नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*वाईन इज फाईन पण .....*
अनिल घनवट
महाराष्ट्र शासनाने मॉल मध्ये वाईन विक्रीची परवानगी दिली व महाराष्ट्रभर विरोध, समर्थन, विनोद, कोट्यांना उधान आले. विरोध करण्यात नेहमी प्रमाणे विरोधी पक्ष सर्वात पुढे. हा निर्णय सध्या विरोधात असलेल्या पक्षाने सत्तेत असताना घेतला असता तर आता सत्तेत असलेल्यांनी विरोध केला असता. हा अनुभव अनेक वेळा अनेक विषयां बाबत आलेला आहे. राजकारण्यांना शेतकरी किंवा जनेतेच्या प्रश्नांचं, हिताचं काहीच देणे घेणे नसते. फक्त सत्तेत रहाणे किंवा सत्तेत येणे इतकेच धेय्य असते. असो, त्यांचा धंदा आहे. आपण आपल्या धंद्याचा विचार करू या.
वाईन विक्रीच्या निर्णया बाबत विरोध करणार्यात विरोधी पक्ष, काही महिला संघटना व समाजसेवी संस्था व वारकरी सांप्रदायातील काही व्यक्तींचा दिसला. सामान्य नागरीक शांत आहेत. शेतकरी समर्थनात आहेत. द्राक्ष शेतकर्यांना समजते की खप वाढला तर त्यांच्या द्राक्षाला किंवा धान्याला चांगले दर मिळणार आहेत. सामान्य नागरिकांना माहीत आहे की ज्यांना प्यायची नाही ते मॉल मध्ये काय पान टपरीवर जरी वाईन विक्रीला ठेवली तरी पिणार नाहीत व ज्यांना प्यायची आहे ते कुठे ही जाऊन पिणार आहेत. ज्या राज्यांमध्ये व जिल्हयांमध्ये दारूबंदी आहे किंवा होती त्या राज्यां मध्ये सर्वात जास्त गावठी दारू पिली जाते. कुठे सरमाडी, कुठे खर्रा,कुठे हातभट्टी, कुठे खोपडी, कुठे आणखी काही नावाने हे पेय्य उपलब्द्ध होत आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात मध्ये खोपडी पिऊन अनेक लोक मेल्याच्या बातम्या आधुन मधून येतच असतात. मग किमान १००० चौरस फूटाच्या मॉल मध्ये वाईन विकली तर काय बिघडलं? सिगरेट प्रत्येक पान टपरीवर मिळते, किराण दुकानात मिळते म्हणुन सर्व गाव सिगरेट पिते आहे असे काही झाले नाही मग मॉल मध्ये वाईन वकली तर सगळा समाज व्यसनाधीन होईल हा कसला तर्क?
वाईन पाण्यासारखीच आहे हे म्हणणे जसे चूक आहे तसे वाईन म्हणजे दारू आहे हे म्हणणे सुद्धा चूकच आहे. अनेक राज्यांमध्ये घराघरात वाईन तयार केली जाते व बाया पोरांसह सर्व तिचा आस्वाद घेतात. वाईन ही अॅपिटायझर म्हणुन घेतली जाते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. भारतात हे धनिक लोकांचे पेय्य आहे. यात नशा कमी. आपल्या कडे रम, विस्की हे अधीक अल्कोहोल व नशा असलेली दारू सर्वत्र उपलब्ध आहे. किराना दुकानात नसली तरी दुकाने आहेतच लोक रांगा लावून ती विकत घेतात. पितात.
मर्यादे पलिकडे नशा करणे घातक आहे, त्याचे समर्थन करणे योग्य नाही, करू नये. मर्यादे पलीकडे चहा पिणे सुद्धा मानवी प्रकृतीला घातकच मग तिची किराना दुकानातली विक्री बंद करायची का?
भारतात वाईनचे सेवन वेदिक काळा पासून सुरु असल्याचे दाखले आहेत. अगदी इंद्राच्या दरबारात सोम रसाचे सेवन जाहिर रित्या केले जाते. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले एक रत्न आहे. यात वाईट काय आहे? अतीसेवन वाईटच मग ते कशाचे ही असो. एका ह.भ.प.ने वाईन विक्री बाबत बोलताना अकलेचे तारे तोडले. दुसर्याच्या खाजगी आयुष्यात दखलअंदजी केली व माफी ही मागितली. खरे तर ज्यांनी कुठली नशा केली नाही अशांनी समजाचे जीवन सुकर व्हावे यासाठी काही योगदान दिल्याचे दिसत नाही. ज्यांनी वेगवेगळे शोध लावून मानव जिवन सुकर व सुसहाय्य केले ते बहुतेक वाईन घेत किंवा थोडीफार नशा करत असत हे पहायला मिळते. आज देशातील बहुतेक उच्च पदस्त अधिकारी, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती, पोलीस अधिकारी, कालाकर सर्व वाईनच नाही तर बीअर, रम, व्हिसकी, स्कॉच सारखी मद्ये घेतात. भारतीय सैन्याला तर अधिकृत नियमत पुरवठा केला जातो. ही गोष्ट इतकी वाईट असती तर हे केले असते का?
शेतकर्यांनी वाईन विक्रीची व्याप्ती वाढण्याचे समर्थन केले आहे. याचे प्रमुख कारण आहे शेतकर्याचे व्यापार स्वातंत्र्य, उद्योग स्वातंत्र्य. वाईन फक्त द्राक्षा पासूनच नाहीतर अनेक फळांपासून व गहू, तांदूळ, नाचणी सारख्या पिकां पासून ही तयार केली जाते. तिचा खप वाढला तर दोन पैसे जास्त मिळतील ही एक आशा. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर याचा बराच परिणाम होईल. देशात ११० वाईनरीज आहेत त्यापैकी ७२ महाराष्ट्रात आहेत. देशात ३४,००० हेक्टर क्षेत्र वाईनसाठीच्या द्राक्षांच्या लागवडीखाली आहे. १७ दशलक्ष लिटर वाईनचे उत्पादन दरसाल होते. १५० दशलक्ष अमेरिकन डोलरची आपली बाजारपेठ आहे. या पैकी ७०% वाईन भारतात तयार होणारी आहे व ३०% वाईन ऑस्ट्रेलिया व युरोपियन युनियन मधून आयात केली जाते. भारतातून ही काही देशांना वाईनची निर्यात होते.
उच्चवर्गातील लोक आयात केलेली वाईन, प्रतिष्ठचे प्रतिक म्हणुन पितात पण ती तुलनेने बरीच महाग असल्यामुळे सर्वसाधारण लोक भारतीय वाईनलाच प्राधान्य देतात. वाईनचा प्रसार व्हावा म्हणुन वाईन टूरीझमचे प्रयोग होत आहेत. नाशिकची सुला वाईन दर्जेदार वाईन म्हणुन ओळखली जाते व ते भारतातील सर्वात मोठे वाईन उत्पादक आहेत.
वाईन किराना दुकानात विकली गेली तर याचा फायदा थेट शेतकर्यां पर्यंत पोहोचेल का अशी रास्त शंका काही मंडळींनी उपस्थित केली आहे. महाराष्ट्रातील राजकारण व शेती आधारित उद्योगांचा इतिहास पाहिला तर हे सर्व उद्योग काही राजकीय घराण्यांच्या ताब्यात आहेत. साखर, दूध उद्योगात खाजगीकरण आले तरी उसाचे व दुधाचे दर बारामतीतूनच ठरतात असे जनतेचे म्हणणे आहे. वाईन उद्योग सुद्धा बारामती मध्ये रुजला आहे व तेथूनच नियंत्रण हण्याची शक्यता आहे. वाईन मॉल मध्ये विकली तरी त्याचा फायदा शेतकर्यांपर्यंत पोहोचेल की नाही या बाबत शंका घयायला वाव आहे. शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांनी १९८०च्या दशकात वाईनरी सुरु केली होती. त्यांची अडवणूक या राजकारणयांनी केली होती पण ते पुरून उरले. एक महिन्यापुर्वी त्यांच्या वाईनरिला भेट देण्याचा योग आला होता. आता व्यवसायाचा बराच विस्तार झालेला दिसला. राजकारण्यांचा हस्तक्षेप व नियंत्रण जर थांबले तरच वाईनचा नफा शेतकर्यां पर्यंत पोहोचेल नाहीतर ऊस व दुधाच्या शेतकर्यांसारखे यांचे गुलाम बनून रहावे लागेल. शेतकर्यांनी आपल्या शेतात पिकलेल्या मालावर प्रक्रिया करून, मुल्यवर्धन करून विकले तरच त्या पिकाचा रास्त भाव मिळू शकतो. वाईन उद्योग हा त्याचा एक मार्ग आहे. वाईन विक्रीत खुलेपणा येणे चांगले पण त्याचा फायदा मुठभर राजकारणी किंवा उद्यगपतीं पर्यंत मर्यादित न रहाता शेतकर्यांपर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा.
०६/०२/२०२२
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.