नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी बाबाची आरती
ओवाळा ओवाळा माझ्या शेतकरी बाबा, माझ्या कामकरी राजा
शहाणपणाचा आता, शहाणपणाचा आता तरी उघड दरवाजा ॥धृ०॥
बैलबंडी, औत खोडका हिशेब करुनी, रे बाबा हिशेब करुनी
बी-बियाणे खतं, बी-बियाणे खतं, पाणी बेरीज करुनी
जमा-खर्च, नफ़ा-तोटा गणीत करुनी, रे बाबा गणीत करुनी
शिल्लक बाकी झिरो, शिल्लक बाकी झिरो मग तू जगतो कशानी?
कर्जाखाली बुडून गेला, झाला बेंडबाजा, रे बाबा झाला बेंडबाजा
शहाणपणाचा आता, शहाणपणाचा आता तरी उघड दरवाजा ॥१॥
चांभार-खाती-म्हाली-वठ्ठी सारे देऊनी, रे बाबा सारे देऊनी
तुरीचा कोंडा हाती कांदा ठेवली आखन भरुनी
मीठ मिरची वाटून खाशी आतरवड्याची, रे बाबा आतरवड्याची
का म्हणूनी खातो? का म्हणूनी खातो रे बाबा भाकर कण्याची
सडकी भेद्र, किडकी वांगी खाऊन होशील का ताजा, रे बाबा होशील का ताजा?
शहाणपणाचा आता, शहाणपणाचा आता तरी उघड दरवाजा ॥२॥
जू-जूपनं वार्ती-बेड्या, माखन शिरवतं, रे बाबा माखन शिरवतं
कडबा कुटार बांधून, कडबा कुटार बांधून, भारा आणतो गवत
दांडी-टोनपं जुवाड-रुमनं, जानकुड धरूनं, रे बाबा जानकुड धरूनं
नांगर-वखर करून, नांगर-वखर करूनी वावर टाकलं पेरून
किटकनाशक मारुनी पीक वाढलं जोमान, रे बाबा वाढलं जोमान
व्याजावरती व्याज, व्याजावरती व्याज लाऊनी लुटलं चोरान
तुमच्याहाती कष्ट, गुंड मारती मजा, रे बाबा मारती मजा
शहाणपणाचा आता, शहाणपणाचा आता तरी उघड दरवाजा ॥३॥
रसिकाही सांगे आता ऐका रे बाबा, आता ऐका रे बाबा
एक होऊनी सारे, एक होऊनी सारे घेऊ दिल्लीचा ताबा
गादीवरती बसवू आता शेतकरी राजा, माझा कामकरी राजा
शहाणपणाचा आता, शहाणपणाचा आता तरी उघड दरवाजा ॥४॥
- रसिका किशोर ढगे (उलमाले)
-----------------------------------------------------
प्रतिक्रिया
शेतकरी जीवनाचे यथोचित वर्णन करणारी आरती
शेतकरी जीवनाचे यथोचित वर्णन करणारी आरती.
फारच सुंदर.
शेतकरी तितुका एक एक!
शेतकरी बाबाची आरती-
शेतकरी राजाचा वाजलेला बाजा अधोरेखीत करणारी यथार्थ आरती. अत्यंत सुंदर- खूप आवडली- लै भारी!
हेमंत साळुंके
पाने