साठीचे हितगुज : भाग - ८
FPC : अभी नही तो कभी नही
काळ सतत बदलत असतो आणि त्यामुळेच शेतमालाच्या विपणन व्यवस्थेच्या उत्क्रांतीचे टप्पेही बदलत असतात. काळाच्या प्रवाहात भविष्याचा व वर्तमानाचा वेध घेऊन जो योग्य वेळी प्रवाहात सामील होतो तो तो त्या त्या कालखंडाचा प्रवाशी होतो, बाकी उरलेले सर्व प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. उदाहरणार्थ; बसची जेवढी क्षमता असेल तितके प्रवासी चढून झाले की उरलेले प्रवासी बसच्या बाहेर राहून प्रवासाच्या संधींना मुकले जातात. संधी वारंवार येत नसल्याने मिळालेल्या संधीचे सोने करायचे असेल तर भविष्याचा आणि वर्तमानाचा अंदाज घेऊन वेळेच्या आत बसमध्ये चढून आपली जागा आरक्षित करणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा ती व्यक्ती संधी गमावून बसत असते.
कोणत्याही व्यवस्थेच्या निर्मितीचा, विकासाचा आणि समारोपाचा एकेक कालखंड असतो. एकेकाळी गावागावात शिक्षणसंस्था, सहकारीसंस्था, धर्मादायसंस्था, वेगवेगळ्या भागात ऊस कारखाने, कापूस बहुल क्षेत्रात जिनिंग प्रेसिंग वगैरे अनेक संस्थात्मक जाळे निर्माण झाले. ज्यांनी त्यावेळेस पुढाकार घेतला ते या व्यवस्थेचे कर्तेधर्ते होऊन संपूर्ण व्यवस्थेचे सुकाणू त्यांच्या हातात गेले. सहभागी व्हायची वेळ निघून गेल्यानंतर आजतागायत शिक्षणसंस्था, सहकारीसंस्था, धर्मादायसंस्था, ऊस कारखाना, जिनिंग प्रेसिंग वगैरे नव्याने निर्माण करायचे ठरवले तर पुन्हा संधी उपलब्ध झाल्यात का? प्रस्थापित संस्थेचे निदान सभासदत्व घ्यायचे ठरवले तरी सभासदत्व तरी आज मिळू शकते का? सरकारी नोकरी मिळवायची असेल तर एकदाची मुदत निघून गेल्यावर नोकरी तरी मिळवता येते का? संधीचे सोने करून ज्यांनी नोकऱ्या मिळवल्या ती नोकरदारांची पूर्ण पिढी रिटायर होईपर्यंत पुन्हा नोकरीच्या संधी उपलब्ध होतात का? नव्याने निर्मित होऊ घातलेल्या व्यवस्थेत सामील होण्याची संधी हुकवणारे किंवा गमावणारे प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात मग व्यवस्थेच्या (सिस्टीमच्या) व प्रस्थापितांच्या विरोधात बोंबा ठोकणे, त्यांच्यावर टीका करणे, शिव्या घालणे व बोटे मोडणे इतकेच त्यांच्या आवाक्यात उरत असते ना?
शेतमालाच्या प्रक्रिया व विपणन व्यवस्थेत भविष्यात आमूलाग्र व क्रांतिकारक बदल होऊ घातले आहेत. सहकारीसंस्था, धर्मादायसंस्था या संकल्पना आता कालबाह्य झाल्या आहेतआणि त्या लवकरच मोडीत निघण्याची शक्यता निर्माण होत आहे. पुढे येऊ घातलेला काळ प्रामुख्याने फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांचा असणार आहे. आता जे शेतकरी सामुदायिकपणे स्वतःच्या कंपन्या उभारतील किंवा अन्य कंपन्याचे भागधारक बनतील त्यांच्याच ताब्यात पुढील काळासाठी शेतमालाच्या विपणनाचे सुकाणू जाणार आहेत.
सबब मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की, आता फार वेळ न दवडता स्वतःच फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. जर शक्य नसेल तर परिसरातील अन्य फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमध्ये भागधारक बनावे. कोणत्याही फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे भागधारक मूल्य फार जास्त नसते. नाहीतरी आजवर आहे त्या व्यवस्थेत आपण इतके वर्ष परवडत नसतानाही मिळेल त्या भावात आपण आपला शेतमाल विकत आलेलोच आहोत. दरवर्षी अडत्यांना कमिशनपोटी हजारो रुपये बिनबोभाटपणे देत आलेलोच आहोत. भविष्यात जर आपल्या स्वतःच्या मालकीची शेतमाल विपणनाची नवीन व्यवस्था उभी राहत असेल तर त्या नव्या व्यवस्थेत सामील होण्यासाठी थोडीफार रक्कम गुंतवण्याची तयारी केलीच पाहिजे. निदान आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी इतके करणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की ...... अभी नही.... तो कभी नही! बैल गेल्यावर झोपा करण्यात तर अजिबातच अर्थ नाही!!
(क्रमशः)
- गंगाधर मुटे आर्वीकर
=-=-=-=-=
पंचेवीस/तीन/बावीस
=-=-=-=-=
=-=-=-=
=-=-=-=