नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवितेचे रसग्रहण
कविता :- शेतमालाचे भाव एक स्वप्न
कवी :- श्री. राजेंद्र फंड
श्री. गंगाधरजी मुठे यांच्या संकल्पनेतून त्यांनी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून विश्वस्तरीय ऑनलाईन लेखनस्पर्धेला जन्म दिला. ही स्पर्धा मराठी विश्वात गाजली सर्वदूर साहित्यिकात पसरली. या लावलेल्या रोपट्याचे आज सलग 11 व्या वर्षात साहित्यिकांच्या हृदयात मानाचे स्थान दिले. आणि हो या स्पर्धेच्या संयोजन मंडळाचा सदस्य होण्याचा बहुमान ही मला सातत्याने मिळत आहे. हे माझे परमभाग्यच होय.
या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या जीवनावर लिहिण्याचा योग आला. या वर्षीच्या लिखाणाचा विषय म्हणजे अनादी कालापासून शेतकऱ्यांची जी मुख्य समस्या आहे ती म्हणजे " शेतमालाचे भाव " होय याच अनुषंगाने मी माझीच शेतकऱ्यांच्या जीवनावरील कविता " शेतमालाचे भाव एक स्वप्न " आज कवितेचे रसग्रहण सदरात तुम्हापुढे मांडत आहे. ती खालीलप्रमाणे......
शेतमालाचे भाव एक स्वप्न
गाय वासरू गेले पंजा ही गेला
नाही मिळाला शेतमालाला योग्य भाव l
धनुष्य ताणले , कमळ ही फुलले , घड्याळ टिक टिक करत हाय
आमचा शेतकरी मात्र हाय तिथच हाय ll 1ll
पूर्वी गावरान होत, कमी उत्पन्न होत
म्हणून शेतकरी अर्धपोटी होता l
आता हायब्रीड आल, बक्खळ धान्य झाल
आडत्याच्या मनभावाने हाती धुपाटन आल ll 2ll
आता कीटकनाशक, रासायनिक खते,
बी बियाणांचे भाव ही गगनाला भिडले l
किती ही उत्पन्न झाले झाले तरी
शेतकरी मुद्दलातच राहिले ll 3ll
रासायनिक खतांच्या अतीवापराने
धरणीमाय निझूर झाली
कास्तकऱ्यांनी कितीही ओतल तरी .....
शेणखतांच्या खुराकासाठी ती आतुर झाली ll 4ll
संकटाची मालिका शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली
कधी सुलतानी संकट, कधी अस्मानी संकट l
यातून वाचलाच तर इमानदारीने सर्वांची उधारी चुकवतो
डूबला तर कधी कुटुंबाचा विचार न करता गळफास घेतो ll 5ll
एखाद्या शेतकऱ्याच्या कोथंबिरीचा लाखोंचा डंका वाजतो
सगळा मीडिया त्याला उचलून धरतो l
कोट्यावधीचा कांदा काही हजारोंनी विकतो
तेंव्हा गावोंच्या गावातील शेतकरी हमसून रडतो ll 6ll
आज नोकरशाहींचे पगार लाखोंनी झाले
दोनशेचे धान्य अन पन्नासचा कांदा त्यांच्या डोळ्यात पाणी आणू राहिले l
पूर्वी त्यांचा महिना एक पोत्याचा पगार होता आता तीस पोत्यांचा झाला
आमचा गरीब शेतकरी मात्र आहे तिथेच राहिला ll7ll
नकोत आम्हाला मोफत, लाडक्या अन् सबसिडीचे गाजर
हवे आम्हाला आमच्या घामाचे दाम l
मायबाप हो खरच असेल जर कळवळा तर
देता का आमच्या मालाला योग्य भाव ll8ll
शेतकरी आता शिक्षित झालाय ,
शरद जोशींचे आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरा l
सामुहिक फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या बनवा,
आपल्या शेतमालाचे भाव आपणच ठरवा ll9ll
राजा आता नकोत यांच्या कुबड्या चतुरंग शेती करू
आपल्या पिकवलेल्या मालाचे आपणच उपपदार्थ बनवू l
आपली बाजारपेठ आपण उभी करू
आपल्या शेतमालाचे भाव आपणच ठरवू ll10ll
कवी. राजेंद्र फंड, राहाता.
कवी राजेंद्र फंड यांच्या " शेतमालाचे भाव एक स्वप्न " या कवितेत ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत आलेल्या अनेक पक्षाने शेतकऱ्यांपेक्षा भांडवलशाही वर्ग, व्यापारी वर्गाला सतत अन् आजही झुकते दिले. तर बहुसंख्य असलेल्या शेतकरी वर्गाला सतत पिळवणुकीचे धोरण ठेवले. व्यापारी , भांडवलदार गडगंज श्रीमंत झाले तर शेतकरी हा गरीब तो गरीबच राहिला. आपल्या पहिल्या कडव्यात ते म्हणतात की.....
गाय वासरू गेले पंजा ही गेला
नाही मिळाला शेतमालाला योग्य भाव l
धनुष्य ताणले , कमळ ही फुलले , घड्याळ टिक टिक करत हाय
आमचा शेतकरी मात्र हाय तिथच हाय ll 1ll
देशाच्या राजकारणावर भाष्य करतांना ते म्हणतात की स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा काँग्रेसचे निवडणूक चिन्ह होत " गाय वासरू " या चिन्हाकडे पाहून शेतकऱ्यांना तो पक्ष आपला वाटला. आणि भरघोस मताने त्यांना निवडून काँग्रेस पक्ष सत्तेत आला. शेतकऱ्यांना वाटले आपले सरकार आले. आता आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळेल. पण या सरकारने पहिली तीन दशके भारत विकसित होण्यासाठी भांडवलदारांच्या हिताचा जास्त निर्णय घेतला. भारत विज्ञान, तंत्रज्ञान , उद्योग यात स्वयंपूर्ण बनेल यातच जास्त लक्ष दिले. ते ही गरजेचे होते. कारण नवीन देश निर्माण करतांना या सर्व गोष्टी विचारात घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणकारी निर्णयाकडे पाहिजे तेव्हढे लक्ष देता आले नाही. हो मात्र या काळात सावकार शहीला काही प्रमाणात चाप लागावा म्हणून बँका, सहकारी संस्थामार्फत शोध लागला. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज सुरू झाले. हरित क्रांती झाली. नवीन बियांणांचा शोध लागला. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमाण वाढले. पुढे याच पक्षाचे पुन्हा चिन्ह बदलले ते हाताचा पंजा झाले शेतकऱ्यांना मतांसाठी गोड गोड गाजर दाखवत 6 दशकाहून अधिक वर्षे भारतावर काँग्रेसने राज्य केले. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाच्या समस्या अजूनही संपल्या नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील माणसे बदलली परंतु शेतकऱ्यांच्या समस्या आहे त्याच आणि तिथेच राहिल्या. पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले या काळात यांनी धान्य , कापूस, उसाचे भाव वाढवले. तर कधी निर्यात धोरण बंद करून भाव ही पाडले. शिवसेनेचे सरकार स्थिरस्थावर होण्यातच वेळ गेला. शेतकऱ्यांच्या पदरात पाहिजे तेव्हढे माप या ही सरकारच्या काळात पडले नाही. देशात भाजपाचे मोदी सरकार आले. पीकविमा, नुकसान भरपाई मिळत गेल्या. यात जास्त फायदा विमा कंपन्यांचा होत गेला. यानंतर लाडकी, मोफत, सबसिडी या गाजर योजना येवून जनतेला भुलवत ठेवले. शेतकऱ्यांना बाजारभावात लाखोंनी लुटले आणि गाजर योजनेत हजारोंनी वाटले. शेतकऱ्यांचे अधिक उत्पन्न झाल्यास व्यापाऱ्यांनी भाव पाडणे, सरकारने निर्यात बंदी करणे, जनतेला परवडत नाही म्हणून आयात सुरू करणे , आयात निर्यात टॅक्स वाढवणे हा प्रकार थोडा बहुत या सर्व सरकारच्या काळात झाला. नंतर नंतर शेतीच्या समस्या बदलत गेल्या. पण शेतकरी त्यांच्या घामाला खर्चाच्या किमान दीडपट योग्य दाम कधी दिले गेले अशी वेळ बहुतेक कधी आलीच नाही असेच वाटते. त्यामुळेच शेतकऱ्यांची स्थिती काही बदलली नाही. आज्याची जी परिस्थिती होती. नातवाची ही तीच थोड्याबहुत फरकाने राहिली.
दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतात की
पूर्वी गावरान होत, कमी उत्पन्न होत
म्हणून शेतकरी अर्धपोटी होता l
आता हायब्रीड आल, बक्खळ धान्य झाल
आडत्याच्या मनभावाने हाती धुपाटन आल ll 2ll
पूर्वीचा शेतकरी जी काही पिके घ्यायचा ती सर्व गावरान आणि कसदार होती. त्याकाळी जमिनी भरपूर होत्या. पण गावरान वाणाला उतारा फार कमी होता. त्यामुळे नुसत्या शेतीतून फार मोठा प्रपंच होईल असे काही नव्हते. झाल तर पोटभर नाहीतर काही दिवस अर्धपोटी रहावे असे उत्पन्न होत होते. पुढे लाल क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली , हरित क्रांती झाली., पिली क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली. या सर्व क्रांत्या शेतकरी, मच्छीमार यांना उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या ठरल्या. लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात स्वामिनाथन यांच्यामुळे 1960 साली हरित क्रांती झाली. विशेषत: गहू, तांदूळ इतर क्रांतीमधून तेलबिया, पशुपालन, यांचे उत्पादन वाढले. जगभर हायब्रीड तंत्रज्ञान आले. पुढे बिटी तंत्रज्ञान आले. जिथे हेक्टरी 850 किलो गहू व्हायचा तिथे 2281 किलो गहू होवू लागला. देश अन्न धान्यं याने स्वयंपूर्ण होवू लागला. पण याच काळात व्यापारी वर्ग प्रबळ झाला होता. तो सरकारलाही फारसा जुमानत नसावा. कारण तो म्हणेल त्या कमी भावात धान्य व इतर माल खरेदी करू लागला. त्यामुळे उत्पन्न वाढूनही कमी भावामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारू शकली नाही.
यापुढे आपल्या तिसऱ्या कडव्यात ते म्हणतात की
आता कीटकनाशक, रासायनिक खते,
बी बियाणांचे भाव ही गगनाला भिडले l
किती ही उत्पन्न झाले झाले तरी
शेतकरी मुद्दलातच राहिले ll 3ll
हरित क्रांतीच्या निमित्ताने जास्त उत्पन्न देणारे वाण आले. पण त्या वाणाला जगविण्यासाठी नुसते पावसावर अवलंबून न राहता पाण्याचे नियोजन करावे लागे. या हायब्रीड वाणाला पोषणासाठी रासायनिक खत बाजारात आले. रोगराईपासून पिके वाचवण्यासाठी कीटकनाशके आली. याचे त्वरीत परिणाम दिसू लागले. मात्र याचे किती प्रमाण ठेवावे याबाबत शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त खते कीटक नाशके शेतकरी वापरू लागल्याने बाजारपेठ वाढली. कमी खर्चात जास्त नफा कमावण्यासाठी मग व्यापारी डुप्लिकेट बियाणे ,रासायनिक खते ,कीटकनाशके तयार करून विकू लागले. याचा परिणाम असा झाला की चांगल्या बियाणांची उत्पन्न वाढले, बोगस वाणाने उत्पादन घटले, शेतकऱ्यांचे नियोजन नसल्याने या खतांच्या, कीटकनाशकांच्या, आणि बियाणांच्या अतिरिक्त वापराने उत्पन्न व खर्चाची बेरीज जुळेना. त्यामुळे उत्पन्न दिसूनही शेतकरी मुद्दलातच राहिले.
पुढच्या कडव्यात ते म्हणतात की
रासायनिक खतांच्या अतीवापराने
धरणीमाय निझूर झाली
कास्तकऱ्यांनी कितीही ओतल तरी .....
