नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्जबाजारी
*मी एका शेतकऱ्याची मुलगी, फार्मसी च्या तिसऱ्या वर्षात शिकणारी ,सामान्य घरातली मुलगी, 'कर्जबाजारी' शीर्षक असलेली माझी कविता, त्यात लपलेल्या माझ्या शेतकरी बापाच्या भावना उनगडून काढताना सांगते की, माझे वडील काय म्हणतात,:-
रुपया रुपया करत जोडली मी नाणी
तरीसुद्धा कर्जाची सुटत नाही फेरी
मुलगा मुलगी दोन अपत्ये
शिक्षण आले जवळी
बाबा बाबा मला डॉक्टर व्हायचे
आवाज आला कानी
अरे बाळा कोणास सांगू?
मी आहे कर्जबाजारी
मी आहे कर्जबाजारी
दसरा दिवाळी कधी गोड जात नाही
बायको माझी कधी साडीही घेत नाही
दुष्काळ गारपीट वादळांचे संकट
त्यात बघा कसा हा बाजारांचा भाव
आत्महत्या करू की उपाशी मरू
सांगणारे देवा मी शेतकरी मी काय करू
माझी काळी आई ही जणू माझ्यावर रुसली
खतपाणी नाही म्हणून जागेवर सुकली
माझ्या झोपडीने ही माझी साथ सोडली
माझ्या घराची पाचट ही जणू उडूनच गेली
एकच विनंती तुमच्याकडे
माझा संदेश पाठवा सरकारकडे
शेतकरी पिकवतो शेतीत धान्य
तेव्हाच मिळते तुमच्या घरात अन्न
तुळशी शिवाय शोभा नाही घराला
शेतकऱ्याशिवाय अर्थ नाही तुमच्या आमच्या जगण्याला
शेतकऱ्याशिवाय अर्थ नाही तुमच्या आमच्या जगण्याला"
• रुपया रुपया करत जोडली मी नाणी
तरीसुद्धा कर्जाची सुटत नाही फेरी
या ओळीत कवयित्रीने शेतकरी बापाच्या मनातली भावना मांडलेली आहे.माझा बाबा ,वर्षभर कष्ट करतो ,आपल्या शेतात पीक पिकवतो आणि जेव्हा तेच पीक बाजारात विकण्याची वेळ येते तेव्हा त्याची किंमत शून्यात होऊन जाते, वर्षभर कष्ट करून शेतकरी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो पण एवढे होऊनही शेतीसाठी लागणारा खर्च ,घर,आणि मुलांच्या शाळेची जबाबदारी यातून शेतकरी कर्जबाजारी होऊन गेलेला असतो , आणि पुढे तो म्हणतो रुपया रुपया गोळा करूनही मी कर्जाची फेरी काय सोडू शकलो नाही ,
पुढच्या ओळीत शेतकरी म्हणतो,
• मुलगा मुलगी दोन अपत्ये
शिक्षण आले जवळी
बाबा बाबा मला डॉक्टर व्हायचे
आवाज आला कानी
पुढे कवियित्री बाबांच्या मनातील चिंता सांगताना म्हणते, मला दोन मुलं त्यांचे शिक्षण माझ्या डोक्यावर आले माझ्या मुलांची स्वप्न मला पूर्ण करायची आहे ,माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचे आहे पण, आता माझ्या लाडक्या राजाला कोण सांगेल मी तर कर्जबाजारी झालो आहे .इथे एक वेळचं जेवण भेटणं पण अवघड झालं आहे, आणि तिथे माझ्या बाळाचे स्वप्न तर डॉक्टर होण्याच आहे.
• अरे बाळा कोणास सांगू?
मी आहे कर्जबाजारी
मी आहे कर्जबाजारी
पुढे बाबा मनातल्या मनात डोळे पुसत म्हणतो ,तुला मी कसे सांगू बाळा मी कर्जबाजारी झालो आहे , तुझ्या शिक्षणाचा खर्च मी कसा झेपू, शेतीच्या मालाला भाव भेटत नाही, आणि घेतलेल्या कर्जाचे व्याज सुद्धा फिटत नाही
पुढे कवयित्रींनी शेतकरी बापाच्या परिस्थितीची कल्पना दिली,
• दसरा दिवाळी कधी गोड जात नाही
बायको माझी कधी साडीही घेत नाही
दुष्काळ गारपीट वादळांचे संकट
त्यात बघा कसा हा बाजारांचा भाव
दसरा दिवाळी सारखे मोठे सणवार आल्यावर सगळीकडे आनंदी आनंद होतो, माझ्या घरात किराणा सुद्धा लवकर येत नाही, लाडू करंजी यांसारखे गोड पदार्थही मला भेटत नाही, माझी बायको कधी स्वतःला एक लुगडं सुद्धा घेत नाही ,अशी दुःखद खंत शेतकरी व्यक्त करतो ,पाण्याच्या अभावानं कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होऊन माझं पीक नासाडी पडतं, कधी वादळ आलं तर माझा चारा उडून घेऊन जात, हे सगळे संकटं सोबत असतातच पण त्यात मात्र अजून एक संकट येत ते म्हणजे माझ्या मालाला माझ्या फळाला माझ्या भाजीपाल्याला आणि माझ्या कष्टाला भेटणारा भाव
• आत्महत्या करू की उपाशी मरू
सांगणारे देवा मी शेतकरी मी काय करू
माझी काळी आई ही जणू माझ्यावर रुसली
खतपाणी नाही म्हणून जागेवर सुकली
शेतकरी पूर्ण दुःखी झालेला असतो आणि त्यातच तो स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न करतो, घरात खायला अन्न नाही माझी मुलं बाळही उपाशी आहे ,या भावनेने तो स्वतः आत्महत्या करण्याचा ठरवतो, तो परमेश्वराला विचारतो देवा मी शेतकरी आहे मला न्याय तर भेटणार नाही ,मग मी काय करू आता तूच सांग पुढे शेतकरी म्हणतो,
मी कर्जाच्या फेऱ्यात अडकलोय आणि त्यात माझ्या काळ्या आईनेही माझी साथ सोडूनच दिली, दोन वर्षे झाली खत पाणी नाही त्यामुळे माझी काळी आई ही ओसाड पडली.
• माझ्या झोपडीने ही माझी साथ सोडली
माझ्या घराची पाचट ही जणू उडूनच गेली
एकच विनंती तुमच्याकडे
माझा संदेश पाठवा सरकारकडे
, माझ्या घराची पाचट ही वारा वादळाने उडून गेली आणि माझी झोपडी ही आता थोड्याच दिवसात पडणार आहे अशी मला भीती वाटते ,शेवटी शेतकरी म्हणतो माझी तुम्हाला एक विनंती आहे माझा संदेश ,माझ्यासारख्या लाखो शेतकऱ्यांचा संदेश, सरकारपर्यंत पोहोचवा
• शेतकरी पिकवतो शेतीत धान्य
तेव्हाच मिळते तुमच्या घरात अन्न
तुळशी शिवाय शोभा नाही घराला
शेतकऱ्याशिवाय अर्थ नाही तुमच्या आमच्या जगण्याला
शेतकऱ्याशिवाय अर्थ नाही तुमच्या आमच्या जगण्याला
शेतकरी जेव्हा शेतात राबराब राबवून रात्रंदिवस कष्ट करतो कधी उन्हामध्ये तापत तर कधी पावसासोबत खेळत , तेव्हा तुमच्या आमच्या गोरगरिबांना श्रीमंतांना खाण्यास अन्न भेटतं, घरापुढे तुळस पाहिजे असे पूर्वीपासून म्हटले जाते तसेच ह्या शेतीला शेती करण्यासाठी शेतकरी पाहिजे तेव्हाच आपल्या आयुष्याला आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ उरेल, कारण उन्हाची किरणं आणि पावसाचा टपका, फक्त शेतकरी सहन करू शकतो, आरामाच्या जीवनात शेतकरी राबराब राबतो, आपण सर्वांनी त्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. आणि खरच खूप आनंदाची गोष्ट आहे की, या शेतकरी साहित्य संमेलनामध्ये मला भाग घेण्याची संधी मिळाली माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या वाघिणी या क्षणाची मनापासून वाट बघत होतो.
नाव:- निर्मळ वैष्णवी नानासाहेब
तिसरे वर्ष फार्मसी (विद्यार्थिनी)
८४४६०४६७२८