नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तोंडचा घास
झाकड पडलेली. एकट-दुकट उरलेल्या पक्षांचे थवे घरट्याकडे कललेले. रानावनातून गडी माणसं घरी टेकलेले. काही याचे राहीलेले. तर काही येत असलेले. तुळशीपाशी दिवे लागण झालेली. आया-पोरी सयपाकात गुंतलेल्या.
माला ही कशी-बशी उठत-बसत कामं उरकवू लागली. मध्येच धापा टाकू लागली. दमीजल्या गाईगत. कंबरेवरती हात ठेवून असह्यपणाने विव्हळू लागली. जसे कंबरेत अगणिक सुया टोचल्या की काय तशी. " आरे देवा ! असं दुकनं देण्यापरस मरन दे ! ह्या दुकन्याने सारा जीव जंगला. पिसारला. आत्ता नाई सोसत रे ! हे दुकनं..माय वं...आये आये !" कंबरेवरती हात ठेवून अर्धी उभी होतं काळजाच्या खोल विहीरीतून ओरडली. आणि वाकत वाकत म्हाताऱ्या बुढीवाणी स्टिलच्या रँकपाशी गेली. एवढ्यात रँकच्या म्होरं बाहेर असलेल्या आंगधुण्यात टमरेल वाजण्याचा आवाज झाला. तसच तिनं आंगधुण्याकडं पाह्यलं. नवरा आल्याचं तिला कळलं. न् ती पुटपुटली," चाल, माले च्या मांडा लागण...नवरा आला वाटते." म्हणताना चहा ठेवायला गेली.
गिरधर दाजीनं वर्णीतल्या दोरान्यावरचा टॉवेल घेतला. हात-पाय पुसून सयपाक घरात आले. चहा चूल्हीवर उखळत होता. माला बाजूला बसली होती. तिच्या जवळ पाट टाकून दाजी बसले. ह्यांना अज का झालं ? कावून हे असे दिसून राह्यले. नवऱ्याच्या अशा शांत चेहऱ्यावरून अंदाज घेत घटकाभरानं माला म्हणाली," कावून वं असे चूप ? कावून असे नाराज ? का झालं ?"
" का सांगू तुले आत्ता. अम्दा तुह्य अपरेशन झालं नं सारं काही जाग्यावर बसल्यावाणी बसलं. वावराकडं एक मजूर येत नाई. एक मजूर धड भेटत नाई. तुह्या मेळ होता त कसं बसं मजूर भेटे. दुसरं मजूर सांगाचं काम नाई पडे. तू उद्या कशी बशी धावती-पळती ये ! आन् सितादेवी करून घे. कापूस तडाल फुटला. दोन-तीन ही आवडातला. हत्याचा पाणी आलागिन तं....पार सातरा पडन कापसाचा पांढरा ही पांढरा. पक्षासारखा." बायकोले आपल्या नाराजीचं कारण सांगत दाजी बोलले.
" आवं म्या थ्यास दिसी म्हन्लं, का कापूस फुटला असन म्हणून. ...त तुमीच म्हणे,' फुटू दे अजून. मंग एकसोयी बाया सांगून येचून टाकू.' मांगच्याच बस्तरवारी किसन्या म्हणे,' आई बड्डीतला कापूस चांगला फुटला...वेचा लागते. नाई तर पाणीगिन आला. त पार खाली सांडण म्हणून.' पण तुमी काई लक्षच नाई देलं."
" कुठं कुठं माह्य मी लक्ष पुरवू वं. आत्ता थे का ल्हानं हाये का ? बराबरीच वाढतं उढतं पोर्ग झालं. आत्ता त्याले समजाले नाई पाह्यजे का ? का, का करा लागण म्हणून. पण तू मलेच म्हन्ते." दाजी आधी पेक्षा आत्ता जरासे तापले होते. बावरूनच बोलले.
" भलाई बराबरीचं झालं असण वं. पण त्याचं खेळतं. उनाडक्या कराचं मन कुठं थांबलं. तुमच्या एवढे का त्यानं उन्हाळे-पावसाळे पाह्यले का ? का तुमच्या एवढे त्याले अनुभव आले ? तुमी त्याला बापु बेटा करून पुढं घालून कामं करून घ्या. निस्ती टावटाव केल्यानं सारं काई होत नाई. थे म्हन्ते ना, "ज्याच्या घरी टावटाव तितं अस्ते कावकाव" अजून त्याचं झालस का ? जेमतम बारावी त झाली. आणि यंदा बी. ए. च वर्ष." लेका बद्दल शहाणपणाच सांगत. समजावीत काकी बोलली.
" आता कुठं गेलं थे ?" दाजी.
" गेलं हिंगणघाटले."
" कायले ?"
" कायले ? कायच्यासाठी ? त त्यानं काई सांगलं नाई." मालाकाकी.
" गेलं असनं पिच्चर पाहाले....नाई तं कुत्रावाणी दंडाऱ्यायच्या मांग लागून." दाजी.
" जावू द्या दिवसं हाये त्याचे .....हिंडा फिराचे...फिरू द्या !" मालाबाई निर्वाणीचं बोलली.
