मेंदू पिसाळणारा ध्यास
ही बोर, ही बाभूळ, हा आंबा, ही चिंच
ही किलबिल, ही झुळझुळ, हा हंबरडा
ही आर्जवे, ही डरकाळी
ही हिरवळ आणि ही दरवळ;
तेव्हाही असणार आहेच! जेव्हा;
तुम्ही आणि मीही नसणार आहे
जिस दिन हम जनम लियो
जग हासे हम रोये
ऐसी करनी कर जाओ
पीछे न हासे कोय
कबिरांचं ऐकावं काय?
आपण ऐकलं वा ना ऐकलं तरीही
तेव्हाही कबीर असणार आहेच जेव्हा
तुम्ही आणि मीही नसणार आहे
माणूस द्या मज, माणूस द्या ही
भीक मागता प्रभु दिसला
स्वत्वाचा शोध घेऊन आपणच
दाखवावा का माणूस राष्ट्रसंतांना?
आव्हान स्वीकारलं वा नाकारलं तरीही
तेव्हाही राष्ट्रसंत असणार आहेच जेव्हा
तुम्ही आणि मीही नसणार आहे
उकिरड्यावर घास शोधणारी लेकरं
घुटभर पाण्यासाठी दुडदुड धावणारी कोकरं
छटाकभर ऋणापायी वळवळणारा फास
राजकारणापायी मेंदू पिसाळणारा ध्यास
या सर्वांना तेव्हाही अभयच असणार आहे?
जेव्हा;
तुम्ही आणि मीही नसणार आहे?
- गंगाधर मुटे 'अभय'
======