

अश्रू मातीत मिळाले
जेव्हा जेव्हा आले बहर असेच बेमौसम गळाले
सवय झाली डोळ्यांना किती अश्रु मातीत मिळाले
व्यवस्था तर भलतीच चालली आहे माजत
धर्म असुन नाही कुणी कुणास पाणी पाजत
लुटारुही आम्हा नाही लुटण्यासाठी लाजत
ढिले झाले तार आता विणाही नाही वाजत
कितीतरी ओले जीव असेच विनाकारण जळाले
झुंजलो वादळाशी प्राणज्योत नाही विझत
पाऊस पडतोय असा की अंग नाही भिजत
थकलेत सारे शरीर तरी डोळे नाही निजत
आपलीच डाळ आपल्या घरी नाही शिजत
भांडवलशाहीच्या जात्यात मजूर लागलेत दळाले
लागवडीचा खर्चही आता नाही शेती काढत
डोंगर कर्जाचा दिवसेंदिवस चालला वाढत
मरणघडी येईस्तोवर राहायचे असेच नाडत
शासनयंत्रणा जित्यापनीच आहे आम्हा गाडत
या गंभीर विकाराला सरकारने वरपांगी पडताळले
शेतमालात ढोरं आता बिनधास्त चरतात
इथल्या लुटीला विदेशात नेऊन भरतात
झाडाझाडावर लटकून सत्यवान मरतात
लोकशाहीवर नेते अभिनेते बलात्कार करतात
ह्याच्या चावण्यामुळे समाज जीवन पिसाळले
शिर आहे बळीचे अजून वामनाच्या पायात
खंडीभर असून फक्त बायकात बडबडतात
सूर्य मावळतात दररोज ऐन उमेदीच्या वयात
अन प्रकाशाची केली जाते विदेशातून आयात
आधुनिक व्यवस्थेतून नेमके शेतकऱ्यांस गाळले
शोधतो शिलेतून झरे कुठेकुठे पाझरततात
आमच्या राखेतून कुठली काव्य उमलतात
वाट बघतोय कोण हृदयाला हृदय देतात
नव्यानेच श्वासांची नवी भेट घेऊन येतात
मृत्यू कुणा आवडतो जर जीवनाचे दान मिळाले
पहिले, दुसरे व तिसऱ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात कवी म्हणून सहभागी झालो. चौथ्या संमेलनात येण्याची इच्छा आहे.