नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*टीचभर धुरा*
"नसते पोट्टे बाट्टे त् बरं झालं असतं, आता असं वाटते पार्बते...,
ग्यान शिकवते गावाले आन् समज नाई पोराले.. अशी गत झाली आपली पार्बते....!"
पयलं म्याच केला गावचा कारभार ,, आन् आता मयास मांग अंदार ... ,पार्बते काही खरं नाई,, आपनं पोट्ट्यायले जन्म देऊन कोणतं पाप केलं हेस समजेना झालं... रामराज अतिशय खिन्न मनाने आपली पत्नी पार्बता जवळ बोलत होते.
पार्बता पण रडकुंडा चेहरा करून,आपल्या पतीच्या आसवा सोबत आसवे गाळत होती. काय करावं काय बोलावं तिला सुध्दा कळत नव्हतं. एके काळी त्यांच्या नवऱ्याचा गावात असलेला मान , शब्दला किंमत तिने सुद्धा अनुभव ला होता. शेवट माय ते मायचं अजूनही तिला तिच्या पोरापासून आशा होतीचं
" होईल व समद बेस ... येईल कवा तरी यायले बुध ...!" पार्बती आपल्या नवऱ्याला आधाराचे दोन शब्द सांगत असे... पण रामराज ला आपल्या घराचं "धुरा प्रकरण" समजण्याच्या पार गेलं , हे चांगलचं माहीत होतं आणि याला कारणीभूत म्हणजे गावातील काही कारणास्थानी माणसं व मदन ची बायको सगुणा होती.
रामराज आणि पत्नी पार्बता हे एका खेळा गावात थोडसं सधन आणि मानवाईक कुटुंब जवळपास सात आठशे लोकवस्ती असलेल्या गावामध्ये वास्तव्याला होते, एक छानसं आंगण असलेलं घर, गावापासून अगदी काही अंतरावर राजारामची ३५ ते ४० एकर उपजाऊ शेती स्वतः मालक व सोबत एक गडी ठेवून सधन शेती करत होते. सर्वचं अगदी व्यवस्थित चाललं होतं. गावात मानपान, घरात गावातील लोकांचं येणं जाणं , गावात फिरत असताना रामराज व पार्बतीला लोकांकडून बराच मान मिळत होता, संवेदनशील मनमिळावू न्यायप्रिय, लोकांना वेळोवेळी मदत करणारं असं रामराज आणि पार्बता यांचे कुटुंब एका खेडा गावात अगदीच आनंदाने राहत होतं. त्यांच्या या संसाररुपी प्रवासात मदन आणि वसंता नावाच्या दोन मुलांचा समावेश होता, आई वडील व्यवस्थित, त्यांची मुलं पण दोघेही लहानपणापासून तर वयात येत पर्यंत अगदी योग्य मार्गावर होते. गावात वडिलांच्या शब्दाला मान होता, पार्बती व मुलांना सुद्धा गावामध्ये त्यांच्या सवंगड्या कडून, गावातल्या प्रत्येक कुटुंबाकडून योग्य तो मान मिळत होता. याचं गावात रामराज व पार्बता यांची दोन्ही मुलं मोठी झाली होती, सहकार्याची भावना वडीला प्रमाणे या दोन्ही मुलांमध्ये होती. गावातल्या लोकांमध्ये फार आदर आणि सन्मान होता रामराज आणि कुटुंबाचा.
गावात जेमतेम दहावीपर्यंत शाळा, रामराज आणि पार्बता हे व्यवसायाने शेतकरी आणि जोडधंदा आणि इतरांना व स्वतः ला मदत म्हणून रामराज काहीसा आपला खरेदी विक्रीचा व्यापार करत होते. सुखी कुटुंब, सदन कुटुंब, न्यायप्रिय कुटुंब अशी सभोवतालच्या गावगाड्यात रामराव च्या नावाची चांगलीच चर्चा होती.
