मज शिवार सारा बोले
बघ शीळ घालतो वारा
पाटाचे खळाळ पाणी
या शुभ्र दुधारी धारा
पायाला चिकटुन माझ्या
ओलेती सुगंध माती
संबंध तिचा माझा
प्रत्येक युगांची नाती
धानाचे वय वाढोनी
ज्वानीत जवारी येते
पाहून थवे चिमण्यांचे
उपवास सोडुनी घेते
या इथे अडोसा पाहू
राघूमैना ही म्हणती
पाहून मला ते लाजुन
कणसाचे चुंबन घेती
मी लवून थोडी तेथे
दुर्लक्ष कराया जाते
ही लबाड गोंडस मैना
मज वेडावुन हासवते...
या इथेच बांधावरती
मी खिळुन राहते बाई
हा पायघोळ ममतेचा
मज शिवार घाली बाई
*****************
©विनिता कुलकर्णी पाटील
*****************
