बळीचे कर्तुत्व झाकले गेले
	 
	आजच्या काळात शेतीचा चित्र पहिले तर ते अतीशय दयनीय असे झालेले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात रोज शेतकरी आत्महत्या झालेल्या बातम्या पहायला मिळतं आहेत, आज कोणताही तरूण शेती करण्यास तयार नाही, कोणतीही तरूणी शेतकऱ्यांशी लग्न करण्यास तयार नाही ना ईलाजाने जे शेती करत आहेत ते पूर्णपणे हतबल झालेले दिसत आहेत. हे चित्र फक्तं दुष्काळी भागात नसून, जेथे चांगली बागायती शेती आहे तेथेही हेच चित्र आहे. संपूर्ण भारतात कोठेही, कोणत्याही प्रकारची शेती असली तरी कमी जास्त प्रमाणात हेच चित्र पाहायला मिळतं आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्तिथी कधीपासून झाली, पहिल्यापासून अशीच होती का, ती का बिघडली, कोणी बिघडली याचे सविस्तर चिंतन आपण आज करू.
	 
	माझा जन्म दुष्काळी भागांतील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे,लहानपणापासून अनेक वृध्द शेतकरी महीला पुरुष.. इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो... असे बोलताना मी ऐकले आहे. परंतु लहानपणी याचा अर्थ मला उमगत नव्हता. शालेय जीवनात असताना आमच्या गांवात अनेक हरिनाम सप्ताह, कथा होत असत, माझ्या आजोबांबरोबर मी त्या ऐकायला जात असे, यावेळी अनेक कथा, कीर्तन मधून बळी राजाची गोष्ट सांगतली जात असे.. बळी हा एक राक्षशी राजा होता, त्याने देवांना खुपचं त्रास दिला होता, यामुळे सर्व देवतांनी भगवान विष्णूंना विनंती करून बळीचा नाश करण्यास सांगितले. अशा वेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला. बळी राजा हा दानशूर राजा होता, तो कोणालाही आपल्या दारातून मोकळ्या हाताने पाठवत नाही, याचा फायदा घेऊन वामन यांनी बळीला तीन पाऊल जागा मागितली, यातील पहिल्या दोन पावलात त्यांनी पृथ्वी व आकाश घेतले आणि तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात घातले. अशा प्रकारे देवतांवरील बळीचे संकट दूर झाले. ही कथा ऐकताना त्यावेळी फार प्रेरणादायी वाटे, राक्षसांचा असाच बीमोड केला पाहिजे अशी भावना मनामध्ये दाटुन यायची. संपूर्ण देशात अश्या कथा सांगून बळीचे कर्तुत्व प्राचीन काळापासून झाकले गेले, यामुळे शेतकरी कायमस्वरूपी अज्ञानात राहिला आणि आजही या कथा सूरू आहेत.
	 
	महाविद्यालय शिक्षण घेत असताना महात्मा फुले यांचे साहित्य माझ्या वाचनात आले, त्यावेळी मी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड ही पुस्तके वाचली, व वारंवार वाचतच राहिलो. भारतामध्ये महात्मा फुले यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या दरिद्री पणाचे कारण जगाला दाखऊन दिले. शेतकऱ्यांची ही अवस्था देवापासून आलेली नसून ती काही स्वर्थ्री लोकांनीं स्वताच्या फायद्यासाठी उभी केलेली शोषणकारी व्यवस्था आहे हे माझ्या लक्षात आले. पुढे आ. ह. साळुंखे यांची पुस्तके वाचनात आली. यामधून मला प्रथमतः बळी राजा विषयी खरी महिती मिळाली. यानंतर मला.. इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो याचा अर्थ समजू लागला...
	 
	बळी हा भारतीय संस्कृतीतील समतावादी संस्कृतीचा महानायक आहे. त्यांनी आपल्या राज्यामध्ये समता प्रस्थापित केलेली होती. कोणीही उच्च नीच नव्हते, सर्व समान होतें व सर्वांना समान अधिकार व संधी होत्या. बळी हा भक्त प्रल्हाद यांचा नातू व विरोचन यांचा मुलगा होता. बळीचा मुलगा बाणासुर यांची कन्या उषा हीचा विवाह श्रीकृष्ण यांचा मुलगा अनिरुद्ध यांच्याशी झाला होता.
	बळीला शेतकऱ्यांचा राजा असे मानतात. कारण आपल्या राज्यकारभारात त्यांनी कृषिप्रधान व्यवस्था निर्माण केली होती. ही व्यवस्था फक्तं नावाला कृषिप्रधान नवती, तर ती वास्तवात होती. अतीशय कार्यक्षम शासन व प्रशासन बळीने शेतकऱ्यांना दिले होतें. यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी, समाधानी व समृध्द होता, यामुळे शेतकरी बळीला आपला राजा मानत असत. बळीही शेतकऱ्यांना, प्रजेला आपल्या मुलांप्रमाणे जपत होता, जीव लावत होता.
	 
	बळीचे राज्य हे नवखंडी राज्य म्हणून ओळखले जात असे, प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला "खंडोबा"असे नाव होते. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे असायचे, अनेक सुभ्याचां मिळून एक महासुभा होत असे,या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा. त्याप्रमाणे सुभ्याचा प्रमुख ज्योतिबा, मल्हार व मरतड हे सुरक्षा अधिकारी होते. या सर्व मंत्री व अधिकारी यांच्या साहाय्याने राज्याचा कारभार चालत असत. ही सर्व व्यवस्था काटेकोरपणे अंमल करत असे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुख सुविधा, मदत, सहकार्य दिवस रात्र यांच्याकडुन होत असे, कोणत्याही प्रकारची मागणी, अडवणूक, पिळवणूक होत नसे. शेतकरी कधीही अधिकारी किव्वा मंत्री यांना भेटून आपल्या अडचणी सोडऊन घेत असत. यामुळे शेतकरी समाधानी होता. यामुळे या सर्व अधिकारी व मंत्री यांना शेतकरी समाज दरवर्षी पीक निघल्यानंतर आनंददाने विविध भेटवस्तू, जेवण देत असत. यामुळे बळीची व्यवस्था ही शेतकऱ्यासाठी आदर्शवादी होती.
	 
	ज्यावेळी एखादा समाज समृध्द, समाधानी, आनंदी बनतो, त्यावेळी त्याच्यावर अनेक संधीसाधू, स्वार्थी लोकांची नजर पडत असते, अशा समाजाला लुटण्यासाठी ते प्रयत्न करतात. असेच बळीच्या बाबतीत झाले. बळीच्या शेजारील राज्यांना बळीची प्रगती देखविली नाही, यामुळे त्याचे राज्य लुटण्यासाठी विविध प्रयत्न सूरू झाले. परंतु हे राज्य प्रबळ असल्यामुळे त्याला जिंकणे कोणालाही सहज शक्य झाले नाही, यामुळे कट, कारस्थाने, कपट, धोका अशा मार्गांचा अवलंब करून बळीचा पराभव करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यावेळी आर्य समाजातील वामन या राजाने बळीचा पूर्ण अभ्यास केला. बळी इमानदार व दानशूर आहे, तो यज्ञ करताना जो कोणी याचक येईल त्याला कधीही मोकळ्या हाताने पाठवत नाही. याचा गैरफायदा घेऊन वामन हा याचकाच्या रुपात बळीकडे आला. यावेळी त्याने मी जे मागेल ते मला देशील असे वचन बळीकडून घेतले. यावेळी राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांनी यामागील कपट ओळखले व बळीला सांगितले ही याला काहीही देऊ नको,, परंतु बळीने ऐकले नाही. यावेळी या वामन राजाने तीन पाऊल जमिनीमध्ये बळीचे संपूर्ण राज्य मागितले, व बळीला पाताळात म्हणजे दक्षिण दिशेला घालऊन टाकले. हा दिवस दसऱ्याचा होता. यावेळी वामन यांच्या सैनिकांनी बळीचे राज्यातील शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात लूट केली.
	 
	आपला राजा हा पाताळात आपल्याला सोडून कायमचा गेला ही बातमी वेगाने संपूर्ण राज्यात पसरली. सगळीकडे शेतकरी जनता आक्रोश करूं लागली, दुःख मानू लागली, यावेळी बळीचा मुलगा बाणासुर याने लोकांचे सात्वन करण्यासाठी त्यांना सांगितले की आपला राजा एकवीस दिवसांनी परत आपल्याला भेटायला येणार आहे, यावेळी आपण सर्वजण मिळून राजाचे स्वागत आनंदात, उत्साहात करू. हा दिवस म्हणजे दिवाळीतील बलिप्रतिपदा, या दिवशी प्रत्येक घरी बळीची पुजा केली जाते, नवीन कपडे, गोड धोड करून आपण किती सुखी आहोत हे आपल्या राजाला दाखविले जाते... इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी इछ्या व्यक्त केली जाते, परंतु हजारो वर्ष गेलीं, परंतु ही इच्छा आजपर्यंत पूर्ण झालेली नाही.
	 
	शेतकऱ्यांचा राजा बळी याला पाताळात घातल्यानंतर त्याच्या राज्याची पूर्णपणे लूट करण्यात आली. तरीही बळीचे विचार लोकांमध्ये रुजलेले होते. या विचारातून क्रांती होऊ नये यासाठी वामन यांनी बळीच्या नावाने विविध कथा रचल्या, त्यांचा समावेश धार्मिकतेमध्ये केला, धर्माच्या प्रसाराबरोबर बळीला बदनाम करण्यासाठी कार्य सूरू झाले. हजारो वर्षांपासून ते आजपर्यंत बळी हा राक्षस आहे, तो समाजाचे शोषण करतो, आणि इतर अनेक कथा सांगितल्या जात आहेत, आजही याचा प्रचार मोठया प्रमाणावर सूरू आहे, यामुळे सत्य आजही मोठया प्रमाणात झाकलेले आहे. परंतु एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो ही वाक्यं चालतं आली आहेत, ती आजही लोकांच्या ओठावर आहेत, यामुळे आजही शेतकरी बळीचे राज्य पुन्हा येण्याची वाट पाहत आहे.
	 
	बळीच्या नंतर प्रत्येक काळात, प्रत्येक राजाकडून शेतकऱ्यांचे शोषण होत गेले.नेमके काय कारणे आहेत की ज्यामुळे व्यवस्था ही शेतकऱ्यांचे शोषण करते. प्रत्येक समाजात, प्रत्येक काळामध्ये असे काही माणसे असतात की ज्यांना दुसऱ्याच्या जीवावर मोठया प्रमाणात भोगवादी जिवन जगायचे असतें. आपला हा भोगवाद पूर्ण करण्यासाठी ते इतरांचे शोषण करतात. यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आपल्या मालकीची करणे, यामध्ये जमिन, जंगले, पाणी व इतर साधने. शेती करण्यासाठी या नैसर्गिक सर्वच साधनांची गरज असते. यामुळे समाजातील 15% लोकांनीं ही साधने आपल्या ताब्यात ठेवली व इतरांना गुलाम केलें, व त्यांच्याकडुन फक्तं कामे करून घेतली, त्यांना कधीही कोणताही अधिकार, मालकी दिली नाही. यामुळे शेतकरी फक्तं नावालाच राहिला.
	 
	धार्मिक व्यवस्थेमध्ये ब्राम्हणी लोकांचे वर्चस्व टिकऊन ठेवण्यासाठी समाजामध्ये एक मोठी शोषण कारी व्यवस्था निर्माण करण्यात आली. या व्यवस्थेचे सर्वाधिक शोषण शेतकऱ्यांचे केलें गेले. जागरण गोंधळ, आरतखाना, मुंज, पत्रिका, धार्मिक कर्मकांड, जीवनातील प्रत्येक प्रसंगात कुंडली व त्यानुसार विविध पुजा, शांती, यामध्ये ब्राम्हण यांना पान, सुपारी, खारिक, खोबरे, धान्य, फळे, किमती वस्तू, गाई, दक्षणा अशा गोष्टी दान करण्याच्या प्रथा पाडल्या गेल्या. घरामध्ये कोणतेही संकट आले की ब्राम्हण शांती करण्यास सांगतात. आजही हे सर्व कर्मकांड समाजात सूरू आहे. महात्मा फुले यांनी ही शोषणकारी व्यवस्था आपल्या गुलामगिरी व शेतकऱ्यांचा आसूड यामध्ये 18 व्या शतकामध्ये स्पष्ट केली आहे, परंतु 200 वर्षानंतरही ही पुस्तके शेतकऱ्यानं पर्यंत आलेली नाहीत, किव्वा शेतकऱ्यांना ते सत्य उमगले नाही. आज हे सत्य शेतकऱ्यांनी जाणून घेऊन या व्यवस्थेला नष्ट केले पाहिजे.
	 
	18 व्या शतकामध्ये भारतावर ब्रिटिश सत्ता आली. यांनी तर पहिल्यापेक्षा अधिक शोषणकारी व्यवस्था लागू केली. यांनी सर्व जमिनीची मोजणी करून घेतली व शेतीवरती पहिल्यांदाच शेतसारा सूरू केला. हा शेतसारा प्रचंड असे, यामुळे कितीही उत्पादन केलें तरी शेतकऱ्यांचा हाती काहीही राहत नव्हते. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना ठरावीक पिके घेण्यासाठी बंधन आणले, या पिकातील उत्पादन ब्रिटिशांना विकायचे याचेही बंधन घातले गेले. त्यांना वाटेल त्या भावात ते शेतकऱ्यांकडून माल विकत घेत असत. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिघडत गेली.
	 
	ब्रिटिश काळात भारतात शेतीवर आधारित अनेक उद्योग व्यवसाय होतें, या व्यवसायांना विविध बंधने लाऊन ते बंद पाडले गेले. येथील सर्व कच्चा माल इंग्लंड ला पाठविला जाऊं लागला, तिकडून पक्का माल बनऊन भारतीय बाजार पेठेत विकला जात असे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक गोष्टी चढ्या किमतीत विकत घ्याव्या लागत असत, यामुळे शेतकरी कंगाल झाला. भारतीय स्वतंत्र लढ्यात महात्मा गांधी यांनी चरखा हाती घेऊन आपण पिकविलेल्या मालावर आपणच प्रक्रिया करा हा संदेश दिला, यावेळी संपूर्ण देशात अनेकांनी चरखे घेतले व कापड उद्योग सुरू केलें. यामुळे ब्रिटिशांच्या शोषणावर अंकुश आला व ते देश सोडून गेले.
	 
	स्वतंत्र भारतामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठया अपेक्षा होत्या, देशाला स्वातंत्र्य मिळऊन देण्यासाठी सर्वात जास्त योगदान हे शेतकऱ्यांचेच होते, यामुळे आता आपल्याला चांगले दिवस आले अशी शेतकऱ्यांची भावना झाली होती. परन्तु याबाबतीत शेतकऱ्यांची पूर्णपणे निराशा झाली. स्वतंत्र भारतात शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी नव्याने व्यवस्था निर्माण झाल्या. यामध्ये परत शेतकरी भरडला जाऊं लागला. सर्वच बाबतीत शेतकऱ्यांचे शोषण सूरू झाले, प्रचंड भ्रष्टाचार सूरू झाला. यामध्ये ग्रामपंचायत, तलाठी, तहसील, व ईतर सर्व शासकीय कार्यालयात कामासाठी शेतकऱ्यांकडून पैसेची मागणी केली जाउ लागली, विविध प्रकारे अडवणूक केली जाउ लागली. बियाणे, खते, औषधे यामध्येही भ्रष्टाचार केला जाउ लागला. यामुळे या व्यवस्थेत शेतकरी अडकत गेला. अशा वेळीं एक नवीन हरितक्रांती आणली गेलीं, या माध्यमांतून शेतीचा यांत्रिकीकरण,आधुनिकीकरण सूरू झाले. यामध्ये यंत्र, औषधे, खते, बियाणे, अवजारे, विकसित केली गेली, ही वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितले गेले. यामुळे शेतीमधील उत्पादन खर्च प्रचंड वाढला व शेती अधिकच तोट्यात जाऊ लागली. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या व शेतकरी हतबल बनत गेले.
	 
	1980 साली शरद जोशी यांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांना "शेतीच्या लुटीचे अर्थशास्त्र"समजाऊन सांगितले. शेती तोट्यात जाण्याचे कारण हे उत्पादनात नसून सरकारी धोरणात आहे, ही सरकारी धोरणे शेतकरी विरोधात असून ते शेतीचे शोषण करत आहेत. याचे प्रमुख कारण हे शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही हे आहे. कोणत्याही पिकाला त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळणे अपेक्षित आहे, परंतु तो मिळतं नाही, यामुळे शेतीमध्ये कितीही सुधारणा आणल्या तरी , जोपर्यंत शेती मालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत शेती ही तोट्याची राहणार आहे, हे शेतकऱ्यांना पटले व सुरुवात झाली शेतकरी संघटनेची.1980 पासून या संघटनेने अनेक आंदोलने केली, प्रचंड संघर्ष केला, यामुळे सरकारच्या शेतकरी धोरणांमध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे. काही पिकांना हमीभाव देखील मिळालेला आहे. परंतु अजून अनेक समस्या आहेत की ज्यावर प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे.
	 
	काळानुसार सर्वच बदलत असतें, यामुळे काळानुसार शेतकऱ्यांच्या शोषण करण्यासाठी विविध धोरणे आखली जात आहेत. खंडित वीजपुरवठा ही फार मोठी समस्या आज तयार झाली आहे.शेतकऱ्यांना रात्रीची वीज दिली जाते, तीपण खंडित स्वरूपात, यामध्ये अनेक अपघात होऊन शेतकस्यांचे बळी जात आहेत. बियाणे, खते, औषधे, मजुरी, आणि इतर सर्वच गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत व शेतीमालाचे भाव पाडले गेले आहेत. कोणतेही अनुदान, मदत, योग्य वेळी व पुरेशी मिळतं नाही,शेतकऱ्यांना कोणत्याही बँका कर्ज देत नाहीत, समाजात शेतकऱ्यांकडे हिन नजरेने पाहीले जात आहे,त्यांच्या मुलांना कोनी मुली देण्यास तयार नाहीत, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, महापूर असी संकटे वाढली आहेत, सर्वच बाजूंनी शेतकरी आज अडचणीत आहे. दूधाचे भाव वारंवार पाडले जात आहेत, सर्वच शासकीय योजणा घेताना प्रत्येक कार्यालयात शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत, त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जात आहेत, शेतीतील उत्पादने सोडून ईतर सर्वच गोष्टीचे भाव वाढविले जात आहेत त्यामुळे आजच्या काळात तर शेतकरी समाजाचे प्रचंड शोषण सूरू आहे.
	 
	शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारीत योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलने सूरू आहेत, परंतु आजही ही मागणी पूर्ण झालेली नाही. सरकारी धोरणे हे शेतकऱ्यांचे मरण आज झालेले आहे, यांचे प्रमुख कारण हे शेतकरी संघटीत होत नाही यामध्ये आहे. विविध गोष्टी सांगून शेतकऱ्यांना भुलविले जात आहे. ज्यावेळी मार्केट मध्ये मालाची आवक वाढते अशावेळी भाव पडतात असे कारण दिले जाते, परंतु यावर्षी जर पाहिले तर महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पाउस सर्वत्रच कमी झालेला आहे, अशा वेळीं सर्वच मालांचे उत्पादन घटलेले आहेत, मग अशावेळी भाव वाढणे गरजेचे आहे, परंतु असे न होता यावर्षी सर्वच शेत मालाचे भाव पडलेले आहेत.दुधाचा उत्पादन खर्च 32 रुपय प्रती लिटर असताना, आज त्याला 25 रुपय भाव मिळत आहे, कापसाला 100 किलो ला 12,000 रुपय उत्पादन खर्च आहे व भाव 7000 रुपय मिळतं आहे. हे वास्तव आहे, हे आजचे नाही कायमचेच आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्याने कसे जगायचे ????
	यामुळें शेतकरी आत्महत्या करत आहेत, आता तर त्या वाढतच चालल्या आहेत.
	 
	सरकारला माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना त्याच्या हक्काच्या मालाला योग्य भाव द्या, त्याला इतर काहीही नको, योग्य भाव न देता आपण ईतर अनेक गोष्टी देऊन शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहात. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता संघटीत झाले पाहिजे, असे झाले तरच आपल्या हक्काचा भाव आपल्याला मिळेल. तो मिळाला तरच शेती फायद्यात येऊ शकते.. दुसरा कोणताही उपाय यावर नाही... यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला शेतीमधील धोरणे शेतीला अनुकूल अशी बनविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे... तरच शेतकरी सन्मानाने उभा राहू शकेल.... असे झाले तर शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल.... असे झाले तरच बळीचे राज्य येइल... बळीचे राज्य आणण्यासाठी संघटीत बना व संघर्ष करा....
	 
	इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो.....
	..............................................................
	लेखक:-
	रविंद्र हनुमंत गोरे, संस्थापक नागर फाउंडेशन,
	रवळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर
	मो. नो.8788663492
	.................................................................
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे.
लेखन छान आहे.
पाने