" जावू दे...तुह्या लेक....तू पाहात बस.....उद्या काई झालं त. मले म्हणू नोको. गाव बराबर नाई...तुले किती येळा सांगतलं. पण तू लेका कडूनच बोलते."
" बरं आत्ता नाई बोलणार झालं......कालच्या कोज्यागिरीचा पाणी यवतमाळाकडं चांगला लोटोपाठ पडला म्हन्ते. कवा आपल्या कडं पडन हातचं नाई आत्ता. पाहा कापूस येचाले बाया ? कापुस गोळा करण्याच्या तळमळीने काकी दाजीले म्हणाली.
" आवं तू यवतमाळाकडं मन्ते. आत्ता आपल्या गावून धोत्रा न् इंझाळा हायेस कितीक दूर ? पण ह्या गावात चांगला दनक्या पाणी पडला मन्ते. मंगा दुपारचा. सारा कापूस खाल्तं सांडला का नं बाप्पा ! कास्तकारानं एक एक बी पोटच्या पोरावाणी जपाची. आन् ह्यानं असं येवून त्याले तुडूवून टाकाची. ह्याले काई कदरच नाई. कास्तकाराच्या मालाची. आन् जिवाची. वर पुन्हा सरकारही ह्याचं रखमचं. बिच्याऱ्या थ्या कास्तकाराचा जीव किती तुटला असण. किती दुकला असनं. एक झाड उभं कराले. रातदिस एक करा लागलं. आण् ह्यानं हे असं केलं. कास्तकाराची भावना कास्तकारचं समजू शकते. नाई सरकार समजू शकत. नं नाही हा निर्दयी पाऊस समजू शकत." हळहळत दाजी कसमसून बोलले. आणि विचारात पडले. गिरधर अम्दाही गुदस्तावाणी होइन. गुदस्ताही तसच झालं. फुटू दे म्हन्ता म्हन्ता. वावर फुटू देलं. आणि एकाकी पाणी येवून पार मातीत मिसळून गेलं. सारं वावर कापसाचं रीकामं झालं. यंदा तरी तसं नाई झालं पायजे. यंदा तरी गांडी भोवतालचं कर्ज फिटलं पायजे. नाई निदान कमी तरी झालं पायजे. आन् हि गुदमरता हटली पायजे. असा दाजी विचारात गुंग पडला होता.
चुल्हीवरचा चहा काकीनं कपात गाळला. आन् नवऱ्यापुढं धरला. " घ्या वं च्या...कायचा इचार करता तं." लटकन झोपेच्या डूलकीतून सावरावं. तसा तो आपल्या विचारातून जागा झाला. आणि हाती च्या ची कप बशी घेतली. गपकन च्या बशीत वतला. गटागटा रिचवून घेतला. न् उठत बायकोले म्हणाला,"माले, कर सयपाक लवकर. मी येतो कापसाले बाया पाहून." नि निघाला बायांचा मेळ पाहाले गावात.
गावापासून दोन कि. मी. वरती गिरधर दाजीची जमिन होती. आठ एकर वलतीची. या जमिनीवर दाजीचं पोट होतं. संसाराची गुजराण होती. यंदा ही दाजीनं या शेतीत संपूर्ण पऱ्हाटीच लावली होती. गतसाली सोयाबीन चांगलं पिकलं होतं. पण भावानं पुर्णता उसन भरून दिली होती. म्हणून या वर्षी बन्द्या वावरात पऱ्हाटीच पिकवाची असं दाजीनं ठरवलं होतं. पण कास्तकारानं चितलेली गोष्ट मनासारखी झाली अस्ती. तर आज कास्तकारानं आत्महत्या नस्ती केली.
दाजीले दोन पोरं होते. एक मोठं मिलटरीत यंदाच लागलं होतं. आन् एक लहान शिकत होतं. पण ह्याचं दाजी संग आडतपाडत खटकत असे. त्यायानं घरात वातावरण अधून मधून जरासं गरम राहायचं. ह्याचा हात कोण्या कामाले लागायचा नाही. घरच्या असो की, वावरातल्या असो. पण मालाकाकी प्रेमाने चोपकारत त्याच्याकून बरोबर कामं घ्यायची. पण काकीलाही पुष्कळ दिसापासुन कंबरेचा अन् छातीचा त्रास होता. तिचा कंबरेचा असह्य होणारा त्रास. तिचं जिवाच्या आकांतानं अर्ध्या रात्री म्हणून नाहीतर उटलं सुटलं केव्हाही विव्हळनं. यानं दाजी जरासे नाराज राहायचे. गंभीर दिसायचे. चिंतेत असायचे. हि दुकन्याची बला दूर सारण्यासाठी बायकोचं अपरेशन केलं पाहीजे. नाई तर उद्या ती कामी पडन नाई. म्हणून दाजीनं पंधरा दिसापूर्वी काकीचं सेवाग्रामच्या हॉस्पिटल मध्ये गर्भ पिशवीचं ऑपरेशन केलं. पोर्गी नसल्याने अन् बहिनही नसल्याने कशी-बशी काकी सयपाक पाण्याच आपल्या हलक्या-फुलक्या हातेने जेवढं जमते. तेवढं करत असे.
ऑपरेशनच्या आधी काकीचा बायांचा मेळ होता. सोताच्या वावरात निंदन, खुरपण, मळणी, असो की, कापुस वेचनं असो. तिचा मेळ असायचाच. पण तिचं ऑपरेशन झाल्याने सर्व मेळ विस्कटून गेला होता. म्हणून दाजीवर आज अशी मजूर पाहाची पाळी आली होती. म्हणून ते मोठ्या आशेने निघाले होते.
गावात चावडीवर बरेचसे लोकं ह्या त्या शेल्याचे बसायचे. गप्पा गोष्ठीसाठी. तर काही इथल्या मारोती देवस्थानात सामुदायिक प्राथनेसाठी जमायचे. तर काही लोकं जवळच्या खर्रा सेंटरवरती खर्रा खायला उतरायचे. कोणी पाणीपुरी खासाठी बाजूच्या गुपचूप कॉर्नरवरती हौसेने यायचे. ज्या बायंकाचे कापूस वेचणीचे मेळ होते. त्यांचे नवरे हमखास इथे असायचे. म्हणून त्यांना विचारण्यासाठी दाजी चावडीवर पोहचले.
पुढं असलेल्या गुपचूप टपरीवरून गुपचूपवाल्या जुगाभाऊचा ऐयनास कानपटलावर आवाज आला," येनं गा गिरधर दादा ! ये लय दिसाचा आला गा ? कोणी कडं आला तं ?"
" काई नाई कापूस येचाले बाया पाहासाठी आल्तो. पक्का फुटला कापूस. लवकर नाई येचला. त नासाडी होईन म्हणून आलो." दाजीनं येण्याचं कारण सांगितलं.
" हो गा ! पण हे अभाळ दोन-चार दिस झाले. घोर-घोर करत हाये. कवा येइन हातचं नाई. माहा पण भाय कापूस फुटला. मले ही पाहा लागते. बाया." जुगा म्हणाला.
" मह्यन्याभरा आंधी ह्यो पाणी पडाले पाह्यजे होता. पण तवा नाई आला. आण् आत्ता अगाऊच बिनकामाचा जीव टांगणी लावून राह्यला." जुगाच्या बाजूनं असलेला बंडूकाका चिंतागती होऊन उद्गारला.
" हो नं गा. पाह्यनं....यंदा इरीले पाणी आलं नाई. पायजे तसं. गहू, हरभरा कसा होइन. काई समजत नाई सालं. माह्या इरीले आत्ताच रातभरात छातीभर फक्त पाणी येते. कालच मी तोडून पाह्यलं वरच्या आवडात....मुरमाटीत. पण आत्ता ह्यो आपल्या डोयाले पाणी आणनार हाये." जुगा असा गहीवरून बोल्ला. न् दाजीच्या डोळ्याले चटकन चटका बसल्या सारखा झाला. डोळ्यांच्या सांदीत खळखन पाणी भरलं. तशाच डोळ्याने जुगाकडं पाहात बारीक आवाजानं म्हणाले," जुगा कोन्त्या बायांचा मेळ हाये का रे खाली ? कोन्त्या भेटन का कापसाले ? कोणाकडं जावू ?"
" दादा, मले माईत तं नाई गा तेवडं. कारण साऱ्यांचे कापसं फुटले. सारेचं बाया पाहात हाये. आत्ता मी का सांगू तुले ? तू जावून पाह्य बायांच्या घराकडे." असं ऐकून दाजीच्या छाताडात धडधड सुरू झालं. आत्ता आपल्याले कोन्त्या बाया भेटन ? आज बाया नाई भेटल्या आन् रातचा पाणी झालागिन त झालं. बोंबलाचच काम हाये. विचारात दाजीची भटकंती चालू झाली. तसाच बंडूकाकानं शर्टाच्या खिशातला खर्रा काढला. आन् दाजीले म्हणाला," घे गा गिरधर !" तसेच दाजी विचाराच्या भटकंतीतून बाहेर पडले. आन् चिमूटभर खर्रा बंडूकाकाच्या हातावरचा तोंडात टाकला. तो ही टाकल्या टाकल्या कडू वाटला. असा हा खर्रा कडू का ? म्हणूण त्यांनी बंडूकाकाला विचारलं," कवाचा होये गा खर्रा ?"
" आगा आत्ताच तुह्या म्होयरं घेतला...विचार जुगाले."
न विचारताच जुगा," हो..दादा..आत्ताच घेतला."
" हो, का नाई मले कडू वाटला. म्हणून म्हन्लं."
" वाटते कधी कधी तब्बेत बराबर नसल्यावर." बंडूकाका दाजीचा चेहरा निरखत बोलला. हे ऐकून दाजीले वाटलं. आपली तब्बेत त बरी हाये. मंग हा खर्रा असा कडू कावून वाटू राह्यला. काई विपरीत त घडणार नाई ना ? का कोणी जाणार हाये...कुटूंबातलं ? हृदयाचे ठोके पुन:पुन्हा जोरजोरात मेंडकीसारखे धडधडू लागले. कसनुसं दाजीला वाटू लागलं. इथून आपल्याला आत्ता निंघा लागते. असा विचार करत दाजी बोलले," बरं येतो मंग. बाया पाहून." म्हणतांना निघाले. देवस्थान कडल्या रस्त्याने. एवढ्यात देवस्थानातून सामुदायिक प्रार्थना आटोपून काही माणसं बाहेर पडले. यात गुणाबाईचा नवरा- रामराव नजरे पुढं आला. तसेच दाजी रामरावकडे कलले. आन् रामरावचं ही अवधान दाजीकडं गेलं. तसाच तो बोलला," का गिरधरराव देवस्थानात आल्ते का ? का कुठं चालले ?"
" तुमच्या घराकडचं निंगालो होतो. बरं झालं तुमीच भेटले."दाजीचं असं बोल्न ऐकून रामराव गोंधळला. व गोंधळत त्यानं विचारलं,"घराकडे कायले जात होते का बा ?"
"तुमच्या घरवालीचा मेळ हाये का खाली ? माह्या, कापूस येचाचा होता ?"
" नाई गा गिरधर. कालच तिनं होका घेतला. निळकंठ पाटलाचा." असं ऐकून दाजी काहीसे गळले. पुर्वीच्या नाराजीत पुन्हा भर पडली. आन् पुन्हा दाजी नाराज झाले. छाती धडधडत होती. तिच्या धडधडण्याचा वेग जरासा वाढला. ऐयनास उत्तरेकडे विजा चमकू लागल्या. वावराकडं विजा चमकत दिसतांना. दाजी पुन्हाही काळवंडून गेले. व्यथित झाले. भरल्या उराने विचारलं," बरं मंग कोन्ता मेळ भेटण येचाले. हाये ध्यानात ?"
" उरकुडकर पुऱ्यात जावून पाहा. तिकडं अम्दा तीन-चार मेरं झाले. त्यातला भेटण तं भेटण एकांदी." हे ऐकत दाजी म्हणाले," बरं मंग जावून पाह्यतो." म्हणत दाजी तिकडे लगबगीने पावलं टाकू लागले.
डोईवरती काळकुट्ट आभाळ धरलं होतं. शुभ्र लुकलूकणाऱ्या चांदण्यांना क्रुर ढगांनी जणू दाबून धरलं की काय ? असं आभाळाकडे पाह्यल्यावर वाटत असे. मात्र कसा-बसा या ढगांच्या पाशातून चंद्र सुटला होता. आणि मंदसा प्रकाश त्या सामटीत सांडत होता. याच सामटीतून दाजी भरभर चालत होते. या सामटीत तेवढाच चंद्राचा उजेड होता. आन् एकाएकी अंधाऱ्या खोलीत उजळलेला दिवा बाळावा. तसा चंद्राचा उजेड ही अचानक मिटला. आन् अवचित ह्या गल्लीत काळंभुक अंधार पडला. असं कसं झालं. ह्या चंद्राले आत्ता झालं तरी का ? मनोमनी म्हणतांना दाजीने आभाळाकडं पाह्यलं. तर काय ? चंद्र, चांदण्या कोणी चोरून नेल्या की काय ? असं त्यांना वाटलं. आभाळातल्या चांदण्या कुठं नाई. चंद्रही दिसत नाई. याचा अर्थ का आभाळ धरलं. म्हणूनच मंगा विजा होये. चंद्र, चांदण्याचा आकाशात पत्ता न दिसता. दाजी पुन्हाही कसेकास करू लागले. या गल्लीतल्या अंधारातून जातांना त्यांच्या मनातही उदासीचा काळोख गडद होऊ लागला. वरती अभाळ धरलं. अजून एक बाई नाई भेटली. कवा भेटण. आन् नाई भेटल्या बाया. आन् हा एकाएकी येवून पडला. त कसं कराचं ? असे नकारात्मक विचार मनातल्या मनात स्वाभाविकपणे फिरू लागले. काळीज वेगाने उठ बस करू लागलं. धडधडू लागंल. गरम रेतीत लाह्या तडफडत फुटाव्या तसे विचार उकळ्या मारू लागले. काळीज तळमळू लागलं. चालता-चालता उरकुडकर पुरा आला.
राघोजी कांबळेच्या घरी दाजी प्रवेशले. राघोजी आपल्या आंगणात बकऱ्यासाठी जून्या पालवायचं चऱ्हाट विनत. आणि सोबतच बिडी वढत होते. तसाच दाजीनं त्याना," रामराम आबाजी" म्हणत मानानं नमस्कार घातला.
" ये गिरधर ...कसं का येणं केलं ?" राघोजीनं दाजीला येण्याचं कारण विचारलं.
" आबाजी, आजी कडं आल्तो. त्यायचा मेळ हाये म्हन्ते ?.... खाली असन तं. पाह्यजे होता. कापूस येचाले. कापूल चांगला फुटला. उंदरं बी मले थ्या दिसी दिसले कापूस दरात नेतांनी. आन् वर असं अभाळ. म्हणून फिरू राह्यलो बायाले. पण मजूरच नाई सापडत हाये.?
" अरे, पण हिचा मेळ त कापसाले हाये सुरू कंट्रोलवाल्याच्या. मंग ह्या कशा येईन. तू दुसऱ्या पाह्य बावा. ह्या नाई येवू शकत." राघोजीचं असं नाईचं बोल्नं ऐकून दाजीच्या छातीत चर्र झालं. आत्ता कुणाकडं जाचं. मनात मटकन विचार रेंगाळला. तसच दाजीनं पटकन विचारलं," कोन्ता मेळ भेटन खाली. हाये काई लक्षात ?"
" नाई नं. तरी पण बोध्द पुऱ्यात जावून पाह्य. भिमाबाईकडं ?" राघोजी.
ऐकताच दाजी ताडकन उठले. आणि तडाक्याने पाय उचलत भिमाबाईच्या घरी आले.
भिमाबाई ही मजूरदारीन होती. बारा महीने ह्याची त्याची मजूरी करून आपली उपजिवीका करायची. गावात हिचाच मेळ जूना नि मोठा होता.
" भिमाबाई हाये का घरी ?"
" हो, या आत." आतून भिमाबाईनं प्रतिसाद दिला. दाजी आत शिरले. बसायच्या आत दाजीनं मुद्याला हात घातला," कापूस येचाले येता का ? हाये का खाली मेळ ?"
"बापुजी, बायातं कापसाले हाये. पंधरा दिस आत्ता काई वाट नका पाहू."
"त्यातल्या काई बाया द्या नं. माह्या कसाही येचनं होते. गावत जे मन्की सुरू असन. त्यापरस पन्नास अगाऊ देतो. पाहा नं."
" पण ज्याच्या कापसाले आमी हावो. तो का म्हणन. तो नाई बायाले जावू देइन. कारण त्यालेही वाटत असन. का, आपला माल लवकर घरात यावा. मंग तो कसा जावू देईन. आपल्या तासावरून. आन् गावगाड्यात ऱ्हा लागते नं. म्हनून असं करू शकत नाई."
" मंग काई उपाय ?" दाजी.
" मेळ त नाई भेटण. पण एक दोन बाया तुमी होये म्हणून मी पाठवते. नविन वाल्या. बाकी तुमी पाहात बसा." ऐकतांना दाजी जराशे सुखावले. आणि लोभाने म्हणाले," दोन-चार भेटन का पुन्हा ?"
" पाह्य गिरधर बापू. साऱ्या गावात कापूस वेचनं सुरू हाये. तुही बायको माह्या मेळात एक-दोनदा आली. आन् आत्ता तिचं अपरेशन झालं. म्हणून ह्या बाया देणं हाये." भिमाबाईचं असं बोल्न ऐकून दाजीला काय बोलू आन् काय नाही. सुचेना. कसे-बसे अवघडत," द्या मंग सकाई बाया पाठवून." म्हणत दाजी तिथून निघाले.
वाटेत बेघारावरचा भोलेश्वर आबा भेटला. म्हणाला," कुठून आला गा गिरधर ?"
"काई नाई कापसाले बाया पाहाले गेल्तो."
"भेटल्या का बाया ?"
"नाईनं गा. हाये का मेळ तुह्या लक्ष्यात एखादी. गावातल्या पेक्षा जास्त देवू मन्की."दाजी.
" आरे गावात मन्की वाढवून जर बाया भेटल्या अस्त्या. तर देवबा मास्तरनं कायले पर जिल्ह्यातून मजूर आनलं अस्तं. त्यानं वाशिम वरून दाहा जोडपे आनले. त्याच्या घरी जागा हाये ठेवाले. त्याची पन्नास-साठ एकर जमिन हाये. म्हनून त्याले परवडते."आबा.
"आत्ता, हिंगणघाट वरून बलवा लागते. बाया."
"बलव बा तू. माह्य का चार एकर. आमी घरीच येचू." आबा बोल्ला नि चालता झाला. दाजीही पुन्हा मजूर पाहासाठी फिरू लागले.
विजा चमकत होत्या. आभाळ गरजत होतं. फक्त बरसाच् राह्यलं होतं. पोटात कावळे भुकेनं अंधारात काव कावत होते. दाजी भुकेला विसरून मजूरांच्या घरोघरी व्याकुळ होवून हिंडत होते. गावातले मजूराचे घर हुडकून काढले. तरी एक ही मेळ दाजीला मिळाला नाई. एवढ्या फिरण्याचं फळ फक्त त्या भिमाबाईनं दिलेल्या दोन बायाच होत्या.
मांगच्या इतवारी आपल्या चूलत भावाच्या बायका म्हणे," भाऊजी, आमाले सांगजा कापुस वेचाले." गिरधर आपण त्यायच्या घरी त गेलोच नाई. चाल जावून पाहू. मनात विचार करत. दाजी चूलत भावाच्या घराकडे वळला.
दाजीचे चुलत भाऊ सात-आठ जणं होते. सात-आठ जनांच्या सात-आठ बायका. हलका-फुलका चांगला एक मेळच होता. ह्या सात-आठ जणी जरी आपल्याले भेटल्या. तरी चार-पाच दिसात आपला कापूस येचनं होते. असं मनात योजत. दाजी मोठ्या चूलत भावाच्या दारात येवून म्हणाले,"झालं का रे शंकऱ्या जेवन ?"
"या भावजी व्हाचं हाये जेवन. ते बाहेर गेले." शंकऱ्याची बायको अदबीनं उत्तरली. दाजीनं आपला मानस तिच्या पुढं मांडला. तशीच ती म्हणाली," भावजी तुमी याच्या आधीच. आमी भोलेश्वर आबाचा होका घेतला. आत्ता त्यायले नाई म्हणून कसं जमन." ऐकताच दाजी अस्वस्थ झाले. नरवसले. हे कशी येळ आली. आज आपली बायको घरी बसली. त सारे गावातले आन् आपल्या घरचे सुध्दा परके झाले. एक ही मजूर खाली नाई. थे होती त सालभर मजूर आपल्या घरी-दारी पडून राहे. पण आत्ता एक बाई सुध्दा कापसाले नाई भेटून राह्यली. विचार करत दाजी उठले. पायात गोळे दाटले होते. तशाच पावलाने चालू लागले.
चालता चालता गजू ऑटो वाल्याचं घर आलं. चाल गिरधर आत्ता ऑटोवाल्याले पाहू विचारून ऑटो बायावर लावून हाये का त. असन त आपण ही सांगून देवू उद्यासाठी. एका टिरीपच्या. विचार करत गजूभाऊला भेटले. "भेटन का उद्या...एखांदी टीरीप बायांची ?"
" भावजी, बायातं बुकींग हाये जी. सात-आठ दिसानं भेटनं."
" कोणाच्या ऑटो हाये मंग गावात खाली ?" दाजीनं आशेनं विचारलं.
" भावजी, सारेच बाया आणत हाये. एकही खाली नाई. पाणी येईन म्हणून साऱ्यांचीच धावपळ सुरू हाये."
" बरं ठिक हाये." अवघडत म्हणाले. आण् घराकडे वळले. जड पावलांनी. येटारातले कुत्रे दाजीवर जोरजोराने भुंकू लागले. रस्त्याच्या कडेने कोणीच बाया-माणसं नव्हते. सारं सामसुम झालं होतं. गिरधर अज त आपल्याले आपल्या येटारातले कुत्रे पण वळखून नाई राह्यले. गावात मजूरासाठी फिरलो. तवाही कोणीच आपल्याले भेटलं नाई. "हाssड् हाsssड् हेss साले गावात राह्यते का कुठं राह्यते रे ! बैताड वानाचे येटारातल्या मानसाले वळखत नाई." कुत्रायले दपटत, गप करत दाजी घरी पोचले.
टि. व्ही. वर चित्रपट सुरू होता. समोरच्या पलंगावर किसन्या झोपी गेलेला दिसला. आन् बाजूलेच मालाबाई ही आडवी झालेली दिसली. दाजी तसेच बायको जवळ आले. व हाताने स्पर्शत म्हणाले," आवं उठ न वं. जेवूण घे. मंग झोप ?" मालाबाई नुकतीच निजली असावी. नवऱ्याचा आवाज येत. जागी झाली व म्हणाली," चाला, जेवाले. धूवा हात. पसरू नोका असे ?"
"जा तू जेवून घे. मले भूक नाई. मी झोपतो आत्ता."
"मंग मले कायले उठवलं. मीही झोपते." म्हणत मालाबाई पुढ असलेल्या आपल्या दिवाणवर गेली. आन् तितं ती पसरली.
" आवं जेवून घे....गोळ्या घे...माह्य मूड नाई साजरं...म्हणून मी नाई जेवत..तू जेवून घे...कायले सोताचा पोटमारा करते."
"जेवाचं अस्त. त कवाचीच जेवली अस्ती. लगन झालं तईपासून कधी तुमाले टाकून जेवली का ? आन् आत्ता जेवा म्हन्ते. नवऱ्यायले बाईचं पेटतं काळीज कधी दिसतच नाई. सारे माणसं सारखेच राह्यते. थे म्हन्ते ना," नवऱ्याले नाई काळजी, न् बायको दिवं पाळती." आपली बायको आपली किती वाट पाहाते. आपल्यावर किती जीव लावते. आपली किती सेवा करते. याचा कधी विचार तरी केला का ? का कवा जाणीव तरी झाली. माह्या जीवाची. दोन घास अगाऊ धकते माणूस डोयापुडं जेवलातं. पण तुमचं तसं नाई राहात. मूड खराब झालं का. मी नाई जेवत. मंग बायको अर्ध्या पोटानं उपाशी कावून नाई मरत. जा मी नाई जेवत. न् नाई गोया घेत. मरू द्या अशीच." फणकाऱ्याने नाकाचा शेंडा मुरडत नवऱ्यावर रूसत-फुगत मालाबाई पापण्या वलावत म्हणाली. तसचं दाजीले भडभडून आलं. डोळ्यातून धारा सांडू लागल्या. "आवं मराचं नाव नोको घेवू. साधं तुह्य अपरेशन झालं. आन् मजूरायनं पाठ फिरवली. तू मले सोडून जाशीन त कसं होईन. तू त माई लक्षी हाये. चाल जेवाले. चाल रडू नोको." दाजी रडत रडत व्याकुळपणे म्हणाले. मालाबाई त्यांच्या डोळ्यात आपल्या बद्दल किती प्रेम हाये. ते पाहात हर्षाने उठून डोये पुसत ताटं वाढाले गेली. दाजीनं डोळे पुसले. आण् दोघे जेवू लागले. "भेटल्या का वं बाया ?" मालाबाईनं घास चघळत विचारलं.
"बन्दा गाव फिरलो फक्त दोन बाया थ्या भिमाबाईनं देल्या. बाकी एकही नाई भेटली. तू यंदा बरी नाई. म्हणून अशी परिस्थिती आली."
"एकाद्या याटोवाल्याले नोये सांगाचं का. का हिंगणघाटवरून बाया आन म्हणून."
"आवं याटो वाल्याच्याही घरी गेल्तो. पण थो खाली नाई. थो ही रोजच बाया आनते नं. गावातले सारे याटो बायावरच लागून हाये."
" बरं मंग जावू द्या. थ्या दोन बाया. आन् एक मी. आन् तुमी. आपणच येचू. उद्याच्या दिवस किसन्याले कालेजले नोको जावू म्हणू. त्यालेही लावू. येचाले."
" लय हुशार हाये वं. तब्बेत तुही जास्त झाली म्हन्जे बसतो. मंग मी पैसे लावत. शानपना जास्त करू नोको. तू फक्त सितादेवी कर आण् चूपच्याप घराकडं ये." दाजीचं असं बोल्न ऐकून मालाबाई गप बसली. तिला ही काय करू न काय नाही. सुचेना. पण दाजीच्या अशा बोलन्याने ती सुखावून गेली. पण तळमळ कापसाची सुरूच होती."बांधून ठेवलं का ? सितादेवीचं ?" दाजीनं हात धूत विचारलं. "नाई. आत्ता बांधतो."
"बांधून ठेव. उद्या सकाई. मंग टोपलं उचल का जाचच राह्यते." म्हणत दाजी आपल्या सारतीवर गेले. नुकतच आंग टाकलं न् डोळे लागले.
दिवस अंधारून उगवला. सुर्याला ढगात घेवून. चारी दिशांना काळ्या ढगांनी हजेरी लावली होती. दाजी उठल्या खाटंचे लगबगीनं बंडीनं वावराकडं निघाले. तर त्यांना पांदीनं जरासा शिरवा झाला असं दिसलं. पण गावात एक ही थेंब पाऊस पडला नव्हता. "बरं झालं बाप्पा ! शिरवाच झाला. नाईतं आली होती आप्पतं." भुईवर थेंबांच्या सड्याकडं पाहात दाजी पुटपुटले. आणि जराशा जोमाने बैलांचे कासरे हलवले. तसे बैलं तडाक्याने टपटपत पळू लागले. तसा तसा शिरवा पुढं दाट झालेला दिसला. पांदिच्या कडेनं चिखलं झालेला. खासराचे चाकं जड होत चाललेले. भोवतीच्या वृक्ष-वेलींवर थेंबाचा शिडकाव शिंपडलेला. तसा आंगावरती सरकन काटा शहारून आला. छातकाडात धाकधूक सुरू झाली. जसी जसी बंडी वावर जवळ करत होती. तसी तसी धाकधूक ओलावा पाहून वाढत होती. तस तसे अंगावरती कापरे उठत होते. हात-पाय लवरलवर कापू लागले होते. मनामंदी नाना तऱ्हेचे विचार डोकावत होते.
गिरधर पाणी गावात नाई आला. पाणी त इकडं झाला. असाच पाणी जर आपल्या वाव..नाई नाई नाई नाई. आपल्या वावरात नसण झाला पाणी. कशा वरून म्हन्ते गिरधर. इतून आपलं वावर जेमतेम कासराभर राह्यलं. तरी तू म्हन्ते का, आपल्या वावरात पाणी नसण झाला. देवा, नसण झाला पाऊस हे खर असू दे ! असा मनाशी बोलत बैलं हाकलत होता.
वावर पांदीपासुन दोन वावरावर आत होतं. पांदीच्या अवती-भवती जे वावरं होते. त्या वावरातल्या पऱ्हाट्या, तुरी चिंब पावसाने भिजून होत्या. बंडी पादीवरून खाली वावराकडे उतरली. तसं इकडं चित्र विचित्रच दिसायला लागलं. सभोवतालच्या शेतातील तुरी, पऱ्हाट्या अस्ताव्यस्त खाली पडून. जसं की, कोणी त्यांना बुडातून कापून टाकलं की काय तशा. कापुस मातीत पाण्यात भिजून काचोळीवर लावला. की, काय. तसा लोंबकाळत भुईकडं मेल्यागत वाकलेला. कपाशीच्या बोंडांचा तुटून सर्वत्र सातरा पडला होता. अर्धे भुईत मिसळलेले होते. तर काही अपघातात मेलेल्या माणसागत सुन्न पडलेले होते. काळवंडून. पऱ्हाटीचे शेंडे मातीत घुसलेले. जसे त्यांच्या शेंड्यावरती कोणी क्रूर अदृश्य शत्रूने लाथ ठेवली की काय. तशी. लाचार, मलूल झालेली. पानातून थेंब टपटपत होते. की ती रडत होती. कुणास ठावूक. तसच सारं दिसत होतं. क्रूर पावसाच्या तांडवाने सारं रान भयभीत, व्याकूळ असं दिसत होतं. असं चित्र पाहून दाजीच्या काळजात वेगाने धडधड उठली.
मंगान पासून हे चित्र आपण बंडी वरून पाहात आलो. दुसऱ्यायच्या वावरात. आन् आत्ता बंडी सोडून पाह्यतो त हे सारं चित्र आपल्या ही वावरात. आपण उघड्या डोळ्यांनी पाहात हाहोत. का, सपनं पाहून राह्यलो. असं त्यांना वाटत होतं. पाठकाडात कोणी मांगूण अवचित लाथ मारावी. आन् अंधारी यावी. न् पटकन आपण तोंड बुचक्या पडावं. तसे दाजी तना-मनाने हिरमुसून या हबक्याने कोसळले. पाया खालची भुई सरकली की काय ? असं वाटून एकदम त्यांना धक्का बसला. रात्रीची विज वावराकडून गडगडनं. रात्रीचा खर्रा कडू लागणं. यांचा संकेत काय ? ते आत्ता दाजी उमगले होते. खर्रा रात्री कडू लागला. तवाच गिरधर आपण वावरात या लागत होतं. ह्या कडूपणानं आपल्याले बराबर संकेत देला होता. पण आपण आपली मती तवा गहाण ठेवली होती. म्हणून हे असं झालं. आण् गिरधर समजा, तू तवा आला अस्ता त का केलं अस्तं. वाकडं. बन्द्या वावरात तूनं का ताडपत्री झाकली अस्ती ? का टिनंचे पत्रे टाकले अस्ते. आपण काई करू शकत नाई रे ! आपण फक्त काळं वावर हिरवं करू शकतो. पण त्याले संकटापासून वाचवू शकत नाई. आपण फक्त पिकवू शकतो. पण आपल्या मनापरी भाव देवून विकू शकत नाई. असं आपल्या मनासारखं झालं अस्तं. तर कदाचित या जगाचा पोशिंदा असा गळफासी नस्ता गेला.
दाजीनं मनी बोलता बोलता गुडघे टेकवले. पायातलं जणू बळ सरलं की काय. तसे आणि ओरडत म्हणाले, "आला...केलं न तूनं आपल्या मनाचं. फेरलं न पाणी माह्या सपनावर. जवा आशा करो याची. तवा नाई आला. तवा पाठ दावली. आण् आत्ता येवून पोटावरती लाथ देली. झालं शांत मन. तुले कवा चांगला दिसला रे कास्तकाराच्या तोंडचा घास. कवा सुका दुष्काळ देला. तवा उन्हेत पोळून काढलं. आन् आता पाण्यात बुडवून. छिनला नं तोंडचा घास. लय सपन पाह्यले होते रे ! म्हन्लं, अम्दा तरी नापिकी नाई होईन. अम्दातरी पिकनं म्हन्लं, मना सारखं. म्हणून कायचीच कसरत सोडली नाई. पण कायले पिकते. केलं तूनं आपल्या मनाचं. गतसाली भावानं सोयाबीन गेलं. आत्ता कापूस गेला. माहागाईनं बन्दं मेटाकुटीले आनलं. विज पाडून मारूनचं टाकाचं होये. म्हन्जे झनझटच खतम होत होती." असे बेभान होऊन आभाळाकडे पाहात दाजी बोलत होते. डोळ्यावर पाणी आलं होतं. का डोळे पाण्यावरून फिरत होते. का डोळे पाण्यात बुडले होते. काही कळेना. मात्र डोळ्यांच्या कोपऱ्यातून धारा ओसंडून वाहात होत्या. आपण हरलो. हरवलो. असं वाटून दाजी वेड्यागत लाचार होऊन रडरड रडत होते. कधी आभाळाकडे पाहात होते. कधी सोताला शिव्या देवून कोसत होते. तस तसे आभाळात पुन्हा काळेकुट्टं क्रूर ढगं दाटून येत होते. आणि दाजीला वाकुल्या दाखवत होते. दाजी ह्या त्या पऱ्हाटीच्या झाडापाशी रेंगाळत होते. जणू पाय कोणी कापले की काय तसे. आणि पागला सारखे पडल्या पऱ्हाटीला उभे करत होते. मातीतला ओला कापूस बोंड न् बोंड वेचत होते. डोळ्यातून पाणी वाहात होतं. आभाळात वीजा कडाडत होत्या. आन् काळे ढगं धावत येवून वाकुल्या दाखवत होते. दाजी डोईवरती दोन्ही तळवे ठेवून कपाशीकडं पाहून रडत होते.
- आशिष वरघणे
रा. शिरूड पो. वेळा. त. हिंगणघाट जि. वर्धा
मो. ९३५९६७९०९३
Sent from vivo smartphone
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने