नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"गावभुईचं गोंदण - एक सृजनोत्सवी काव्यसंग्रह!"
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
"गावं भुईचं गोंदण" हा कविता संग्रह म्हणजे ग्रामीण जीवन शैलीतला हृदयस्थ मृदगंध होय. कवी श्रीनिवास मस्के यांनी हा दरवळ आपल्या शब्दातून थेट रसिकांच्या हृदयापर्यन्त पोहोचवला आहे.ग्रामीण जीवनातला सच्चेपणा, निसर्गाशी तादात्म्य साधणारी शब्दकळा हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य. झपाट्याने होणारं शहरीकरण आणि त्यात इंग्रजीचा सर्रास होणारा वापर यात अश्या अस्सल ग्रामीण जातकुळीच्या भाषांची हल्ली गळचेपी होताना दिसत आहे. अश्या परिस्थितीत या ग्रामीण पार्शवभूमीच्या आणि ग्रामीण बोलिभाषेतील कविता म्हणजे आपला वारसा असोशीने जपण्याचा स्तुत्य प्रयत्न होय ,असं मला वाटतं.आकाश गाठत असताना पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवावेत हे सर्वांनांच ज्ञात असतं पण तस प्रत्यक्षात होताना फारसं दिसत नाही.तो आपली नाळ कुठे आणि कशी जुळली आहे हे माणूस विसरत चालला आहे आणि नेमकी तिच आठवण करून देण्याचं काम हा काव्य संग्रह करतो. या काव्य संग्रहाला ना.धो.
महानोर यांची सुंदर पाठराखण लाभलेली आहे.
कवी श्रीनिवास मस्के यांची कविता म्हणजे नेमकं काय आहे, हे तेच आपल्या कवितेत सांगून जातात...
माझी कविता
शेणामातीनं भरलेली
उकंड्यात निपचीत पडते
कुजवून शब्दाशब्दांना
रानभुईत उगवते
दयनीय अश्या प्रतिकूल परिस्थितीत हा सृजनाचा आशावाद कमाल आहे.
याशिवाय कित्येक कळापासून न बदललेली गाव खेड्यातली परिस्थिती, जातीयवाद , खेड्यानं कधी झापड लावून जपलेलं तर कधी त्यांच्यावर लादलं गेललं अप्रगत जीवन या सर्व गोष्टींचा मार्मिक उहापोह या काव्य संग्रहात दिसून येतो.
सामान्य माणूस म्हणजे नेमकं कोण..? हा भाबडा अन विचार प्रवण प्रश्न कवी मांडतात.. आणि सामान्यातल्या असामान्यत्वाकडे निर्देश करताना म्हणतात..
जात्यावर पायाला पाय लावून
मरण कांडताना
हजार ग्रंथांचं जगण्याचं तंत्र
एका ओवीत सांगणारी
तांबड फुटण्या आधी
मातीला भिडणारी
कशी असेल सामान्य...?
या ओळीत ग्रामीण स्त्रीच्या असामान्यत्वा शिवाय तिचं अखंड राबतं जीवन कवी अधोरेखित करतात. एक पुरुष ग्रामीण स्त्री जाणीवांचा सहज सुंदर मांडणी कवी लिलया
करून जातात.मग त्या माहेरच्या कविता असोत किंवा
शेतात काम करणाऱ्या स्त्रीच्या जाणीवा असोत...
आंब्याच्या डहाळीला
झुले लुगाड्याचा झोका,
नजर तान्हूल्याकडं
चुके काळजाचा ठोका
ही भावना हृदय हेलावुन टाकते. कविच निरीक्षण
आणि त्या निरीक्षणाची यथोचीत अभिव्यक्ती यात
हातखंडा दिसून येतो."रानवाट" " पदर जरा सावर" या
मला विशेष भावलेल्या कविता.
तस पाहिलं तर ग्रामीण जीवनातलं साचलेपण ,पडझड, वेदना, ऋणानुबंध हे सगळंच यांच्या काव्यात दिसून येत.
निसर्ग आणि त्या निसर्गानं नटलेलं गावं हे समीकरण
नितांत सुंदर आहे.तशी काही वर्णन कवितेत आढळूनही
आली आहेत.
कणीस आलं पोटाऱ्यात
हिरवीगर्द शेंग
ओघळला थेंब थेंब
सळसळ पानावर
बाई येऊन गेली सर
कशी झरझर
अशी सुंदर वर्णन आढळून येतातही पण व्यथेची अभिव्यक्तीच अधिक दिसून येते. भोगलेपण,वेदना खोल खोल जपल्याची जाणीव अनेक काव्यातून होते. रितेपण, आकांत, मोडलेल्या माणसाची,श्रद्धांजली ,दांडके ही त्यांच्या कवितेची नावचं त्यांच्या मनातल्या मळभाबद्दल सूचक अस बरचं काही सांगून जातात.
चाळणीच आयुष्याची
तरी ठिगळ जोडावं
काळजातल्या भुईला
कस वाऱ्यावर सोडावं
अशी दुखरी सल शब्दाशब्दातून जाणवते.
कविकडे प्रतिभा आणि शब्दसामर्थ्य आजोड आहे.सुंदर रूपकांचा अलंकारिक साज ग्रामीण भाषेतही दर्शवीला आहे पण काव्य संग्रह अधिक व्यापक होऊ शकला असता.विषयांचा तोच तोपणा आढळून येतो शिवाय कुठे कुठे यमक योजनाही खटकून जाते.जसे -'झुला -मायीला' 'जपा -बघा' इ. भावकविता आणखी समृद्ध होऊ शकते.अर्थात हे माझं मत आहे.
कवी श्रीनिवास मस्के यांनी अल्पावधीतच उत्तम कवी
म्हणून ओळख निर्माण केलेलीच आहे."रानकवी" म्हणून
ते प्रसिद्ध आहेतच.धरेच्या गर्भात सामावून अंकुरणारी त्यांची कविता सृजनोत्सवी आहे.साहित्य विश्वात स्वतः चा वेगळा ठसा निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या समृद्ध लेखणीत आहे.त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
©रोहिणी पांडे,नांदेड
Mob.9518749475
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने