शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत
दिनांक १० जुलै २०१४ ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देशातील एकूण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेची बलस्थाने असलेल्या काही मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यावर येऊ घातलेले दुष्काळाचे सावट, दुबार पेरणीचे उद्भवलेले संकट त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्याची परिस्थिती बघता पीककर्ज, वीजबील, हमीभाव यासंदर्भात महत्त्वपूर्ण आणि सांगोपांग चर्चा करण्यात आली.
आंदोलनाची दिशा :
बैठकीला संबोधित करताना मा. शरद जोशी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुल्यांची एका बाबतीत चूक झाली, त्यांनी असे मानले की ब्राम्हण-भटजी कारकुनांऐवजी जर शेतकर्याच्या जातीचे, त्यांच्या नात्यागोत्यातले कारकून आलेत तर ते शेतकर्यांशी जास्त सहानुभूतीने वागतील आणि पिळवणूक कमी होईल पण आता क्रित्येक ठिकाणी भट कारकून गेलेत आणि त्यांच्या ऐवजी शेतकर्याच्या जातीचे कारकून आलेत, पण शेतकर्यांची पिळवणूक काही कमी झाली नाही, याउलट ते भटकारकुनांपेक्षा जास्त जोमाने व ताकदीने दुष्टपणे पिळायला लागले आहेत.
मी १९८० सालच्या भाषणात सांगत असे की, साखर, कांदा, बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे काय? साखर, कांदा, बटाटा खाल्ला नाही तर माणूस मरत असतो काय? उलट साखर खाल्ल्यामुळे लोकांना डायबिटीस व्हायची भिती असते. डायबिटीसने मरण्याची शक्यता असते. उलट औषधाच्या गोळ्या माणसाचा जीव वाचवतात पण औषधाच्या गोळ्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश नाही. काँग्रेसही तेच करत होती आणि नरेंद्र मोदी तुमच्या-आमच्या शेतकर्यांच्या जातीचे असले तरी तेच करत आहेत. त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाच्याच मार्गाने जावे लागणार आहे.
नाशिक येथे ३ ऑगष्टला पुंजाभाऊ खोत यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा आहे, या कार्यक्रमात मी पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथेच ४ ऑगष्टला कांदा उत्पादक शेतकरी मेळावा आहे. कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकावा यासाठी, सत्ताधार्यांना हादरा बसेल असे आंदोलन मी जाहीर करणार आहे. मी शरीराने थकलो असलो तरी मनाने थकलेलो नाही. रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलनाचे प्रत्यक्ष रणांगणात उतरून मी नेतृत्व करेन, असेही शरद जोशींनी जाहीर केले.
अर्थसंकल्प २०१४-१५ :
शेती आणि शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक व डोंगर पोखरून उंदीरही निघू नये असा आहे. 'भारत' आणि 'इंडिया' यांच्या लढाईत भारत पराभूत झाला आहे. दुस-या महायुद्धानंतर युरोपातील राष्ट्रांच्या पुनरुत्थानासाठी ज्याप्रमाणे 'मार्शल प्लान' अमलात आणला गेला त्याप्रमाणे, शेतक-यांना शेती करण्यास हुरूप वाटेल अशा प्रकारच्या इंडियन मार्शल प्लानची आवश्यकता आहे. असा काही प्लान सरकारचा समोर असल्याचे दिसत नाही. शेतीसंदर्भात या अर्थसंकल्पात काही रस्ते आखून दिले आहेत; त्यावर मार्गक्रमण कसे होते ते बघावे लागेल. अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्प २०१४-१५ वर बोलताना शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी व्यक्त केली.
शरद जोशी यांची जामिनावर सुटका :
शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची बुधवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. सन २०१० साली शेगाव येथे एका कार्यक्रमात चिथावणी देणारे भाषण केल्याने शेतकर्यांनी शेगावात रेल रोको केल्याच्या त्यांच्यासह ९ जणांवर आरोप आहे.
११ ऑक्टोंबर २०१० साली शेगाव येथे शेतकरी संघटनेने शेतकर्यांचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डात पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या भाषणातून शेतकर्यांना लगेच रेल रोको सुचविल्या नंतर हजारो शेतकर्यांनी शेगावचे रेल्वेस्थानक गाठून ३ तास रेल रोको केले. या प्रकरणात शरद जोशी यांच्या सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वामनराव चटप, रवी देवांग, नामदेव जाधव, अनिल घनवट, सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे आणि कैलास फाटे अशा ९ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
तेव्हा पासून या प्रकरणातील ४ आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होते. बुधवारी या फरार आरोपींपैकी शरद जोशी, वामनराव चटप, रवी देवांग हे पोलीस स्टेशनला हजर झाल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. समाधान कणखर रा. वरखेड यांनी शरद जोशी यांची जामीन घेतली. या प्रकरणात अनिल घनवट रा. श्रीगोंदा जि. अहमदनगर हे आरोपी सद्या फरार घोषित केले आहेत.
याच बैठकीत मा. शरद जोशी यांनी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या नव्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे;
स्वतंत्र भारत पक्ष : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पुढील प्रमाणे;
१ श्री. अॅड दिनेश शर्मा (वर्धा) प्रदेशाध्यक्ष
२ सौ. सरोजताई काशीकर (वर्धा) प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी)
३ श्री. सुधीर बिंदू (परभणी) प्रदेशाध्यक्ष (युवा आघाडी)
४ श्री. गंगाधर मुटे (वर्धा) महासचिव
५ श्री. अनिल धनवट (नगर) उपाध्यक्ष
६ श्री. समाधान कणखर (बुलडाणा) उपाध्यक्ष
७ श्री. गुलाबसिंग सुर्यवंशी (धुळे) उपाध्यक्ष
८ श्री. उत्तमराव वाबळे (हिंगोली) उपाध्यक्ष
९ श्री. प्रभाकर दिवे (चंद्रपूर) उपाध्यक्ष
१० श्री. विजय निवल (यवतमाळ) उपाध्यक्ष
११ श्री. महमूद पटेल (सोलापूर) सचिव
१२ श्री. दिलीप भोयर (अमरावती) सचिव
१३ श्री. शिवाजी शिंदे (नांदेड) सचिव
१४ श्री. निवृत्ती कर्डक (नाशिक) सचिव
१५ श्री. श्रीकृष्ण उमरीकर (परभणी) प्रसिद्धीप्रमुख
१६ श्री. संजय पानसे (मुंबई) कोषाध्यक्ष
१७ सौ. अंजलीताई पातुरकर (हिंगोली) प्रचार प्रमुख
१८ श्री अॅड प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद) प्रचार प्रमुख
१९ सौ. जोत्स्नाताई बहाळे (अकोला) कार्यकारीणी सदस्य
२० श्री. सतिश देशमुख (अकोला) कार्यकारीणी सदस्य
२१ श्री. सुनिल शेरेवार (अमरावती) कार्यकारीणी सदस्य
२२ श्री. राजेंद्रसिंह ठाकूर (गडचिरोली) कार्यकारीणी सदस्य
२३ श्री. आनंद पवार (परभणी) कार्यकारीणी सदस्य
२४ श्री. बाबुराव गोरडे (जालना) कार्यकारीणी सदस्य
२५ श्री. कडुअप्पा पाटील (जळगाव) कार्यकारीणी सदस्य
२६ श्री. शीतल राजोबा (सांगली) कार्यकारीणी सदस्य
२७ श्री. माधव मल्लेशे (लातूर) कार्यकारीणी सदस्य
२८ श्री. विठ्ठल पवार (पुणे) कार्यकारीणी सदस्य
***********************
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
शेतकरी तितुका एक एक!
पाने