कसे सांगू मनात पंख मी छाटून आलो
अन पुन्हा माझ्या व्यथेशी एकदा भांडून आलो
मी मनाला शांत केले जळूने स्वप्नात माझ्या
शृंखला वेडेपणाच्या आज त्या तोडून आलो..
कार्याध्यक्ष आणि सुप्रसिद्ध गझलकार मा. गंगाधरजी मुटे सरांनी कष्टकरी, कामकरी शेतकऱ्यांच्या संदर्भात न्याय हक्क मागण्यासाठी आपल्या गझल शैलीतून सातबारा कोरा करण्यासंदर्भात किंवा शासन व्यवस्थेला जागे करण्यासाठी त्यांच्या अनेक शेरांमधून सभागृहामध्ये उत्स्फूर्त दाद मिळाली..
संपूर्ण सातबारा कोरा करू म्हणाले
भुललेत भाडखाऊ सत्तेत पोचल्याने..
शेपटी तेव्हा खाली नको वाघा सारखा ऊठ
हाण त्याच्या टाळक्यात पाया मधला बूट..
मुक्त विहारी टोपण नावाने लिहिणारे गझलकार राजकारणाबद्दल भावना व्यक्त करून आजच्या सद्यस्थितीवर राजकारण्यांना टोले मारून राजकारण कोणत्या स्तरापर्यंत गेलेले यांचा त्यांच्या शेरातून जाणवतो..
इतके कधीच नव्हते लक्षात राजकारण
का आणले असे हे रस्त्यात राजकारण
पोटावरी कुणाच्या मारू नका कधीही
पोटामध्ये असू द्या पोटात राजकारण..
गंगाखेडचे गझलकार आत्माराम जाधव यांनी विठ्ठलाला थोडे थांबण्याची विनंती केली, कारण थोडे मलाही बदलायचे आहे आणि आनंद साजरा करायचा आहे...
शक्य होईल तेवढे बदलायचे आहे मला
या जगाला साजरे बनवायचे आहे मला
विठ्ठला बोलावणे धाडू नको इतक्यात तू
एकदा दिंडीमध्ये नाचायचे आहे मला..
गझलकार यशवंत मस्के यांनी परमेश्वर जिथे असतो तिथे खऱ्या अर्थाने शांती असते पण ती कोणाला दिसत नाही अशा आशयाची रचना सादर करून पुन्हा विठ्ठलाला हाक दिली..
तुला मूर्तीमध्ये दिसतो जरी विठ्ठल
खरा रमतो क्षमा शांती घरी विठ्ठल
हवा असते तरी दिसते कुणाला ती
दिसत असते जगाला बासरी विठ्ठल..
अत्यंत सुंदर देखणा असा गझल मुशायरा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी सरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अध्यक्षीय भाषण आणि त्यांच्या रंगतदार समारोपाच्या काही शेराने या गझल मुशायऱ्याचा समारोप करण्यात आला..
कोणते लावू मलम कळत नाही
खोल गेलेली जखम खपली धरत नाही
नेमका टाळावयाचा क्षण मला कळतो
यामुळे माझा कधी संयम ढळत नाही..
माझ्यासारख्या नवख्या गझलकाराला या मुशायऱ्याचं निवेदनाचं काम देण्याचा बहुमान आ. गंगाधरजी मुटे सरांनी व त्याच्या सर्व टीमने दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी राहील. शेतकऱ्यांचे कैवारी शरद जोशी यांच्या संकल्पनेतून स्वप्नातील भारत घडवण्यासाठी हे संमेलन निश्चितच भविष्यकाळासाठी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि अशाच प्रकारच्या मुशायऱ्याचे आयोजन भविष्यकाळातही नक्कीच होतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.