नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शांत झाले आहे शिवार पुन्हा...
नांगरत होता तो
कालपरवापर्यंत नशीब स्वतःचे
फाडत छाती मातीची,
आणि घालतही होता टाके
हाती घेऊन कुदळ फावडे
पोहचवण्यासाठी कसब कुणब्याचे
पिढीपर्यंत पुढल्या
थाटात शल्यविशारदाच्या...
सोबतच उरकली होती पेरणीही त्याने
करत हवाली
काळजाच्या ठोक्यांना
कोंबाळत्या 'बी'च्या...
पण मेलाय तो आज अचानक...
पण थांबा!
कसा मेला? चालू आहे उत्खनन
उकलण्यासाठी गूढ...
तोपर्यंत करू आयोजित
चौकात एखादा 'कँडलमार्च'
जमलंच तर 'मोर्चा'
नाहीतर देऊन टाकू एखादे 'पॅकेज'
अंत्यविधीच्या वाटेवर मूडद्याच्या पदराला
बांधलेल्या वाफाळत्या भातासारखे
तोपर्यंत जमलेच तर
मांडून पाहू राजकीय गणिते.
नाहीतर चर्चा
घालत वाद वैचारिक, मानसिक, सामाजिक
निष्कर्षांवर...
नाहीतर करू कौतुक जरा त्याचे
'पोशिंदा बिशिंदा: अशी काहीतरी
जोडत विशेषणे.
नाहीतर
आणू गुंगी जराशी भयकारितेला
रिचवत चार बाटल्या
त्याच्याच मळ्यातल्या उसाच्या
मळीतून मिळालेल्या मद्याच्या
किंवा नासल्या कापसाचे बोळे चार
बुडवू सुगंधी श्वासात
समजवण्यासाठी
तीक्ष्ण नाकाच्या पेशीसमूहाला ...
तसेही,
आणि पेरणी तर चालूच आहे
झिरपत्या लेखण्यांतून सोबतच
जागतिकीकरणाचे दावत आमिष
त्याच्या गहाणवट शिवाराला...
पण थांबा!
नुकताच धरलाय वाफसा
पुन्हा एकदा मातीने
आणि मीही धरले हाती रुमने
मूठमाती देऊन आल्यावर त्याला
कारण
शांत झाले आहे शिवार पुन्हा
परत फिरल्यावर अंत्ययात्रा...
- रावसाहेब जाधव.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने