ग्रामीण जीवन : एक मागोवा
आपला देश खेड्यांचा देश आहे. आपल्या देशात शहरांपेक्षा खेड्यांची संख्या जास्त आहे. गाव, खेडे म्हटले की आपल्या डोळ्यांपुढे एक सुंदर निसर्ग चित्र तयार होते. ज्याप्रमाणे शांत अचल पाण्यामध्ये चंद्राचे गोड प्रतिबिंब दिसते त्याचप्रमाणे गावाचे नयनरम्य प्रतिबिंब, स्वरूप सृष्टीच्या कुशीत वसलेले दिसते. गावातील मन प्रसन्न करणारे मंजुळ ध्वनी कानी ऐकू येऊ लागतात. गाव खेड्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेती करणारा शेतकरी हा देशाचा कणा आहे. मानवाच्या नजरेत शेती करणारा शेतकरी असेल परंतु निसर्गाच्या दृष्टीने तो बळीराजा आहे. अन्नधान्य पिकवून देशाला अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण करणारा शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा प्रमुख घटक असून शेती हा त्याचा आत्मा आहे. वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे गावे स्वयंपूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे कारण देशाचे खरे चित्र शहरावरून नाहीतर गाव खेड्यावरून कळते. गाव समृद्ध तर देश समृद्ध.
देशाला समृद्ध करण्याचा मार्ग हा गावातून जातो हे वास्तविकता आहे. गावातील शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध. आज विकासाच्या नावावर शहरांकडे फार लक्ष केंद्रित आहे परंतु त्या मानाने ग्रामीण भागांचा विकासाचा वेग फार कमी आहे. असे दिसतात की विकासाची उलटी गंगा वाहत आहे. व्यवस्था ही शेतकऱ्यांना प्रतिकूल आहे, परिणामी शेती कसणारा शेतकरी हतबल होत आहे. शेतकऱ्याला कष्टाचे अपेक्षित फळ मिळत नाही आहे ही वास्तविकता आहे. निसर्गाशी लढणाऱ्या बळीराजापुढे वामनरुपी व्यवस्था आजही तशीच उभी आहे. आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगात शेतीकडील कल हा कमी होत आहे का? आजची तरुण पिढी शेती करण्यापेक्षा एखाद्या कंपनीमध्ये काम करणे पसंद करत आहे का ? ग्रामीण जीवन बदलत आहे कारण तोट्याचा व्यवसाय कोण करायला तयार होणार. पूर्वी शेतीसाठी नोकरीला नकार देणारा शेतकरी बाप आज त्याच्या मुलाला शेती कसन्या ऐवजी कंपनीत कामाला पाठवणे पसंत करतो. हा तोच शेतकरी बाप आहे ज्याच्या शेतामध्ये चार चौघांना रोजगार मिळतो.एवढी अनास्था शेती विषयी का येत आहे, खरोखरच विचार करण्याबाबत बाब आहे.
आधुनिकीकरणामुळे शेतीतील उत्पादन वाढले असे आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. मग शेतकरी सदोष शेती करतो काय? नाही कारण उत्पादन खर्च आणि मिळकत याचे गुणोत्तर आजही तेच कायम आहे. एकीकडे गावे दिवसेंदिवस ओसाड पडण्याच्या मार्गावर येत आहे तर दुसरीकडे शहरांमध्ये जागा मिळत नाही आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर योग्य त्या उपाययोजना योग्य वेळी करणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्राचा आरसा ही गाव, खेडी आहेत, शहरे नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या कारणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. "चल चल रे आपल्या गावाला राहू नको रे शहराला अन्न नाही तर मरशील उपाशी!" राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कळले ते व्यवस्थेला कळत नसेल काय की कळत असून वळत नसेल? गावाचा आरसा तेथील जनजीवन आहे, गावात राहणारा शेतकरी आहे. राष्ट्राच्या विकासासाठी शेतकरी समृद्ध, स्वयंपूर्ण होणे खूप गरजेचे आहे. इतर सुविधा सोबतच आज गावातील मुख्य घटकाचा, शेती आणि शेतकरी यांचा विचार होणे आवश्यक आहे.
व्यवस्थेला गाव खेड्याविषयी अनास्था न बाळगता राष्ट्राला अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण करणाऱ्या ग्रामीण भागांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा शेतीमधील गोडवा कायमचा निघून जाण्यापूर्वी व्यवस्थेला शेती आणि शेतकरी यांच्या विषयी अनुकूल धोरण अमलात आणणे उपयुक्त आहे. शेतकरी हा ग्रामीण जीवनमान उंचावण्याच्या विरोधात नाही आहे. ग्रामीण विकासाच्या विरोधात नाही आहे. परंतु शेती आणि शेतकऱ्याला केंद्रभागी ठेवून या गोष्टी व्हाव्यात एवढी त्याची साधी आणि सोपी अपेक्षा आहे, त्याची अपेक्षा अगदी संयुक्तिक आहे कारण शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर राष्ट्रसमृद्ध.
- सतीश शंकरराव मानकर
