माझी गझल निराळी : तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने...
माझी गझल निराळी या मराठी गझल कवितेत शेतकऱ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडूनही कवी गंगाधर मुटे अभय यांच्या तिसऱ्या आवृत्तीचे स्वागत करण्यासाठी मराठी गझल-काव्य रसिक उत्सुक आहेत. पहिली आवृत्ती सन् २०१३, दुसरी आवृत्ती २०१४ आणि सन् २०१७ मध्ये गडचिराेलीच्या अखिल भारतीय तिसऱ्या साहित्य संमेलनात तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन हाेत आहे. तीन-चार वर्षांतच तिसऱ्या संग्रहाचे प्रकाशन ही खरेतर मराठी काव्यजगतासाठी आनंद आणि समाधानाचीच बाब मानायला हवी. मराठीतील दिग्गज कवींची पाचशे काव्यसंग्रहाची एक आवृत्ती संपायला कवीला आपली हयात घालवावी लागते. एकूणच मराठी कवी आणि कवितेच्या उदासिनतेला टाळून, शेतकऱ्यांविषयी काव्यसृजनाचा कळवळा असलेल्या, कवी गंगाधर मुटे यांच्या गझलसंग्रहाच्या लाेकप्रियतेचं मूळ कारण त्यांच्या गझलनिर्मितीच्या अनुभूतिनिष्ठ दमदार आशयमूल्यांच्या मूळांशी दडलेले आहे.
शेतकऱ्यांच्या दुःखाविषयी समाजाला आस्था आणि सहानुभूती आहे. कवीच्या सृजनशीलतेवरही रसिकांचा विश्वास आहे. कवीची अस्सलता आणि अंतःकरणातील सृजनाच्या प्रेरणा प्रामाणिक असल्याचेच ते द्याेतकही आहे. कवीच्या वाट्याला जी रसिक मान्यता मिळाली आहे, त्यातून शेतकऱ्यांच्या भाेगवट्याविषयी, दुःखाविषयी केवळ कळवळा नाही; तर खाेलवरची दुःख जाणीव समाजाला व्हावी, शेतकऱ्यांच्या दुःखाचे पडसाद नतद्रष्ट शाेषण व्यवस्थेत उमटावे, शेतकऱ्यांच्या जीवनात सुरू असलेले मृत्यूचे तांडव थांबावे, शेतकऱ्यांचे कल्याणकारी बळीराज्य यावे, स्वाभिमानाने शेतकऱ्यांना जगता यावे; एकूणच कृषिवलांच्या कृषिक्षेत्रांत क्रांती व्हावी; हीच कवीचीही रसिकांकडून-सांस्कृतिक जगताकडून अपेक्षा आहे.
कवी गंगाधर मुटे अभय या टाेपणनावाने रसिकांच्या राज्यात निर्भयपणे वावरताे. ताे खुद्द शेतकरी आहे. बी. एस्सी. (गणित) पदवी घेतल्यावरही त्याने शेतीत राबून, शेतकऱ्याचे दुःख अनुभवता यावे म्हणून, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एका लहानशा खेडेगावात-आर्वी (छाेटी) या राहत्या गावी मुक्त कृषी पत्रकारिता-काव्यलेखन करीतच; शेतीविषयक संशाेधन, बिजाेत्पादन आणि विपणण आदी कालाेचित नवे नवे प्रयाेग शेतीत करीत-करीत, शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाचे व्रत हाती घेतले आहे. शेतकरी संघटनेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून ताे अनेक वर्षांपासून आजतागायत शेतकऱ्यांच्या क्षीण आवाजाला आंदाेलनाची-साहित्य संस्कृतीची कृषिभाषा प्रदान करून, त्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात माैलिक आणि विधायक कामगिरी बजाऊन, भरीव असे कृतिशील संघर्षरूप याेगदान दिलेले आहे.+
गंगाधरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक याेगदानाला तीन भक्कम आयाम प्राप्त झाल्याचे दिसते. एक, ताे शेतकरी संघटनेत प्रारंभापासून कृतिशील आंंदाेलनात सहभागी झाल्यामुळे, शेतकऱ्यांच्या कृतिशील आंदाेलनाच्या एका थाेर परंपरेचा ताे पाईक आहे. दाेन, शेतीच्या सृजन साेहळ्यात सामील हाेतानाच, ताे काव्य-गझल-ललित लेखनादीच्याही सृजनाशी तादात्म्य पावत गेला आहे. अस्सल सृष्टीचा तारणहारा-पालनहारा-कृपावंत-मायबाप असलेल्या सृष्टीच्या हिरव्या मळ्यात रमलेला आणि जीवन कृतार्थ करून घेणाऱ्या सृजन साेहळ्याचाही ताे कर्ता आणि कार्यकर्ता कवी आहे. तीन, शेतकरी साहित्याची स्वतंत्र ज्ञानशाखा विकसित करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात कळवळ्याने शेतकरी साहित्याची चळवळ रुजवून, खुद्द शेतकरी साहित्याचे सृजन करून; शेतकरी साहित्य चळवळीला तात्त्विक आणि कृतिशीलतेचा सृजनशील मजबूत पाया उपलब्ध करून दिला आहे. खरेतर ताे शेतकरी साहित्याची उपासना, भक्ती करून, वारकऱ्यांसारखीच भूमीदेवाची शेती करून, जगाचे पालनपाेषण करण्यासाठी किमान कृषिवलांच्या जगाने तरी सजग, कृतिशील-संघर्षशील राहावे, हा निर्वाणीचा संदेश जगाला देण्यासाठीच, त्याने अखिल भारतीय स्तरावर शेतकरी साहित्य संमेलनाचे भव्य-दिव्य आयाेजन करून, आजवर एकूण दाेन आणि आता सन् २०१७ मध्ये गडचिराेलीला तिसरे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयाेजनही केले आहे.
गंगाधरचा उत्साह, हुरूप, जिद्द, चिकाटी, चिवटपणा अस्सल शेतीत राबराब राबणाऱ्या जातिवंत-कुलवंत हाडाच्या शेतकऱ्यांनाही लाजवणारा आहे. याचसाठी केला हाेता अट्टाहास, शेवटचा दिस गाेड व्हावा... शेतकऱ्यांचे संत असलेल्या संत तुकाेबांच्या अभंगातील आशयाला कृतिशीलतेचे परिमाण देण्यासाठी, सतत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, अत्यंत निग्रहाने सामाजिक संघर्षाची भूमिका घेऊन, सांस्कृतिक क्षेत्रांत, शेतकरी साहित्याला शेतकऱ्यांच्या जीवन जाणिवांचा साक्षात्कारी स्पर्श देणारा, हा खरेतर अस्सल शेतकरी कुळाचाच कुलवंत काव्याविष्कार आहे. आजपर्यंत गंगाधरचे रानमेवा (२०१०), नागपूरी तडका (२०१३), माझी गझल निराळी (२०१३) असे तीन काव्यसंग्रह आणि वांगे अमर रहे (२०१२) याच नावाचा एक ललित लेखसंग्रह, अशी ही ग्रंथसंपदा त्याच्या शेतिनिष्ठ जीवन जाणिवांच्या अस्सल अभिव्यक्तीशी इमान राखण्याचेच उदाहरण आहे. मुक्त पत्रकारिता-सदर लेखन-वांगे अमर रहे! सारखे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनदायीनी हिरव्या शैलीच्या सृजनाचाच लळा असलेला हा शेतकरी-कवी-लेखक-पत्रकार-कार्यकर्ता वाङ्मयशेती सुजलाम-सुफलाम करणाराही आहे.
गंगाधर शेतकरी-लेखककवी-कार्यकर्ता असूनही उच्चविद्याविभूषित आहे. नाेकरी न करता शेती आणि शेतकऱ्यांच्या दुःखांवर मलमपट्टी करून, शेतकऱ्यांना दुःखमुक्त करण्याचा विडा त्यानं स्वीकारलेला आहे. ताे शेतकऱ्यांच्या आवाजाला जागतिक स्तरावर जगाला जाणवून देण्यासाठीही नेट-कनेक्ट टेक्नाेसॅव्ही आहे. साेशल मिडियात फेसबुकवर आणि आंतरजालातही शरद जाेशी, बळीराजा, गंगाधर मुटे, ब्लागपाेस्ट-संकेतस्थळांची निर्मिती करून ई-लेखनातूनही बळीराजाच्याच दुःखांना वाचा फोडणारे लेखन करून, जगातच शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचेही महत्कार्य इमानेइतबारे ताे करीत आहे. विविध वाहिन्यांनीही ब्लाॅग माझा या जागतिक पातळीवरील स्पर्धेत सन् २०१० आणि २०१२ मध्ये सलग दाेनदा पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. आजवर गंगाधरच्या कृतिशील लेखनाला-उपक्रमशीलतेला मान्यवर संस्था-वाहिन्यांनी-प्रकाशकांनी पुरस्कृत करूनही सन्मानीत केले आहे. आजच्या घडीला तरी गंगाधर मुटे हा शेतकरी साहित्य चळवळीचा आणि शेतकरी साहित्याची अनुभवनिष्ठ वाङ्मयशेती करणारा सांस्कृतिक आकाशातील स्वयंप्रकाशित तारा आहे. शेतकरी साहित्य या नवज्ञानशाखेचाही ताेच एकमेव जनकही आहे.
मराठी अभिजात अभिजन साहित्य आणि ग्रामीण साहित्यातून आजवर शेतकरी जीवनाचे जे काही चित्रण करण्यात आले; ते असत्य, आभासी वास्तव निर्माण करणारे, विनाेदी स्वरूपाचे असून, शहरातून लेखक ग्रामीण जीवनाचे कपाेलकल्पित चित्रण करताे, याविषयीचे तीव्र असमाधानही कवीने-सूडाग्नीच्या वाटेवर...या कवितेतून, माझी गझल ऐकण्यास गर्दी लाेटली हाेती, काही जागीच नव्हती, बाकी झाेपली हाेती...डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली हाेती...विराेधक प्रसन्न नव्हते, सत्ता काेपली हाेती...सलवार विझली नव्हती, पगडी पेटली हाेती...संधी दवडली नव्हती, अभये वेचली हाेती... या जातीचे परम व्यंग करीत-आजच्या वर्तमान साहित्य, भाषा, संस्कृतीचे सृजन-वास्तव कवीने औपराेधिक शैलीची रचना करून नेमकेपणाने व्यक्त केले आहे.
माझी गझल निराळी, असं म्हणतानाच कवीने आपली भूमिका गझलरचनेतूनच सांस्कृतिक जगासमाेर स्पष्ट केली आहे.
घामाची कत्तल जेथे, हाेते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी...
शब्दांची गुळणी नाेहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गाताे शेर भुपाळी...
युगानुयुगे ते बाेलले, ऐकत आलाे आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी...
गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकऱ्यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी...
पाेशिंद्याच्या रक्षणाचा अभय घेताे मक्ता
ओतप्राेत भरताे आहे शेरास्त्रांनी हाळी...
आधुनिक कवी केशवसुतांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड-विद्राेह म्हणून सर्वहारांच्या कल्याणाची जाग समाजाला यावी म्हणून, त्यांच्या नव्या शिपायाने तुतारी फुंकून शाेषक समाजाला हादरे दिले. ग्लाेबल व्हिलेजच्या काळात देशात सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सृष्टीचा तारणहाराच जेव्हा मृत्युपंथाचा गळास लावून दुःखमुक्तीचा अघाेरी मार्ग स्वीकारण्यास बाध्य हाेताे, तेव्हा समाजही मृत्यूच्या चक्रव्यूहात शेवटचेच आचके देऊ लागल्याची, सृष्टीच्या महाविनाशाची ती गंभीर चाहूल असते. गंगाधरने ती तीव्रपणे अनुभवून, वर्तमान जगालाही त्याची जाणीव करून दिली आहे.
घामाची कत्तल करणाऱ्या व्यवस्थेच्या विरुद्ध बंडखाेरी करीत, त्याने घामाचे निर्माल्य मानणाऱ्या व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी गझलरूपी तुतारी फुंकली आहे. शब्दांची गुळणी करणाऱ्या सांस्कृतिक विश्वाचाही त्याने धिक्कार केला आहे. लढवैय्या आशयाची निर्मिती करून, युगानुयुगे शेतकऱ्यांच्या दुःखांना साहित्यातूनही आभासी वास्तवाच्या हुलकावण्या देणाऱ्या लेखकांच्या सांस्कृतिक विश्वाविरुद्धही ताे सजग झालेला आहे. आता तुम्ही लिहू नका तर आम्हीच साक्षात आमचं दुःख आमच्या भाषेत मांडू, असा गगनभेदी हादराही त्याने सांस्कृतिक विश्वाला दिला आहे. आता शेतकऱ्यांचाच मतला ऐकण्याची वेळ असल्याचीही जाणीव करून दिली आहे.
अर्थातच गझल काव्यातून शेतिनिष्ठ जीवन जाणिवांची संपृक्त अभिव्यक्ती करणाऱ्या प्रतिमासृष्टीनेही कवी अभयची कविता संपृक्त आणि समृद्ध झालेली आहे. गझलवृत्ताला पाेषक आशय, भाषा, शैली अशा त्रिगुणात्मक रचना माध्यमातून कवी गंगाधरने बंड आणि विद्राेहाची संयत रचना गझलेसारख्या तरल काव्यवृत्तातून केल्याचेही दिसते. कवीच्या कवितेचा स्वभाव बंडखाेरी-विद्राेहीरूपात व्यक्त हाेण्याचा नाही. तर कमालीची उदासिनता, थंडपणा कवीला अस्वस्थ, अंतर्मुख करताे. शेतकऱ्यांच्या-वारकऱ्यांच्या एकेश्वरी विठ्ठलाच्या आत्मीय कळवळ्यापाेटी-चीडसंतापजनक परिस्थिविषयीची मवाळ जाणीव हाेताच-कवी दुर्धर आजारग्रस्त समाजाच्या शरिराचे कठाेर भाषाशस्त्राने सर्जन करताे. विठ्ठलाने अठ्ठावीस युगे आपल्या कास्तकारांच्या उजाड भक्तिमळ्यातले दुःख; सुंदर ते ध्यान, उभे वीटेवरी कर कटावरी ठेवून उघड्या डाेळ्यांनी पाहिले. परंतु वीटेवरून इंचभरही ताे हा विठ्ठल बरवा, ताे हा माधव बरवा, दिनांचा नाथ विठ्ठल हटला नाही. कृष्णासारखे पापयुगाचा संहार करण्यासाठीही त्याने हातातील महाखड्ग साेडल्याचं उदाहरण नाही. विठ्ठलानेही भक्तांच्या डाेळ्यातील अश्रू पुसण्यासाठी नकारच दिल्यामुळे, दगडामातीत देव नसताे तर ताे रंजल्यागांजल्यांत-त्यांच्या सेवेकऱ्यांतच विराजमान असताे, ही संत तुकाेबांची मानुष-परिभाषा मात्र कवीने आपल्या काव्यसृजनातून सार्थ ठरवली आहे. अर्थातच समाजाला आजारग्रस्त मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी, त्याला यशस्वी सर्जनाची सर्जक भूमिका बजावावी लागली. ताे त्यात तसूभरही हयगय करताना दिसत नाही...
माझी गझल निराळी...पहिल्या आवृत्तीत (२०१३) भूमिकेसह ७४ गझलांचा संग्रह आहे. दुसऱ्या आवृत्तीत (२०१४) भूमिका नाही तर एकूण ७६ गझला आहेत. पहिल्या आणि दुसऱ्याही आवृत्तीला गझलनवाज गायनसम्राट रा. भीमराव पांचाळे यांची जबरदस्त पाठराखण आहे. गजल लेखन ही कुणा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही. या विधानाला पुष्टी देणाऱ्या नावांमधील एक नाव आहे-गंगाधर मुटे... हा सार्थ अभिप्राय आहे. दुसरे गझलगंधर्व-गझलगायक कवी सुधाकर कदम यांची, कविते तुझ्या लयीने... ही कवीच्या मर्मस्थलांची आस्वादक चिकित्सा करणारी प्रस्तावनाही अर्थपूर्ण आहे. आनंदऋतू ई-मॅगझीनचे संपादक रा. किमंतु ओंबळे यांचाही, परिघाबाहेरची गझल... हा सार्थ अभिप्राय आहे. सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर तसेच अरुणाचल प्रदेशात वास्तव्यास असलेले स्वामी निश्चलानंद, मुंबईचे प्रमाेद देव यांचाही सराहना करणारा अभिप्राय आहे. दुसऱ्या आवृत्तीत तर आंतरराष्ट्रीय किर्तीचे काेवळी पानगळकार समाजसेवी डाॅ. अभय बंग, आनंदवन वराेराचे समाजसेवी डाॅ. विकास आमटे, भारतीताई आमटे, लाेकसाहित्याचे अभ्यासक डाॅ. मधुकर वाकाेडे, हैदराबादचे बँक अधिकारी रा. प्रमाेद गुळवेलकर, अंबाजाेगाईचे रा. राज पठाण, पुण्याच्या महांगुळेचे रा. श्याम पवार, अकाेल्याचे तुळशीराम बाेबडे, लातूरचे रा. विजय शंकरराव चव्हाण अशा सर्वच क्षेत्रांतील जाणकारांच्या गझलचे निराळेपण अधाेरेखित करणारे अर्थघन अभिप्रायही आहेत. तिसऱ्या आवृत्तीत (२०१७) पुन्हा भूमिका व्यक्त करणारी आणि लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!, मढे माेजण्याला, वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये, पाहून घे महात्म्या, एक केवळ बाप ताे, वैश्विक खाज नाही, नाटक वाटू नये, खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल, कळली तर कळवा अशा काही नवजाणिवांच्या नवीन गझलांचाही समावेश कवीने केलेला आहे.
शेतीमातीत रुजलेल्या-उगवलेल्या क्षेत्रीय भाषिक रूपांचा उपयाेग करून, कृषिनिष्ठ कृषिवलांच्या साक्षात भाषाभिव्यक्तीच्या माध्यमाने कवीने गझल काव्याचे शेतमळे फुलवले आहेत. अर्थातच कवीच्या आशयाची जातकुळी संत तुकाेबांच्या, मढे झाकुनि करिती पेरणी, कुणबियांचे वाणी लवलाहे...याच भूमीच्या कुशीत असलेल्या सृजनतळांत-जळांतच, कवी गंगाधर-अभयच्याही, कुणब्यांच्या जातिवंत दुःखांची यातना-कमळे उगवली आहेत. आपुलिया पाेटासाठी करी लाेकांचिया गाेष्टी, तुका म्हणे शिंदळीच्या व्यर्थ क्षमवीली वाचा... हा कवी-अहंभाव गंगाधरच्या कवितेतून पुसटसाही जाणवत नाही. उलट, नका दंतकथा येथे सांगाे काेणी, काेरडे ते बाेल मानी काेण, येथे पाहिजे जातीचे, येरागबाळाचे काम नाेहे, ह्याच अस्सल कविरुढीच्या पायवाटेवरून कवी गंगाधरचा अभय काव्यप्रवास दिसून येताे. कवी गंगाधरच्या जवळपास सर्वच गझल-हजल शेतकऱ्यांच्या अस्सल कळवळ्यापाेटीच प्रतिभा सामर्थ्यांचे हादरे देत, अणुबाॅम्बसारख्या अणूरेणूया थाेकडा कवी आकाशाएवढा, अशा महाकारुणिक आशयाभिव्यक्तीचीच अनुभवांकित उदाहरणे आहेत. गझलची कारगिरी न करता, गझलवृत्ताचे प्रातिभ सामर्थ्य पूर्ण अभयांकित ऊर्जेचा वापर करूनच कवीची कविता, शेतकऱ्यांच्या दुःखमुक्तीचे ऊर्जास्त्राेत बनते. शब्दास्त्रांच्या तुफान माऱ्याने समाजालाही आणि शेतकऱ्यांना मृत्युपंथी नेणाऱ्या व्यवस्थेच्या भूगर्भात खाेलवर हादरे देणारी आहे. व्यवस्थेच्या समूळ विनाशाची जबरदस्त ऊर्जा तिच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीत आहे.
पहिल्याच अस्थी कृषीवलांच्या या गझलेत कृषिवलांच्या अस्थिपंजर अवस्थेसाठी जबाबदार असलेल्या त्यांच्या मुलाबाळांसह एकूणच पिळवणूक व्यवस्थेचा धिक्कार कवी प्रथमतः करताे. सृष्टीचे पालनकर्ते कर्तव्याचा पाया रचून जातात. व्यवस्थेत दुःखी, कष्टी, चिंतातूर जगण्याचेच दिवस कृषिवलांच्या आयुष्यात उगवतात. माजून तर्र काही दिसतात कर्मचारी, प्रत्येक कागदाला पैशात घाेळणारे... लालिफितशाहीच्या चक्रव्यूहात कृषिवलांच्या अस्थीही उरत नाहीत. खेड्यातून शहरात सत्तास्थानी पाेहाेचून मायबापांच्या टाळूवरील लाेणी खाणारी पांढऱ्या गेंड्यांची जमात, कृषिवलांच्या आयुष्याला उधळी लावते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घमासान चर्चायुद्ध संसदेत चालते. हाेते तसेच आहे नुसते बाेलणारे...कवी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न लाेक-संसदेत मांडताे, अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला, करतात आत्महत्या का देश पाेसणारे? कवीच्या ह्या प्रश्नाचे उत्तर त्याला आजपर्यंतही संसदेने दिलेले नाही. देणारही नाही. प्रश्न चर्चेत मुरवण्याचे-जिरवण्याचे-भिजत घाेंगडे कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखेच कितीही आरडाओरडा केला तरी डब्ल्यू. टी. च (वाकडे ताेंड) राहणार. सरळ हाेणारच नाही. कुणालाच सृष्टीच्या पालनहाऱ्याची चिंता नाही. जन्मनारे मायबाप हळूहळू नामशेष झाले की पृथ्वीचा प्रलय व्हायलाही वेळ लागणार नाही. शेतकरी जगला तर जग जगेल. शेतकरी मेला तर जगही जिवंत उरणार नाही. एवढं साधं सरळ तत्त्व का कळत नाही जगाला? कवीलाही हेच काेेडे कमालीचे अस्वस्थ करणारे आहे.
कवीनं सबंध गझल संग्रहातल्या कवितेत केवळ शेतकऱ्यांच्या दुरावस्थेचे, दुःखाचेच खाेलवर हादरे दिले आहेत. गझल रचनेला पाेषक असलेल्या प्रेम, भावनांची बंदिशी आदींवर कवीने मुद्दामहून भाष्य टाळले आहे. ह्याचा अर्थ कवी भावनाशील-संवेदनशील नाही, असे नाहीच. कवी कमालीचा संवदेनशील आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मढ्यांचाही भ्रष्टाचार-राजकारण करणाऱ्या व्यवस्थेविषयी मात्र ताे पराकाेटीचा असंवेदनशील आहे. ही असंवेदनशीलता विखार पेरणाऱ्या त्याच्या कवितेतील जहाल भाषिक रूपांवरून प्रगटत गेली आहे. गझलसारख्या तरल भावनिक संवेदनशील हादऱ्यांतून खरी गझलची मर्मस्पर्शी, उत्तुंग अशी संवेदनशील ऊर्जा जाणवते. तितकीच उत्तुंगता-तरलता-भावनेलाच आवाहन देण्याची क्षमता कवीच्या गावखेड्यांच्या गावठी भाषेतून, कवीच्या गझलेतही आपसूकच आली आहे. हे असंवेदनशील वाटणारे हादरे अक्षरशः ज्वालामुखीसारखे भ्रष्ट व्यवस्थेला भस्मसात करण्यासाठीच आतूर असल्याचेही जाणवते. हेही कवी अभयच्या गझलेचे निराळेपण विशेषत्वाने मराठी गझलेच्या इतिहासात गझलेलाच निराळे, स्वतंत्र आयाम देणारे आहे. व्यवस्थेलाच भस्मसात करण्याची शब्दऊर्जा, दुःखाच्या-मृत्यूच्या जीवघेण्या विनाशाच्या चक्रव्यूहातून, अनुभूतीच्या अवकाशातून, कवीच्या प्रातिभ लीळेत शिरलेली आहे. कवीचे गझल-दुःख स्वतः कवीने भाेगलेले, अनुभवलेले असल्यामुळे अनुभवाचेच काफ़िये, रदीफ, मतला, यमके, शेर सर्वकाही तिळातिळाने अंतःकरण तुटणाऱ्या कवीने, केवळ अनुभूतीचे निके फटकेच व्यवस्थेला हाणले आहेत. ह्या फटक्यांची जातकुळी संत तुकाेबांच्या, ह्यांना न माेजताच हाणाव्या पैजारा याच पठडीतली आहे.
अमेठीची शेती-वाह्यात कायद्यांच्या लाेच्यात कास्तकारी, सर्वत्र सत्य एकच ताेट्यात कास्तकारी, पाेसून राजबिंडे आलू समान नेते, उत्पादकास नेते खड्ड्यात कास्तकारी, डाॅलर सुकाळ शेती बारामती-अमेठी, ती तांबड्या दिव्यांची अज्ञात कास्तकारी... मरणे कठीण झाले-जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले, पंचाग गावराणी पिकणे कठीण झाले, मातीत ओल नाही तगणे कठीण झाले, आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले... अन्नधान्य स्वस्त झाले-अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे, कागदावर आकडे अन माल सारा फस्त आहे, झाेपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे... ना झाकते कधी ती, वस्त्रात अंग सारे, मिळणार भाव कैसा, शेतीत कापसाला?...भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला, उद्ध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला...पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर, पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर... गाेचिडांची माैजमस्ती पण, अता ती गाय जगणार कशी? ... मारली मी मिठी त्या क्षणी वाटले, शेरनीच्याच जबड्यात गेला ससा... ही असहनीय स्थिती कवीला लिहिते करते.
गझल-हजल मधून कवीने हे तिसरे महायुद्ध काव्यास्त्रे परजून, शाेषण-व्यवस्थेच्या विराेधात बंडाळी करून पुकारले आहे. कवीची सबंध संग्रहातील विद्राेही-बंडखाेरीची भाषा अस्सल प्रतिभावंताच्या गर्भातून निपजल्यामुळे, तिच्यात महादेवाच्या शाब्दिक अणुऊर्जेचे जगाला वठवणीवर आणण्याचे प्रातिभ सामर्थ्यही ओतप्राेत काठाेकाठ शिगाेशीग तुडुंब ठसठसून ठासून भरलेले आहे. कवीचे इशारे वेळीच समजून, शाेषक भांडवली समाजाने सुधरण्याचीही संधी उपलब्ध करून देताना, कवी म्हणताे, निष्कारण वार केलास तू म्हणून फणा उचलला, पण; जा तुला मी अभय देताे, तू आता मागे हटल्यावर... कवीची जातकुळीच मुळात कुणब्याच्या वाणाची पिळदार, अभयदार, उदार असल्यामुळे ताे, सृष्टीच्या पालनहाऱ्याचीच कर्तव्य भावना मनात बाळगून, क्षमाशील वृत्तीचा पाेशिंदा आहे. जगातल्या सुष्टादुष्टांच्या पालनपाेषणाची समत्वभावाने जाेपासना करणाऱ्यांच्या भूतदयेचाही ताे वारसदार आहे. सदैव अमृततुल्य मातृपान्हा अखंडपणे कृषिवलांच्या अंतःकरणाच्या तळाशी समभावानेच पाझरत असताे. ताेच वारसा कवी गंगाधरनेही अभय या टाेपणनावाची जाणीवपूर्वक मांडणी करून, अभय ही निर्भयाचे प्रतीक असलेली नाममुद्रा वापरूनच, जगाला अभयदान देण्यासाठीच स्वीकारलेली आहे. चुकलेल्या बाळांना, वैष्णव जन ताे तेने कहिये जाे पीर पराई जाने रे... याच न्यायिक कारुण्यभावाने आपल्या कवितेतून, तुका म्हणे या नाममुद्रेसारखीच सख्यभावाने कवितेत वापरून, शेतकरी जगतासह सबंध जगात अभयपर्व प्रस्थापित करण्यासाठी, जगाच्या नतद्रष्ट मनाेभूमीत रुजवली आहे...
घमासान आधी महायुद्ध हाेते, पुढे माणसांचे यशू-बुद्ध हाेते... रक्त आटते जनतेचे देश सुंदर घडवायला, एकटा रावण पुरेसा राज्य धुळीत मिळवायला... जाणवू ना दिल्या वेदना ना कळा, कापला रेशमाच्या सुताने गळा... आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे?... अस्मानी-सुलतानी निदर्य व्यवस्था सृष्टीच्या विनाशाचे मनसूबे रचून, सृष्टीची रचना करणाऱ्या बळीदेवाचा बळीच घेत आहे. कवीने अस्मानी-सुलतानी व्यवस्थेच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याची आकाशभेदी गर्जना कवीने गझलेतून केलेली आहे. शब्दास्त्रांचे अग्निलाेळ शाेषणव्यवस्थेच्या सैनिकदलावर हळूच साेडलेले आहेत. शेतकऱ्यांना तर पत्ताही लागू न देता, रेशमाच्या सुताने त्यांचा गळा कापला जाताे. हे अधाेरेखित करताना, शेवटचे आचके देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मरणासन्न देहात प्राणांची फुंकर कवीने घातली आहे. शाेषण व्यवस्थेचा कायमचा बंदाेबस्त करण्यासाठी, जगात सृष्टीच्या निर्मात्यांचे जगणे, हेच आपलेही उद्याचे जगणे असल्याचे पटवून दिले आहे. एक माेठी परम पराक्रमी शूरवीरांची युद्ध छावणीच कवितेचे ब्रह्मास्त्र वापरून कवीने जगात उभी करण्यासाठी, कवितासृजनाचे सृजनशील-सर्जनशील माध्यम वापरले आहे.
लाेंढेच घाेषणांचे दिल्लीवरून आले, येणार वित्त आहे बत्तीस तारखेला... ही बत्तीस तारीख कधीच शेतकऱ्यांच्या जीवनात येणार नाही. कल्याणकारी आश्वासनांची खैरात करणारा लबाडपंथी पॅकेज-दिवस जगातच कधीही उजाडलाच नाही. जगातल्या पांढऱ्या गेंड्यांचा हा सतत गाभण असलेला असृजनशील हेला आहे. पटू संसदेचा, तरी दांडगाई, म्हणू का नये रे तुला रानहेला? कवीच्या भाषेत हा पांढऱ्या कातडीचा खुशालचेंडू गुबगुबीत संसदेतील संसदपटू रानहेला आहे. कवी विठ्ठल वाघांच्या कवितेतील, दिल्लीच्या कुरणात कायम गाभण असलेली असृजनशील म्हैस आहे. भांडवली-सत्ताधारी शाेषण तंत्राचा खरेतर हाच गुप्त-सुप्त रानवट मुखवट्याच्या आड दडलेला जगातील सर्वहारांच्या मृत्युपंथी अंधकार युगाच्या आगमनाचा येऊ घातलेला अजेंडा आहे. जगाच्याच इतिहासात कधीही बत्तीस तारीख उजाडत नाही, तसेच आश्वासनांची पूर्ती झाली, शेतकऱ्यांच्या गळ्यातून मृत्यूास आनंदाने काढून फेकल्याचाही दिवस कधीही उजाडणार नाही! हेच ग्लाेबल जगाचे भयावह जीवघेणे वास्तव आहे. सृष्टी निर्मात्याच्या ललाटी काेरलेल्या दिवाळखाेरीच्या ह्या रेघा कधीही पुसल्या जाणार नसल्याचेच मृत्युमय-सत्य कवीने जगाला बत्तीस तारखेच्या कवितेच्या निर्मितीतून सांगितले आहे. बत्तीस तारखेच्या महाविनाशाच्या संसूचक कल्पकतेत काव्यगत विश्वसत्य मांडणारा कवी अभय, बहुदा मराठी कवितेच्या इतिहासातील तरी पहिलाच कवी असावा. साेकावलेल्या अंधाराला इशारा देताना कवी म्हणताे, आता थाेडे बाेलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे; हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे... जगाच्या बरळण्याला दहशत निर्माण करण्याची गगनभेदी आकाशवाणीच जणू कवीने केली आहे.
गझलेमुळे कवीचे जगणे सुरात आले... संतांचे अभंग, कबिराचे दाेहे, ज्ञानेशांच्या ओव्या सर्वहारांच्या कल्याणासाठी, सृष्टीतील चराचरांत वास्तव्य करणाऱ्या जीवजंतूंचे जगणे सुकर करण्यासाठीच संतमहात्म्यांनी रचून, जगाच्या कल्याणाचे पसायदान मागण्यासाठीच निर्माण केल्याचेही स्मरण कवीला आहे. आताच्या कवितेत-मग अभंग, दाेहे, ओवी, गझल, छंद-वृत्ते आदींमधून जी कविता प्रसवली गेली, तिने मात्र दुःखितांचे अश्रू पुसण्याचे महत्कार्य केलेले नाही. आजच्या कवितेवर टीपणी करताना कवी म्हणताे, वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले, कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले... जगण्याचे हे लयीचे सूर केवळ वर्तमानातल्या कवींनाच सापडले. कवी आजच्या काव्यजगताचा उपहास करताना म्हणताे, कसला अभय कवी तू? रचलेस हे मनाेरे, जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!... हेच आजच्या काव्यजगताचे खाेलवरचे कलहशील सृजन-वास्तव आहे. कवी मात्र या आभासी जगतातील काव्यवास्तवापासून सुरक्षित अंतरावर उभा राहून, आपल्या प्रातिभ-निर्मितीकडे एकमेव शेतकऱ्यांच्या स्वाभिमानानं जगण्यासाठीचा अजेंडा समाेर ठेवूनच बघताे आहे. नव्या यमाची नवीन भाषा त्याला कळलेली आहे.
मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रुजणाऱ्या, नव्या बियांची नवीन भाषा
पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबाेलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा
अता मुखातून शाेषितांच्या, ज्वलंत हुंकार बाेलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा
कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागताे देह चिंधड्यांनी
यमास थाेडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा
श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विराेध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा...
कवीला यम ह्या अनादिअनंत काळापासून जगात मृत्यूचा फास आवळणाऱ्या यम ह्या पाैराणिक मृत्यू कल्पनेसह वर्तमानातल्या ग्लाेबल यमांची नवीन भाषा, नवीन शैली, नवीन मनसूबे पुरेपूर कळलेले आहेत. शाेषणाच्या चरखातून चिपाडासारखे अस्थिपंजर मानवी देहाचे फोलपट काढणाऱ्या, मृत्युशेष आत्महत्येचा मृत्युास आवळणाऱ्या, नव्या जगातील नव्या यमांची जीवघेणी भाषा, ग्लाेबल मृत्यूचे विकसित ग्लाेबल तंत्रज्ञान मूळांपासूनच कळलेले आहे...
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे, झाेपले असेल शेत जागवायला हवे... पेरले अभय अनेक बीज जाणताेस तू, हे प्रभाे! निदान एक तरी अंकुरायला हवे... काेणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे, नाटकी बाेलतात साले, की गरीबी हटली पाहिजे... देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की, क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे... कवीचे हे कळवळ्याचे खाेलवर विद्ध करणारे काव्यार्त त्याने नव्या जगाला कवितेतूनच सांगितलेले आहे. ते केवळ काव्यास्वादासाठी-काव्यानंदासाठी नाही; तर ग्लाेबल काळात बाेकाळलेल्या भांडवली विकृतीने नाखाेरीची लालसा भागवण्यासाठी सृष्टीच्या तारणहाऱ्यालाच मृत्युपंथी नेण्याचे मनसूबे वेळीच समाजाच्या लक्षात आणून देण्यासाठी आहेत. विश्व कल्याणाच्या कळवळ्याने तळमळून बाेलणाऱ्या महात्मा व्यवस्थेला, खाेलवरचे हादरे देऊन, आता तरी जागे व्हा! आता शेतकऱ्यांसाठी खाेदलेल्या कबरीत पाय घसरून तुम्हीच पडण्याची पायवाट पर्यायाने तुम्हीच अधिक माेकळी करीत आहात! हीच गंभीर सूचना कवीने अत्यंत गंभीरपणे नव्या जगाच्या, नव्या यमांच्या, नव्या भाषेतच जगाला ठामपणे करून दिली आहे.
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! या कवितेत कवी म्हणताे, अभ्यास चिंतनाला शास्त्रात घाेळवावे, कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने... अबाेलांच्या जीवांचे रक्षणास लढण्यासाठी, शेतीमातीचे मृत्युपंथी वास्तव चितारण्यासाठी तरी, भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जाऊन, अभिजात सृजनाच्या लेखणीने तरी सृष्टीकर्त्याच्या कल्याणाची साहित्यातून शब्दपूजा बांधावी. लटक्या-पुचाट शिरजाेर वाणीची गच्ची धरावी! चहूदिशांनी वादळ विराट रूप धारण करते, तेव्हाही लेखणीने दिवा तेवत ठेवण्यासाठी कवीला अभय द्यावे, अशी विनवणीही कवी प्रतिभावंतांना-कलावंतांना करताे. मढे माेजण्याला... शाेषकांची जमात नेहमी सज्ज असते. लपेटून फासामधी कायद्याला, ससे वाकुल्या दावती पारध्याला... हेच आजचे सृष्टीच्या पालनहाऱ्याचे मृत्युपंथी वास्तव आहे. करा की नका काम काेणी पुसेना, बिले चाेख ठेवा लुटा आंधळ्याला... हे वर्तमान शाेषक व्यवस्थेचे जीवघेणे वास्तव आहे. अस्मानी-सुलतानी संकटांनी अनादी काळापासून शेतकरीच सर्वप्रथम लुटला जाताे, कंगाल हाेताे, कर्जबाजारी हाेताे, दिवाळखाेर हाेताे. शेवटी मृत्यूचा गळास हाच त्याला दुःख-यातनामुक्तीचा अनिवार्य पर्याय स्वीकारावा लागताे.
कवी म्हणताे, इथे देवळाच्या चिखल भाेवताली, स्मशाने चकाचक अभय तालुक्याला... शहरात सुखाेपभाेगांचा लखलखाट तर तालुक्यातल्या आडगावातील स्मशानात शेतकऱ्यांच्या शवज्वाळा आकाशाला भिडलेल्या... वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये, गाभुळलेल्या शिवारास यंदा आग लावू नये... असा वरुणदेवालाही सक्तीचा आदेश देऊन, फटकारण्यास कवी मागेपुढे पाहत नाही. महात्म्याला उद्देशून कवी म्हणताे, पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने, केला भकास भारत, शाेषून इंडियाने... संपूर्ण सातबारा काेरा करू म्हणाले, भुललेत भाडखाऊ दिल्लीत पाेचल्याने... वृद्धाश्रमात आई गाेतावळ्यास झुरते, गायीस मात्र माता म्हणतात गाैरवाने... मुर्दाड शासकांना साेयरसुतक नाही, हकनाक तूच मरशील गळास घेतल्याने... हेच सत्तेचे आणि पांढऱ्या काॅलरच्या सत्ताधाऱ्यांचे-लालफितशाहीतील शाेषक अधिकाऱ्यांचे शाेषण-वास्तव, महात्मा ज्याेतीराव फुल्यांनी एकाेणिसाव्या शतकातच शेतकऱ्यांचा असूड मधून मांडल्याचेही आज स्मरण हाेते. शिक्षित-पांढरपेशा-सत्ताधारी अधिकारी वर्ग, खेडेगावातीलच कास्तकऱ्यांनी पाेटाला चिमटे देऊन मुलं शिक्षित करून शहरात सत्ता सांभाळण्यास पाठवला, ताेच बुर्ज्वा वर्ग-शेतकऱ्यांचीच मुलं-आपल्याच गावखेड्यातल्या मायबापांच्या मढ्यांवर स्वार्थ-भ्रष्टाचाराच्या पाेळ्या सेकून जगत आहेत... हे वास्तव आज जसेच्या तसेच वर्तमानाचे वास्तव म्हणून सर्वत्र शेतकऱ्यांच्या, गावखेड्यातील शिवारांच्या भूमीत शेतकऱ्यांचाच बळी घेत असल्याचे दिसत आहे... गावखेड्यातून शहरात सुखचैनीत स्थिरस्थावर झालेली नवीन पिढी, गाव साेडून गेली. गाव पांढरीच्या कुशीत आपल्या जन्मदात्यांना वेदना-दुःखाचे अखंड दान देऊन गेली. अनेक ग्रामीण कवींनी ह्या स्वार्थांधांवर कवितेतून काेरडे ओढले आहेत. परिणाम स्वरूप ग्रामीण कवी-लेखक माेठे झाले. गाव पांढरीची गढी केव्हाचीच भुईसपाट झाली. आता स्मशानातील राख सावडायलाही कवी-लेखक मुलांना उसंत मिळत नाही, इतके बदल ह्या ग्लाेबल यंत्रमानव विसंवादी जगात सवयीचे झालेले आहेत. अंगवळणी पडले आहेत.
वैश्विक खाज नाही या अर्थघन कवितेत कवी म्हणताे, शृंगारल्या मनाला वैश्विक खाज नाही, भाेगत्व साेडले तर कसलाच माज नाही... खाणार काय घंटा? साेने पितळ कि तांबे?, शेतीमधे जर पिकले अनाज नाही... गावे बकाल आणिक शहरे सुजून आली, आम्हांस मात्र त्याची अजिबात लाज नाही... शालेय पुस्तकांनी मेंदू बधीर केला, बुद्धी भ्रमिष्टतेवर उरला इलाज नाही...
कवीने आपल्या कवितेतून पांढरपेशा-सत्ताधारी-शाेषक व्यवस्थेच्या बुद्धिभेदांवर, दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांवर-पॅकेजवर जळजळीत भाष्य केले आहे. कवीच्या भट्टीत अस्सल तेच टिकते. नक्कल ते कितीही माेहमयी असले, तरी जळून खाक हाेते. हेच कवीच्या ज्वालाग्राही ऊर्जास्त्राेताचेही महात्म्य आहे. हेच गझलचेही निराळेपण आहे.
हे विपरित जीवन अनादी काळापासून भाेगत आलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखमुक्तीसाठी अस्सल गावरान-गावंढळ-कृषिवलांच्या जगण्याच्या भाषेलाच संस्कृतीच्या जागरणाचे माध्यम बनविणारा हा अभय कवी, खरेच प्रतिभेच्या गर्भगाभ्यातला आत्मकल्लाेळ-आत्मक्लेश आपल्या कवितेच्या रचनेतून अभिव्यक्त करताे, तेव्हा त्याची कविता ही कविता राहत नाही; तर क्रांतबिजांची समाज भूमीत मशागत करून, शेतकऱ्यांच्या हिरव्या बाेलीला शब्दरूपे देताना, जिवंत महाकारुण्याच्या निर्भय-निर्मळ जलवर्षावाने चिंब भिजवून, मरणाच्या हुडहुडीची अनुभूती देते. कवी अभयला जाणीव आहे की, ही आपली कविता पारंपरिक कवितेपेक्षा अनुभूतीच्या, दुःखमुक्तीच्या आसक्तीने समाजात पीडा निर्माण करणारी आहे. कवी गंगाधर-अभय गर्जना करताेय की, माझी गझल निराळी... हेच ते निराळेपण आहे. समाजात निराळेपणाचे तीव्र भान निर्माण करण्याचे प्रातिभ सामर्थ्य आहे... माझी गझल निराळी, हाच निराळेपणाचाही गझल-गाज गझलेच्या सांस्कृतिक अवकाशात निनादत आहे...
शेतकऱ्यांच्या मुक्तिसाठी शब्दास्त्रांची-आयुधांची थाळीही कवीने सज्ज ठेवली आहे. पाेशिंद्यांच्या रक्षणाचा अभयपूर्ण मक्ताही घेतल्याची सूचना, ताे शेरास्त्रांची हाळी देऊनच समाजाला देताे. चेतनेची पेरणी आणि संघर्षाचे पिक घेणारा हा कवी कवितेच्या शेतीत अभय खते शिंपून, प्रतिभावंत कसदार माळी बनूनच कवितेची मशागत करताे. शेतकऱ्यांची पिळवणूक-शाेषण करणाऱ्या व्यवस्थेच्या माथ्यावर अर्थशिस्तीची वृत्तेही काेरताे. कवीच्या अभयशील सृजनशील प्रतिभेतून, त्याची गझल निराळी, सांस्कृतिक विश्वातील भूमीच्या तळठावातही ज्वालामुखीच्या उद्रेकाला वाट माेकळी करून देते. हे सर्व ताे बळीराजाच्या दुःखमुक्तीच्या कळवळ्यातूनच करताे.
कवीची कविता किंवा गझल ही केवळ कविता राहात नाही तर समाजाच्या मरूभूमीत भुकंपाचे हादरे देणारे ते खरेतर शब्दास्त्रेच हाेत. शब्दास्त्रातून टणत्कार करणारी आयुधे हाेत. संत तुकाेबा म्हणतातच की, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू... माझी गझल निराळीतून हाच संत तुकाेबाप्रणित शब्दास्त्रांचा झंझावात, समाजाच्या मनाेभूमीत शेतकऱ्यांच्या दुःखमुक्तीसाठी विधायक बिजांची संजीवन पेरणी करताे. कवी अभयच्या शब्दात अनुभूतीचे तेज आहे. जीवनाशयाच्या जिवंत अभिव्यक्तीचे प्रतिभा सामर्थ्य ओतप्राेत भरलेले आहे. कवीची कविता केवळ कविता म्हणून सृजनशील नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदी आनंद गडे... जिकडे तिकडे चाेहीकडे... सृष्टीच्या चराचरात हिरवे सृजनमळे उगवण्याची जीवनदायी क्षमता असणाऱ्या सृष्टीच्या तारणहाऱ्यांच्या-पालनहाऱ्यांची जगण्याची तसेच त्याला सुखाने, आनंदाने, समाधानाने, स्वाभिमानाने जगवण्याची दिक्षा समाजाला देण्याचे खरेतर ते पावरस्टेशन आहे. पावरस्टेशन भस्मसात झाले तर जगात अंधराचे साम्राज्य पसरते. पावरस्टेशनमधून ऊर्जा बाहेर पडण्याची जिवंत यंत्रणा सुरू राहत असेल तर जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग सुकर हाेताे. कवी अभयची कविता ही अशी गंगाधरची गंगावाहिणी-जीवनदायीनी-उत्तरवाहिणी आहे. गंगेच्या पाण्याने जगाचा भाेवताल जसा सुखशांतीने नांदताे, तसाच कवी गंगाधरच्याही काव्यजलाने सांस्कृतिक आणि सामाजिक भाेवताल-आनंदाने, सुखासमाधानाने नांदण्याची संभाव्यताच नव्हे तर आश्वासकताही त्याच्या काव्यसृजनात काठाेकाठ भरलेली आहे.
तात्पर्य, शेतकरी साहित्य ज्ञानानुभवांकित शाखेत गझल काव्यप्रकाराची निर्मिती करून, कवी गंगाधरने शेतकरी साहित्याला संपृक्त आणि समृद्ध केले आहे. कवी गंगाधर मुटे यांच्या ह्या असाधारण प्रतिभा सामर्थ्य व्यक्त करणाऱ्या माझी गझल निराळी... या गझल संग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन, तिसऱ्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाच्या सांस्कृतिक विचारपीठावरून हाेत असल्याबद्दलही खूप माेठे समाधान झाल्याचे मनाेमन कृतार्थ-कृतज्ञ वाटते. कवी गंगाधर मुटेला आणि त्याच्या कवितेलाही उज्वल भविष्य असल्याचेही या निमित्ताने सांगावेसे वाटते. अशीच क्रांतशील भाषा आणि विचारांची अभिव्यक्ती पुढेही भविष्यात कवीच्या लेखणीतून हाेत राहावी, यासाठी हार्दिक शुभेच्छा. जय जवान जय किसान जय कवी अभय...
- डाॅ. किशाेर सानप
कमला नेहरू शाळेजवळ, रामनगर, वर्धा-442001
दूरध्वनी-9326880523, 9422894205
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/4355699141121407
शेतकरी तितुका एक एक!
जय हो! जय हो!! जय हो दादा!!!!!!
शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालनारं काव्य!!!!
आभार सर
आभार सर
शेतकरी तितुका एक एक!
पाने