नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अनुभव कथन
शेतीत राबताना आलेले कर्जबाजारी पणाचे अनुभव.
कर्जाचं दुःखणं
भारतासारख्या विकसनशील देशाची वाढती लोकसंख्या पाहता अन्नधान्यासाठी शेती करणे ही काळाची गरज आहे. सध्या पीक उत्पादनासाठी जमीन व पाणी हे गरजेचे आहे. पाणी आणि जमीन निसर्गाने मानवाला उपलब्ध करून दिलेली अत्यंत महत्त्वाची साधन सामुग्री आहे. पाणी हे जीवनाचं सार आहे . प्रत्येकांनीच त्याचा जपून वापर करायला हवा . पाणी जर जपून वापरले नाही तर भविष्यकाळात पाण्याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे . पीकांच्या वाढीसाठी पाणी हे हवेच. बहुतांशी शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात.
शेतकरी अतोनात कष्ट करूनही काळजीत असतो. पावसाची अनियमितता, अतिवृष्टि, यांमुळे पीकांच्या वाढीवर व उत्पादनावर अनेक प्रकारचे परिणाम होत असतात. कसं बसं पीक आलं तरीही त्याला शेती करावीच लागे. शेतकरी कितीही हालअपेष्टा भोगत असला तरीही तो सर्व जनतेला अन्नपुरवठा करत असतो. त्याला स्वतःच्या काळजी पेक्षा दुस-र्याँची काळजी मोठी वाटते म्हणून तो कितीही त्रास झाला तरी धान्य पिकवून करोडो लोकांची भूक भागवतो. काबाडकष्ट करून पै - पै चा हिशोब ठेवून , स्वतःची हौसमौज बाजूला ठेवून दिवसरात्र उन्हातान्हात घाम भुईत सांडून कुटुंब सुखी राहावं म्हणून संसाराचा गाड़ा हाकत असतो.
पीकांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करतो. महागडया खते, बी- बियाणे , किटकनाशक औषधांचा वापर करून शेती करतो. एवढे करूनही जर ऐनवेळी पावसाने दगा दिला तर पीकांचे भले मोठे नुकसानही होई. पण काय करणार? तो एकप्रकारे जणूकाही मातीसोबत जुगारच खेळत असतो. बिन भरवशावर हाती पीक येवो न येवो पण तो आधी मातीत पैसा खर्च करतो. नशिबाने जर थोडेफार पीक आले तर त्यालाही बाजारात कवडीमोल भाव मिळतो. त्याला पीक विक्रीसाठी प्रत्येकवेळी व्यापाऱ्याचेच पाय धरावे लागे. दलाल, मध्यस्थ अन् व्यापारी या तिघांच्या कैचीत तो नेहमी सापड़ला जात असे.
या साऱ्या प्रकारामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य, लग्न समारंभ इत्यादी खर्च भागविणेसाठी त्याला आर्थिक चणचण भासते. त्याला काय करावे सुचेनासे होते शेवटी न राहवून तो सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी धाव घेतो. कर्ज घेण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. मोठ्या मुश्किलीने कर्ज घेतो पण ते फेडता येईल की नाही या विवंचनेत असतो.
तो जमिनीच्या छटाक तुकड्याला जीवापाड जपत असतो. दरसाल येणाऱ्या पीकाकडे पाहुन मुलांना वह्या -पुस्तके- घेईन असे वचन देतो, पण पीकाच्या मळणीआधीच अवकाळी पाऊस येतो अन् तोंडाजवळ आलेला घास एका क्षणात निसटून जातो. सावकारी तगादा सतत झोप उडवून नेतो. मात्र पीकांच्या भरवशावर तो दरवर्षी वायद्यावर वायदा देत असतो. बाकी काहीच करू शकत नाही.
आता तुम्हीच सांगा शेतमालाला वाजवी भाव केव्हा भेटेल? पेरणीचे दिवस येत नाहीत तोच सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी बहुतांशी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. वर्षभराच्या पीकांच्या भरवशावर दमड़ी दमड़ी कर्ज फेडता फेडता त्याला त्याचा जीव मेटाकुटिला येत असे. पण कर्ज काही फेडता येत नाही. घेतलेल्या कर्जावर सावकाराने लावलेल्या दामदुपटीच्या व्याजाच्या कर्जातच तो पुरता कायमचाच कर्जबाजारी होऊन जातो. ह्या कर्जाच्या विळख्यात तो हळूहळू गुरफटला जातो. वाढलेले चक्रव्याज पाहताच त्याला अक्षरशः पुढचा मार्गच दिसेनासा होतो. काय करावे? कर्जाची परतफेड कधी आणि कशाप्रकारे करावी? हा मोठा गहन प्रश्न त्याच्या समोर उभा राहे. उभ्या ठाकलेल्या त्याच्या प्रश्नातच त्याला त्याच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचं दुःखणं दिसे. त्याच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचं दुःखणं काही संपता संपेना. खुप विचार करूनही त्याला कोणताच मार्ग दिसेना . शेवटी नाइलाजास्तव त्याच्याजवळ आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही. आजपर्यन्त कर्जबाजारी मुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे.
वर उल्लेखलेल्या याच कर्जबाजारीपणाचे अनुभव प्रत्यक्षात शेती राबत असताना आम्हास आलेले आहेत. मी आठवी इयत्तेत होते तेव्हापासून
वडिलांसोबत शेतीच्या कामात मदत करीत असायचे. त्यावेळी मी स्वतः अनुभवले आहे वडिल कर्जबाजारी कसे झाले ते. आम्ही एकूण दहा भावंडं , आई- वडिल असे एकूण बारा जणांचं कुटुंब. आमचा उदर निर्वाह फक्त शेतीवरच अवलंबून असायचा. त्यावेळी खुपच कठिण प्रसंग ओढवलेला असताना देखिल वडिलांनी त्यावर मात करीत आम्हा भावंडांना शिक्षित करण्याचा निर्णय घेतला.
आधीच गरीब परिस्थिती त्यामध्ये हा आम्हा शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नसे. आम्ही सर्व भावंडे शेतात राब राब राबायचो. तरीही नशीब काही साथ देईना. अक्षरशः उपासमारची वेळ यायची. तरीही आम्ही डगमगलो नाही. कारण शेती केल्या शिवाय दूसरा कोणताच पर्याय नव्हता. बरेच प्रयत्न करूनही हाती मात्र पैसा येत नसायचा. त्यावेळी वडिलांना खुप वाईट परिस्थितीशी सामना करावा लागला. मुलांचे शिक्षण , आजारपण तसेच इतर काही गोष्टी या साऱ्यांचा खर्च भागवता भागवता खुपच दमछाक व्हायची. काय करावे ? हा खर्च कसा भागवायचा? या अशा अनेक प्रश्नांच्या विवंचनेत पडायचे. खुप प्रयत्न करूनही हाती काहीच उरायचे नाही. खुप विचार करून शेवटी नाईलाजास्तव वडिलांनी कर्ज घेण्यासाठी सावकाराकडे धाव घेतली. दामदुपटीने कर्ज घेऊन ते सर्व बाबी पूर्ण करीत होते. मुलांसाठी सतत राब राब राबून छटाक तुकड्याला जपत होते. दरवर्षी आम्हाला वह्या, पुस्तके, कपड़े घेण्याचीही त्यांची ऐपत नसायची . पीक येईल त्यावरच आमचं सर्व अवलंबून होतं. पण पीकाच्या अपुऱ्या उत्पन्नामुळे प्रत्येकवर्षी हार खावी लागायची.
मुलांचे शिक्षण , आरोग्य व इतर खर्च करता करता घेतलेले कर्ज काही देणे जमत नसायचे. शेवटी सावकारी कर्जाचा तगादा सतत झोप उडवून न्यायचा. खरोखर चारही बाजूंनी वडिलांना कर्जाच्या विळख्याने लपेटुन घेतले होते. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. त्यावेळी वडिलांच्या डोळ्यात ओघळत असलेले ते कर्जाच्या दुखण्याचे अश्रु आजही मला आठवतात.
खरेच त्यावेळची किती बिकट परिस्थिती होती. शेतात राब राब राबुनही आमच्या वाट्याला फक्त नि फक्त कर्जाचं दुःखणंच यायचं . दमड़ी दमड़ी कर्ज फेडता फेडता कर्जाचा डोंगर वाढतच जायचा. पण कर्ज काही फेडता येतच नसायचे. आधीच अथराविश्व दारिद्रय त्यात हे कर्जबाजारी झाल्याचं दुःखणं. अशावेळी डोक्यावर वाढलेले कर्ज कधी आणि कशाप्रकारे फेडायचे या गहण प्रश्नात आई वडिल अक्षरशः हवालदिल व्हायचे. त्यांची खुपच दयनीय अवस्था झाली होती. ह्या कर्जापायी त्यावेळी आईने तर चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हे माझ्या पाहण्यात येताक्षणीच मी तिला आत्महत्येपासून रोखु शकली. हा प्रत्यक्ष प्रकार माझ्या अनुभवास आला.
बहुतांशी शेतकरी जर कर्जाच्या विळख्यात एकदा का सापडला तर तो त्या कर्जाच्या विळख्यातच मरतो . एकंदरीत हा सर्व प्रकार अनुभवला तर ऐकिवात आलेले हे वाक्य अगदी खरे आहे की, शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जातच मरतो.
आयुष्यभर कर्जाचं दुःखणं असून देखीलही प्रत्येक शेतकरी मातीचे ठेकुळ फोडत फोड़त घाम भुईत सांडत असतो अन् चिल्ल्यापिल्ल्याईच्या सुखासाठी जीवाचा डाव मांडत असतो .
सौ. अनुराधा धामोडे
वाणगाव(पालघर).
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने