जगणं प्रत्येकाला सुगंधी वाटलं तर
कवी संमेलनाच्या उत्कट मंडपात
अलगद बसलोय
तर शेजारी अनोळखी मित्र
कवी असल्याचं कळलं
बोलता बोलता तो म्हणाला
“दरवेळी निमंत्रण असूनही कवी संमेलनाला का जात नाही”
मी म्हणालो
“कापूस वेचायचा असतो, भूक पेरायची असते”
लगेच त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
“व्वा ! क्या बात है !
तुझे कारणंही किती सुगंधी आहे
नाही तर आमची- लोकल लेट झाली”
मनातच मी म्हणालो
‘नासुकली कारणं तुला सुगंधी वाटली
आमचं जगणं किती सुगंधी वाटेल’
माझ्या मित्रासारखं जर
आमचं जगणं प्रत्येकाला सुगंधी वाटलं
तर आमची काळजी किती लोक काळजीपूर्वक घेईल.
- आशिष वरघणे
रा. सिरुड, पो. वेळा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा
पिन. 442301
मो. 9359679093
