Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.हिवरे बाजार जि. अहमदनगर : समृद्ध एक हिरवगार गाव

 हिवरे बाजार : एक समृद्ध गाव

अहमदनगरपासून 16 कि. मी. अंतरावरचं हिवरे बाजार. अंदाजे 1200 लोकवस्तीचं हे एक केवळ खेडं नाही. ते आहे वैभवशाली इतिहासाची जपणूक करणारं, आधुनिकतेची कास पकडून समृद्धीचा मंत्र सांगणारं एक छोटंस हिरवंगार गाव.
 
खेडं हा भारताचा आत्मा आहे. खेड्यांच्या शाश्वत विकासातून समृद्ध भारताची पायाभरणी कशी होते याचे उत्तम उदाहरण हिवरे बाजारने निर्माण केले असून एक आदर्श गाव म्हणून राज्याला आणि देशाला आपली स्वतंत्र ओळख करून दिली आहे. या आदर्शत्वाचा जवळून अनुभव घेण्यासाठी या गावाला भेट दिली आणि अनेक गोष्टी मनाला स्पर्श करून गेल्या.
 
हिवरे बाजारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. गावात पूर्वी हत्ती, घोड्यांचा बाजार भरवला जायचा. या बाजारामुळेच गावाच्या नावामागे बाजार हा शब्द चिकटला तो कायमचाच. पूर्वीपासून समृद्ध असलेल्या या गावात वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव पडला. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगार संधींचा अभाव, अस्वच्छता, स्थलांतर यासारख्या समस्यांनी इतर गावांप्रमाणे या गावालाही ग्रासलं. पण गावानं हा अनुभव घेतला तो 1989 पर्यंत. बाहेर शिकायला गेलेली मंडळी शिकली, मोठी झाली आणि शहरातच स्थिरावली. पण एक ध्येयवेडा तरूण शिकल्यानंतर गावातच काम करायचं या निर्धाराने गावी परत आला. त्याचं नाव पोपटराव पवार. 
 
बदल करायचा तर सत्ता हातात हवी, म्हणून गावाच्या राजकारणात उतरून ते गावचे सरपंच झाले. गावात माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठी केलेला प्रयत्न असो किंवा लोकसहभागातून गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न. पोपटराव पवारांचा गाव विकासाचा निर्धार अधिकाधिक पक्का होत गेला. 
 
पूर्वी फक्त कागदोपत्री ग्रामसभा व्हायची. मग आपल्या कामात लोकसहभाग मिळवायचा कसा? त्यांनी युक्ती लढवली. ग्रामसभेची तयारी बरेच दिवस आधी करून प्रत्येक घरात ग्रामसभेचा निरोप आणि ग्रामसभेत चर्चेला घ्यावयाच्या विषयांची यादी पाठवली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. ग्रामसभेच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त लोक सभेला आले, चर्चा झाली, लोकांनी आपली मतं मांडली, निर्णय झाले. त्या दिवशी खऱ्या अर्थाने गाव विकासाचे नियोजन लोकांमधून झाले आणि गावकऱ्यांच्या मनात गाव विकासाप्रती एक बांधिलकीही निर्माण झाली.
 
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा विचार ग्रामसभेत मांडण्यात आला. केवळ शासनावर विसंबून न राहता पूर्ण गावानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आसपासचा डोंगर, पडीक तसेच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड झाली. दरवर्षी मानसी एक झाड लावण्याचा संकल्प करताना गावाने स्मृतिवन विकसित केले. गावातील मृत व्यक्तीच्या नावाने येथे झाड लावलं जातं, त्याचं संगोपन केलं जातं.
 
पावसाचं पाणी अडवण्यासाठी सरल समतल चर, पाझर तलाव खोदण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या शक्यतेनुसार शेतात शेततळी घेतली. काही वर्षात श्रमदानातून लावलेली ही झाडं आता जंगल वाटावीत एवढी मोठी आणि हिरवीगार झाली आहेत. पाणी अडवा- पाणी जिरवा ही मोहीम यशस्वीरित्या राबविल्याने पडलेल्या पावसाचं पाणी अडलं-जिरलं. त्याचा परिणाम गावातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळी वाढण्यात झाला.
 
1990 पूर्वी 90 ते 140 फुटावर लागणारं पाणी आता 35 ते 60 फुटावर आलं. गावात 318 विहिरी. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याने तळाला गेलेल्या विहिरी नितळ पाण्याने भरून गेल्या. पाझर तलाव, शेततळी भरून वाहू लागली. गाव बेसाल्ट खडकावर वसलेलं. त्यामुळे गावकऱ्यांनी जमिनीच्या आतमध्ये वेगवेगळ्या स्तरावर स्फोट घडवून आणून जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठी जागा निर्माण केली. त्याला जोडून माथा ते पायथा या पद्धतीने पाणी अडवलं, पाणी वापराचा ताळेबंद निश्चित केला. त्यातून पाण्याचा संचय वाढला. यामुळे दुष्काळाला दूर ठेवण्यात गाव यशस्वी झालं. पाणी आलं तसं समृद्धी आली, गावाची अर्थव्यवस्था सुधारली.
 
आता गावकऱ्यांना आपल्या क्षमतांची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. एकत्र येऊन काम केलं की किती चांगलं काम होतं याची जाणीव झाली. गावचा पाणी प्रश्न सुटला तसा गावकऱ्यांनी आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, शेती प्रश्नाच्या सोडवणुकीकडे आपला मोर्चा वळवला. मतभेद विसरून गाव पोपटराव पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले.
 
गावात सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून काहींनी सेंद्रीय शेती केली. त्यांना झालेला वाढीव लाभ पाहून गावातील इतर शेतकरीही सेंद्रीय शेतीकडे वळाले. पाण्यानुसार खरीपाच्या आणि रब्बीच्या पिकांचे नियोजन झाले. हे नियोजन ग्रामसभेत जाहीर करण्यात आले. नियोजनानुसार पिकं घेतल्याने पाणी बचत तर झालीच पण वर्षातून दोन ते तीन वेळा पिकंही घेता येऊ लागली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे उत्पन्न वाढले. 
 
गावातील 97 कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आज पाच लाख रुपयांपर्यंत आहे तर 70 कुटुंबाचं उत्पन्न 5 ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान. 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाची संख्या 56 असून गावातील साक्षरता दर 95 टक्के इतका आहे. 95 शेतकऱ्यांकडे ड्रीप आणि स्प्रिंक्लरची व्यवस्था आहे. गावाचं दरडोई वार्षिक उत्पन्न 99 हजार रुपयांच्या आसपास आहे. गावात एकही बेरोजगार नाही किंवा एकही माणूस गावातून स्थलांतरित होत नाही.
 
उलट गाव सोडून गेलेली 48 कुटुंबं "गड्या आपुला गावच बरा" असं म्हणत पुन्हा गावी परतली आहेत. गावात 108 घरांमध्ये शोष खड्डे आहेत तर सर्व घरात सांडपाण्याची व्यवस्था आहे. गावाने कपडे धुण्यासाठी 3 ठिकाणी सार्वजनिक धोबीघाट बांधले आहेत. या धोबीघाटातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी फळबागांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
प्रयोगशील हिवरे बाजारने गावकऱ्यांना व्यवहारोपयोगी शिक्षण दिलं. हिवरेबाजारमध्ये गावातील पावसाचं प्रमाण मोजणं, गावातील पाण्याचा साठा मोजणं, त्यानुसार पिकाची यादी करणे, त्याचा तक्ता करणं, ही सर्व कामे शासकीय अधिकारी करीत नाहीत तर ती करतात गावच्या माध्यमिक शाळेतील मुलं. आहे नं आश्चर्य. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. इथली शाळा केवळ पुस्तकी शाळा नाही. इथं मुलांना जीवन शिक्षण आणि संस्कार दिले जातात.
 
शेती कशी करायची, पाण्याचा वापर कसा आणि किती करायचा, पिकांचं नियोजन कसं करायचं, पाणी साठा कसा मोजायचा, हे सगळं शाळेतच शिकविले गेल्यानं बालवयातच मुलांच्या मनात विकासाचं संकल्पचित्र पक्कं होण्यास मदत झाली. ही मुलं म्हणजे हिवरे बाजारची पुढची पिढी. ती विकास साक्षर झाली तर गावाचं हे चित्र उद्याही टिकून राहिल किंवा आणखी चांगले होईल हा त्यामागचा विश्वास. शाश्वत विकासाचा सार्थ अर्थ यापेक्षा दुसरा कुठला असू शकतो? 
 
शाळा झाली, पाणी झालं, संस्कार झाले, शिक्षण-प्रशिक्षण झाले आता गावाने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष घातलं. उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतीपूरक व्यवसाय हवा या भावनेतून गावात दुग्धव्यवसायाला चालना देण्यात आली. गावात दुध डेअरीची स्थापना करण्यात आली. चार-पाच चारा डेपो तयार करण्यात आले. त्यामुळे गावातील जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध झाला. घरटी जनावरांची संख्या वाढली.
 
गावात गुरं आली तसा पशुवैद्यकीय दवाखानाही. त्याचाही चांगला परिणाम दिसून आला. गावातील दुध उत्पादन वाढले. 1990 पूर्वी गावात होणारं 150 लिटरचं दुध उत्पादन आता 4 ते 5 हजार लिटरच्या आसपास गेलं आहे. 
 
लोकांमध्ये आत्मियता वाढली. गावातील जमीन गावाबाहेरील माणसाला विकायची नाही, गावात कोणीही बोअरींग घ्यायचे नाही, गावातील शेती विहिरीतील पाण्यावरच करायची. ऊस, केळ्यासारखी पिकं गावात घ्यायची नाहीत असे ठराव ग्रामसभेत मांडले गेले आणि ते जसे मंजूर झाले तसेच सगळ्यांनी त्याचे पालनही केले. 
 
गावात विवाहापूर्वी मुला-मुलींची एच.आय.व्ही चाचणी करणे बंधनकारक आहे. संपूर्ण गावाची एकाचवेळी शेतजमीन मोजणी करण्याचं अनोख कामही गावाने केलं आहे. एक गाव एक स्मशानभूमी सारखा उपक्रम राबविताना पोपटराव पवारांना मिळालेल्या दलित मित्र पुरस्काराच्या रकमेतून मागासवर्गीय कुटुंबांना स्नानगृहे बांधण्यासाठी मदत करण्यात आली. गावात गेल्या दहा वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते.
 
गणपती किंवा नवरात्री सारखे उत्सव साजरे करताना प्रतिकात्मक छोट्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे दरवर्षी नवी मूर्ती विकत घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत तर होतेच त्याचबरोबर जलप्रदूषणालाही आळा बसतो. गावात उत्सवकाळात घरगुती पुजांमधून निर्माण होणारे निर्माल्य एकत्र करून त्याचा खत म्हणून वापर केला जातो.
 
गावात तंटा नाही की दारू. गावात दारु तसेच गुटखाबंदीची 100 टक्के अंमलबजावणी केली जाते. गावातील दुकानात गुटखा, तंबाखु, सिगारेट विक्रीला बंदी आहे. ग्रामसभेने तसा केवळ ठराव केला नाही तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली. 
 
ग्रामविकासाच्या सर्व कामात आणि समित्यांमध्ये महिलांचा सहभाग चांगला असून गाव, गावठाण, रस्ते, वस्त्यांची स्वच्छता यामध्ये सगळा गाव एक होऊन काम करतो. गावातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. त्यापासून गांडूळ तसेच कंपोस्ट खत तयार करण्यात येते. गावात वैयक्तिक 50, सार्वजनिक 4 ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती होते. गाव पूर्ण हागणदारीमुक्त असून शौचालय गोबरगॅसला जोडून त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात आला आहे.
 
गावात 8 सौरपथ दिवे आहेत तर ग्रामपंचायत कार्यालयात होम लाईट सिस्टिम बसविण्यात आली आहे. 78 घरांत सौर कंदिलाचा वापर सुरु आहे. गावातील 230 कुटुंबांपैकी 98 कुटुंबांकडे सौरदिवे आहेत. गावातील 73 कुटुंबांकडे गोबरगॅस, 90 कुटुंबांकडे बी.पी. ऊर्जा चूल, 58 कुटुंबांकडे एलपीजी गॅस आणि 8 जणांकडे रॉकेल स्टोव्ह आहे.
 
आज गावात श्रीमती सुनीताबाई पवार सरपंच आहेत तर पोपटराव पवार उपसरपंच. या द्वयींच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक बी.टी. लोंढे ग्रामविकासाची ही उज्ज्वल परंपरा पुढे नेत आहेत. एक मुल एक झाड, बालवृक्षमित्र पुरस्कार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी सारख्या उपक्रमाबरोबरच गावात लग्नात वराती आणि बॅन्जोला मनाई आहे.
 
गावाला अनेक मान-सन्मान आणि पुरस्कारांनी गौरविले आहे. देश विदेशातून गावाला दररोज 400 ते 500 लोक भेट देतात. यात अर्थतज्ज्ञ आहेत, शेती तज्ज्ञ आणि जलतज्ज्ञ आहेत.
 
विविध गावांचे सरपंच ते राष्ट्रीयस्तरावर नेतृत्व करणारी नेतेमंडळी देखील आहेत. त्यामुळेच हिवरे बाजार हे केवळ एक गाव नाही, ते आहे परिपूर्ण विकासाचं आदर्श संकल्पचित्र. जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगतेय हिरव्यागार गावांच्या समृद्धीचा मंत्र.
 
  • महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार - 1995
  • महाराष्ट्र शासनाचा यशवंत ग्राम पुरस्कार - 2000
  • भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार - 2007
  • भारत सरकारचा वनग्राम पुरस्कार- 2007
  • भारत सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार- 2007
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार- 2007
  • महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार 2008
  • राजमाता जिजाऊ पुरस्कार 2012
 
लेखिका - डॉ. सुरेखा म. मुळे
 
(स्त्रोत : महान्यूज)
Share