नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
1.कुबेराचं मोल
पाभारीच्या संगतीनं
झाली स्वपनांची पेर
काकरीच्या रेघमधी
उद्या फुलेलं शिवार
गर्भ बीजाच्या अंतरी
जीव तयात फुंकला
बाळ कधीचा भुकेला
पान्हा आभाळी फुटला
खरपते माय माझी
तन खुरप्यात येई
काळ्या आईचा पदर
नीट सावरुन घेई
मोट चालते सैराट
बारं टाचतं साऱ्याला
गंध कोण्या शिवाराचा
पेच अजूनी वाऱ्याला
काळ्या आईची ही माया
काळजात खोलखोल
ओंजळीला लेकराच्या
येई कुबेराचं मोल!
2. सांगून गेले बाबा
सांगून गेले बाबा
जगी गाथा जगण्याची,
' महारोगी कुणी ना येथे
ही सेवा महाप्रभूंची'
घनदाट दाटला होता
काळोख मनाच्या भवती
व्यथा प्रथेच्या आणिक
काजळी तयाची होती
लक्तरे अशी शरिराची
मनेही झडली होती
पाहुनी मास सडलेले
धरणीही रडली होती
बहुवाट ' विकासाची'
तूच दाविली बाबा
तव 'प्रकाश' उजळील आता
नव्या युगाचा गाभा!
3. पेरणी
काकरीच्या रेघमधी
गुंतला ग जीव
उगवत्या मनालाही
फुटल्याती पेव
पाभारीच्या लगोलग
बाई मोघण्याचा साज
सात जलमाचं फेरं
मन घालतया माझं
सर्जा राजाच्या नावाचा
डंका रानोमाळ होई
आसुडाच्या कौतुकाचं
हसु जुपनीला येई
तिफनीच्या कुंचल्यानी
नक्षी काढली भुईला
रंग येईल ग नवा
धरतीच्या पदराला
मनचिया मळ्यामधी
झाली स्वपनांची पेर
हिरव्याच्या मोडावानी
स्वप्न उगवंल सारं.
4. हिरवं सपान
उन्हं कलली ग सये
जरा इसाव्याला जावू
कांदा-भाकरीच्यामधी
रुप इटुबाचं पाहू
दिल उगवला तव्हा
काम अगतीन केलं
पात उधळली बाकी
दल खुटानाला आलं
खुरप्याची जीब बाई
ढुशी मारती रानाला
असा फुटलं ग पान्हा
काळ्या आईच्या मनाला
पाटाच्या पाण्यामधी
काय तुला ग दिसतं
शालू हिरवा लेवूनी
हिरवं सपान फिरतं
तिसऱ्या ग पहराला
मोट रायाची सुटंल
किती वारलंया काम
त्याच्या डोळ्यात दिसंल
दिस जाईल कलून
ओढ लागंल घराची
असती ग माया मोठी
पाखराला घरट्याची.
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)
पाने