नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लोकशाही-वार्ता दि. ११-०९-१३
निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अनेक संकटांचा सामना करीत शेतकरी काबाडकष्ट करून जीवन जगत आहे. सदैव समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांपुढे चोरट्यांनी नवे आव्हान उभे केले आहे. आतापर्यत चोरटे केवळ शेतीपयोगी साहित्यांचीच चोरी करीत होते परंतु, त्यावर त्यांची भूक भागत नसल्यामुळे चक्क बैलचोरीचा सपाटा लावला आहे. बैलजोडीच्या आधारावर शेतकर्यांची मदार असते, ती बैलजोडीच चोरीस गेली तर, त्यांनी शेती कशी कसायची, तेव्हा बैल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समिती गठित करा, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनातून केली आहे.
मागील दोन वर्षांपासून वर्धा जिल्ह्य़ात बैल चोरीचे प्रमाण वाढले आहे. संबंधित पोलिसस्टेशनला तक्रार देऊनही पोलिसांची चोरट्यांना पकडण्यात अपयश येत आहे. वडनेर व अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या गावांमध्ये बैलचोरीचे प्रमाण अधिक आहे. परंतु, बैलचोरट्यांचा साधा सुगावा सुद्धा पोलिसांना लागला नाही.
आर्वी (छोटी) व अल्लीपूर या गावातून दोन वर्षात १० पेक्षा जास्त बैल चोरीस गेल आहेत. आर्वी (छोटी ) येथील वामण चंदणखेडे यांचा एक बैल, संतोष शहारे यांचा एक बैल, यशवंत खोडे यांचे दोन बेल, राजू जयपूरकर याचा एक बैल, अल्लीपूर येथील दुर्गे यांचे २ बैल व पवनी येथील मासूरकर यांचा एक बैल चोरीस गेला आहे.
दोन गावातून १० बैल चोरी जातात, तर संपूर्ण जिल्ह्य़ात दरवर्षी किती बैल चोरी जात असतील याची प्रतिची येईल. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी एकाही प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले नाही. चोरी जाणारे बैल शरीराने धडधाकट आणि लाखो रुपये किमतीचे असतात. अकस्मात आलेल्या संकटाने शेतकर्याचे कंबरडेच मोडून जाते, नविन बैल विकत घेण्याची ऐपत नसल्याने शेतकरी हवालदिल होतो.
वर्धा जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी बेकायदेशिर कत्तलखाने सुरू आहेत. चोरी केलेले बैल कत्तलखान्यात जात असल्यामुळे काही तासातच बैलांची कत्तल करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे चोरीस गेलेले बैल शोधूनही सापडत नाही. राज्याच्या सिमेलगत असलेल्या आंध्रप्रदेशातील आदिलाबाद शहरात बैलांचा मोठा कत्तलखाना आहे. त्या कत्तलखान्यासाठी वर्धा जिल्ह्य़ातून ट्रकमध्ये भरून बैल पाठविले जातात. एकंदरीत बैलचोरी प्रकरण अत्यंत गुंतागुतीचे बनले असून, या बैलचोरी प्रकरणाची विशेष उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करून प्रभावी उपाययोजना व सक्षम पथकाद्वारे चौकशी करा अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. यासाठी शेतकरी संघटनेनी पोलिस खात्यास सहकार्य करण्यास तत्परता दाखविली आहे.
(लोकशाही-वार्ता दि. ११-०९-१३ वरून साभार)
प्रतिक्रिया
दैनीक भास्कर बातमी
पाने