नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वांगे अमर रहे
'ग्रंथ हेच गुरु' ही उक्ती सर्वांना परिचित आहे. ग्रंथ अनेक असतात परंतु काही ग्रंथ दुर्मिळ असतात.श्री गंगाधर मुटे लिखित 'वांगे अमर रहे' हा लेखसंग्रह अशा दुर्मिळ लेखसंपदेतील एक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 'वांगे अमर रहे' हा लेखसंग्रह लेखकाच्या शेतीनिष्ठ जीवन जाणिवांच्या अस्सल अभिव्यक्तीशी इमान राखण्याचे एकमेव उदाहरण आहे.भारत हा शेतीप्रधान देश आहे मात्र येथील सामाजिक,राजकिय इच्छाशक्ती या प्रधानतेस प्राधान्य देतांना दिसत नाही त्यामुळेच दिवसरात्र घाम गाळून साऱ्या देशातील जनतेला अन्न पुरविणारा अन्नदाता बळीराजा कायम दैन्यावस्थेत राहातो. बळीराजाच्या मनातील घालमेल ,त्याला येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना यावर विचारमंथन करून लेखकाने आपल्या विविध लेखातून प्रकाश टाकला आहे.
श्री.गंगाधर मुटे 'लिखित वांगे अमर रहे' या लेखसंग्रहात एकूण तेवीस लेख समाविष्ट आहेत. यामधील पहिलाच लेख 'शेतकरी पात्रता निकष' वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारा आहे. आजपर्यंत अनेक विभागात कार्य करणाऱ्यांचे व्यावसायिक पात्रता निकष ऐकिवात होते .उदाहरणादाखल डॉक्टर,वकील,इंजिनिअर,शिक्षक ,कलेक्टर यांचे पात्रता निकष सर्वविदित आहेत परंतु शेतकरी होण्याकरिता पात्रता निकष कोणते असावे? या प्रश्नावर लेखकाने सुचविलेले उत्तर म्हणजे समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन असेच म्हणावे लागेल. आजपर्यंत शेतकरी होण्याकरिता लागणारे पात्रता निकष कुणालाच माहीती नव्हते परंतु लेखकाने उत्तम शेतकरी होण्याकरिता लागणाऱ्या पात्रता त्यांच्या खुमासदार शैलीत मांडल्या आहेत.हा लेख वाचून वाचक अंतर्मुख होतात हेच या लेखाचे गुणविशेष आहेत.
'हत्या करायला शिक' या लेखात लेखकाने कृषिप्रधान देशातील शेतकरीपुत्रांची ,शिकल्यासवरल्या शेतकऱ्यांविषयीची,कृषिव्यवसायाविषयीची, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविषयीची, शेतकऱ्यांना काही हजार रुपयांच्या कर्जापायी करावी लागणारी आत्महत्या याविषयीची अनास्था व्यक्त केली आहे. मुळात लेखक उच्च विद्याविभूषित असूनही त्यांनी स्वेच्छेने शेतीव्यवसाय स्वीकारला आहे. शेतकऱ्यांच्या दुःखावर मलमपट्टी करून ,समस्त शेतकऱ्यांना दुःखमुक्त करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्याकरिता लेखकाने सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या
शिक बाबा शिक लढायला शिक।
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक।
या कवितेचा परामर्श घेतला आहे. यापुढे जाऊन ते म्हणतात की,
मांग मांग नको पुढं सरायला शिक।
आत्महत्या नको हत्या करायला शिक।
आणि लेखकाला हीच शिकवण शेतकऱ्यांना द्यायची आहे.
'शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' हा लेख अतिशय वाचनीय आहे. या लेखात शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या आत्महत्या, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले दुःख, यापेक्षाही त्यांच्या आत्महत्यांची झालेली कारणमीमांसा किती वेदनादायी आहे हे विविध उदाहरणांच्या आधारे वाचकांसमोर येते. तसेंच शेतकाऱ्यांविषयीची समाजाची, शासनाची अनास्था, याचे वास्तविक दर्शन होऊन मन विचलित करून जाते. असे अनेक वाचनीय लेख मनाचा तळ ढवळून काढतात. विचार करायला भाग पाडतात. समाजाचे खरे वास्तव आपल्यासमोर उभं करतात.
या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच महिलांच्या व्यथा, वेदना यावर सुध्दा प्रकाश टाकला आहे.
'भोंडला, हादगा, भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा' या लेखातून लेखक भुलाबाईच्या गाण्यांचा संदर्भ देऊन समस्त स्त्रीवर्गाला आपल्या भुतकाळाची यात्रा घडून आणतात. हा लेख म्हणजे शेतकरी कुटुंबातील सर्वच घटक आर्थिक व्यवस्थेपुढे कसे हतबल होतात, त्यातल्या त्यात कुटुंबातील स्त्रीयांना कसा मुकाबला करावा लागतो याचे जिवंत चित्रण आहे अशीच अनुभुती येते. सूनबाईची माहेरी जाण्याची लगबग आणि सासूबाईंच्या मनात असूनही तिच्यासमोरील आर्थिक संकटांसमोर तिची हतबलता लेखकाने खूप खुबीने साकारली आहे. "कारलीचे बी लाव गं सूनबाई, मग जा आपल्या माहेरा", असे म्हणत तिचा माहेरी जाण्याचा बेत तिच्या उपरोक्ष कसा पुढे ढकलला जातो , याचे वर्णन वाचून डोळे पाणावतात. या गाण्याच्या आधारे लेखकाने गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजावून दिलेले आहे. ही लेखकाची हातोटी म्हणजे त्यांच्या लेखनशैलीचा कळस आहे असेच म्हणावे लागेल.
'कुलगुरुसाहेब आव्हान स्वीकारा' या लेखाद्वारे श्री. गंगाधर मुटे यांनी विद्यापीठीय शेतीसंशोधन आणि प्रत्यक्ष शेती याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही हे पटवून दिले आहे.
'अण्णा सेवाग्रामला या ! दारूने अंघोळ करू' हा लेख म्हणजे शिगेला पोहोचलेला भ्रष्टाचार म्हणजेच "जगणे मुश्किल, मरणे मुश्किल" अशी सामान्य जनतेची झालेली अवस्था, आणि आपल्या खुर्च्या वाचविण्याकरिता हतबल झालेली राजसत्ता यावर प्रकाश टाकलेला आहे.
'आता गरज पाचव्या स्तंभाची' हा लेख म्हणजे विधिमंडळ, न्यायपालिका, प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि शेतकरी यांचा परस्पर संबंध व त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दुर्दैव आणि वेदना याचे अभ्यासपुर्ण वर्णन वाचकांच्या ज्ञानात भर टाकण्यास मदत करते. शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करायचे असेल तर पाचव्या स्तंभाची नितांत आवश्यकता आहे ,हे लेखकाचे मत त्यांच्या शेतकऱ्यांविषयी असलेल्या अतिव आस्थेचे द्योतक आहे. या सर्व लेखांमधून एक शेतकरीच शेतकऱ्यांच्या जाणिवा जाणू शकतो हे सिद्ध होते.
श्री.गंगाधर मुटे लिखित 'वांगे अमर रहे' या लेखसंग्रहातील सर्वच लेख वाचनीय आहेत. 'बरं झालं देवबाप्पा', 'प्रक्रिया,उद्योग आणि शिक्षणपद्धती', वर्धापनदिनाच्या निमित्ताने' आणि इतरही अनेक लेखांमधून शेतकरी हाच केन्द्रबिंदु आहे हे जाणवते. शेतीविषयक प्रश्न लेखकाला विचारप्रवृत्त करतात. शेती ही जणू त्यांचा आत्मा आहे अशी जाणीव झाल्याशिवाय राहात नाही.
या लेखसंग्रहातील 'वांगे अमर रहे' हा लेख लेखकाच्या स्वतःच्या शेतीव्यवसायातील एक अनुभव आहे.
या लेखात कॉलेज जीवन संपवून मोठ्या विश्वासाने शेती व्यवसायात पदार्पण करणाऱ्या लेखकाने वांग्याची शेती करून माल बाजारपेठेत नेण्यापर्यंतचे अनुभव विशद केले आहेत. त्यामधून शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किती संकटांचा सामना करावा लागतो,आणि शेवटी "तेल ही गेले आणि तूप ही गेले ,हाती धुपाटने आले" अशी गत होते हे आपल्या अनोख्या शैलीत मांडून वाचकांसमोर आपले अंतर्मन मोकळे केले आहे. म्हणूनच 'वांगे अमर रहे' हे या लेखसंग्रहाचे शीर्षक समर्पक वाटते.
जनशक्ती वाचक चळवळ औरंगाबाद प्रकाशित 'वांगे अमर रहे' या श्री.गंगाधर मुटे लिखित पुस्तकाचे सरदार यांनी तयार केलेले मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि शिर्षकाला साजेसे आहे . मुखपृष्ठावरील गुलाबी, जांभळे, हिरवे वांगे आपली काय किमया दाखवतील याची वाचकांच्या मनात उत्सुकता वाढवितात. कुतूहल निर्माण करतात. पण त्याचवेळी वांग्यामधील अस्वस्थ माणूस , शेतीचं झालेलं माळरान, आणि त्या निर्जन माळरानात एकुलत्या एका झाडावर गळफास लावून अंतिम श्वास घेतलेला शेतकऱ्याचा लटकता देह वाचकांचे मन हेलावून सोडतो.
ISBN-978-81-923259-5-8 असलेल्या या लेखसंग्रहाचे मुद्रितशोधन विवेक देशमुख औरंगाबाद यांनी केले असून याची प्रथमावृत्ती अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले लेखक श्री.गंगाधर मुटे यांनी २२ जुलै २०१२ रोजी वाचकांच्या स्वाधीन केली .
या संग्रहातील सर्वच लेख वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सर्व लेख वाचनीय आहेत.अशीच क्रांतीशील भाषा आणि समृद्ध विचारांची अभिव्यक्ती पुढेही लेखकाच्या लेखणीतून होत राहावी याकरिता मनापासून खूप खूप शुभेच्छा
प्रा. चित्रा कहाते
22,शिवगिरी हाऊसिंग सोसायटी
ओम नगर नागपूर 30
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने