नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धोतर फ़ाटेपाव्तर
मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला
धोतर फ़ाटेपाव्तर सोटे खाऊन आला …॥१॥
गाढवाम्होरं भगवद्गीता वाचून काय होते?
माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते
राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला
उसण उतरेपाव्तर लाथा खाऊन आला …॥२॥
मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला …॥३॥
पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते
कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते
मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला
होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला …॥४॥
अरधकच्चं ग्यान लई, खतरा असते भाऊ
नको अभय कोणाच्याबी, झाशामंदी जाऊ
कावरल्या कुत्र्यासाठी भाकर घेऊन गेला
येता येता बोम्लीवर, सुया घेऊन आला …॥५॥
गंगाधर मुटे
————————————————————
मारखुंडा = मारकुडा, पारखुंडा = पारखी, पारख करणारा
————————————————————