शेणखतांच्या खुराकासाठी ती आतुर झाली ll 4ll
शेतकऱ्यांचे शेतीचे योग्य नियोजन नसल्याने ऐकीव माहितीवर इथे हे वाण, खत, कीटकनाशक वापरल्याने जास्त उत्पादन मिळाले हे एकूण प्रमाणापेक्षा जास्त खते व कीटकनाशके यांचा जास्त वापर झाल्याने शेतीचा पोत बिघडला म्हणून कमी उत्पादन येवू लागले. कमी उत्पादन येते म्हणून अजून डोस वाढवले त्यामुळे धरणी माय कायमची आजारी पाडून टाकली. हिला नीट करण्याचा एकच उपाय म्हणजे जैविक खते उदा. शेण खते हे टाकली तरच पोत जाग्यावर येवू शकतो. पण हरित क्रांतीत शेतकऱ्यांची गुरे औद्योगिक क्रांतीने कमी झाली. त्यामुळे शेणखत ही जास्त प्रमाणात मिळेना.
पुढच्या कडव्यात ते म्हणतात की
संकटाची मालिका शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली
कधी सुलतानी संकट, कधी अस्मानी संकट l
यातून वाचलाच तर इमानदारीने सर्वांची उधारी चुकवतो
डूबला तर कुटुंबाचा विचार न करता गळफास घेतो ll 5ll
शेतीसाठी एव्हढ्या क्रांत्या झाल्या , शेतीमालाचे वाढते उत्पन्न दिसू लागले पण त्याबरोबरच पिकांची रोगराई वाढली. कधी अनियमित वेळेत पाऊस, पेरतांना पावसाची आशा दिसते म्हणून शेतकरी पेरणी करतो. मध्ये थोडाफार पाऊस पडतो पण ऐन दाने पोटऱ्यात भरतांना पाऊस नसतो. कधी येतो ते पीक काढणीला आल्यावर येतो आणि हे अस्मानी संकट पीक होत्याचे नव्हते करून टाकते. तर कधी भरपूर उत्पादन होते, परंतु पीक निघाल्यावर भाव पाडले जातात, अन्न धान्याचे भाव वाढले म्हणून परदेशातून धान्य आणून भाव पाडले जातात. किंवा आपला माल भारताबाहेर पाठवायचा असेल तर निर्यात शुल्क वाढवतात किंवा निर्यातबंदी केली जाते. हे सर्व सुलतानी संकट शेतकऱ्याच्या माथी येते. कधी भावाचा लक साधला तर सर्वांची देनी देवून शेतकरी मोकळा होतो. मात्र अस्मानी संकटानी घेरला गेला तर पुढच्या वर्षभराच काय ? लोक काय म्हणतील, मुलीचं लग्न, सावकाराच देणं, या समस्या त्याला भेडसावतात. लोकलज्जेपायी तो स्वतः च्या कुटुंबाचा विचार न करता गळफास घेतो.
पुढच्या ओळीत ते म्हणतात की.......
एखाद्या शेतकऱ्याच्या कोथंबिरीचा लाखोंचा डंका वाजतो
सगळा मीडिया त्याला उचलून धरतो l
कोट्यावधीचा कांदा काही हजारोंनी विकतो
तेंव्हा गावोंच्या गावातील शेतकरी हमसून रडतो ll 6ll
शेतकरी हा असा व्यक्ती आहे की त्याला हर्ष व्यापाऱ्यासारखा झाकून ठेवता येत नाही. एखादा भाव साधला व लाख दोन लाखाची कोथंबिर जरी विकली गेली तरी जिल्हाभर त्याचा गवगवा ही मीडिया करते. याउलट सरकार, व्यापारी संगनमताने अनेक वेळा अनेक गावांच्या गावांचे कोट्यवधी रुपयांचे कांदे हजारो रुपयात घेवून भाव पाडतात. तेंव्हा हे शेतकरी हमसू हमसून रडतात. कारण या पिकाच्या जीवावर त्याच्या मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, एखादा नवा शेतीचा तुकडा, एखादे वाहन , घरातील एखाद्याच्या आजारपणाचा खर्च करण्याचे नियोजन असते. हे सर्व कमी भाव मिळाल्याने कोलमडलेले असते म्हणून तो हमसून हमसून रडतो.
पुढच्या ओळीत कवी म्हणतात......
आज नोकरशाहींचे पगार लाखोंनी झाले
दोनशेचे धान्य अन पन्नासचा कांदा त्यांच्या डोळ्यात पाणी आणू राहिले l
पूर्वी त्यांचा महिना एक पोत्याचा पगार होता आता तीस पोत्यांचा झाला
आमचा गरीब शेतकरी मात्र आहे तिथेच राहिला ll7ll
आणखी एक विडंबना पहा ज्याला लाखो रुपये पगार असतो तो नोकरदार दोनशे रुपये पायली धान्य व पन्नास रुपये किलो कांदा झाला की महागाई खूप वाढली म्हणून बोंब करतात. सरकार ही त्यांच्या हा ला हा म्हणून आयात करतात. व शेतकऱ्यांचे भाव पडतात. वस्तूत: ही महागाई या जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली नसते तर चैनीच्या वस्तूंची वाढलेली असते. महिन्यातून किमान दोनदा मित्र, फॅमिली सोबत हॉटेलला जातील. शंभर रुपये मुद्दलाचे खाण्याचे हजारो रुपये देतील. इकडे कांदे वाढलेले वीस रुपये दिसतील. पण या चैनीचे हजारो रुपये भाव वाढल्याचे त्यांना दिसणार नाही. चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी नोकरीला लागतेवेळी सरकारी नोकरांच्या पगार हा महिन्याला त्यावेळी एक पोते धान्य येवू शकेल इतका होता. तरी ते आनंदी होते. आता सरकारी नोकरांचा पगार महिन्याला तीस पोत्यांचा झाला. तेंव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांचे धान्याचे भाव 10 पटीने वाढले तर सरकारी नोकरांचे पगार 220 पटीने वाढले. त्यातही बहुतेक घरात दोघे ही नोकरीला आहेत. तरी यांना महागाई दिसते. चाळीस वर्षांपूर्वी आमचा शेतकरी जेव्हढ्या जमिनीचा मालक होता तेव्हढीच जमीन विभागून त्यांच्या मुलांकडे राहिली. सपर जावून पत्रा काय तो आला. सरकारी नोकरांचे बंगले, गाडी प्लॉटचें प्लॉट झाले.
पुढच्या ओळीत मात्र शेतकरी चिडलेला आहे.
नकोत आम्हाला मोफत, लाडक्या अन सबसिडीचे गाजर
हवे आम्हाला आमच्या घामाचे दाम l
मायबाप हो खरच असेल जर कळवळा तर
देता का आमच्या मालाला योग्य भाव ll8ll
या कडव्यात शेतकरी म्हणतो " मायबाप सरकारने नेमके काय चालवले आहे. " आम्ही मागतो काय ? ते देतात काय ? आम्ही शेतकरी कधी काही मोफत मागत नाही. आम्ही आमच्या कष्टाचे मोल मागतो. पण हे सरकार मोफत दोनशे रुपयाचे धान्य देवून आमचे धान्याचे भाव पाडून किमान 20 हजार रुपयांचा तोटा करतात. लाडक्या बहिण योजना व मोफत धान्य देवून कामगारांची क्रियशिलता नष्ट करतात. याच पैशातून कामगार व्यसनाधीन होतो. पर्यायी शेतीला मजूर मिळत नाही. वरून सरकार आम्ही तुमच्यासाठी एव्हढे करतो. असा आव आणतात. मायबाप सरकारला जर खरोखर आमची काळजी असेल तर आम्हाला सन्मानपूर्वक जगण्यासाठी या फुकटच्या योजना बंद करून फक्त आम्ही पिकवलेल्या मालाला योग्य भाव द्या. हीच आमची माफक अपेक्षा आहे.
आताचा शेतकरी कसा आहे हे या पुढच्या कडव्यात पहा......
शेतकरी आता शिक्षित झालाय ,
शरद जोशींचे आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरा l
सामुहिक फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या बनवा,
आपल्या शेतमालाचे भाव आपणच ठरवा ll9ll
खरे तर शेतकरी आता काही पूर्वीसारखा अडाणी राहिला नाही. किमान दहावी, बारावी व पदवीधर होवून तो सरकारच्या नोकरीबंदीच्या मेहेरबानीने खेड्यात शेती करतो आहे. एक शरद जोशीसारखा कलेक्टर माणूस जगभर फिरून शेतीचा अभ्यास करून भारतातील मेहनती शेतकरी हा शेतीतून सोन्यासारखे पीक काढून त्याचे उपपदार्थ बनविणारी चतुरंग शेती करावी. त्यातून त्यांनी भरपूर उत्पन्न मिळवावे. या व्यापारीधार्जिण्या कोणत्याही सरकारच्या शेतमालाच्या भरवशावर राहू नये. म्हणून शेतकऱ्यांसाठी त्यांनी नोकरी सोडली. भारतातील शेतकरी जागृत केला. भारताला शेतीक्षेत्रात पुढे नेणाऱ्या अनेक नवनवीन कल्पना त्यांनी सरकारला सुचविल्या. प्रसंगी मोठमोठे मोर्चे, आंदोलने केली पण सरकारला त्यांच्या गोष्टी मान्य करून शेतकऱ्यांची व्होट बँक हातातून घालवायची नव्हती. विदर्भातील शेतकरी हे युगात्मा शरद जोशी यांच्या विचारांनी खूप प्रेरीत होते. त्यांनी चतुरंग शेतीचा प्रयोग एखादी वेळी केला ही असता परंतु तेथे बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नाखूष आहेत. कारण जमिनी खूप जास्त पण उत्पन्न खूप कमी आहे. त्यामुळे बँका कर्ज देत नसाव्यात. यूगात्मा शरद जोशी यांच्या मृत्यूनंतर हाच प्रयोग नाशिक येथे 9 शेतकरी एकत्र येवून सीड टू प्लेट म्हणजे बियापासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत धर्तीवर राबवित आहे . आज त्यामध्ये 22 गावचे 11,000 शेतकरी सभासद असून त्यांच्या 25,000 एकर शेतीतील माल जगातील 42 देशांना पाठवतात. जवळजवळ एक हजार कोटींचा त्यांचा टर्न ओव्हर आहे. सभासद सर्व शेतकऱ्यांच्या मालाला ते व्यापारीपेक्षा जास्त भाव देतात. युगात्मा शरद जोशी यांची ही संकल्पना किती चांगली आहे. हे एका उदाहरणावरून दिसून येते. असे जर बहुसंख्य शेतकरी एकत्र येवून त्यांनी अनेक फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या बनविल्या असत्या तर युगात्मा शरद जोशींचे स्वप्न सत्यात उतरून शेतकरी स्वयंपूर्ण झाला असता.
युगात्मा शरद जोशींचे हे स्वप्न सत्यात उतरतांना पाहून या कवितेतील शेतकरी स्वप्न पाहू लागतात की.....
राजा आता नकोत सरकारच्या कुबड्या,चतुरंग शेती करू
आपल्या पिकवलेल्या मालाचे आपणच उपपदार्थ बनवू l
आपली बाजारपेठ आपण उभी करू
आपल्या शेतमालाचे भाव आपणच ठरवू ll10ll
आता अगदी ईर्षेने कवितेतील शेतकरी आपल्या बांधवांना म्हणतो की आता किती दिवस सरकार व व्यापारी आपल्या मालाचे भाव ठरवून आपण लुटले जाणार ? चला आता युगात्मा शरद जोशी यांचे चतुरंग शेतीचे स्वप्न आपण सत्यात उतरवू. आपण पिकवलेल्या मालांचे आपणच उपपदार्थ बनवू. त्याचे भाव आपल्याला परवडेल ते आपणच ठरवू. ते विकण्यासाठी सर्व जगभर पाठवून आपली बाजारपेठ आपणच उभी करू.
पाहुयात कवितेतील शेतकरी यांचे हे स्वप्न पुरे होते की काय.
ला. राजेंद्र फंड, राहाता ( शिर्डी)
मो. 9881085671.