नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*शेतकऱ्यांची दिवाळी अन हॅप्पीच*
- अनिल घनवट
दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. रोषणाई, नवे कपडे, फटाके, मिठाई व समृद्धीच्या, आनंदाच्या शुभेच्छा. हॅप्पी दिवाळीचे मेसेजची देवाण घेवाण. हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, पुढेही चालत राहील. सधन, कमवता वर्ग नेहमी सारखीच दिवाळी साजरी करेल पण या वर्षी शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करावी व का करावी हा प्रश्न सतावत आहे. सोशल मीडियावर एकीकडे दिवाळीच्या शुभेच्छांचा भडिमार सुरू आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्रभर अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पाण्यात वाहून जाणारे सोयाबीनचे ढीग, झोपलेल्या केळीच्या बाग, चाळीतून वाहून जाणार कांदा, खुरटं कपाशीचे पीक, खूप मोठी यादी आहे. रकमेला आलेले पीक हातातून गेल्यावर काय करावं ? दिवाळी कशी साजरी करावी? वर्ष कसं काढावं? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यानं समोर उभे रहातात. या वर्षी हा प्रश्न एखाद्या तालुक्या, जिल्ह्यापुरता मर्यादित राहील नाही तर कोल्हापूर पासून चंद्रपूर पर्यंत व नासिक पासून लातूर पर्यंत हीच परिस्थिती आहे.
शेतात पेरलेले खरिपाची पीक घरात येण्याच्या सुमारास दिवाळी येते. पिकलेला कापूस, सोयाबीन, बाजरी, विकून शेतकरी दिवाळी साजरी करत असतो. नवे कपडे घेतो. गोड धोड करून खत असे. पूर्वी दिवाळीची सुरूवात दसऱ्या पासूनच होत असे. तेव्हा पासूनच फटाक्यांचे बार ऐकू येत. आज धनत्रयोदशी आहे पण खेड्यात कुठे फटकडे फुटल्याचे आवाज आले नाहीत. नवे कपडे घेण्याचे अनेक वर्षांपासून बंद झाले आहे. लेकरांच्या हट्टापायी गोड धोड करावे लागते नाहीतर ते सुद्धा होणे मुश्किल झाले आहे.
हजारो वर्षांपासून दिवाळी साजरी होती म्हणजे हा शेतकर्यांचाच सण. कारण तेव्हा शेतकरी व बलुतेदार हीच प्रजा होती. तेव्हा काही कारखानदारी व आय टी सेकटर किंवा इतर क्षेत्र विकसित झालेले नव्हते. सर्व सण शेतीच्या उत्पन्नाशी जोडलेले आहेत.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. शेतकऱ्याच्या भाषेत गायी गुरांची बारस. चांगला पाऊस, भरपूर चारा झाल्या नंतर ताज्या तवाण्या, दुभत्या गायीचे व वासरांचे कोड कौतुक करण्याचा हा दिवस. लेकरा बाळांना दूध दुभतं पुरवले म्हणून ऋण निर्देश करण्याची ही परंपरा. या वर्षी मात्र आमच्या गायी गुरांना लम्पी रोगाने ग्रासले. जवळ होतं नव्हतं ते उपचारावरच खर्च करावे लागले.
दुसरा दिवस धनत्रयोदशी. या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकलश घेऊन बाहेर निघाली अशी आख्यायिका आहे. म्हणून तिची पूजा. शेतकऱ्याने सहा महिने शेतात मंथन करून तयार केलेले पीक घरी येण्याचे हे दिवस, तीच आमची धनवन्तरी पण या वर्षी अतिवृष्टीने सगळंच वाहून नेलं. कशाची पूजा करावी? धनवंतरी "अमृत" कलश घेऊन आली पण या वर्षी शेतकरी विषाची बाटली जवळ करत आहे. झालेले नुकसान न पहावल्यामुळे अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. हे एक विदारक सत्य आहे.
नरकचतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आगोदर स्नान आटोपून, उटणे लावून अंघोळ करायची असते. नरकासुराचा वधाचा हा दिवस. पण शेतकऱ्यांसाठी, शेतातील माल, अंग खांद्यावर वाहून घरी आणताना साचलेला मळ धुवून टाकण्याचा हा दिवास. बहुतेक शेतकरी तर रोजच सूर्योदयाच्या अगोदर उठतात पण या वर्षी अंगाला उटणे लागणे संभव नाही झाले.
लक्षमीपूजन हा दिवळ सणातील म्हत्वचा दिवस. लक्ष्मीची पूजा करणे. व्यापारी, उद्योजक, नोकरदार जवळ असलेल्या धनाची व हिशोबाच्या वहयांची पूजा करतात. शेतकऱ्यांकडे पूजा करण्यापूरती सुद्धा लक्षमी या वर्षी असेल असे नाही. कर्जाच्या वह्यांची व लक्ष्मी ( केरसुनी) पूजा तेव्हडी होईल.
दिवाळीतील पाचवा महत्वाचा दिवस बलिप्रतिपदा. वामन अवतारात भगवान विष्णूने, कपट करून बळीराजाला पाताळात गाडले. मग वर दिला की तुझ्या प्रजेला भेटण्यासाठी वर्षातून एक दिवस पृथ्वीवर येत जा! तो हा दिवस बलिप्रतिपदा!! शेतकरी या दिवशी आपल्या राजाची पूजा करतात व आशेने म्हणतात, "इडा पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे." हजारो वर्षे झाली शेतकऱ्यांची व माय माऊल्यांची ही प्रार्थना काही फळाला येत नाही. कधी येईल काही सांगता येत नाही.
दिवाळीचा शेवट भाऊबीजेने होतो. घरातील छोटी भावंडे, बहिणीच्या ओवाळणीच्या ताटात पाच, पन्नास, शंभर रुपये टाकून साजरी करतात पण लग्न होऊन सासरी गेलेली बहीण जर भाऊबीजेला माहेरी आली तर आनंद होतो पण चिंता ही वाढते. सणाला आलेल्या बहिणीची साडी चोळी देऊन बोळवण करावी लागेल. उधार पाधार का होईना एक छानशी साडी आणावी लागते. बहिणीला ही भावाची परिस्थितीची कल्पना असते. शहरात, नोकरदाराला दिलेली बहीण असेल तर गुपचूप भावाच्या हातात साडीपूरते पैसे ठेवते व साडी आणायला सांगते. सासरी आपल्या माहेरची अब्रू राखण्याचे भान तीला ठेवावे लागते.
दर वर्षीच शेतकऱ्यांची दिवाळी तानातानीतच जाते पण या वर्षीची दिवाळी मात्र खूपच कठीण आहे. सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे. एक दूरचित्र वाहिनीचा प्रतिनिधी, एका कुटुंबाशी संवाद साधताना पाच सहा वर्षाच्या चिमुरड्याला विचारतो नवे कपडे घेतले का? तो नाही म्हणतो. तू मागितले नाही का? असे विचारल्यावर, नाही अशी नकारार्थक मान हलवतो. का नाही मागितले? असे विचारल्यावर त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव हृदय पिळवटून टाकणारे होते. खाली मान घालून तो मुलगा म्हणतो, पैसे नाहीत.
वडिलांच्या परिस्थितीची जाणीव या वयापासूनच शेतकऱ्यांच्या मुलांना ठेवावी लागते !! त्या सदग्रहस्ताने त्या मुलाला नवे कपडे घेऊन दिल्याचा ही व्हिडीओ पुन्हा आला आणि पुन्हा आतड्यांना पीळ पडला. रात्रंदिवस कष्ट करून ही वेळ का शेतकऱ्यांवर? एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या व्यवसायाचा मालक असून, अशी नैसर्गिक आपत्ती झेलण्याची क्षमता का येऊ नये शेतकऱ्यांमध्ये? वामन अवतारात बुद्धिजीवींनी श्रमजीवींवर वर्चस्व मिळवले. हा झाला मानवाच्या उत्क्रांतीचा भाग. पण आणखी किती पिढ्या असेच श्रमिकांच्या शोषण होत रहाणार?
शेतकरी वगळता इतर सर्व घटक आनंदात दिवाळी साजरी करतील. व्यापारी, उद्योजक मिळालेल्या नफ्यातून उत्सव साजरा करतील. नोकरदार आगाऊ पगार, बोनस घेऊन फटकड्यांचा धूर करतील. शेतकरी मात्र वाहून चालले सोयाबीन गोळा करण्याचा प्रयत्न करतोय, भिजलेला कापूस काळा पडू नये म्हणून वाळवायचा प्रयत्न करतोय, उपळलेल्या तुरीची धसकटे उपटून हरभऱ्यासाठी रान तयार करतोय, सडलेल्या कांद्याच्या ढिगातून चांगले कांदे निवडून दिवळी पुरते पैसे जमविण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांची दिवाळी हॅप्पी हॅप्पी झाली असेल पण आम्हा शेतकऱ्यांची या वर्षीची दिवाळी मात्र अन हॅप्पीच गेली आहे.
२३/१०/२०२२
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी.