नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
@ गुना @
हेंमत ऋतूने कडक उन्हातही थंड गारवा जानवत होता. वर्षा ऋतु कोरडा गेल्या नंतर शरदाने तुफानी खेळी केलेली त्यामुळे जमिनीतला गारवा तसाच टिकून होता.
हळूहळू रानाला घात येईल तस शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू शाळू हरभरा पेरणीने वेग घेतला. ऊस उत्पादक शेतकरीही रस्त्याकडची घान काडून स्वच्छता करत ऊसतोड येण्याची वाट बघू लागला. तस आमचा कृष्णाकाठ म्हंणजे ऊस बागायत पट्टा . इथल्या शेतात मुख्यत्वे करून ऊस पिकतो. अन् इतल्या माणसांच्या डोक्यात ऋतू परत्वे राजकारणच पिकत. म्हणजे असकी घरटी पुढारी. पाढरा कडक इस्त्रीचा कांजी शर्ट घातका की झाला युवा नेता. घरात कोरड्यासाला फळाकपाणी, हं पण रूबाब मातूर राजावाणी.
सोसायटी पतसंस्था खाजगी सावकार किराणा दुकानदार आम्ही या सगळ्यांच देनकरी. पण आम्हा बागायतदारांची मिरास लय भारी. वर्षभर शेतात एकच पिक ऊस . अन् त्यावर पोसत चाललेली सहकारी कारखानदारी. आता या कारखान्याचा मालक सभासद शेतकरीच पण नावापुता. सगळा मलीदा कारखान्याच्या पुढार्यांना. मग कारखाना पार खाऊन वरबाडून पुन्हा विकत घेऊन खाजगी केला तरी आमचा वाली कोन म्हंणा. मग इथं घराघरातल्या पाढर्या सदर्यातल्या पुढार्याने नुसत लाचारपणे चापलूसी करायची. यावर एक घटना आठवते, माझा बाबा जुन्या तालुक्याच्या गावच्या कारखान्याचा सभासद. कारखान्याची वार्षिक सभा होती. गावातलं काय काळ्या मिशीतलं पांढरं कावळं आदल्या दिवशी घराकडं चक्कर टाकून सभला या म्हणून सांगून गेलेले.भोळा भाबडा बाबा सायकलीवरनचं तर्हाट कारखान्यावर हाजर. पण कारखान्यावर टपलेल्या एका कैवार्याने ही सभाच उधळण्यासाठी शेकड्याने गुंड पैलवान आणलेले. सभासदाची सभा उधळलीच. पैलवान दिसेल त्याला मारत होते.
त्याच्या हातातून वाचलेला बाबा एस आर पी च्या मारात सापडला. माझ्या माजी सैनिक शेतकरी बाबाला पडूस्तर मारलं गेलं सोडवायला मध्ये जाणार्यालाही तसचं बडवलं गेलं. आजही आठवतात आईने व मी पाठ शेकताना पाहिलेले बाबाच्या पाठीवरचे वळ ...
शेवटी आमच्या मुंड्या पिरघाळत हा कारखाना खाजगी करत तो कैवारी खासदार झालायं. त्याने त्या कारखान्याचा धुराडा म्हणे ब्लास्टींग करून बंद केलाय. अन् आम्हा ऊस ऊत्पादकांचा जीव टांगणीला नेलायं. शेतातलं पीक निघे पर्यंत जीवाला घोर नुसता.
सोन्या सारख्या पिकाला चांगला दर मि ळून आमच उखाळ पांढरं होनं लांबच. पण कधी एकदा ऊसाला तोड येत्या असं होतंय.
बॉयलर पेटवून कारखान्यांनी आपला गळीत हंगाम सुरू केलेला . पण यंत्रणा अजून पुर्ण शमतेने सुरू नव्हती. हळूहळू ऊस तळावर तोडकरी जमू लागला होता.
सुदैवाने यंदा पहिलाच ऊसतोडीचा नारळ आपल्या शेतात फुटला. गेल्या वर्षी घरच्याच ब्याने केलेली आडसाली लागन चांगलीच तरारून येना- जानार्याच्या डोळ्यात भरत होती. जो तो म्हंणायचा,
' शिप्यानं जमिवलंय यंदा, लवकर तोड घ्या मजी झालं'.
आण्णाच नियोजन अन् बाप-लेकाच्या चकरा असल्यावर जमणार कसं न्हाय.
ऊसाला तोड सुरू झाली खरी पण पहिल्या दिवशी तीनच कोयते अन् दोन बायका आल्या. असेना का म्हंटलं तोड तरी सुरू झाली. कालच संध्याकाळी थोडा पाऊस पडून भिजलेल्या जमिनीला वाफसा सुटलेला पण थांबून चालणार नव्हते.अर्धा कच्चा खोपटामुळे कालच्या पावसात तोडकर्याची बाजरी , कापडं सग ळा लवाजमा भिजला. तो उन्हाला घालून ते आलेले.
फडात वाड्याला झुंबड उडायची. पण एका ऊसाचे दोन तुकडे अन् एक वाडे पडायचे. पहिल्या दिवशी अर्ध्या खेप भरतीची तोडणी झाली. दोन-तीन हजार खर्चून शेतातून वाहन बाहेर काढण्यासाठी मुरूम टाकून जेसीबीने रस्ता करून घेतला. एका ट्राली सह ट्रक्टर बसावा इतका सोगळा रस्ता केला.दुसर्या दिवशी ऊस तुटलेल्या ठिकाणी वाहन आरू नये यासाठी दोन सरीच्या चाकोरीत ऊसाचा पाला नाचून तुडवून चापून भरत होतो.
दुपारी जेवायला सुट्टी करून तोडकर्यांनी जेवल्यावर ऊस भरायला सुरवात केली. आणि अचानक कुठून ढग एक मोठा ढग भरून आला अन् धोधो कोसळला. मग आम्ही ट्रक्टरच्या ट्रॉलीखाली आसरा घेतला.. ढग मोकळा झाल्यावर दिड ट्रॉलीच ऊस भरता आला. तरीही त्या आठ गुंठ्यातल्या ऊसाच तेरा टन वजन आलं ज्याने माझा उत्साह वाढवला. तिसर्या दिवशी आणखी दोन गडी अन् बायका वाढल्याने त्यांनी त्याच दिवशी वाहान भरती करून गावात गुरुवारच्या आठवडी बाजारला जायचे ठरवले.
मला तोडवाल्यांचा भाषेच खुप कुतूहल वाटायचे. ते सगळे मला खुप आदराने बोलायचे मला गम्मत वाटायची.
'मालक, तुम्ही या जावा घराकडनं आम्ही टुकडा खातो आणि ट्रालीत माल भरायला चालू करतो!'
मला सारखे मालक- मालक म्हणायचे. मी म्हंणलं, " मी कशाचा मालक रावं! मालक घरात हातरूनाव बसला आसलं सुन, नातवंडांची स्वप्न रंगवत! आपण नुस्त बीन पगारी, फुल्ल अधिकारी !"
तस्स मालक शब्दाच मला वावड येवड्यासाठीच वाटतं की, कसणार्या जमीनीचा नावावर सातबारा निघतो म्हणूनच शेतकरी मालक . नायतर वर्षभरातून ऊस पिकवून येणाऱ्या उत्पन्नातून घातलेले भाडवलं वजा जाता मिळालेला मोबदला एखाद्या शेतगड्याच्या वार्षिक मजुरीपेक्षा कमी असेलतर आम्ही कसले मालक ?
मी घरी जाऊन आलो तेव्हा फडात कलेल्या पाल्याच्या चाकोरीवर वाहान भरायला ऊभे होते पण त्यात मोळ्या टाकायला सुरवात केली नव्हती.पाटापर्यंतचा उरलेला ऊसाचा कोपरा पाडूनच भरायला सुरवात करायची असा त्यांचा सुर होता. पण ऊस अधिकच दाट असल्याने त्यांना रान उरकत नव्हत. अशातच आभाळ भरून येत होत. पावसाला सुरवात झाली. सग ळेजण ट्रालीखाली पाल्यात आसरा घेतला. मी विचारलं,
"भरती झालेय का?"
आबा दाबात उत्तरला, 'पंधरा-सोळा टनाच्या खेपचा माल पाडलाय मालक!'
पावसाने निम्मे तोडकरी भिजले होते. रानही चागलंच भिजलेले. त्यामुळे उद्या सकाळी लवकर भरायच ठरवून तोडवाले तळावर जायला बाहेर पडले.
अंधार पडेपर्यंत राखणीला थांबून मीही घरी परतलो
रात्री पडल्या पडल्या झोप लागली अंगावर पांघरूणा घ्यायचीपण सुद राहिली नाही. सकाळी गारट्याने दचकून उठलो.
आवरून शेतात गेलो. हलका हल्का पाऊस येतच होता. त्याची पर्वा न करता तोडकरी मोळ्या उचलून ट्रॉलीत रचत होते. रचताना ट्रॉलीखाली पडणार्या ऊसाच्या कांड्या वेचत होतो. कारण एक किलो ऊसाची किंमत अडीच रूपयं असल्याची जाणीव होती. पाऊस अधेमध्ये कमीजास्त होत होता. पण भरणी सुरूच राहिली. एक ट्रॉली भरली ती खुप कसबीने डायवरने रस्त्यावर काढली. थोडी रस्त्यावर आणून भरली. पावसाने सगळेच गारठून गेलेलो. दुसरी ट्रॉलीही फुल्ल भरली. डायवरने ट्रक्टरला स्टाटर मारला तसं अगावर काटा आला तो फुल्ल रेस करत वाहान बाहेर नेत होता मी हातात गुन्याचा दगड घेवून धावत होतो. चाक बरीच रूतत चालली होती. पण डायवर वेग कमी करत नव्हता. अशा रिमझिम पावसात मला घाम फुटलेला. आम्ही पिकवतो, निसर्ग नेतो अशी अवस्था.आजकुठे सोळा गुंठा ऊस तुटलेला, अजून पस्तीस गुंठा ऊस बाकी होता.
अचानक मुरूम टाकलेल्या रस्त्यावर आल्यावर ट्रक्टरचा वेग मदावला. तसे माझे ठोके वाढत चालले. पुढच्या टायरला ग्रीप मिळेना. ट्रक्टर चे पुढचे तोंड डांबरी रस्तावर उचलून आदळू लागले. मागे मुरमावर घसरणार्या ट्रॉलीच्या चाकाला हातातल्या दगडांनी गुना लावत होतो वरून पाऊस आमच्या नशिबाला गुना लावत राहीला...
© संदीप नाझरे /९७६६६८९४३३.
आमणापूर, ता. पलूस, जि. सांगली.
-४१६३०८
----------
don't copy pest forward.....
प्रतिक्रिया
मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने