नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यसरस्वती बहिणाबाई चौधरी
३ डिसेंबर बहिणाबाईंची पुण्यतिथी . त्यानिमित्त..निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी या अशिक्षित स्त्रीचे काव्यातून प्रकट होणारे तत्त्वज्ञान शिक्षितांनाही लाजविणारे आहे. जात्यावर किंवा चार स्त्रिया एकत्र आल्यावर त्यांनी ओव्या, गाणी म्हणावीत ती सोपान चौधरी यांनी लिहून ठेवावीत, आचार्य अत्रे यांनी ती पाहावीत आणि संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडणारी कविता प्रकट व्हावी, हा एक अद्भुत योगायोग होय. खांदेशामध्ये जन्मलेल्या बहिणाबाई या खर्या अर्थाने निसर्गकन्या होत्या. त्यांच्या कवितेत शेतकरी, रानवनातील निसर्ग,कष्टकरी या सार्यांचे वर्णन आलेले आहे. अप्रतिम प्रतीके सहज व सोपी शब्दरचना कवितेतून अगदी आपलासा वाटावा असा गोडवा आणि शेवटी डोळय़ात झणझणीत अंजण घालणारा व आपलासा वाटणारा उपदेश या सर्व पार्श्वभूमीवर बहिणाबाई यांची कविता मनामध्ये कधी घर करते ते वाचकाला कळतच नाही.
माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिणीच्या मनी,किती गुपित पेरली
सरस्वतीप्रमाणेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या त्या भक्त होत्या. मातीचे ऋण मानण्याचे तत्त्वज्ञान त्या काळात त्यांच्याकडे होते. त्याचप्रमाणे सूर्य हा सृष्टीपोशिंदा आहे हेही त्यांच्या काव्यातून प्रकट होते.
अरे देवाचं दर्शन झालं आपसुक।
हिरीदात सूर्यबापा दाये अरूपाचा रूप॥
माहेरवासीन स्त्रियांच्या नशिबी येणारे सुख व सासरच्या व्यथा हा बहिणाबाईंच्या काव्यांचा आणखी एक पैलू होता. बहिणाबाईंच्या माहेरच्या वर्णनात त्या स्वत:चे माहेर शोधू लागतात. माहेरच्या वाटेने जाणारं मन माहेरपणासाठी कसं आसूसलेल असतं यांची जाणीव बहिणाबाईंच्या कविता वाचल्यावर होते.
माझ्या माहेराच्या वाटे, जरी आले पायी फोड
पाय चालले चालले, अशी माहेराची ओढ
पायाला फोड आले तरी पाय थांबत नाहीत ते माहेराच्या दिशेने चालत राहतात. अशा प्रकारचे वर्णन त्यांच्या अनेक कवितांमधून दिसते. घरोटा,संसार अशा कवितांतून त्यांनी सहजीवनाच्या यशाचे गमक सांगितले आहे.
देखा संसार संसार, दोन्ही जिवाचा सुधार
कधी नगद उधार, सुखा दु:खाचा बेपार
संसार म्हणजे काय? त्यात एकमेकांच्या जिवाचा व विचारांचा कसा आदर करावा ते बहिणाबाईपेक्षा योग्य रीतीने आणखी कोणी चांगले सांगू शकेल, असे वाटत नाही. संसार वेलीवर सुख-दु:खाचा सामना करताना पती निधन झाल्यावर खंबीरपणे संसाराचा गाडा रेटणार्या बहिणाबाई या खरोखर आदर्श असे प्रतीक होत्या. पती निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा जो डोंगर कोसळला. खरे तर त्यात एक अडाणी, निरक्षर, स्त्री पूर्णपणे नेस्तानाबूत झाली असते. मात्र, त्यांच्या कवितेतून जे संदर्भ समोर येतात ते फार विचार करायला लावणारे आहेत. लपे करमाची रेखा किंवा आता माझा मले जीव यासारख्या कवितांमधून त्यांच्या सोशिकपणाचे व खंबीरतेचे दर्शन घडते.
देव गेले देवाघरी, आणि ठेयीसनी ठेवा
डोयापुढे दोन लाल, रडू नको माझ्या जिवा
पती गेल्यावर दोन मुलांकडे पाहत रडायचे नाही. हे स्वत:ला बजावणारी स्त्री खरोखरच धिरोदात्त असली पाहिजे यात शंका नाही. त्याच बरोबर ज्योतिषासारख्या थोतांडाला विरोध करून
नको नको रे जोतिषा, नको हात माझा पाऊ
माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ!
असे ठणकावून सांगत आपल्या नशिबात जे आहे त्याला समोर जाण्याची त्यांची बेधडक वृत्ती वाखणण्याजोगी आहे,यात शंका नाही. कष्टकरी व शेतकरी जीवन जगणार्या बहिणाबाई त्यांच्या कवितेतून शेतीला बाजूला ठेवू शकल्या नाहीत. शेतीची साधने यात मोघडा, पांभर, कोयप, आऊत, तिफन, चाहूर, वखर, नांगर या सर्व अवजारांचे उपयोग त्यांनी अगदी सोप्या शब्दांत मांडून ठेवले आहेत. शेतकर्याला सर्वात जास्त वाट पाहावी लागते, तो पाऊस. तो आल्यावरचे अप्रतिम वर्णन बहिणाबाईंच्या आला पाऊस या कवितेत आढळते. पेरणी, कापणी, रगडणी (मळनी) उफणनी या प्रत्येक शेतकरी कर्माचे जिवंत वर्णन करणार्या स्वतंत्र कविता बहिणाबाईंनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर
धरत्रीच्या कुशीमंदी, बियबियानं निजली
वर्हे पसरली नाही, जशी शाल पांघरली
अशा प्रकारे शेतातील बियाणे व त्यातून फुटणारे अंकुर त्याचे वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. मोट हाकतो एक या कवितेतूनही त्यांनी कष्टकरी जीवन चित्रित केले आहे.
निसर्गातील सुगरण या पक्ष्याच्या खोप्याला अजरामर शब्दरूप देण्याचे काम ज्यावेळी बहिणाबाई करतात, त्याचवेळी गुढी उभारणी, आखजी (अक्षय तृतीया), पोया (पोळा) इत्यादी सणाची महती वर्णन करताना शेतकर्याने बैलाची पूजा का करावी तेही बहिणाबाई सांगतात.
वढे नागर वखर, नही कष्टाले गनती
पीक शेतकर्या हाती, त्याच्या जिवावर शेती
अशाप्रकारे दु:ख, सण, उत्सव, अध्यात्म धर्म इत्यादी सर्व बाबींवर आपल्या सहजसाध्य शब्दांनी भाष्य करीत बहिणाबाईची कविता समाजासाठी एखाद्या दीपस्तंभासारखी तेवत आहे. कवितेप्रमाणेच सहज बोलण्यातून वापरल्या जाणार्या काही सुंदर म्हणी हे सुद्घा बहिणाबाईंचे एक देणं आहे.
१) दया नाही, मया नाही डोयाले पाणी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोणी,२) शिदोळाले आला राग, माले म्हणा फन्या नाग, ३) कयाचे गेली नवस, आज निघाली आवस, ४) आसु नाही ती सासु कशाची?आसरा नाही ती सासु कशाची?
५) माणसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा.
##########$$$$$$$$###################किरण शिवहर डोंगरदिवे
समतानगर, मेहकर, जि. बुलढाणा
मोबा ७५८८५६५५७६
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
सुरेख
सुरेख लेखन. पुढील लेखनास शुभेच्छा!
शेतकरी तितुका एक एक!
पाने