मुलांनी शिकावं जमेल तर नोकरी करावी नाहीतर आपल्या वडिलोपार्जित आज्या पासून आलेला व्यवसाय आपण सांभाळावा या धरणीचे रामराज होते. गावातील प्रत्येक मुलांना मुलींना व कुटुंबांना शिक्षणाचे महत्त्व त्याचबरोबर व्यवसायाचं महत्त्व, शेती व्यवसायाचे महत्व व त्याला पूरक अशा लहानसा गृह उद्योगाचे महत्त्व रामराज नेहमीच आपल्या न्यायदानातून किंवा आपल्या त्याच्याबरोबर असलेल्या लोकात, चारचौघात समजून सांगत होते. त्यांना नोकरीबरोबर व्यवसायाचा सुद्धा आवड होती, कारण ते स्वतः शिक्षित असून त्यांच्या काळात नोकरी न करता त्यांनी शेती हा व्यवसाय निवडला होता आणि आपल्या मुलांनी शिकावं आणि त्याचबरोबर व्यवसायाकडे , शेती व्यवसायाकडे लक्ष द्यावं असं त्यांना नेहमी वाटत होतं. त्याच अनुषंगाने त्यांनी मुलांना त्याच त्याच पद्धतीचे शिक्षण दिले व जमेल तर नोकरी नाही तर आपला वडिलोपार्जित व्यवसाय शेती करावं असं त्यांना मनोमन वाटत होतं. आणि त्याच धर्तीवर त्यांची मुले सुद्धा तयार झाली होती. गावात दहाव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवून दोन्ही मुलांना सुशिक्षित केलं,,, पण कुठेतरी चुकलं हे त्यांना कळलं होतं. मुलं शिकली होती पण शिकून शहाणी झाली नव्हती. आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज रामराज आणि पार्बता यांच्यावर आज असे दिवस आलेले होते.
म्हणतात ना,,, वाईट दिवस आणि पतनाला काहीतरी कारण असत,, तसंच कारण रामराज पत्नी पार्वता आणि त्यांच्या दोन मुलांच्या कुटुंबात आलं होतं. आणि ते कारण होतं,, घर असो इस्टेट म्हणजे शेती असो किंवा नाती असो *वाटणी* ही आजपर्यंतच्या इतिहासात पाहिलं तर नावाप्रमाणेच ही घर असो शेती असो याच्यात तर वाटणी करतेचं,, परंतु नात्यात सुद्धा वाटणी हा शब्द फार भयंकर प्रकार घडवतो, असे प्रतेय समाजात वावरताना पुष्कळदा प्रसंगातून, कुटुंबांच्या दुभंगलेल्या नात्यातून जाणवत आले आहे. आणि त्यातल्यात्यात जर शेताची वाटणी असेल तर,, एक संयुक्त कुटुंब असो किंवा एका गावात आजूबाजूने घर आणि लागूनच असलेली शेती असो त्यांच्यात कलह निर्माण करण्यात *धुरा* फार मोठा कारणीभूत ठरतो. आणि असाच काहीतरी रामराज यांचे सोबत घडलं होतं.
मदन आणि वसंता मोठे झाले ... मोठे होता हातो तेवढेच शहाणे सुध्दा झाले होते. बापाचा गावातील मान सन्मानाचा अर्थ त्यांनी वेगळ्या लावला होता. गावात चांगलं कार्य करणाऱ्या लोकांसोबत काही चालत्या गाड्यांची खिरुटी काढणारे लोक सुध्दा रामराज यांच्या वाट्याला आले होते. खुटीउपाड ,रामराज यांच्या दूर होते पण रामराज च्या एका मुलाच्या अगदी जवळचे झाले होते हे नक्की. दोन्ही मुलं शिक्षीत होती पण वडीलाच शेती वैभव पाहून त्यांनी सुद्धा व्यवसाय व शेती करणे म्हणजेचं नौकर ठेवून शेतीचा मालक म्हणून राहणे पसंत केले होते... रामराज ला त्यांचा हा निर्णय सुध्दा योग्य वाटत होता... दोन्ही मुलांनी मिळून ४० एकरची नाही ८० पण ६० एकर तरी शेतीचा आवाका आपल्या कष्टाने वाढवावा अश्या विचारांचे रामराज व पार्बता होते.
त्यांच्या सोबतीला दोनाचे चार हात लागावे म्हणून त्यांच्याच जवळपास च्या नातातील गावगाड्यातील शेती व्यवसायात असलेल्या कुटुंबातील लग्नायोग्य,शेती समजणाऱ्या दोन मुली बघितल्या यथा योग्य पध्दतीने दोन्ही मुलांचे लग्न लावून दिले. सोज्वळ सुना पाहून पार्बता सुध्दा सुखावून गेली होती. घरी पहिल्या पेक्षाही सुखी आणि भरल्या सारखं वाटतं होतं. सगळा आनंदी आनंद.... पण या आनंदाला कुठून तरी विर्जन लागायला सुरुवात झाली होती.
*वाटणी...*
रामराज व पार्बता यांच्या घरात चर्चा नव्हती पण ... गाव खेड्यात पाणी भरण्याची विहीर, धुणं धुण्याचं ठिकाण, गावाचा पार यावर मात्र रामराज च्या घरापासून तर शेतीच्या वाटणीची खबर बात चालली होती. जेमतेम एक वर्ष सुखी, संयुक्त कुटुंबाची वाटणी करण्याची गोष्ट ही रामराज पर्यंत येणारच होती परंतु ती घरातून न येता गावातून येणे हे रामराज ला अपेक्षित नव्हते. गावातील काही खुटीउपाड व घरातील एक सुनबाई यांच्या प्रयत्नातून "वाटणीचा विषय" आला होता.
एका सायंकाळी रामराज पार्बता निवांत पडले असता वाटणीच्या विषयावर बोलायचे ठरवले.
"पर्बते शेवटी वाटणीचा ईषय आला आपल्या घरामंदी...!"
"व्हय व... लायनीच्या तोंडून कवा कवा असा सुर निंगते जी...!" पार्बता शांतपणे रामराजला सांगतं होती.
"थे मंते मणे ... आमी बी आदुनीक वावर करून ईसाचं तीस करू... असं आलं मया कानावर...!"
"व्हय का... "रामराज म्हणाला..
वसंताले कष्टारू बायको भेटली..., मंग त्याले त्या गावच्या ईब्लीस लोंका पासून दूर रायले कावून नाई सांगत थे...!"
दोघे ही उद्या वाटणीच्या विषयावर बोलायचे म्हणून शांत झाले.
दिवस उजाडला, नेहमी प्रमाणे घरात खेळत वातावरण होते, परंतु गावातील इतर लोकांचा विविध मुद्द्यांवर न्याय निवाडा करावा लागत होता तसा विचार ठेवून राजाराम आज त्याच्या स्वतःच्या घरात वाटणी या मुद्यावर चर्चा करणार होते. लोकांच्या घर, शेतीच्या वाटण्या पाहून राजारामला नेहमी वाटायचे की आपल्या वाट्याला,आपल्या पोरांच्या वाट्याला वाटणी हा प्रकार येऊ नये. दोघांनीही माय बाप सोबत घेऊन एका घरात रहाव व गावात आदर्श घडवावा पण ते शक्य वाटत नव्हतं , म्हणून त्यांनी सुना व पोरांसमोर वाटणीचा विषय शक्यतोवर सोडवू या विचाराने दोन्ही मुलांना वाटणीवर चर्चेसाठी बोलावले... विषय गंभीर होता ...पण यावर बोलने जरुरी होते. माय बाप दोन पोरं दोन सुना एक सुखी कुटुंब आज वाटणी या विषयावर बोलायला एकत्र आलं होतं... काय बोलावं कुणालाच कळेना, वाटणी बद्दल कुणाला काहीच माहित नाही या अनुषंगाने सगळे वावरत होते. परंतु कशी का होईना राजारामने या विषयावर बोलायला सुरुवात केली...
" बाबांनो आम्ही आता आलो कलत्या वयात, आजवर आपण समदे एकत्र एक आदर्श परिवार म्हणून या गावात राहिलो परंतु आता काय आमचं वय झालं, हे सर्व कमावले ते तुम्हा दोघांचं आहे यावरून या सर्वांचा कारभार तुम्ही सांभाळावा असं मी आणि तुमच्या मायला ठरवलं, गावचा न्यायनिर्वाळा लावता लावता आपल्या घरात पण आपल्या कर्तबगार खांद्यावर जिम्मेदारी द्याव म्हणतो...!"
बाबा रामराज आपल्या दोन्ही पोरांना उद्देशून म्हणाला.
हे सर्व बोलताना पार्वता आपल्या नवऱ्याकडं पाहत होती. तिलाही वाटत होतं की आपली सुना-पोरं एकत्र राहावे व सुखाने संसार करावा पण वाटणीच्या विषयावर आपले घरात चर्चा झाली या विचाराने ती अस्वस्थ होती , ती काय बोलणार बिचारी जो निर्णय होणार तो तिला मान्य करायचाच होता.
यावर मदन बोलला " काय बोलता बाबा तुम्ही ,, आम्ही कधी म्हटलं का तुम्हाला आम्हाला वाटणी पाहिजे म्हणून, आहे तसं चालू द्या की मग हा वाटणीचा विषय आणला कसा तुम्ही. यावर मदन ची बायको जरा कटाक्ष नजर नी आपल्या पतीकडे पाहत होती तिलाही हे अनपेक्षित होते पण वाटणीचा विषय म्हटल्यावर तिच्याही मनात आपल्या हिस्सेदारीची आपुलकी, मनात चेहऱ्यावर आनंद देणारी होती.
वसंता मात्र या वाटणीच्या विषयाने थोडा ताजा तवांना जाणवत होता कारण की त्याच्या बायकोने व गावातील काही खुटी उपाड मंडळीने त्याच्या डोक्यात स्वतंत्र कुटुंबाचा आणि शेती वाटपाचा विचार आधीच पेरला होता. लग्ना पहिल्या जीवनमानात व लग्नानंतरच्या जीवनमानात वसंतामध्ये फारच फरक आला होता.
" अरे ... दादा कुठपर्यंत बाबाला आपण शेतीच्या कामाला लावायचे ,आता आपण सांभाळू आपला व्यवसाय व शेती,,, करू दे म्हणतो मी आई बाबाला आराम...!" वसंता उत्साहात बोलत होता, त्यांच्या या बोलण्याचा अर्थ सर्वांना कळला होता. वसंताने योग्य वेळी आपला वाटणीला होकार आहे हे स्पष्टपणे त्याच्या बोलण्यातून सांगून टाकले होते आणि हेच विचार रामराजला ऐकायचे होते. आपल्या नवऱ्याच्या विचाराने सगुणा आपल्या थोडी चेहऱ्यावर आनंदाची छटा घेऊन उभी होती शेतीचा हिस्सा, घराची वाटणी आणि आपली वेगळी पेटणारी चूल, या सर्वांचा आनंद तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. आणि या वाटणीच्या विषयाला कुठे ना कुठे याआधीच तिच्या मनात विचार आला होता आणि आज त्याच मार्गाने घरात चर्चा चालू आहे यामध्ये ती आपल्या विषयाचा विजय समजत होती.
" अरे,,, बाबांनो मी विसा ची तिस केली. तिसाची चाळीस केली, आता तुम्ही आपापला हिस्सा घेऊन वाढवा की शेती. आणि व्यवसाय यामध्ये तुमच्या मायेचा व माझा काहीच विरोध नाही बाबांनो...!"
" पण आता जसे भावाभावा प्रमाणे राहता तसे रहा म्हणजे झालं बाबा..." रामराज यावर उत्तरला . आणि मनात नसताना सुद्धा काही भांडण तंटा न होता दोन मुलांनी वाटण्या करून देण्यास त्यांचा त्यांनी आपला होकार दर्शविला होता...
झालं,,,वाटणीची ठिणगी पडली होती,, वाटणीचा दिवस ठरला दोघांच्या हिस्स्याला येणारी शेती आणि घर यावर आपसातचं आपल्या नातेवाईकांमध्ये चर्चा करून दोघांची वाटणी करून देण्याचे ठरले. परंतु सर्वांनी एकाच घरात राहायचं हा विचार राजाराम व त्यांची पत्नी पार्वती यांनी जेव्हा सर्वां सोबत ठेवला तेव्हा मात्र यावर थोडासा वाद सुरू झाला.
" करायची तर सरसकट सर्वांचीच वाटणी करा, कशाला दोन्ही पोरांना कष्टाला लावून तुम्ही आपली जिम्मेदारी झटकतात...!" ह्या सगुणाच्या बोलण्याने रामराज व पार्वता दुखावले होते. यावरून सगुणाला एकाच्या दोन चुली करायचे आहे हे स्पष्ट झालं होते. लोकांचा न्याय निवडा करणारा रामराज या विषयाला विरोध करू शकत नव्हता, कारण त्यांना माहीत होतं यांच्या न्यायनिवाड्यात गावातील एका चुलीच्या दोन चुली झाल्या होत्या, मग त्याला कारण काहीही असो. परंतु आपल्या घरात दोन चुलीचा विषय निघाल्यावर रामराज थोडा दुखावला होता आणि दोन चुली झाल्यावर लोकांच्या घरातले भांडण तंटे त्यांना चांगलीच माहीत होते. परंतु यावर पर्याय नव्हता त्यांना लोकांना जसा न्याय दिला तसा आपल्याही घरात न्याय देणे भाग होते, म्हणून रामराज आणि पार्वता यांनी दोन चुलीचा प्रस्ताव पारित केला. आणि एका मुलाला पंधरा एकर दुसऱ्याला पंधरा एकर आणि स्वतःच्या नावावर दहा एकर वावर लावून घेण्याच्या शासनी कार्याला सुरुवात केली व ते योग्य त्या मार्गाने पार पाडले.
घरात एका चुलीच्या तीन चुली झाल्या होत्या. उरात रग आहे तोपर्यंत आपण कोणत्याही मुलाकडे न राहण्याचा विचार रामराज आणि पार्वताने घेतला होता. आपली अडचण कुणालाही होऊ नये या विचाराचे ते होते. गावामध्ये एकाच्या,, दोन-तीन चुली झाल्या आणि तोच प्रसंग आपल्याही घरात आला या वाटणीच्या विषयाने रामराज आणि त्याची पत्नी या विचाराने खरच खचले होते . त्यांनी या विषयाचा कधीही विचार केला नव्हता पण नियतीला जे मान्य ते त्यांनी सुद्धा मान्य करण्याचा निर्धार केला आणि एकाच अंगणात तीन चुली पेटू लागल्या.
शेताची वाटणी करताना जे न व्हायचे ते झाले होते शेतात घरात वाटणीमध्ये धुरा आडवा आला होता वाटणीही पक्कीच करण्याच्या उद्देशाने दोन भावाने सलग शेतामध्ये आपापल्या वाटणीची ओळख म्हणून शेती मधोमध धुरा करून घेतला आणि या धुर्याने समोर बरेच काही घडले होते.
मदन आणि वसंता आता १५- १५ एकरचे मालक झाले होते. दोन नौकर ठेवून चाळीस एकर शेतीचा हंगाम करणारे रामराज आता स्वतः एक नौकर ठेवून आपल्या दहा एकर शेती वाहण्याला लागले. मोठा मुलगा मदन स्वतःच शेती व्यवसाय पाहत होता पण वसंता हा थोडासा वेगळ्या वळणाचा व मालकी हक्क दाखवणारा असल्यामुळे त्यांनी एक नौकर व स्वतः मालक बनवून शेती करण्यास सुरुवात केली होती. शेती करता करता वादाची ठिणगी कधी दोघा भावात पडली आणि या वनव्याचा ताप रामराज आणि पार्वता यांना कधी बसला हे कळलेच नाही.
शेती वाहतीच्या पहिल्याच वर्षी धुऱ्यावरून दोघा भावांमध्ये वाद निर्माण झाला हा वाद इतका विकोपाला गेला की दोघे भाऊ एकमेकांना मारण्यापर्यंत आणि एकमेकांचे डोके फोडण्यापर्यंत विचार करू लागले. एका वर्षात मध्येच एका आदर्श परिवाराला ग्रहण लागले होते. त्याला कारणीभूत वाटणी हा विषय होता पिकाच्या हंगामाचे पीक निघल्यावर उन्हाळ्यात शेतीचा फरकडा करावा लागतो शेती मशागतीला तयार करावी लागते उन्हाळ्याचा फरकाळा करत असताना मदनच्या वखराने वखरणी करत असताना फक्त टीच भर धुरा जास्त वखरण्यात आला, हे त्याने जाणून केलेली कृती नसावी हे मदनच्या स्वभावातून समजून घेण्याची गोष्ट होती. परंतु वसंताची पत्नी सगुणा ही नावाप्रमाणेच गुणा होती , तिच्या लक्षात ही बाब आली. ति आजचा विचार सोडून समोरचा विचार करणारी बाई होती. हित हित धुरा फोडून आपलं वावर वाढवण्याच्या प्लॅनिंग मध्ये मदन भाऊजी वाटते असं तिच्या मनात आलं. आणि तिने आपला नवरा वसंताला यावरून एक अनुचित विचार आपल्या नवऱ्याच्या डोक्यात भरले आणि झाली इथून धुरा फोडणीवरून डोकं फोडण्याला सुरुवात.
वसंता स्वतः शेतात काम करायला राबयला फारसा जात नव्हता परंतु गुणकारी सगुणा व नौकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या भावाला याचा जाब विचारण्याचा विचार केला व भावाला म्हणू लागला "तू का मोठा झाला म्हणून काहीही करशील का ...! आज तू धुरा फोडला उद्या थोडा थोडा करून वावरही घेशील...आपला हिसा वाढवशील...!"
" मी कुठं तुझा धुरा फोडला वसंता,,, मी आपलं वावर वाहतो तुझ्या वाटणीत आलोचं कुठं मी ...!" मदन शांत स्वरार बोलतं होता.
"राहू द्या भाऊजी तुम्ही... मी स्वतः पाहिलं तुम्हाला धुरा फोडताना..."
"हो व गुणे ... सकाळी किर मारून सडा सारवण केलीसं आणि धुरा पाहले गेली वावरात..." कधीही मोठ्यांच्या मधात न बोलणारी निर्मला आपल्या नवऱ्याची बाजू घेत बोलली.
" आता चुपचाप रावा की दोघी, धुरा फोडला म्हणून एका मेकांचे डोस्के फोडणार का तुम्ही... कवा नाई पायला बापा उब्या जलमात म्या...!" रागावल्या आवाजात पार्बता आपल्या दोन्ही सुनांना म्हणत होती.
दोन सख्ख्या भावाचा आणि जावा जावाचा, घरात गावात वावरात झगडा व्हायला शुल्लकसं कारणही तसेच आवले टेवले मारून बोलणेही चालतं होते. घरात सर्व पाण्या धुण्या खाण्याची सोय सासऱ्यान करून ठेवली असून सुद्धा,,, दोन्ही सुना घराबाहेर विहिरीवर पाणी भराले, नदी नाल्यावर धुणं धुवाले, धरण कांडण कराले, गावात जात होत्या, या मागचा उद्देश एकच की बाई- माणसांत आपली बाजू मांडणे व आम्ही किती खरे हे गावगाड्यात पसरवणे. या त्यांच्या अशा वागण्याने रामराज ची आजवरची कारकिर्द डागाळली होती... याचं त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. शिस्तप्रिय रामराजचा परिवार चर्चाचा व खुटीउपाड लोकांसाठी हास्याचा विषय झाला होता.
जिंकलेला डाव हरल्यागत रामराज हे सर्व घरात एका ठिकाणी बसून बघत होते. त्या दिवशी,गावातील वाद सोडविणाऱ्याच्या घरातचं कडाक्याचं भांडण झाले होते. समोर हा वाद वाढतच गेला दिवसेंदिवस कधी वावरात कधी घराच्या अंगणात दोघा भावात व दोघी जावात झगडे व्हायला लागले.
एका घरात दोन शत्रू राहते की काय असे रामराजला आपल्या पोरांबद्दल वाटतं होतं...
" आरे... नसलं जमतं त् एकानं जा दुसरीकडं रहायला ... " असे राजाराम ने आपल्या दोन्ही मुलांना बजावले होते. परंतु मुलांचा व सुनांचा लोभ वाढला होता, आम्ही घरातून बाहेर पडलो व घर आपल्या नावानं लावून घेतल तर... या विचाराने कोणीच घर सोडायला तयार नव्हते.
घर म्हटलं की झाडझुड , सडा सारवण आलाचं या सडा सारवणा वरून सुध्दा घरात भांडणं व्हायला सुरुवात झाली होती
एके दिवशी सकाळी सकाळी शेणाच्या सड्या वरून दोघा जावाचा भयानक लटा बुरनी राडा झाला ... साधारण ,, किर मारून झाडणे व सड्याच्या शितोळ्या वरून दोघा जावायनं एक मेकीच्या लटा बुरल्या. रामराजच्या घरात कधीही न विचार केलेले घरगुती झगड्याचे प्रकार घडतंच राहतं होते. या असल्या प्रकारने आपणचं घरचं का गावचं सोडावं असं रामराज व पार्बताला वाटतं होतं. गावातील मान पान आपल्यास पोरासुनांनी घालवला याचं फार दुःख रामराज यांना झालं होतं, ईवाइ - जावई मानवाईक यांच्यात रामराजचा अजूनही मान होता पण स्वाभिमानी रामराजला , आता आपण त्या लायकीचे नाही असे विचार दोघांच्याही मनात येत होते. वेळोवेळी सुना व पोरांकडून होणारा मानसिक त्रास त्यांना सहन होत नव्हता. एवढं होऊनही त्यांनी दोन्ही सुना व मुलांना समजविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला... परंतु दुसऱ्यांना न्याय देणारा रामराज आज स्वतः साठी न्याय करु शकतं नव्हता. गाव- शिवच्या पंधरा कोसात त्यांची कुठंही राहण्याची सोय होईल हे रामराजला माहीत होते,
अशातच रामराज ने पार्बता समोर आपले विचार मांडले " पार्बता जाऊ कावं आपणास यायचं वावर , धुरा , आंगण सोडून कोठे तरी लांब , जेत यायले लागंन नाई थांग...!"
" तुम्ही तेथं मी... म्हणून पार्बता गप झाली.
रामराजने पार्बतीला घेऊन रोजच्या कटकटी पासून दूर जाण्याचा विचार केला व ते कुणालाही काहीही न सांगता एके दिवशी गाव सोडून निघून गेले व एका निराधार छत्रछायेला आपल्या वाटतीचं जमीन जुमला देऊन येथे राहून आपण होईल तेवढी समाज सेवा करावी व आहो तो पर्यंत आधार मिळावा या उद्देशाने तेथे राहू लागले.
गावात व पंधरा कोसात याची खुप चर्चा झाली... गावातील लोकांनी व दोन पोरांनी रामराज-पार्बतीला खुप समजावले पण व्यर्थ एकदा गाव सोडून गेले रामराज उतरत्या वयातही आपल्या या वेळेच्या दरिद्री वैभवात यायला तयार नव्हते.
" मेल्यावं आमची समाधी ही तुमच्या वाटणीला आलेल्या धुऱ्यावं नोका बांदा... !" हे आपल्या मदन व वसंताला सांगायला विसरले नाही.
" मया नातवायले घेऊन ये जा पोरींनो, आशरमात तुम्ही, आमाले भेटाले,, फकस्त एवरं करंजा मायं आमा आजा - आजी साठी...!" पार्बता आपल्या सुनायले म्हणाली.
रामराज व पार्बता यांचे एकेक दिवस संपत होते... तसे तसे त्यांनां त्यांचीच चिड येते होती.
अजूनही त्यांच्या पोरांच्या हिस्सेवाटी व धुरा फोडण्यावरून झगडा व मारामाऱ्याच्या बातम्या रामराजच्या कानावर येत होत्या, "टीचभर धुरा नात्यातला दुश्मन पुरा" ह्या प्रमाण रामराजच्या परिवारात घडतं होतं. कधी धुऱ्यावरून कधी माऱ्यावरून कधी जनावरांच्या चाऱ्यावरून मारामारी ते कोर्टकचेरी चालु झाली होती. रामराजच्या वयाचे व काही समवयाचे गावातील लोक समजावून मध्यस्थी करून वाटणी वाद संपविण्याचा प्रयत्न करत होते. " माय सोडून गेले पण यायले सूद नाई आली ..." असा विरोधाचा सुर गावात वाजत होता.
" मेल्यावं काय बादून नेवाचा हाये का जेवरा धन कमावला थो..." गचका खाल्लेल्या शायण्याचे बोल पण दोघांच्या कानात शिरकाव करत नव्हते.
धुरा वाटणी पाई,
"सख्खे भाऊ पक्के वैरी... अन् माय बाप घरा बाहेरी... " गावात ही रामराज व त्यांच्या गुणवान पोरांबद्दल चर्चा व्हायची तेव्हा रामराज व पार्बता " नसतं त् असे पोट्टे बरं झालं असतं बापा ..." म्हणून कपाळावर हात मारत होते.
" टीचभर धुरा वखरून पेरला पण वापलेला पाण्यानं गेला...!" हे काही गावांतील व जवळपासच्या शेतकऱ्यां बाबत नक्कीच घडत होतं त्यापैकी वसंत व मदन होते. अशा या लोभी लबाड पोरा सुनायची तेवढ्या भागात पसरती किर्ती ऐकून रामराज फारच खचून गेला होता. अश्या जगण्यापेक्षा मारणं बरं म्हणून तो आपल्या बायकोला पार्बताला म्हणत होता. पार्बता पण आपण दोन लेकराची माय होती. वाचले ते दिवस जगून शेवटच्या दिवशाची वाट पहात होती. व कधी कधी
" नसते पोट्टे बाट्टे त् बरं झालं असतं,,,आता असं वाटते..." असं म्हणत होती.
सर्व असून काहीच नव्हतं,,, असे दिवस वाटणी केलेल्या टीचभर धुऱ्यानं रामराज व पार्बता यांच्या जीवनात आले होते. अगदी शेवटच्या काळात,,, घर, वावर आणि त्यांची सुध्दा वाटणी झाली होती.
रामराज नावाप्रमाणेच खरंच राजा माणूस होता. शेती , व्यवसाय, गावात मान सन्मान, शब्दाला किंमत, पण या टीचभर वाटणीच्या धुऱ्यापाई... रामराजच्या सर्वस्वाचा बळी गेला होता आणि रामराज बळीराज झाला... हे मात्र नक्की.
✍️
सुनिल बावणे - निल
बल्लारपूर, चंद्रपूर
८३०८३३४१२३
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने