मग भले नाव द्या
वृत्त :- मेनका
गालगागा गालगागा गालगा
आज माझ्या कापसाला भाव द्या !
मग भले शहरास तुमचे नाव द्या !
राहुद्या बाजूस शहरे आधुनिक
चार गोष्टी बोलणारे गाव द्या !
दानधर्माने बळी गेला बळी
पण तरी म्हणतो भुकेला ठाव द्या !
कोरड्या खाऊन बघ जा भाकऱ्या
पूर्ण ताटावर तुम्ही मग ताव द्या !
राज्य आणाया बळीचे आपल्या
वामनाला आजच्या घेराव द्या !
प्रश्न पोटाच्या भुकेचा सोडवा
मग कुणीही काळजावर घाव द्या !
स्वच्छ शासन पाहिजे सेवेत तर
चोर टाळा अन् निवडुनी साव द्या !
- सुनिल बावणे - निल
बल्लारपूर,चंद्रपूर
Comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान
लेखन छान आहे.
Pages