विषय: कवितेचे रसग्रहण.
कविता: स्वदेशीचे ढोंगधतुरे.
कवी: गंगाधर मुटे.
कविता 'कणसातली माणसं' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून प्रकाशित झाली आहे.
***************
स्वदेशीचे ढोंगधतुरे ही कवी गंगाधर मुटे या अवलिया कवीची कविता वाचतांना दाबलेल्या आवाजाला कंठ फुटल्याची जाणीव होते. ही कविता शेतकरी चळवळीसाठी एक मैलाचा दगड आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. शेतकरी आत्महत्या हा विषय तसा ज्याने त्याने बेगडी आस्थेचा आणि राजकारणासाठी मलिध्याचा म्हणूनच आजतागायत चघळला गेल्याचा सर्वमान्य पुरावा आहे.
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल
उद्वेग आणि विद्रोह ही जोडगोळी धगधगत्या निखाऱ्यावर ठेवून कागदी नियोजनाची भेंडोळी वास्तवतेच्या कचराकुंडीत भिरकावण्याचे धाडस या दोन ओळींत दिसून येते. हे धाडस करण्याच्या मानसिकतेचे कारण ही अगदी मूल्याधिष्ठित आहे. वस्तुस्थितीकडे पाठ फिरवणे सामान्य अनुभूतीला सहजासहजी शक्य नसल्याने एकंदर इतिहास विजेसारखा माथ्यावर कडाडतो आणि आसमंत फाटल्याची तसेच नेमके ठिगळ कुठे लावले गेले नाही याची रोखठोक जाणीव करून देतो.
शेतकरी आत्महत्येची जेवढी कारणें शोधली गेली आणि जेवढ्या उपाययोजना केल्या गेल्या त्या किती निरर्थक होत्या आणि आहेत याची प्रचिती येताच वाचक पुढच्या कवितेला सरसकट वाचण्यासाठी धडपडतो.
पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल
या ओळी वाचताच वाचकांच्या तोंडून आपसूकच एक ओळ बाहेर पडते ' तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल'. हा अनुभव मी नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात प्रत्यक्ष घेतला. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहातील प्रत्येकाच्या तोंडून ही ओळ जयघोषासारखी ऐकणाऱ्याच्या कानावर जाऊन आदळत होती. यातील कटू सत्य नाकारणे कुणालाही शक्य नाही. आजही वीज आणि पाण्याचे शेतकरीहीत केंद्रित नियोजन न केले गेल्याने कोरडवाहू शेती ही पडीक जमिनीहूनही अधिक घाट्यात जातांना तर दिसतेच पण ती जमीन हळूहळू वाळवंट सदृश्य होत चालली आहे. एकीकडे जगात वाळवंटाचे नंदनवन करण्याचे यशस्वी प्रयत्न केले गेले तर दुसरीकडे मात्र स्वतंत्र भारताने सुजलांम सुफलांम म्हणत म्हणत सुपीक जमिनीचे रूपांतर वाळवंटात केल्याने निर्माण झालेली दाहकता स्पष्ट जाणवते.
विस्थापित भारतातील कवी इंद्रजित भालेराव यांची,
शीक बाबा शीक लढायला शीक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक
किंवा ज्ञानेश वाकुडकरांची
पालीच्या मुतन्याला मी पाऊस म्हणावे का हो
किंवा गंगाधर मुटेंची
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल
या कविता वाचून प्रस्थापित इंडियाच्या भुवया कायम तिरकस होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी त्यांचे साहित्यिक मूल्ये त्रिकालाबाधित आहे यांत तिळमात्र शंका घेण्याचे कसलेही सद्सद्विवेक कारण असणे शक्य वाटत नाही.
गंगाधर मुटे पुढे म्हणतात-
खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल
कोणत्याही न्यायालयात या ओळी चुकीच्या आहेत किंवा कवी कल्पनेचा एक भाग आहेत हे सिद्ध करता येणार नाहीत, याचाच अर्थ शेतकरी कविकल्पनेच्याही पल्याड शोषकांनी शोषला आहे असा होतो. एक पीक पिकवणे, ते पिकवून विकणे या कालावधीत दलालांची आणि सरकारी यंत्रणांची त्याला लुबाडण्यासाठी चाललेली बौद्धिक धडपड भाई, देखतेही बनती है! इंडियाने भारताकडे नेहमी बाजारपेठ म्हणूनच पाहिले. इथला कच्चा माल लुटून नेला आणि त्याचे पक्क्या मालात रूपांतर करून अव्वा च्या सव्वा किंमतीत विकावयास सुरुवात केली. शेतकऱयांना लागणारी शेती उपयोगी साधने विकत घेणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे होते. या उलट त्यांच्या संपूर्ण नियंत्रणात असलेली बाजारपेठ आपल्या मर्जीने वस्तूंच्या किंमती ठरवायला लागली. यामुळेच चतुःसूत्री तील एक सूत्र स्वदेशीचा स्विकार व परकीय मालावर बहिष्कार हे होते. मात्र इंडियनांच्या स्वातंत्र्यानंतर त्यांना भारताला मनमोकळेपणाने लुटण्याची मुभा मिळाली होती. याचाच अर्थ इंग्रजांच्या काळात जी आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱयांवर आली नाही ती इंडियाच्या काळात आली!
खरेतर वसाहतवाद्यांचा हा नवा डाव अजूनही भोळ्याभाबड्या शेतकऱयांच्या लक्षात आला नाही. खेडीपाडी, वस्त्या, तांडे याठिकाणी शेतीमालाच्या बाजारपेठा कधीच आणि कुठेच झाल्या नाहीत. आपला माल घेऊन याच्या-त्याच्या दारात फिरण्याशिवाय त्याला ईलाज नाही. शहरातून आपला माल प्रत्यक्ष गिर्हाईकास विकण्याची मुभा नाही. असलीच तर त्याच्यासाठी बसण्याची निवाऱ्याची सोय नाही. व्यापाऱयांसाठी मात्र अशा सोई वसाहतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केलेल्या आहेत. शेतीमाल आणि शेतकरी या सर्व व्यूह रचनेमुळे कवडीमोल झाल्याचे विदारक चित्र गंगाधर मुटें यांनी अगदी हुबेहुब रेखाटले आहे.
मागणीनुसार उत्पादन करण्याचे शास्त्रोक्त शासकीय स्रोत निर्माण करणे गरजेचे असूनही तसे होत नाही. इतर उद्योगाच्या बाबतीत मात्र हे नियोजन केले जाते. उत्पादित मालाला टिकवण्यासाठी किंवा साठवण्यासाठीचे शासकीय नियोजन शेतकऱयांसाठी कुठेच नाही. चार कुडा पत्र्याच्या किंवा चार खोल्यांच्या घरात राहणारा शेतकरी अशी व्यवस्था निर्माण करू शकत नाही. आठवडी बाजारात भाजीपाला त्याच दिवशी विकला गेला नाही तर तिथेच त्यांचे ढीग सोडून शेतकरी परत फिरतात. यावर एकच नामी उपाय सरकारी यंत्रणेकडे आहे, तो म्हणजे तुटवडा झालेला किंवा तसा भास निर्माण झालेला माल आयात करणे! परंतु देशात पिकलेल्या अतिरिक्त पिकाचे कांही नियोजन उपलब्ध आहे का हे सांगणे कठीण आहे. हा एसी मध्ये आखलेले सटरम फटरम बेत चा नव्हे तर कशाचा परिणाम आहे?
निर्यातीचे एकीकडे तीनतेरा वाजवून दुसरीकडे मोठ्याप्रमाणात शेतीमालाची आयात करण्याचा प्रपंच केला जातो. यामुळे शेतकऱ्याची अवस्था "धोबी का कुत्ता, ना घर का ना घाटका" झाली आहे, असे सांगतांना गंगाधर मुटे पुढे म्हणतात-
आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा बाजा
स्वदेशीचे ढोंगधतुरे; खातोस विदेशातली दाल
मुळात शेतीमालाच्या आयात निर्यातीचे संतुलन बिघडल्याची खंत त्यांनी ठासून सांगितली आहे. स्वदेशीचे ढोंगधतुरे हा शब्द इंडियाच्या बाबतीत तंतोतंत योजल्याने भाषा व भाष्य आलंकृत झालेली दिसून येतात. शेतीप्रधान देश ही संकल्पना इंडियातून समूळ हद्दपार झालेली दिसून येते. तसेच भांडवलदार किंवा राजकीय वर्चस्व असलेल्या भागापूर्ती मर्यादित झालेली आहे.
अंत्यक्रियेचा बाजा वाजल्यानंतर होणारे फोटोसेशन हा सुद्धा अलीकडच्या काळातील चवीने चर्चिण्याचा विषय होऊन राहिला आहे. ढोंग केल्यामुळे किंवा क्षणीक पुळका दाखवल्यामुळे या गंभीर प्रश्नाची उकल होणे शक्य दिसत नाही. त्यासाठी दीर्घकालीन कृती आराखडा युद्ध पातळीवर राबवला जाणे आवश्यक आहे, अन्यथा अनुशेषधारी जसा आहे तशा प्रांतात स्वतःला विभक्त करून घेतील.
म्हणूनच शेवटी गंगाधर मुटे प्रस्थापितांना स्पष्ट शब्दांत बजावतात-
छल कपटाचा नाद सोडून भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमीकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल
तुज आहे तुजपाशी
पण तू जागा चुकलाशी
अशीच जाणीव होऊन जाते.
एकंदर कायतर शेती आणि शेतकरी, माती आणि माणसे यांच्यापासून दूर गेलेल्या इंडियाला भारताने दिलेली ही एक हाळी आहे. तशीच ती होऊ घातलेल्या वैचारिक संक्रमणाची ऐतिहासिक नांदी पण आहे. अशाच 'दम'दार कवितांची मुक्यांना गरज आहे. कवीला तथा शेतकरी चळवळीला माझ्या हार्दिक शुभेच्छा!!
- राज पठाण
अंबाजोगाई, जि. बीड
भ्रमणध्वनी: ९७६४९८०२२४
प्रतिक्रिया
स्वदेशीचे ढोंगधतुरे!
धन्यवाद
धन्यवाद
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल
नमस्कार,
पठाण सर खूप छान आणि मार्मिक रसग्रहण केलेत ह्या कवितेचे.
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
नमस्कार रवींद्रजी, अलीकडे
नमस्कार रवींद्रजी,
अलीकडे प्रकृती अस्वास्थामुले सक्तीच्या आरामावर डॉ. नी पाठवले आहे.म्हणून चळवळीला वेळ देवू शकलो नाही. आपल्या प्रेरणादायक प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद तथा शुभेच्छा!
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर
अतिशय दमदार व सुंदर परीक्षण सरजी.
मुक्तविहारी
मुक्तविहारीजी
मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अवांतर : परिक्षणाबद्दल मनपूर्वक आभार
शेतकरी तितुका एक एक!
शुभेच्छा!
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन
धन्यवाद
पाने